‘पालक होण्यामागे विचार असा काही आपण करतो का? करायचा असतो का? आपल्या पालकांनी
आणि त्यांच्या पालकांनी केला होता का? मग आपण का करायचा?’ असे अनेक विचार मनात दरवळले
ना शीर्षक बघून! माझ्याही मनात असे अनेक तरंग उमटून गेले. मानवी मेंदूची जडणघडणच अशी
आहे की ठरवलं नाही तरी विचार होतंच राहतात. आता प्रश्न आहे तो विचारांना दिशा देण्याचा.
ज्या गोष्टी जैविक घड्याळाप्रमाणे आपोआप घडत राहतात त्या विचाराअंती करण्याचा. पालक
होण्याआधी मी, आम्ही विचार केला. त्यामुळे ‘विचार
करावा’ हे मनानं पक्कं ठरवलं होतं पण ‘का करावा’ ते कारण सापडत नव्हतं. या लेखाच्या निमित्ताने ते कारण सापडवायचाही मी प्रयत्न
करते आहे.
आपण कसं पालक असावं, व्हावं याची
सुरूवात कुठे होते, तर जेव्हा आपलं आपल्या पालकांशी पटेनासं होतं तेव्हा! किंवा आजूबाजूला
असलेले आपल्या वयाचे पालक जे करत असतात ते बघून आपल्याला वाटतं, ‘मी असते तर असं नसतं
केलं...’ कसं पालक
असावं यासोबतच विचार सुरू होतो, मला खरंच पालक व्हायचंय का? माझ्या मनाची तयारी आहे
का आयुष्याची एवढी वर्षं (कमीतकमी अठरा!) कोणाची तरी काळजी आणि जबाबदारी घेण्याची?
अजून तर माझंच बालपण संपलंय असं वाटत नाही मला, तर दुसर्याचं बालपण कसं अंगावर घेऊ?
मुक्तपणे अनेक गोष्टी करत असताना असं बंधनात पडायचंय का मला? माझं मातृत्व एका मुलापुरतं
मर्यादित नाही ठेवायचं मला! ते वैश्विक आहे आणि त्यासाठी एका मुलाच्या शारीरिक जडणघडणीत
सामील होण्यापेक्षा माझ्या संपर्कात येणार्या अनेकांच्या मानसिक, अध्यात्मिक जडणघडणीत
सामील व्हावं असं वाटतंय मला! असे उलटसुलट विचार मनात येतात.
आयुष्य
भरभरून जगण्याच्या वेगवेगळ्या संकल्पना असू शकतात प्रत्येकाच्या! निसर्गदत्त गोष्टी
यथाक्रम घडून येणं हे ही त्यात मोडू शकतं. किंबहुना आत्ता आत्तापर्यंत ते त्यात मोडतच होतं की! नातवंडं – पतवंडं पाहिली की धन्य वाटणारी पिढी आहेच ना अजूनही. त्यात काहीच
चूक नाही. पण मग पालक होण्याआधी विचार करण्याची आवश्यकता का निर्माण झाली? आणि कधी?
जग झपाट्यानं
बदलतंय. परिसर, तंत्रज्ञान आणि वातावरणही. हा बदलाचा
वेग काही पिढ्यांपूर्वीपर्यंत इतका नव्हता. मागची पिढी पुढच्या पिढीला मार्गदर्शन करू
शकत होती आणि त्याचा उपयोगही होता. आता जणू प्रत्येकच पिढीला सगळं काही नव्यानं शिकावं
लागतंय. माझे आईबाबा जसे मला विशेष मदत करू शकत नाहीत तसंच मी माझ्या मुलांना विशेष
मदत करू शकणार नाही, या बदलणार्या जगामध्ये!
‘लग्न झालं
की मुलं होतात’ हे वाक्य काही वर्षांपूर्वीपर्यंत खरं होतं. पण आता मात्र ते तितकंसं
खरं राहिलं नाहीए. त्यातला पहिला भाग हा तंत्रज्ञानाचा तर दुसरा भाग समाजमनाच्या परिवर्तनाचा.
गर्भनिरोधक गोळ्या, कॉंडोम यासारख्या गोष्टींमुळे ‘मूल न होऊ देण्याचा’ निर्णय आपल्या
हातात आला. अजूनही काही गोष्टी घडल्या: काही कारणास्तव वंध्यत्वाचं प्रमाण एकीकडे वाढत
चाललंय आणि त्यावरच्या उपायांमध्येही प्रगती होत चालली आहे. दत्तक पालकत्व पूर्वीपेक्षा
अधिक प्रमाणात घडून येताना दिसतंय. स्त्रियांचं शिक्षण आणि बाहेर पडून काम करणं यामुळे
वाढलेला मानसिक आणि शारीरिक परीघही आहे. या सगळ्याचा परिणाम असा की मूल हवं की नको,
किती हवीत, कशी हवीत (जैविक किंवा दत्तक), या सगळ्याचं महागाईशी असलेलं नातं, मनातल्या मनात आजमावून हा निर्णय जाणतेपणी, समजून उमजून
घेणं ओघानंच आलं. आणि असं म्हणतानाच माणसाचे विचार हे त्याच्या ‘प्राणीपणा’तूनच (biological instincts) कसे उद्भवतात हे विसरून चालणार नाही.
लग्न न झालेल्या स्त्री किंवा पुरुषाला मूल असणं हे समाजाला राजरोसपणे अजूनही मान्य
नाहीच. पण अशी उदाहरणं दिसू लागली आहेत. त्याबद्दल दोन्ही बाजूंनी बोललंही जाऊ लागलं
आहे.
मानवाच्या
बाळाला फक्त दुहेरी पालकत्वच नाही तर आख्ख्या गावाची गरज असते कारण ते स्वावलंबी व्हायला
खूप वर्षं जातात. ‘It
takes a village to raise a child’ (मूल वाढवायला आख्खं गाव लागतं!) अशी एक आफ्रिकन म्हण आहेच ना! त्यामुळे ‘आधी
लग्न मग मुलं’ अशी समाजमान्य पद्धत स्थिरावली असेल कदाचित. पण आता पैसे देऊन अनेक गोष्टी
विकत घेता येतात. त्यात मानवी मदतही विकत घेता येते आणि मग दुसरा पालक नसला तरी दुसरी
व्यक्ति त्यातला काही भार का होईना उचलू शकते. आई बाबाची सर याला येत नसेल कदाचित....
आत्ता आत्ता
पर्यंत आईच्या त्यागाची गौरवगीते आपण गातो आहोत. पालकांनाही असं वाटतं की ते मुलं जन्माला
घालून आणि त्यांना वाढवून त्यांच्यावर उपकार करतात वगैरे... पण अजुनही ‘मुलांच्या अस्तित्वाचे
सामाजिक फायदे’ यावर लिहिलेलं मी वाचलं नाहीए. (फक्त सामाजिक फायदे असा उल्लेख एवढ्यासाठी
की जैविक फायदे गृहितच आहेत.)
ज्या जोडप्यामध्ये
स्त्रीला मूल नको असेल आणि पुरुषाला हवं असेल तर त्यांनी काय करावं असा विचार करताना
मला वाटतं की मूल होऊ देण्याच्या निर्णयामध्ये स्त्रीच्या विचाराला अधिक महत्त्व आहे.
आणि हे पुरुषानं मान्य करणं गरजेचं आहे कारण तिचं आयुष्य त्याच्यापेक्षा खूप जास्त
बदलणार आहे. दुसरं असं की ते कधी होऊ द्यायचं
हाही तिचाच निर्णय असायला हवा. अर्थात, ह्यात हे गृहित आहे की तो निर्णय घेण्यासाठी
तिला पुरेसं ज्ञान आहे आणि नसेल तर त्याची जाण आहे आणि शिकून घेण्याची तयारी आहे. यातही
निर्णय तिचाच असला तरी तो त्या दोघांनी मिळून घेणं महत्त्वाचं. गरज पडली तर माहिती
मिळवण्यासाठी, समजून घेण्यासाठी पुरुषानं तिला मदत करणं आवश्यक आहे.
वयाचं घड्याळ दोघांचंही टिकटिकत असतं, पण स्त्रीचं जरा अधिकच! आणि त्याचाही विचार तिचा तिनेच करून
ठरवावं लागतं. एकूणच आपल्याला आयुष्यात जोडीदार असावा की नाही, कसा असावा या विचाराच्याही
आधी आपल्याला मूल हवं आहे की नाही हा विचार मुलींनी करायची गरज निर्माण झाली आहे. आणि
मूल हवं असेल तर मात्र निर्णय घेण्यासाठी ‘डेडलाईन’ आहे. मूल नकोय हे निश्चित असेल
तर मात्र वयाच्या घड्याळाची काही भीती बाळगायचं कारण नाही.
जोडीदार
शोधतानाच आपल्याला पालक व्हायला आवडणार आहे की नाही हे मुला-मुलींनी एकमेकांशी बोलणं
खूप गरजेचं आहे. स्त्री-पुरुष समानता, स्त्री मुक्ती या पार्श्वभूमीवर विचारांची वेळेत
आलेली स्पष्टता आणि ती समोरच्या व्यक्तिला वेळेत कळवणं याची जबाबदारी सगळ्यांचीच आहे.
“आपण पालक होण्यामागे आपला ‘स्वार्थ’ आहे, जन्माला येणार्या
तान्ह्यासाठी केलेला हा परमार्थ नाही, उपकार तर अजिबातच नाही” हे एकदा मनात पक्कं केलं की पालक म्हणून वागताना
आपण आपसूकच वेगळे वागू. पालकत्वाच्या प्रत्येक अंगाचा मनापासून आनंद लुटू, अगदी शी काढण्यापासून ते आजारपणांपर्यंत.
(मागच्या अंकातला लेख वाचण्याकरता इथे क्लिक करा)
(मागच्या अंकातला लेख वाचण्याकरता इथे क्लिक करा)
प्रीती ओसवाल.
No comments:
Post a Comment