पर्यटन व्यवसायाची पायाभरणी आणि इतिहास!
शरद किराणे |
मूळचे सोलापूर जवळच्या खेड्यातले हे मोठे कुटुंब चरितार्थासाठी १९५० मध्ये पुण्यात आले. धाकटा शरद एच.पी.च्या पेट्रोल पंपावर कामाला लागला. पण पंप बंद पडल्याने त्यांनी घराजवळच्या यात्रा कंपनीमध्ये नोकरी धरली. १९५७ मध्ये दोघा भावांनी मिळून 'जयलक्ष्मी यात्रा कंपनी' चा मुहूर्त केला. त्यावेळी मुंबईत एकच गुजराथी कंपनी या व्यवसायात होती.
त्यावेळी पर्यटन हे आजच्याइतके सोपे नव्हते. वेगवेगळया ठिकाणी राहण्याची सोय हॉटेलमध्ये न करता मंडळामध्ये व्हायची किंवा त्या काळच्या सहली रेल्वेच्या C.T.S. च्या खास बोगीने व्हायच्या. त्यात राहण्याची रीतसर सोय होत असे. सोबत शिधा आणि आचारीही असायचा. अशा वेळी जेवणाचा मुद्दा कळीचा ठरायचा. पर्यटन स्थळी हे रेल्वेचे डबे गाडीपासून वेगळे काढून सायडिंगला ठेवत. चुलीवर स्वयंपाक होऊन प्लॅटफॉर्मवर पंगती बसत. वीस ते चाळीस दिवसांच्या सहलीत ग्रुपला साहजिकच एका कुटुंबाचं स्वरुप यायचं.
शीलाताई किराणे |
१९६५-६६ च्या सुमारास अमरनाथच्या एका सहलीला तरुण मंडळींच्या ग्रुपबरोबर आलेल्या मुलीनं शरदभाऊंचं लक्ष वेधून घेतलं. सुखवस्तू घरातील सावळी, स्मार्ट, उंच, तरतरीत, हसतमुख, बोलघेवडी मुलगी आणि ह्या सहलीतील गोरागोमटा, उमदा, हसरा, माणूसवेडा, महत्वाकांक्षी तरुण मालक ह्यांच्यात प्रेमबंध जुळले ...आणि अमेरिकन कंपनीतल्या अधिकाऱ्यांची मुलगी शीला नेरुरकर शरदभाऊंच्या बेभरवशाच्या उद्योगात आयुष्यभर साथ द्यायला आली. ३० एप्रिल १९६७ ला डोक्यावर अक्षता पडल्या आणि लगेच मे महिन्यातच दोघेही चाळीसजणांची काश्मीर सहल घेऊन गेले; तोच त्यांचा मधुचंद्र! १९६७ च्या अखेरीस यांच्या कंपनीचं नामकरण 'आराधना ट्रॅव्हल सर्व्हिसेस' असं झालं.
सरकारी - निमसरकारी कर्मचाऱ्यांना पर्यटनासाठी सवलती मिळू लागल्याने पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली. मुंबईच्या पार्ल्यात 'दयाळाश्रम' हे आराधनाचं आॉफिस आणि किराण्यांचं घरही झालं!
पुढे-पुढे शीलाताई एकटीनेही सहली घेऊन जाऊ लागल्या. बाई व्यवस्थापक म्हटल्यावर लोक बिचकत. परंतु किराण्यांचा लौकिक तोवर सर्वदूर झाला होता. जाहिरातीचीही गरज भासेना! ५ मे १९७७ ला 'काश्मीर स्पेशल ट्रेन' नेली त्यांनी! काश्मिर सहली आता शीलाताईच नेऊ लागल्या.
सीझन तोंडावर आला की घरात शिध्याची तयारी... मसाले, लोणची, चटण्या, मुरांबे, शेव - चिवड्यांचे प्रकार, दिवाळीसाठी अनरश्यापासून सर्व फराळाचे पदार्थ ... नुसती लगबग असायची. तब्बल ६० जणांच्या बैठकीमध्ये जगाचा नकाशा आणि कॅलेंडरच्या साथीने वर्षांरंभी नवनवीन सहली जन्म घेत. कोस्ट-टू-कोस्ट (मुंबई ते चेन्नई) हे एक उदाहरण! १९७९ मध्ये श्रीलंका सहलींचा जन्म झाला. रामेश्वर - तलैमन्नार (श्रीलंका) असा बोटीने प्रवास व्हायचा. १९८० मध्ये श्रीलंका आणि लक्षद्वीपही सुरू झालं.
१९८२ मध्ये अंदमान सहलींचा प्रारंभ झाला. तेव्हा अंदमानला आठवड्यातून एकदाच विमान जायचे आणि यायचे. हॉटेल नव्हतेच. पर्यटकांची सोय युथ हॉस्टेलमध्ये असायची. त्यानंतर दोनच वर्षांत N. K. INTERNATIONAL हॉटेल तयार झालं आणि त्याचं उदघाटन शीलाताईंनी, पर्यायाने आराधनाच्या ग्रुपने केलं. अंदमाननंतर लेह-लडाख, मग १९८३ साली पूर्वांचल - सेव्हन सिस्टर्सच्या सहली शरदभाऊंनी धडाक्यात सुरु केल्या. ह्या भागांत सहली नेणारी 'आराधना' ही एकमेव पर्यटन संस्था होती; आजही आहे!
लडाख (फोटो गुगल च्या सौजन्याने) |
१९८० च्या दशकांत आशियातील सर्वात मोठा ग्रुप आफ्रिकन सफारीला नेण्याचा मान
'आराधना' ला मिळाला. १९८९ मध्ये 'मॉरिशस' सहलींना सुरुवात केली. पहिलाच ग्रुप ८०
जणांचा! जगभरात ह्या जोडीने अनेक माणसे जोडली. स्नेहबंध निर्माण केले. मात्र १९९१
च्या मॉरिशसमधील जागतिक मराठी परिषदेचे आयोजन शरदभाऊंकडे येण्याचे थोडक्यात हुकले.
त्याची बोच त्यांच्या मनात अनेक वर्षं राहिली.
त्यानंतर व्हिएतनाम सहली सुरू झाल्या. पर्यटन व्यवसायात अनेक नवनवीन स्थळं आणि संकल्पना शरदभाऊंनीच आणल्या. वर्षारंभाची अष्टविनायक सहल, त्यातली ४ जानेवारीच्या रात्रीची गाण्याची मैफिल असो की वर्षासहल, त्यातील खाण्यापिण्याची रेलचेल आणि उत्तमोत्तम गाण्यांची बरसात असो... शहरातील पर्यटकांना खास गुळभेंडी हुर्ड्याची हुर्डा पार्टीही त्यांनीच सुरु केली! शेतातच राहुट्यांमध्ये मुक्काम, गावरान जेवण, रात्री चांदण्यांत गाण्याची मैफिल.. हे खास वैशिष्ट्य!
गेल्या शतकातील तीन ही खग्रास सूर्यग्रहणांच्या सहली मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आराधनाने आयोजित केल्या होत्या. १९९९ ची कच्छचे रण इथली सहल विशेषच! ३५० पर्यटकांना वेळ न दवडता तिथल्या कारागिरांची, उत्पादनांची ओळख व्हावी म्हणून त्यांनी ५०-६० स्टॉलचे कलाग्राम उभारले. मनसोक्त खरेदीसोबत लोकगीत - लोकनृत्याचे आयोजन! सहलीला शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन होते. त्या अनुभवात शिक्षण आणि मनोरंजन, दोन्हीचा मिलाफ होता.
व्हिएतनाम (फोटो गुगल च्या सौजन्याने ) |
शरदभाऊंनी समव्यावसायिकांशी स्पर्धा नेहमीच टाळली. हातचं राखून न ठेवता हवं
त्याला मार्गदर्शन केलं. मोनोपोली किंवा सिग्नेचर सहलींमधून खोऱ्याने पैसा ओढणें, प्रसिद्धी मिळवणे.. यापासून दूर राहून, व्यवसायाशी प्रामाणिक राहून वेगळ्या वाटा चोखाळल्या. पर्यटकांच्या चेहऱ्यावरील
तृप्तीचा आनंद त्यांना समाधान देत असे. शरदभाऊंनी शेवटची सहल २००९ मध्ये नेली,
त्यानंतर ते निवृत्त झाले. मितभाषी, हसरे,
माणूसवेडे शरदभाऊ ९ एप्रिल २०२० रोजी वयाच्या ८८ व्या वर्षी
अतिदूरच्या प्रवासाला निघून गेले!
एका वेगळ्या क्षेत्रांत स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या ह्या अवलियास पर्यटनप्रेमी मुशाफिरांचा मानाचा मुजरा.
स्वाती कर्वे
छान माहिती. नवीन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करुन प्रचंड मेहनत आणि सचोटीने काम करत यशवंत झालेल्या शरदभाऊना सलाम.
ReplyDelete