आई म्हणून जगताना... पालकत्व कशाशी खातात!

‘लग्न झालं की मुलं होतात’ हे वाक्य काही वर्षांपूर्वीपर्यंत खरं होतं. पण आता मात्र ते तितकंसं खरं राहिलं नाहीये. वेगवेगळ्या गोष्टींचा निर्णय आपल्या हातात आलाय आणि उपलब्ध पर्यायही बहुत झालेत. पालकत्वाचाही निर्णय असाच आपणच घेऊ शकू अशी परिस्थिती कमीत कमी शहरी, सुशिक्षित मध्यम वर्गीय कुटुंबांमध्ये तरी निर्माण झाली आहे. मीही साधारण अशाच कुटुंबामधून जगत असताना आणि सजगपणे पालकत्वाचा निर्णय घेऊन आता त्याचा आनंद घेत असताना माझे विचार, कृती इतरांना सांगण्याचा मला मोह होत आहे. आमचं मूल जन्माला आलं तेव्हाच माझाही आई म्हणून जन्मझाला. त्यामुळे मी ‘दोन वर्षांची आई’ आहे. आणि तिथवरचेच अनुभव मी स्वतः घेतलेले आहेत. पुढच्या अनुभवांची मानसिक तयारी आणि आजूबाजूची निरिक्षणं चालू असली तरी ही ‘लंबी रेस’ आहे, हे मला ठाऊक आहे.  

पालक होण्यापूर्वी काय विचार केला होता मी? आम्ही? पालक म्हणून जगत असताना कसा विचार होतो आहे? याबद्दल आपण इथे बोलणार आहोत. ह्या प्रवासात जगून झालेलं आयुष्य आणि खुणावणारं भविष्य या दोन्हीबद्दल मी लिहिणार आहे. त्यावर तुमची मतं, प्रतिक्रिया, प्रश्न आले तर या संवादात अधिकच धमाल येईल, असं मला वाटतं. अजून एक गोष्ट म्हणजे, काळ इतका झपाट्यानं बदलतो आहे की ‘अमूकच बरोबर आणि अमूक एक चूक’ असं म्हणणंच ‘चूक’ ठरेल कदाचित. आणि नुसता काळच नाही तर प्रत्येकाची परिस्थिती वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी असते. तेव्हा इथे लिहिलेल्या सर्व गोष्टी या मला पटल्या, मी केल्या अशा प्रकारातल्या आहेत. मी केलं म्हणून सगळ्यांनी तेच करावं असं अजिबात नाही. नवीन विचार ऐकायला मी उत्सुक असते आणि बदल आपापल्या गतीने होत राहतो. त्यामुळे मी कोणावर बंदूक रोखलेली नाही आणि तशी ती कोणी माझ्यावरही रोखू नये अशी अपेक्षा आहे. (मला मारामार्‍या विशेष आवडत नाही.) अजून एक गंमतीशीर गोष्ट मला स्वतःबद्दल जाणवली आहे ती म्हणजे, ‘I am very rigid about being liberal! (प्रत्येक व्यक्ती मुक्त विचारांची असलीच पाहिजे या विचाराबद्द्ल मी कट्टर आहे!)

पुढचे काही महिने आपण नियमितपणे भेटावं असा इरादा आहे. त्या भेटण्यामध्ये जे विचार मी हाताळू पाहते आहे ते साधारणपणे असे आहेत-
पालक होणं हे विचारपूर्वक ठरवलं पाहिजे आणि पालक होण्यासाठी नीट शिकायचीही तयारी पाहिजे. हे करूनसुद्धा पालक झाल्यावरही सतत स्वतःचं निरिक्षण आणि स्वतःत सुधारणा करत जाणं कसं अपरिहार्य ठरतं. बाबा पालक आणि आई पालक यांनी कितीही सगळं करायचं ठरवलं तरी त्यात थोडा फरक पडतोच. पण तेवढा अपवाद वगळता इतर गोष्टी करताना आई-बाबा यांचं स्त्री किंवा पुरुष असणं कसं मध्ये येऊ नये याबद्दलही आपण खल करणार आहोत. प्रत्यक्ष जन्म देऊन झाल्यानंतरचा पहिला मोठा फरक म्हणजे आईजवळ असलेले दुधाने भरलेले स्तन. स्तनपान आणि त्या संदर्भात असलेले समज, गैरसमज, फायदे, तोटे, सध्याचे ट्रेंडस इत्यादीवर बोलूयात ‘पाजू आनंदे’ मध्ये. तान्हं बाळ म्हटलं की चारच महत्त्वाच्या गोष्टी डोळ्यासमोर येतात, शी, शू, मंमं, गाई गाई! त्यातला मंमंचा विचार करून झाल्यावर आता ‘शी-शू काढण्यामागचा विचार’ आपण करू. आणि झोपेबद्दल बोलू ‘work in progress, don’t disturb’ मध्ये. बाळ मोठं होत जातं तसं पालकांना आपल्या पालकत्वाआधीच्या आयुष्याची सय यायला लागते. ‘तसे’ दिवस परत कधी येणारच नाहीत का? अशा विचारांनी हादरून जायला होतं. पैशासाठी किंवा आनंदासाठी किंवा दोन्हीसाठी घरकामापलीकडचे काम करणार्‍या स्त्रियांच्या मनाची दोन्ही बाजूने उलघाल सुरू होते. मग आपण नेमके सुपर वुमन आहोत का सुपर आई आहोत हे कळेनासं होतं. स्त्रियांच्या मनातील उलघाल अगदी समजूतदार पुरुष मित्रही बर्‍याचदा समजून घेऊ शकत नाही. आणि इतर आई झालेल्या स्त्रिया म्हणतात, “आम्ही केलंच ना, त्यात काय एवढं!” मग या उलघालीत स्त्रीने कोणाशी बोलायचं आणि स्वतःच्या भावनांचं जाळं कसं सोडवायचं?

मग प्रेम दाखवायच्या समाजमान्य आणि पिढ्यानुपिढ्या चालत आलेल्या पद्धतीचा सहारा घेतला जातो, अगदी नकळत. वेगवेगळ्या गोष्टी मुलांना खाऊ घातल्या जातात, अखंडपणे. अन्नाला घेऊन तर आपण इतके सवयीचे गुलाम आहोत की बस्स! खाण्याबद्दल बोलू काही ‘कधी आणि काय खाऊ घालू?’ मध्ये.

बाळाचे बोबडे बोल ऐकायला आसुसलेले मोठे स्वतःच अनेक बोबडे बोल बाळांशी अगदी सुरुवातीपासून बोलत असतात. बाळांशी नेमकं काय बोलायचं? काय बोलायचं नाही? याबद्दल चर्चा करूयात ‘गप्पाष्टके’ मध्ये. भावना आधीही असतात पण मूल बोलायला लागतं आणि त्याच काळात भावनाकल्लोळही सुरू होतो. ‘टेरीबल टूज’चं काय करायचं असा प्रश्न पडतो. अजूनही अनेक गोष्टी आहेत, कपडे, संस्कार, आजीआजोबा, शाळेचं माध्यम, टिव्ही, कॉम्प्युटर, मोबाईल यांचा वापर... अजूनही अनेक असतील ज्याबद्दल बोलावं असं तुम्हाला वाटेल, ते जरूर सुचवा. जवळजवळ सर्व आईबाबांना या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं. प्रत्येक जण वेगळा विचार करतो, वेगळा निर्णय घेतो, घेतलेल्या निर्णयाचे चांगले वाईट परिणाम बघतो. कधी स्वतःचे निर्णय चुकले अशा विचाराला पोहोचतो, कधी चुका मान्य करतो. या सगळ्या प्रवासात खुल्या मनाचे सहप्रवासी मिळाले तर प्रवास सुखकर होतो.

हा छोटासा प्रयत्न आहे, माझा आनंद तुमच्यासोबत वाटून घेण्याचा आणि माझा आणि तुमचा प्रवास सुखकर करण्याचा!

प्रीती ओ.

No comments:

Post a Comment