गेला आठवडाभर घरातील कपाटांची साफसफाई करून पार दमून गेले. गेल्या दोन वर्षात घरातली कामं जाणवायला लागली होती. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. अंगात उत्साह असायचा. कामाला वेग असायचा. पण आता मात्र स्वतःतील बदल जाणवायला लागला आहे. पहिला उत्साह आता मावळला आहे. जास्त काम निघालं की दडपण येतं. कशाला साठवतो आपण एवढं सगळं सामान? त्यातलं किती उपयोगाचं? किती अडगळीचं? आणि ‘अडगळ’या शब्दावर मी स्थिरावले.
आयुष्यभर किती खरेदी करतो ना आपण.
कधी गरज म्हणून, कधी नवीन ट्रेन्ड म्हणून, कधी बदल म्हणून, कधी खूप आवडले म्हणून,
तर कधी लागलं कधी तर घरात असू दे म्हणून! जोपर्यंत अंगात ताकद असते तोपर्यंत
उत्साहाने आपण त्यांची साफसफाई करतो, त्या पुन्हा जपून ठेवतो. टाकवत नाहीत म्हणून,
कधी तरी उपयोगाला येतील म्हणून, पण हळूहळू लक्षात येतं, वर्षानुवर्ष हे असंच चाललं आहे.
किती वर्ष हे करायचं आणि कशासाठी? आता वयाच्या या वळणावर आल्यावर वेळेचं महत्त्व
खूपच जाणवतं. कितीतरी आवडीच्या गोष्टी आयुष्यात करायच्या राहून गेल्या आहेत.
त्यासाठी वेळ काढायचा सोडून आपण हे काय करतोय हा प्रश्न पडतो. मग खूप विचार करून
मन घट्ट केलं आणि अगदी गरजेच्या, उपयोगाच्या गोष्टी सोडून बाकी सगळ्या वस्तू
ज्यांना गरज होती त्यांच्यात वाटून टाकल्या. मनाला तर छान वाटलंच पण असं वाटलं, माझी कपाटं आता मोकळा श्वास घेत
आहेत. उरलेल्या वस्तू सुद्धा भरपूर जागा मिळाल्याने आनंदात विसावल्या आहेत.
असाच मोकळा श्वास आपल्याला पण घेता आला पाहिजे. सोडवत नाहीत म्हणून पकडून ठेवलेली नाती,
आपल्यावर वैचारिक आक्रमण करणारी माणसं, आपला किमती वेळ वाया घालवणारे, फारसे महत्त्व नसणारे सण-समारंभ, वेळ जात नाही म्हणून फोनवर तासन-तास गप्पा मारून आपला वेळ वाया घालवणारे लोक, अभिरुची भिन्न असूनही भिडस्तपणे जपलेले संबंध, ज्या गोष्टीत आपल्याला फारसा रस नाही त्या केवळ सामाजिक बंधनांमुळे आपण करत आल्यामुळे होणारी मानसिक घुसमट, लोक काय म्हणतील म्हणून पाळत आलेल्या, पण महत्त्व नसलेल्या रूढी आणि परंपरा, नाही म्हणता येत नाही म्हणून स्वीकारलेली पण नकोशी वाटणारी बंधनं.... या सगळ्या वैचारिक आणि मानसिक अडगळीत आपण आपली आवड, निवड, आनंद, समाधान सगळं हरवून बसतो.
मग कधी वेळ मिळाला तरी या अडगळीत
शोधूनही आपल्या आवडीची, समाधान देणारी गोष्ट मग आपल्याला सापडत नाही. ही अडगळ आधी
दूर करता आली पाहिजे. दुसऱ्यांचा दोष नाही. याला कारणीभूत आपणच आहोत. आयुष्यात
प्राधान्यक्रम ठरवता आला नाही आणि नकार देता आला नाही तर अडगळच वाढणार! याला
जबाबदार आपणच आहोत. आपण या गोष्टींवर कधी खोलात जाऊन विचार केलेला नसतो. समाजात
मेंढ्यांच्या कळपात राहणार्यानाच चांगलं म्हटलं जातं. त्या चांगुलपणाच्या
लेबलसाठी मग आपण आपलं स्वत्व पणाला लावतो. न आवडणाऱ्या गोष्टींची मालिका मग कधी
संपतच नाही. आपण मग त्यात चक्रव्युहासारखे अडकतो. परतीचा मार्ग सापडत नाही.
कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात. आपल्याच भल्यासाठी. मरण्याअगोदर जगण्यासाठी. स्वतःच्या मूल्यांना, स्वतःच्या आवडीनिवडींना न्याय देण्यासाठी. हे उशिरा समजलं म्हणून हळहळायचं नाही. अडगळ जमा केल्यानंतर त्याच्यातला फोलपणा अधिक चांगला समजतो.
निदान आयुष्यातल्या या वळणावर तरी
जेव्हा तुमच्या जबाबदाऱ्या तुम्ही यशस्वीपणे पार पाडल्या आहेत, अशा वेळी आपला
आपल्याशी संवाद होणं गरजेचं आहे. एकांतात स्वतःशी एकरूप होऊन गप्पा मारता आल्या
पाहिजेत. आपल्या आवडत्या गोष्टींचं चिंतन करता आलं पाहिजे. पण त्यासाठी सगळी अडगळ
आपणच दूर करणं आवश्यक आहे.
एकदा ‘अडगळ’ या शब्दाचा अर्थ नीट लक्षात आला, की आपणही कोणासाठी ‘अडगळ’ ठरत नाही ना, या प्रश्नावर माणूस विचार करायला लागतो. जशी आपल्याला अडगळ नको, तशी आपलीही कोणाला अडगळ होणार नाही याची काळजी आपल्याला घेतली पाहिजे. ‘अडगळ’ म्हणजे जे उपयोगाचं नाही, पण ज्याने जागा व्यापली आहे.
एकत्र कुटुंबात तर या गोष्टीचं खूप महत्त्व आहे. आपल्या मुलांबरोबर राहताना आपण त्यांना मदत रूप होऊ शकू असंच आपलं वागणं पाहिजे. त्यांना आपण त्रासदायक होत असू तर नक्कीच आपण अडगळ आहोत. आपल्या हातात असेपर्यंत आपण या गोष्टीची नक्कीच काळजी घेऊ शकतो आणि अशी आपण आयुष्यभर काळजी घेतली तर दुर्दैवाने आपले हात पाय थकले आणि आपण कोणाला मदत करण्याच्या पात्रतेचे राहिलो नाही, तरी तेव्हा आपली इतरांना अडगळ वाटणार नाही हे नक्की. कारण ही ‘अडगळ’ सगळे कृतज्ञपणे स्वीकारतील अशी अपेक्षा करायला काय हरकत आहे?
अप्रतिम!! 'आपण अडगळ ठरत नाही ना ..' बेष्टच ...
ReplyDelete