आठवणीतले बदललेले माझे गाव

(मु.पो.परखंदीता.वाईजि. सातारा)

प्रत्येक गाव नावारूपाला येते ते तेथील राहत असणाऱ्या लोकांमुळेगावामधील झालेल्या बदलामुळे. माझे गाव परखंदी. चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगा असणाऱ्या गावाचा उंबरठा जवळपास साडेतीनशेलोकसंख्या तीन हजारच्या जवळपास. सर्व बारा बलुतेदार गावामध्ये राहातात. गावाची रचना अतिशय सुरेख आहे. गावाच्या मध्यभागी भवानी मातेचे मंदिर आहे. 



तेथे चार रेखीव बुरूज आहेत. भवानी मातेच्या मंदिरासमोर मारूतीचे छोटेसे मंदिर आहे. मंदिराला लागूनच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. मी त्याच शाळेत शिकलो. तिथे बालवाडी पासून ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेजवळ गेल्यावर अजूनही शाळेतील जुन्या आठवणी डोळ्यांसमोर उभ्या राहतात. मी जेव्हा गावाला जातो तेव्हा शाळेला अवश्य भेट देतो. २०१९ वर्षामध्ये प्राथमिक शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली आणि हे ऐकल्यावर खूप आनंद झाला. आपण देशात कुठेही राहिलो तरी आपण आपल्या शाळेला कधीही विसरू शकत नाही. माझे गाव तीन प्रभागामध्ये विभागले गेले आहे. गावामध्ये ऊसपीक मोठ्या प्रमाणात होते. गावातील लोक किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे सभासद आहेत. गावाच्या अर्थवाहिनीची नाळ ही मुख्यत: गावाची सोसायटी आणि सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेशी जोडली गेली आहे. गावातले पोस्ट ऑफिस लोकांच्या आर्थिक देवाणघेवाणच्या व्यवहारासाठी मदत करते. गावाच्या प्रत्येक घरातील कमीत कमी एक तरी माणूस नोकरी निमित्त मुंबई किंवा पुणे शहरात स्थायिक झाला आहे.


गावामधील शेती ही विहीर बागायती आहे. गावाच्या उत्तर दिशेला एक सुंदर तलाव आहे. १९७२ साली महाराष्ट्रमध्ये दुष्काळ पडला होतात्या काळात गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन तलावाचे काम पूर्ण केले. तलाव पावसामध्ये पाण्याने भरणे महत्त्वाचे आहे. तलावामध्ये पाणी कमी असेल तर लोकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते. पिण्याच्या पाण्याची गैरसोय होते. कवठे-केंजळ जलसिंचन योजनेच्या मार्फत काही प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध केले जाते. तलावाचे काम करण्यासाठी सरकार कडून भरघोस निधीची गरज गावाला आहे.


प्रत्येक वर्षामध्ये गावामध्ये दोन यात्रा केल्या जातात. भवानी मातेची यात्रा मार्गशीर्ष महिन्यातील चतुर्थीला होत असते. ह्या यात्रेला माहेरवाशीणी देवीचे दर्शन घेण्यासाठी आवर्जून येतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा असतो. परखंदी गावचे ग्रामदैवत भैरवनाथची यात्रा चैत्र महिन्यातील कालाष्टमीला होत असते. दोन्ही यात्रेसाठी शहरामध्ये राहणारे परखंदीकर हजर राहतात आणि गावातील यात्रेचा आनंद घेतात. शहरात जरी राहत असले तरी त्यांची नाळ गावाशी जोडलेली आहे. गावामध्ये शहरीकरणाचा दिखाऊपणा नसतो. शुध्द हवा आणि निसर्गाच्या सान्निध्यात माणूस मोकळा श्वास घेऊ शकतो. आजूबाजूच्या डोंगरदऱ्यात लहान मुलेपण मस्त धुडगूस घालताना दिसतात. आंबेचिंचाबोरेकरवंदं  झाडावर चढून तोडून खाण्याची मजा ही बालमंडळी घेत असतात. अशी एकतरी जागा हवी की तिथे गेल्यावर सगळा तणाव आपण विसरून मनसोक्त श्वास घेऊ शकतो आणि ती जागा माझ्यासाठी तरी माझा गाव आहे.


पूर्वी आमच्या गावात पावसाचे प्रमाण भरपूर होते. गावातील घरे जुन्या पध्दतीची होती. जास्त पाऊस असला की घरांच्या कौलातून पाणी अख्ख्या घरात टिपकायचे. आम्ही मुले घरातील सर्व भांडी घेऊन ते टिपकणारे पाणी पकडण्यासाठी पळायचो. गावाच्या काही अंतरावर डोंगरातून वाहाणारे धबधबे घराच्या ओसरीतून पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे आता असं काहीच अनुभवता येत नाही. राहिल्यात फक्त आठवणी. गावातील घरे आता सिंमेट काँक्रिटची झाली आहेत. 
नवीन विचार करणारीआधुनिकतेची कास धरणारी पिढी गावामध्ये तयार होत आहे.  

आज गावामध्ये गावाचे स्वत:चे हायस्कूल आहे. हायस्कूल मधून बाहेर पडणारी मुले इंजिनिअर होत आहेतकाही जण सरकारी नोकरीमध्ये काम करत आहेततर काही देशसेवेसाठी सैन्यात भरती होत आहेत. परखंदी गावाला वाईची बाजारपेठ सहा किलोमीटर अंतरावर आहे. वाई शहर महाराष्ट्रची दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. जुन्या प्रकारची मंदिरेनदीवरील घाट वाईची एक ओळख वेगळ्या प्रकारे करून देतात. मराठी विश्वकोशाचे कार्यालय वाईमध्ये आहे. वाईला भेट दिली तर किसनवीर चौकातील ज्ञानेश्वर खामकर यांच्या दुकानातील कंदी पेढा विकत घ्यायला विसरू नका.


गावातून नुसते फिरले किंवा गावाकडील आठवण जरी आली तरी मन जुन्या आठवणीने सुन्न होऊन जाते आणि डोळ्यांच्या कडा नकळत पाणवतात.

गणेश शिंदे



2 comments:

  1. Very nice, informative & beautiful village .

    ReplyDelete
  2. छान गावाबद्दल माहिती लिहिलेली आहे वाचून छान वाटले वाचून गावची आठवण जागी झाली प्रत्येकालाच आठवण शब्दरूपात मांडता येत नाही तो प्रयत्न तुम्ही छान केला आहे

    ReplyDelete