आई पालक – बाबा पालक


दिलेली तारीख उलटून एक आठवडा झाला होता. डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की सगळं आलबेल असलं तरी एक्केचाळीसाव्या आठवड्यानंतर अजून पुढे थांबणार नाही. त्या दिवशी ‘इंड्युस’ करणार. कळा येण्याची औषधं चढत्या क्रमानं सुरू करणार. आम्ही सर्व तयारीनिशी ‘लेबररूम’ मध्ये पोहोचलो. रात्रीची वेळ होती. एकेक करत फॉर्मॅलिटीज सुरू झाल्या. तिथल्या एका नर्सने मला विचारलं, “तुमच्या सोबत कोणी लेडीज नाही का?” मला आधी या प्रश्नाचा रोख कळला नाही, पण लवकरच तो लक्षात आला. माझ्या सर्वांत अवघड परिस्थितीत मदत करायला माझा नवरा लेबर रूममध्ये माझ्या सोबत होता. मागे वळून बघताना मला वाटतं, त्यानं जेवढी उत्तम साथ मला केली तेवढी इतर कोणीच ‘लेडीज’ करू शकली नसती, कारण बाळ आम्हा दोघांचं होतं ना! माझ्या आयुष्यातल्या काही अत्युच्च प्रसंगांपैकी तो एक आहे. बाळ माझ्या पोटात होतं, पण प्रसूती आम्ही दोघांनी मिळून केली. कळा माझ्या शरीरात सुरू होत होत्या, पण अखंड घट्ट पकडलेल्या हातातून त्या त्याच्यापर्यंत पोहोचत होत्या. जे तो करू शकत नव्हता ते मी करत होते, पण ते सोडता तो इतर सर्व काही करत होता आणि पुढची अनेक वर्षं करत आहे.

(c) RubberBall Productions/Getty Images
Source: https://www.verywellfamily.com/
ways-to-comfort-a-woman-giving-birth-2753063
खरंतर या शेवटच्या वाक्यात सर्व काही आलं. आता फक्त  बारकावे लिहायचे राहिले. बाबा पालकाने काय काय करावं? तर ‘जमेल ते’ सर्व काही करावं. जन्म देणं, नंतरची काही वर्षं ‘पाजणं’ सोडता ‘तो’ सर्व काही करू शकतो, फक्त त्याची तयारी पाहिजे. काही गोष्टींसाठी मनातला अडथळा दूर करावा लागेल, तर काही गोष्टी प्रत्यक्ष शिकून घ्याव्या लागतील. इतकं करूनही सगळ्या गोष्टी दोघांमध्ये पुर्‍या होत नाहीत. अजून मदत लागते. 

तर तीही प्रत्येकानं आपापल्या सोयीसवडीनं घ्यावी. पण उपलब्ध असेल आणि शक्य असेल तर बाबा पालकाने या सगळ्याचा जरूर विचार करावा. जमेल तेवढा आचारही करावा. तो एक पुरुषप्रधान  संस्कृतीतला ‘पुरुष’ आहे हे त्याच्या बाबा असण्याच्या मध्ये आलं नाही की सगळं मिळवलं.

‘बाबा पालकानं काय काय करावं?’ असा प्रश्न विचारण्याचं कारण असं की मूल जन्माला घालण्यापासून ते थोडं मोठं होईपर्यंत तरी ती फक्त आईचीच जबाबदारी समजली जाते. मी तर असेही उद्गार ऐकलेले आहेत, “तिची मुलं आणि तिचा नवरा एवढं तर तिला संभाळावं लागेलच ना!” म्हणजे सांभाळ  करावा लागण्याच्या स्कोअरमध्ये ३ विरूद्ध १ असा असमतोल समाजालाच अपेक्षित आहे. आणितो आपण आजवर मान्यच केला आहे. त्यातल्या त्यात बाहेर जाऊन काम करून पैसे मिळवून आणणंएवढंच काय ते पुरुषाकडून अपेक्षित. काही अभागी कुटुंबांत तर तेही दिसत नाही. सगळं करायचं वर नवर्‍याचा मारही खायचा!

आजचं कुटुंबाचं बदललेलं चित्र इतिहासात कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे आजच्या अपेक्षाही पूर्वीकधी नव्हत्या. विभक्त कुटुंबाबरोबर स्त्री-पुरुषांवरच्या जबाबदार्‍याही बदलल्या. स्त्री-पुरुष यांच्यामधले मूलभूत जैविक फरक अजूनतरी बाजूला सारता येणार नाहीत. पण त्या फरकांतूनजन्माला आलेले दुय्यम फरक बाजूला सारता येणं शक्य आहे. अर्थात, ते तेवढंच अवघड आहे. दोघांनाही त्यावर काम करावं लागणार हे गृहीतच आहे. बोलण्याशिवाय पर्याय नाही. स्वतःला आणि दुसर्‍याला समजावून सांगावं लागणार. मनात नुसत्या अपेक्षा ठेवून चालणार नाही. त्या योग्य मार्गानंमांडाव्या लागणार. एकदा सांगून संपेल असं नाही. परत परतही काही गोष्टी चर्चिल्या जातील.

हा बदल कोणी घडवून आणावा? तर शक्य असेल, इच्छा असेल त्या सर्वांनी! तुम्ही पालक असाल तर आपल्या मुलामुलींमध्ये भेद करू नका. तुम्ही एक प्रौढ असाल तर आजूबाजूच्या सर्वंच मुलामुलींशी वागताना हे लक्षात ठेवा. त्यांना त्यांच्या ‘जेंडर’ची सतत आठवण करून देऊ नका. त्यांचे कपडे, त्यांची खेळणी, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं, ते करत असलेल्या गोष्टी या कश्शाकश्शात भेद करू नका. खेळण्यातल्या वाघोबाला स्वतःच्या छातीशी घेऊन दूध पाजणार्‍या मुलग्याला आत्ता थांबवलंत तर उद्याच्या उत्तम बाबापालकाच्या प्रगती आड तुम्ही येत आहात. आई सतत सोबत असल्यामुळं स्त्रीलिंगी बोलणारे मुलगे कालांतरानं आपोआप पुलिंगी बोलू लागतील. त्यांना ते ‘मुलगा’ असल्याची सतत जाणीव करून देण्याची खरंच गरज आहे का हे एकदा मनाला विचारून बघा ना! लहान मुलं (मुलगी - मुलगा) आपल्या आई आणि बाबा दोघांनाही बघतच असतात. त्यांच्यामध्ये फरक आहे हे त्यांच्या लक्षात येतच असणार. आणि कालांतराने जग मुख्यतः स्त्री आणि पुरुष अशा दोन भागात विभागलेलं आहे हे ही त्यांना जाणवेलंच ना! मग “तू मुलगा,मुलगी आहेस ना, म्हणून तू हे असं करायचं किंवा करायचं नाही.” हे वाक्य आपल्या बोलण्यातून बादच करता येईल का? मुली आणि मुलगे यांच्याशी जैविक फरकांबद्दल, जैविक धोक्यांबद्दल बोलावे तर लागेल पण ते बोलणारे निवडकच लोक असतील प्रत्येकाच्या आयुष्यात.

सुरुवातीच्या काळात आईची रात्रीची झोप पुरी होत नाही. बाबा दिवसभर कामासाठी बाहेर जाणारा असेल तर त्यालाही पूर्ण झोपेची गरज असते. इतर सर्व कामं बाबा करू शकला तरी पाजण्यासाठी आईला उठावं लागणारच. तेव्हा दोघा दोघांनी रात्रीची झोप अर्धवट करण्यापेक्षा एकाने म्हणजे आईनेच ही जबाबदारी घेतल्याचा फायदा होतो. पण मग त्या झोपेची भरपाई करायला दिवसाच्या कामांमध्ये बाबा पालकाची मदत गरजेची ठरते. अगदीच मदत नसेल तर कमीतकमी मूल होण्यापूर्वीसारख्या अपेक्षा तरी नसाव्यात.
  
गर्भधारणेपासूनच स्त्रीच्या शरीरातले मोठ्ठे बदल सुरू होऊन जातात. इतर वेळी शांत, संयमी असलेल्या स्त्रीलाही ह्या रसायनांना शरण जावं लागतं. बाबा पालकालाही बदलांना सामोरं जावं लागतंच, पण अगदी शरणागती पत्करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली नसते. त्यामुळे गरोदर स्त्रीला सांभाळून घेणं इथपासून बाबाच्या कामाला सुरुवात्त होते. जे उघडपणे बाबाचं काम आहे. त्याबद्दल अर्थातच आपण इथे बोलत नाही आहोत.  गर्भारपणात सगळ्यात महत्त्वाच्या दोनच गोष्टी असतात, कुटुंबातल्या सगळ्यांचं, खास करून गरोदर स्त्रीचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखणं. आणि ह्यासाठी सगळ्यांनीच त्या काळात झटावं, होणार्‍या आई आणि बाबाने तर नक्कीच. ह्याचे परीणाम दूरगामी असतात आणि ते जन्माला आलेल्या पिलामध्ये निश्चितपणे जाणवतात.

उत्तरार्ध

स्त्रीपुरुषांच्या कामांमधल्या फरकावरून अनेक चर्चा आत्तापर्यंत मी केल्या असतील. अजूनही समाधानकारक उत्तर मला सापडलेलं नाही. मध्यमवर्गीय शहरी वर्गात घरकाम कमी लेखलं जातं कारण ते ‘आऊटसोर्स’ करता येतं. आणि त्या मिळालेल्या वेळात घरातली स्त्री बाहेर पडून अधिक पैसे मिळवू शकते. पण जिथे हा पर्याय उपलब्ध नाही तिथे कोणीतरी पूर्ण वेळ घराकडे, म्हणजे अवलंबून असलेल्या कुटुंबातील घटकांकडे सक्षमपणे बघणं आलं. म्हणजे म्हातारी माणसं आणि लहान मुलं!


यातल्या पहिल्या घटकाला पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. पण स्वतःहून मूल होऊ द्यायचं ठरवलं तर त्यांची काळजी घेणं याला काही पर्याय नाही. आणि दुसर्‍या माणसाने ह्या सगळ्यासाठी लागणारा पैसा मिळवणं आलं. पुरुषांच्या करीअरमध्ये खंड पडत नसल्यामुळे त्यांना प्रगतीची शिडी लवकर चढत राहता येते. हे प्रत्येक स्त्रीच्या बाबतीत शक्य होतंच असं नाही. प्रत्येकाकडून पैसे मिळवून देण्याच्या बुद्धिमत्तेची अपेक्षा करणंही चूक आहे. अशा परिस्थितीत जो जास्त पैसे, सन्मानाने, आनंदाने मिळवू शकेल त्याने ते मिळवून स्वतःसाठी आणि घरासाठी वापरावे आणि जे इतर गोष्टी करू शकतील त्यांनी त्या कराव्यात अशी विभागणी स्वाभाविक वाटते. यातली मेख ही आहे की पैसे मिळवणं ही महत्त्वाची गोष्ट असली तरी इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत हे विसरून चालणार नाही. त्यामुळे पैसे मिळवणार्‍याच्या हातात सर्व सत्ता, निर्णयाचे सर्व अधिकार, आणि घरातले बाकी सगळे त्याच्या दिमतीला, अशी विभागणी होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.

Creator: Juice Images / Alamy
© Juice Images / Alamy
नोकरदार वर्गामध्ये पैसे मिळवण्याचं काम आठ ते दहा तासांचं. बाकी वेळ त्यांचा स्वतःचा. घरकाम करणार्‍या व्यक्तीचं मात्र तसं नाही. लहान मुलं असली तर चोवीस तास कामाचेच असं म्हणणंही अतिशयोक्ती होणार नाही. पाजणार्‍या आईला इतर काही ऐकू आलं नाही तरी झोपेतही आपल्या मुलाचं ‘आई, ममं’ एवढं निश्चित ऐकू येतं. यातला काही भाग आनंदाचा असला तरीही पूर्ण घरकाम आनंदाचं असेलच असं नाही. पण ते करण्याला पर्याय नसतो हे ही तेवढंच खरं. अशा वेळी आई आणि बाबा यांच्या कामाची वाटणी सारखी आहे का? पैसे मिळवण्याच्या अवघड पण कमी वेळाच्या कामानंतर न पैसे देणार्‍या पण गरजेच्या असलेल्या आणि जास्त वेळाच्या कामामध्ये बाबाने मदत करावी की नाही? का घरकाम करणार्‍या आईकडून पूर्ण घरकामाची अपेक्षा करावी? याची उत्तरं प्रत्येक जोडप्यासाठी वेगवेगळी असतील. प्रत्येकाचा काम करण्याचा वेग काय? शारीरिक क्षमता काय? आई लोकांना वैयक्तिक वेळ नावाची काही गोष्ट उपलब्ध असते का? असायला हवी का? आनंदासाठी, अस्मितेसाठी घरकामाव्यतिरिक्त काही काम त्यांनी करावं का, पैसे कमी मिळाले तरीही? मग वेळ आणि पैशाचा हिशोब कसा मांडायचा? पैशात मोजता न येणार्‍या गोष्टींचं काय करायचं? असे अनेक प्रश्न पोट भरल्यावर सुचायला लागतात. हो, खरंच! कारण तोवर परिस्थितीचा रेटाच इतका असतो की मिळेल ते काम करून, मिळेल तेवढे पैसे मिळवून रोजचा दिवस आणि हा महिना नीट पार पडेल ना एवढाच घोर लागलेला असतो. पण आपल्यातले अनेक जण त्या वर्गात नाहीएत हाच तर खरा प्रश्न आहे! 


प्रीती
 ओ. 

2 comments:

  1. लेख आवडला. आज शहरात परिस्थिती बदललेली असली तरीही, maternity leave भले सहा महिन्यांची झाली असली तरीही, मूल झाल्यावर नोकरी सोडणाऱ्या मुलींची संख्या खूपच आहे. अर्थात याला त्या करत असलेल्या कामाचं स्वरूप, द्यावा लागणारा वेळ हे जरी अंशतः कारणीभूत असलं तरीही, काम करणाऱ्या बाईसाठी मुल होऊ देण्याचा विचार करणं हो मोठाच आणि बहुतांश धाडसी निर्णय असतो.
    हा विचार लेखातून मांडल्याबद्दल अभिनंदन.

    ReplyDelete
  2. धन्यवाद अभिजीत!

    ReplyDelete