आकाश झेप' भाग १४: समुद्री विमाने (Seaplanes)

 

ही बातमी एका वर्षापूर्वीचीच! 'भारताची आता गुजरातमध्ये पहिली समुद्री विमान सेवा.' गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यातील केवडियाजवळ 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' आणि अहमदाबादमधील 'साबरमती रिव्हरफ्रंट' दरम्यान ही समुद्री विमान (सी-प्लेन) सेवा सुरू झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या सेवेचे उद्घाटन केले. 'स्पाईस-जेट' कंपनीचे हे विमान १९ प्रवासी घेऊन जाते. ४० मिनिटांचा हा रोमहर्षक प्रवास, फक्त १५०० रुपयांमध्ये! 

                       

छायाचित्र: "स्पाईस जेट " समुद्री विमान सेवा

'समुद्री विमान' हे एक निश्चित पंख (Fixed Wing) विमान आहे, जे पाण्यावरून उड्डाण आणि पाण्यावर उतरण्यास सक्षम आहे. 'समुद्री विमाने' सामान्यत: त्यांच्या तांत्रिक वैशिष्ट्यांवर आधारित दोन श्रेणींमध्ये विभागली जातात: 'पाण्यावर तरंगणारे विमान' (Floatplane) आणि 'हवेत उडणारी नौका' (Flying Boat). त्यापैकी 'हवेत उडणारी नौका' हा विमान प्रकार सामान्यतः बराच मोठा असतो आणि बऱ्याच गोष्टी वाहून नेऊ शकतो. 

१. 'पाण्यावर तरंगणारे विमान' या प्रकारामध्ये पातळ तराफा (Floats) असतात, ते विमानाच्या मुख्य धडाच्या (Fuselage) खाली बसवल्या जातात. 

२. उडत्या बोटीमध्ये, उत्प्लावनतेचा (Buoyancy) मुख्य स्त्रोत म्हणजे मुख्य धड (Fuselage), जे पाण्यात जहाजाच्या कवचासारखे काम करते, कारण मुख्य धडाच्या (Fuselage) खालच्या भागाला द्रायुगतिक (Hydrodynamic) आकार देण्यात आला आहे, ज्यामुळे पाणी त्याच्या सभोवताली वाहू शकते. 


फ्रान्सच्या अल्फोन्स पेनॉड याने १८७६ मध्ये नावेचे धड (Fuselage) आणि मागे घेता येण्याजोगी अवतरण यंत्रणा (Landing Gear) अशा विमानासाठी पहिले एकस्व (Patent) दाखल केले.ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स आणि अमेरिका या देशातील  प्रवर्तकांनी देखील विमानांना तराफा (Float) जोडण्याचा प्रयत्न केला. २ मार्च १९१० रोजी फ्रान्सचे हेन्री फॅब्रे याने जीनोम ओमेगा या हवाई इंजिनवर चालणारे 'हायड्राव्हियन ट्रायमरन फ्लोट प्लेन' उडवले. हे यशस्वी उड्डाण केलेले पहिले समुद्री विमान (सी प्लेन).


दुसऱ्या महायुद्धानंतर समुद्री विमानांचा वापर हळूहळू कमी झाला, कारण त्या युद्धाच्या वेळी जमिनीवरील विमानतळांमध्ये गुंतवणूक वाढली. आजही २१ व्या शतकात, समुद्री विमानांचा काही विशिष्ट उपयोग होतो, जसे की हवाई अग्निशामक, द्विपसमूहांच्या आसपासची हवाई वाहतूक आणि अविकसित किंवा रस्ताविरहित भागांत प्रवेश, जसे की मोठे तलाव, मोठे नदी पात्र. आणखी एक प्रकार आहे. 'उभयचर विमान' (Amphibious Aircraft) एक असे विमान आहे, जे जमिनीवर आणि पाण्यावर उड्डाण करू व उतरू शकते.शाळेमध्ये असताना आपण उभयचर प्राण्यांचा अभ्यास केला होता.जे प्राणी दोन्ही प्रकारचे (जमिनीवर व पाण्यात) जीवन जगू शकतात, ते 'उभयचर प्राणी', जसे की 'बेडूक', हो ना? तसाच हा विमानाचा एक प्रकार. निश्चित पंख (Fixed Wing) असणारी उभयचर विमाने म्हणजे ही समुद्री विमाने, जी आत ओढून घेण्यायोग्य चाकांसह सुसज्ज असतात. केवळ जमीन किंवा केवळ पाण्यासाठी तयार केलेल्या विमानांच्या तुलनेत, याला थोडे जास्तीचे वजन आणि यात जटिलता आहे. तसेच हे त्यांच्या तुलनेमध्ये कमी पल्ल्याचे आणि जास्त इंधन लागणारे विमान आहे, असे म्हणता येईल. काही उभयचर विमानांना प्रबलित कणा (Reinforced Keel) बसवला जातो, ज्यामुळे त्यांना त्यांच्या चाकांसह बर्फावरही उतरता येते.

                                         

छायाचित्र: विकर्स वायकिंग - एक प्रारंभिक उभयचर विमान

युनायटेड किंग्डममध्ये, जे की एक पारंपारिकपणे सागरी राष्ट्र आहे, येथे १९१८ पासून 'विकर्स  वायकिंग' आणि १९२० च्या सुरुवातीच्या 'सुपर मरिन सीगल'पासून युद्धांदरम्यान मोठ्या प्रमाणात उभयचर विमानांची निर्मिती झाली.आणि त्यांचा वापर शोध आणि बचाव, तोफखाना शोधणे, पाणबुडीविरोधी गस्त, यासह लष्करी कर्तव्यांसाठी करण्यात आला.अमेरिकेमध्ये १९२० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत, सिकोरस्की कंपनीने उभयचर विमानांचे विस्तृत कुटुंब तयार केले (S-34, S-36, S-38, S-39, S-41, S-43) ज्याचा वापर  अन्वेषण करण्यासाठी आणि विमान म्हणून केला जात होता. त्यातून अनेक परदेशी हवाई मार्गांना जेथे मोठ्या उड्डाण बोटी जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी मदत करण्यात आली आणि अमेरिकेतील उभयचर विमानांना लोकप्रिय करण्यात मदत झाली. रशियाने सुद्धा अनेक महत्त्वाच्या उड्डाण नौका विकसित केल्या.

       

छायाचित्रे: 'शिनमायवा यूएस -२', 'आयकॉन ए-५उभयचर विमाने

उभयचर विमानाची मुख्य तपासणी म्हणजे जमिनीवर उतरताना त्याची चाके योग्य स्थितीत असल्याची खात्री करणे. आता दुर्गम भागातही हवाई पट्ट्यांच्या वाढत्या उपलब्धतेमुळे, पुर्वीच्या तुलनेत आज कमी उभयचर विमानांची निर्मिती केली जाते, जसे की बॉम्बार्डियर ४१५, आयकॉन ए-५ आणि सेस्ना- कॅरावॅन. उभयचर विमानांचा विकास आजच्या घडीलाही चालू आहे. 'शिनमायवा यूएस -२' नावाचे उभयचर विमान 'जपान मेरिटाइम सेल्फ-डिफेन्स फोर्स'साठी २००० साली जपानमध्ये विकसित केले गेले.

              

छायाचित्र: अमेरिकेच्या तटरक्षक दलाचे एक HH-3F पेलिकन हेलिकॉप्टर जळत्या बोटीजवळ पाण्यावर उतरताना

 
उभयचर हेलिकॉप्टर हे एक असे हेलिकॉप्टर आहे.की ज्याचा उद्देश जमिनीवर उतरणे आणि पाण्यावरून उड्डाण करणे हा आहे. उभयचर हेलिकॉप्टरचा वापर हवाई-समुद्री बचाव, सागरी बचाव आणि समुद्रशास्त्रासह विविध विशेष उद्देशांसाठी केला जातो, त्याशिवाय कोणत्याही गैर-उभयचर हेलिकॉप्टरद्वारे पूर्ण करता येणारी इतर कामेही यावर करता येतात.

                                  

छायाचित्र: 'फ्लाईबोर्डद्वारे खेळ करताना काहीजण

'फ्लायबोर्ड' हे एक उपकरण आहे, जे पाण्याद्वारे उड्डाण (Hydro-flying) म्हणून ओळखला जाणारा खेळ करण्यासाठी, फ्लायबोर्डला हवेत चालविण्यास प्रणोदन (Thrust) पुरवतो.आणि हो मित्रांनो, या वर्षीची बातमी अशी आहे की, आता भारत सरकारने १०० हून अधिक अशा भारतीय मार्गांची योजना आखली आहे, ज्याद्वारे समुद्री विमानांतून दळण-वळण होऊ शकते, ज्यामुळे पर्यटनालाही चालना मिळू शकते. आशा आहे तुम्हालासुद्धापाण्यावरून आकाशझेपअशी संधी लवकर मिळो. शुभेच्छा!

(संदर्भ: विकिपीडिया, संबंधित कंपन्यांची अधिकृत संकेतस्थळे, आणि इंटरनेट)


 राकेश शांतीलाल शेटे

विमानशास्त्र अभियंता, बेंगलोर

संपर्क: 8951655367

 

2 comments:

  1. रोमहर्षक तांत्रिक माहितीने परिपूर्ण लेख. धन्यवाद

    ReplyDelete
  2. Rakesh Shantilal SheteNovember 8, 2021 at 1:38 AM

    प्रिय रसिकांची माफी मागतो:
    दोन दुरुस्त्या आहेत:
    १. अमेरिकेमध्ये १९२० च्या दशकाच्या मध्यापासून ते १९३० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत, सिकोरस्की कंपनीने उभयचर विमानांचे विस्तृत कुटुंब तयार केले (S-34, S-36, S-38, S-39, S-41, S-43) ज्याचा मोठ्या प्रमाणावर अन्वेषण करण्यासाठी आणि जगभरातील विमान एअरलायनर म्हणून वापर केला जात होता.
    २. उभयचर हेलिकॉप्टर हे एक हेलिकॉप्टर आहे जे जमिनीवर आणि पाण्यातून उतरण्याच्या आणि उड्डाण करण्याच्या उद्देशाने आहे.

    ReplyDelete