एक आठवण ........

 


ही गोष्ट म्हटली तर तशी गंमतीदारच आहे. १९६८ साली माझं लग्न झालं. सासर गिरगावात, एका चाळीत दोन खोल्या. त्यांत आम्ही दोघं, सासूबाई, मामंजी, दोघे दीर व दोघी नणंदा एवढी मंडळी राहात होतो. झोपायला खालच्या मजल्यावर माझ्या सासऱ्यांची विधवा आत्या राहायची. त्या, त्यांचे  आटपून उशिरा वरती यायच्या. मग आम्ही खाली जायचो. त्यावेळी प्रायव्हसी, स्पेस हे शब्दच अस्तित्वात नव्हते.

 

हे सकाळी साडेआठ पर्यंत ऑफीसला जायचे ते साधारण आठ पर्यंत घरी परतायचे. त्यावेळी मुंबईत डबेवाला पध्दत होती. त्यावेळी वरकामाला, लादीपोछाला नोकर ही पध्दत नव्हती. त्यामुळे डबा, छोटी भांडी घासायला लागायची.

 

एकत्र कुटुंब आणि लहान जागा यामुळे आमच्यात संवाद असा नसायचा.

 

एके दिवशी मी घासायला डबा उघडला तर आंत एक चिठ्ठी होती आणि त्याखाली एक पुडी होती. मला खूपच आनंद झाला. मी एकदम romantic mood मधे गेले. मनांत म्हटलं कांहीतरी प्रेम भावना व्यक्त केल्या असाव्यात आणि पुडीत छोटंस गिफ्ट असावं. मनांत खूप हरखून गेले. पण चेहऱ्यावर कांहीं न दाखवता (तो अभिनय मला जमला म्हणायचा) ती चिठ्ठी आणि पुडी मी लपवून ठेवली. आणि योग्य संधीची वाट पाहत होते. मनात आनंदाच्या  उर्मी उठत होत्या. वेळ खूप हळू चाललाय असं वाटतं होतं. शेवटी ती वेळ आली.

 

मी चिठ्ठी उघडली, त्यांत लिहीलं होतं की पुडी उघडून बघ. आणि...... काय सांगू त्यांत एक अळी होती ....मेलेली. आणि त्या कागदावर लिहीलं होतं, की भाज्या नीट निवडून चिरत जा. घरांत तिघी तिघी बायका असतांना असं होतंच कसं? मी मटकन  खालीच बसले. आधीच्या आनंदाश्रूंचे रुपांतर विरस झालेल्या अश्रूंमधे झाले.

 

लग्न ठरल्यापासून पंधरा दिवसांतच झाल्यामुळे यांच्या स्वभावाची मला कल्पना नव्हती. थोडेसे तापट आहेत असं ऐकलं होतं. पुढे अनेक सुखदुःखाचे प्रसंग आले. पण नवीन लग्न झालेल्या मला हा अनुभव पेलायला जरा जडच गेला.

 

आज पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. तरीही अजून ही आठवण मला येते. कधी कधी वाटतं, अशीच एखादी चिठ्ठी त्यांनी एखादा पदार्थ खूप आवडला म्हणून पाठवली असती, किंवा आज तू छान दिसत होतीस असे सांगायला पाठवली असती तर? मग हीच आठवण माझ्या मनात राहिली नसती का?

मनाला सुखावणाऱ्या आठवणी आपल्याला कायम आनंद देत राहतात. आपण गेल्यानंतर आपल्या जवळच्यांच्या मनात आपण कोणत्या आठवणी ठेवून जायचे हे ही आपणच ठरवतो ना. मात्र जगताना, वागताना प्रत्येकाने या गोष्टीचा विचार केला पाहिजे. नाही का?


रोहिणी काळे




 

2 comments:

  1. छोटीशी आठवण पण खुप काही सांगून गेली. आठवणी अशा निर्माण करा की ज्यांनी प्रियजनांच्या चेहरयावर कायम हसू येईल.

    ReplyDelete
  2. लागलेली ठेच परिणामकाकरीत्या मांडली गेली आहे, आधी पटकन हसू पण लगेचच एक वेदना देवून गेली

    ReplyDelete