श्रावण भाद्रपद महिन्यातील आयांची गडबड संपली, की माझ्या मैत्रिणींना आणि मला हादग्याचे वेध लागायचे. हादगा म्हणजे काय? तर अश्विन महिन्यात हस्त नक्षत्र लागलं, की हादग्याच्या चित्राला रोज संध्याकाळी हार घालून, पाटावर हत्तीचं चित्र काढून, त्या भोवती शेजारपाजारच्या, नात्यातल्या सर्व मुली बायकांनी, वेगवेगळी गाणी म्हणत, हत्ती भोवती धरलेला फेर आणि गाणी म्हणून झाल्यावर खिरापती वर मारलेला यथेच्छ ताव. काही ठिकाणी यालाच भोंडला किंवा भुलाबाई देखील म्हणतात.
हादगा हा बसवावा लागतो. घरात मुलगी जन्मली की तिच्या पहिल्या अश्विन महिन्यात हादग्याची पूजा करून बसवलेला, ती सोळा वर्षांची होईपर्यंत दर वर्षी पुजून, तो सोळाव्या वर्षी बोळवायचा. म्हणूनच की काय हादग्याचे ‘ऐलमा पैलमा गणेश देवा’हे गाणे अधिक प्रसिद्ध आहे. माझ्या आईने अगदी हौसेने माझा १६ वर्ष हादगा बसवला आणि आम्ही जिथे राहायचो त्या विष्णु- लक्ष्मी अपार्टमेंट मधले होतेच सगळे तो हौसेने साजरा करायला.
माझी शाळा सुटली की मला वेध लागायचे हादगा खेळायचे. आज कुठली गाणी म्हणायची? आई काय खिरापत करेल? आणि माझीच खिरापत दुसऱ्या कुणी आणली तर? मला गाणीच नाही आठवली तर? खिरापत पुरेल का आपली सगळ्यांना? "श्री बालाजी ची सासू कशी मेली" हे सगळे पदार्थ सोडून काय वेगळं करता येईल? हे आणि असे अनेक प्रश्न घेऊन मी हादग्याची वाट बघत बसायचे.
माझा आणि माझ्या २-३ मैत्रिणींचा हादगा असल्यामुळं आम्ही सगळे रोज एकमेकींच्या घरी जायचो. कधी कधी आम्ही आमच्या शाळेतल्या मैत्रिणींना आणि त्यांच्या आयांना ही बोलवायचो. हादगा हा मुली आणि बायकांचा खेळ असला तरी घरातले दादा, बाबा पाटावर हत्ती काढून द्यायला उपयोगी यायचे. माझ्या बाबांनी तर मला मातीचा साधारण १ फूट उंचीचा मातीचा हत्ती आणून दिला होता. मग त्या हत्तीच्या भोवती फेर धरून रोज एक एक गाणं म्हणत जायचे आणि शेवटच्या दिवशी १६ गाणी म्हणून हादगा बोळवायचा.
या सगळ्या खेळात सर्वात मोठी जबाबदारी
असायची ती म्हणजे, रोज किती गाणी म्हणायची
ते ठरवणं आणि हत्तीच्या चित्राच्या खाली रांगोळीने तितके ठिपके काढून, एक-एक ठिपका एक-एक गाणं म्हणून झालं की पुसणं. किती मोठी जबाबदारी आहे ही.
एक ठिपका पुसायला विसरला की सगळ्या गाण्याचा क्रम चुकणार. सगळंच चुकत जाणार.
हादग्याला काही सामाजिक संदर्भ देखील आहेत. जुन्या काळी जेव्हा मुलींना, स्त्रियांना घराबाहेर पडता येत नसे तेव्हा अशा खेळ समारंभातून त्यांचे मनोरंजन होई, कलाकुसरीला, पाककलेला वाव मिळे. गंमत म्हणजे हादग्याची कित्येक गाणी देखील सासू-सून, नवरा-बायको, नणंद-भावजय अशा नात्यांवर आधारित आहेत. काही गाण्यांमध्ये सासर कसे नकोसे होत आहे आणि माहेर किती प्रिय आहे याची ही वर्णने आहेत. अशी गाणी समूहाबरोबर म्हणताना सासुरवाशीणीला मनोरंजनासोबत मनातील छोटी-छोटी किल्मिषे देखील झटकून टाकायला मदत करत.
आता मोठ्या मोठ्या काय, कोल्हापूर सारख्या छोट्या शहरातून पण हादगा दुर्मिळ होत आहे. कितीतरी वर्षात मी कुणाच्याही हादग्याला गेले नाही. बऱ्याच जणींना हादगा माहितीही नाही. ज्या मुलींना हादगा माहिती आहे त्यांना तो बसवायला वेळ नाही. काही जणींना वेळ आहे पण खेळायला वेळ नाही किंवा खेळायला मुली नाहीत. हे सगळं ऐकून बघून मला वाटतं की बरं झालं, मी ९० च्या दशकात जन्मले. इंटरनेट ने जग काबीज केले नव्हते आणि माणसेही अगदीच sophisticated झाली नव्हती. एकमेकांच्या घरी जायला, खायला लाज वाटत नव्हती.
पण आता सगळंच बदललं. आता श्रावण काय आणि भाद्रपद काय. सगळे दिवस ऑफिसमध्ये कॉम्प्युटरच्या समोर जातात किंवा घरी Netflix समोर. पण धो-धो पाऊस पडला की मन मात्र अल्लड होऊन हादग्याच्या आठवणीत रमून जातं.
करूयात का या वर्षी virtual हादगा.?
देवयानी मुरगुडकर
मस्त लेख (आणि सुंदर शैली!)
ReplyDeleteVery well written
ReplyDeleteसुंदर लेख.
ReplyDeleteखूप छान आणि माहितीपूर्ण लेख. मन परत भूतकाळात लहानपणीच्या आठवणीत गेले. ती भोंडल्याची गाणी खिरापत ओळखण्याचा कार्यक्रम सगळी मजाच होती
ReplyDeletevery nice
ReplyDelete