या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक महिना आपल्या परीक्षेसाठी येतो आहे. मलमास, अधिकमास, शास्त्राच्या दृष्टीने मराठी
महिन्याच्या गणिताची गंमत असे सगळे हिशोब घेऊन अश्विन अधिक महिना १८ सप्टेंबरपासून सुरु होतो
आहे.
दर महिना सूर्य एका राशीचे
संक्रमण करतो, या तेराव्या महिन्यात सूर्य संक्रमण नसते म्हणून याला "मलमास" असे नाव आहे. या मलमासात विवाह, उपनयन, गृहप्रवेश, देवप्रतिष्ठा, अपूर्व देवदर्शन वगैरे मंगलकार्यं
वर्ज्य असतात. पण धार्मिक दृष्ट्या अधिक महत्त्व आहे या महिन्याला. या अधिक मासाचा स्वामी स्वतः
पुरुषोत्तम श्रीकृष्ण आहे. त्या पुरुषोत्तमाची भक्ती करणे, तीर्थस्नान करणे, उपवास-व्रतवैकल्ये करणे अन नियम
पाळणे यामुळे मन शांत होऊन आत्मिक समाधान नक्की मिळेल असे शास्त्र सांगते.
अधिक महिन्याचे नियम असे आहेत -
दीपदान करावे. दुसऱ्याचा अंध:कार नष्ट करण्यासारखं सत्कृत्य
नाही.
एकभुक्त राहावे. मौन भोजन करावे. थोडी भूक ठेऊन कमी जेवावे. किती सुंदर नियम आहे पहा. जे जेवतोय त्यासाठी एकाग्रता
हवी,
शांतता हवी, आणि मर्यादा पण हवी.
आपल्या आवडीच्या वस्तूचा त्याग करावा. ती वस्तू खाण्यातली व रोजच्या
वापरातली असावी. त्याग हा आपल्या शास्त्राचा पाया आहे. त्याने तुमचा संयम पारखला
जाईल.
अन्नदान करावे. सर्व दानांत अन्नदान श्रेष्ठ आहे.
गोग्रास द्यावा. तो नित्यनेमाने द्यावा. कोणतीही गोष्ट नियमितपणे
केली तरच फायदेशीर ठरते.
नामस्मरण करावे. आपल्या आराध्य देवतेचे स्मरण करावे.
दररोज नियमाने देवदर्शन घ्यावे. ते घरातच घ्यावे. मनीचा देव शोधता आला तर जास्त उत्तम!
जवळपासच्या क्षेत्राची यात्रा करावी.
सद्विचारांचे श्रवण-वाचन करावे.
आता हे झाले शास्त्राचे नियम आणि अधिक मास महात्म्य. तू या महिन्यात जे सत्कृत्य
करशील त्याचं फळ मी दुप्पट देईन, असं भगवंत आपल्याला सांगतात. आपण जर वर नजर टाकली तर नियम
कसे आहेत पहा - निःस्वार्थी जगा, दान करा, ईश्वरस्मरण करा, संयम राखा, तीर्थयात्रा करा. मला हे वाचल्यानंतर प्रश्न
पडला की हे जे नियम दिले आहेत त्यासाठी अधिक महिनाच कशाला हवा? साधे साधे नियम आहेत सगळे. हे तर रोजच पाळायला हवेत असे नियम आहेत.
कोरोना येवो आणखी काही येवो, अधिक मास असू देत नसू देत, शरीराची नियमितता, मनाला व्रतस्थता हवीच ना! गणिती शास्त्राप्रमाणे हा
अधिक मास आलाय, त्याचा धनी भगवान श्रीकृष्ण आहे , तो आपल्याला सांगतो आहे, "अरे माणसा, माझ्याकडे काय मागायचं हेही
तुला शिकावं लागेल." भगवंताचं म्हणणं असं आहे- तू तुझ्यापुरतं मागितलंस तर तेवढंच मिळेल. धन, धान्य, यश, संपत्ती सगळं न टिकणारं आहे... मग मागायचं तरी काय? तर चिरकाल टिकणारा आनंद... तो कसा मिळेल? तर स्वतःच्या पोटाला चिमटा
घेऊन, थोडीशी तसदी घेऊन दुसऱ्यासाठी काही केल्यानंतर त्याच्या डोळ्यात सापडतो
तो खरा आनंद!!!
मला भगवंत मागायचाय, तो कुठे मिळेल? अजून तर देवळंही बंदच आहेत. मग तो कुठं सापडेल? तर प्रत्येकाच्या मनी-हृदयी वसलेला तो नक्की सापडतो. केव्हा? आपल्यातलं थोडं दिलं ,थोडं सोडलं की सापडतो. तो मूर्तीत, देवळात राहातच नाही... तो तुमच्या आमच्या मनातच
आहे ना!
शोधा जरा सल दुसऱ्याचा
लावा प्रेमाचं माणुसकीचं मलम
अधिक मासाचं निमित्त कशाला
स्वच्छ मनानं जिंकावं दुसऱ्याला
भगवंत राही पाठीशी जर सोडला "मी"
चला तर करू या पुण्याची बेगमी
उर्मी उदय निवर्गी
आतापर्यंत अधिक महिना म्हणजे सासुबाईंकडून मिळणारे अनारसे आणि सासऱ्यांकडून (कमी कमी होत जाणारा) हुंड्याचा पुढला हप्ता असं वाटायचं, किंवा काही लीप ईयरप्रमाणे कॅलेंडरची डागडुजी करायचा प्रकार वाटे. पण त्यामागे असलेलं शास्त्र आणि या महिन्याचं महत्त्व या लेखामुळे समजलं!
ReplyDeleteछान लेख. बरीच लोकं आपल्या ओळखीच्यांना अधिक मासाचं वाण देतात. ज्याच्या कडे सर्व काही अधिक आहे त्यालाच अजून वाण कशाला? पण अर्थ माहीत नाही. काय अपेक्षित आहे ते ही माहीती नाही.
ReplyDeleteछान लेख. अधिक मासाच्या पोथीत,गोष्टी रुपात खूप छान सांगितले आहे
ReplyDelete