आईचं पत्र

 


आम्ही लहानपणी एक खेळ खेळत असू. त्या खेळात आम्ही सर्व मुलं रिंगण करून बसत असू. एक भिडू हातात एक रुमाल घेऊन त्या रिंगणाच्या बाहेरून "आईचं पत्र हरवलं" असं म्हणत गोल फिरत असे. बाकी गोलाकार बसलेल्या सर्वांचे डोळे बंद असत आणि ते त्याच्या त्या "आईचं पत्र हरवलं" या घोषणेला, "ते आम्हाला सापडलं" असं प्रत्युत्तर देत असत. मग तो रिंगणाबाहेर फिरणारा भिडू, बसलेल्या कोणा एका मुलाच्या मागे तो रुमाल हळूच टाकून त्याच्या खांद्यावर धप्पा करून त्या रिंगणाभोवती पाळायला लागत असे. तोंडाने "आईचं पत्र हरवलं" असं म्हणत म्हणत पळत असे आणि ज्याच्या मागे तो रुमाल टाकला गेला आणि ज्याला खांद्यावर धप्पा मिळाला तो भिडू तो रुमाल हातात घेऊन " ते मला सापडलं" असं तोंडाने म्हणत म्हणत त्या दुसऱ्या भिडूला रिंगणाच्या गोल फिरून त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असे. जेव्हा तो पकडला जाईल तेव्हा मग पकडला गेलेला भिडू रिंगणात बसत असे आणि असा खेळ पुढे चालू राही. लहानपणी हा खेळ खेळायला खूप मजा येत असे आणि त्याच वेळी 'पत्र' या एका हळव्या वस्तूशी मनही अजाणता हळूच जोडले  जाई.

 


माहिती तंत्रज्ञान आणि संदेशवहन क्रांतीचा उदय आमच्या पिढीने खूप जवळून अनुभवला. आधुनिक काळगणनेचे जसे 'ख्रिस्तपूर्व आणि पश्चात' असे दोन भाग मानले गेले तसेच आमच्या पिढीने 'मोबाईल पूर्व आणि मोबाईलपश्चात' असे दोन्ही काळ जवळून पाहिले, अनुभवले, अनुभवत आहोत. मोबाइलपूर्व काळात मी कामानिमित्त अमेरिकेत वास्तव्य करत असताना घरचं पत्रं येण्याची वाट पाहत मनात चाललेली हुरहूर कशी असते याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतलेला आहे.

 

भारतात दूरध्वनी करणं परवडत नाही म्हणून आठवड्यात एखादा दिवस ठरवून अगदी वेळ मोजून फोनवर सगळ्या आठवड्याची ख्याली खुशाली देणे-घेणे आणि घरच्या सर्व मंडळींची चौकशी करण्याची कसरत मी केलेली आहे. आता मोबाईलक्रांतीमुळे जगात कुठेही कुणाशीही, कितीही लोकांबरोबर हवं तेव्हा, हवं तितका वेळ बोलण्यासाठी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग करून जवळ जवळ प्रत्यक्ष भेटल्याचा अनुभव आपण घेऊ शकतोय. विशेषतः सध्याच्या कोरोनाच्या कठीण काळात तर हे तंत्रज्ञान देवदूतासारखं कामाला आलंय.

 

या मोबाईल तंत्रज्ञानाचे फायदे तोटे या चर्चा खूप रंगतात आणि त्यात दोन्ही बाजू तितक्याच तुल्यबळ असतात. त्यात कुठला पक्ष योग्य या चर्चेत मला जायचं नाही. पण मोबाईल क्रांतीमुळे घडलेली एक गोष्ट मला काही दिवसांपूर्वी लक्षात आली आणि त्यासंदर्भात विचार सुरु झाले. मला असं लक्षात आलं की या मोबाईल क्रांतीत सांकेतिक दृष्ट्या "आईचं पत्र" हरवलंय. म्हणजे पत्रं ही संकल्पनाच लोप पावत चालली आहे.

 

प्रश्न असा पडतो की ई-मेल आणि मोबाईल तंत्रज्ञानाच्या व्हाट्सऍप युगात पारंपरिक अर्थाने पत्रं लिहिण्याची सवड खरंच कुणाकडे आहे का? आणि तशी गरज आहे का? यावर थोडा विचार केल्यावर मला असं लक्षात आलं की केवळ संदेशवहन हा पत्राचा मर्यादित उपयोग विचारात घेतला तर या प्रश्नांचं उत्तर 'अजिबात नाही' असंच द्यावं लागेल. आणि तसं आधुनिक तंत्रज्ञान त्याला उत्तम आणि अधिक सक्षम पर्याय नक्कीच आहे. पण पत्र म्हणजे केवळ कागदावर खरडलेली अक्षरं नसून, त्या पत्राशी निगडित सर्व व्यक्तींच्या आयुष्यातील घटना आणि भावना यांचा त्या काळातील दस्तावेज असा अर्थ घेतला तर मग पत्रं या संकल्पनेचं अनन्यसाधारण महत्व आपल्याला लक्षात येतं.

 


यावर चिंतन करताना या संदर्भानेच अजून काही गोष्टी जाणवल्या. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आणि संदेशवहनातील वेगामुळे माणूस अधिकाधिक व्यग्र होतोय पण व्यक्त मात्र खूप कमी व्हायला लागलाय. व्यग्रतेच्या रेट्यापुढे व्यक्त होण्याकडे दुर्लक्ष होतंय. पूर्वी पत्रं हे व्यक्त होण्याचं साधन होतं. पत्रं हे मन मोकळं करण्याचं साधन होतं. पत्रं हे चिंतनाचं आविष्कृत अवजार होतं. सध्या लोक समाज माध्यमांवर भरभरून लिहीतायत याबद्दल वाद नाही पण ते संदेश वाचले तर मला तरी ते संदेश म्हणजे त्यांच्या आयुष्यतील घटनांच्या वैयक्तिक जाहिरातीच अधिक वाटतात. अर्थात ते साहजिक आहे कारण आपण वॉलवर जाहिरातीच लावतो, मन मोकळं नाही ना करत!.

 

पत्राद्वारे जे 'ह्या हृदयीचे त्या हृदयी' घालणं होतं ते समाजमाध्यमातील पोस्टवरून कसं होईल? समाजमाध्यमं माणसांचा माणसांशी 'संपर्क' वाढवत आहेत पण प्रश्न असा आहे की 'मानवी संबंध' बळकट होत आहेत का?. पत्रं हे संपर्कातून संबंध जोडण्याचं काम करायचं. संदेशातून संवाद साधण्याचं काम करायचं. ते हळवं सांकेतिक "आईचं पत्र" सापडतं का हल्ली?

 


अत्यंत प्रतिभावान शास्त्रज्ञ लेखक कै.डॉ.मो.रा.गुण्ये यांनी अल्बर्ट आईन्स्टाईनच्या जीवनावर लिहिलेला "आईन्स्टाईनचे मनोविश्व" हा ग्रंथ काही दिवसांपूर्वी वाचनात आला. ते पुस्तक वाचताना प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट म्हणजे अल्बर्ट आईन्स्टाईन याने त्याच्या संशोधनाबद्दल, जीवनाबद्दल आणि सद्यपरिस्थितीबद्दल अनेक मित्र, सहकारी आणि नातेवाईकांना अगणित पत्रं लिहिली आहेत, त्याचे त्या पुस्तकात अनेक संदर्भ दिलेले आहेत. या पत्रांत आईन्स्टाईन यांचे विज्ञानाबद्दलचे विचार, संशोधनाबद्दलचा आंतरिक संघर्ष आणि आपल्या विचारश्रुंखलेवरचा आत्मविश्वास, त्यांची मनोभूमिका, त्यांची एकंदरीत जीवनाबद्दल असणारी वैचारिक भूमिका याचं स्वच्छ प्रतिबिंब पडलेलं जाणवतं.

 

आईन्स्टाईन एक अलौकिक, युगपरिवर्तन करणारे शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्धीस येण्यापूर्वी त्यांनी पाठवलेली अगणित पत्रं हीच त्या अलौकीक शास्त्रज्ञाची मानसिक आणि वैचारिक जडणघडण दाखवणारे विश्वासपात्र दस्तावेज ठरले आहेत. ती पत्रं जेव्हा लिहिली गेली तेव्हा इतरांनाच काय पण दस्तुरखुद्द अल्बर्ट आइन्स्टाईन यांना तरी कुठे माहिती होतं की ते पुढे युगप्रवर्तक शास्त्रज्ञ म्हणून ख्यात होणार आहेत. पण स्वतःला व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांनी त्यावेळी त्यांनी लिहिलेली पत्र आज सर्व समाजाला मार्गदर्शक ठरत आहेत. मला वाटतं या दृष्टीने 'पत्राचं महत्त्व' अतुलनीय आहे.

 

जे आईन्स्टाईन यांच्या बाबतीत तेच थोर समाजसेवक अल्बर्ट श्वाइट्झर, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद आणि अशा अनेक युगपरिवर्तन करणाऱ्या महापुरुषांच्या बाबतीतही खरे आहे. कधी कधी त्यांच्या कार्याचा आढावा घेतला तर वाटतं ,की त्यांना त्यांचं अलौकिक कार्य करत असताना इतकी पत्रे  लिहायला वेळ कसा मिळाला असेल? अल्बर्ट श्वाइट्झर यांच्या बाबतीत असं सांगतात की आफ्रिकेतल्या दाट जंगलातही त्यांच्या कार्यस्थळी त्यांना असंख्य पत्रे  येत असत आणि ते सगळ्या पत्रांना उत्तरं दिल्याशिवाय झोपत नसत. हे वाचल्यावर मी आश्चर्याने दिग्मूढ झालो. विचार आला की व्हाट्स अँपवर  आलेल्या संदेशांना सुद्धा उत्तर म्हणून पूर्ण वाक्य न लिहिता वेळ वाचवायला आम्ही एक किंवा अधिक इमोजी टाकतो. पण या प्रचंड कार्य करणाऱ्या महात्म्यांना इतकी असंख्य आणि मोठी पत्रं लिहिण्याची उर्मी, शक्ती आणि वेळ कुठून मिळत असेल? हे कसं शक्य केले असेल त्यांनी?

 

विचार केल्यावर लक्षात आलं की तंत्रज्ञान भले सोय करतं, पण सवड आपल्यालाच काढायला लागते. तंत्रज्ञान वेग देतं पण वेळ आपल्यालाच द्यावा लागतो. तंत्रज्ञान सुविधा पुरवतं पण उर्मी आपल्यालाच असावी लागते. जर उर्मी असेल तर मग आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करूनही पत्रं संस्कृती लोप पावण्याऐवजी उलट अधिकाधिक माणसांबरोबर केवळ संदेशांची देवाणघेवाण न होता संवाद घडू शकेल. मागे वळून पाहताना या दस्तावेजांच्या मदतीने आयुष्य पुन्हा एकदा जगता येईल.

 

हे लक्षात आल्यावर ठरवलंय की माझ्याकडून तरी शक्य तितका संदेशांपेक्षा संवादांवर भर द्यायचा आणि तंत्रज्ञानाचा आधुनिक पोस्टमन मदतीला घेऊन पूर्वीची 'पत्रं संस्कृती' नवीन रूपात पुनरुज्जीवित करण्याचा माझ्यापुरता तरी प्रयत्न करायचा. अर्थात माझ्या आयुष्याचा दस्तावेज अल्बर्ट आईन्स्टाईन, स्वामी विवेकानंद , अल्बर्ट श्वाइट्झर इतक्या महानतेचा नसेल कदाचित. पण काळाच्या ओघात कधीतरी पाठवलेले "आईचं पत्र" आयुष्याच्या रिंगणाभोवती फिरत असताना न हरवता निदान मला तरी सापडलं तर माझ्यापुरते  मात्र ते खूप मौल्यवान असेल.

 

राजेंद्र वैशंपायन



rajendra.vaishampayan@gmail.com

1 comment:

  1. लेख आवडला. पत्रसंस्कृती पुनरुज्जीवित करण्याचा लेखकाचा संकल्प
    अभिनंदनीय आणि अनुकरणीय.

    ReplyDelete