आकाश झेप भाग ४: 'राइट बंधू' - चिरविश्रांती

 

विल्बर ओर्वील यांना लगेच प्रसिद्धी मिळाली नाही, हे एका दृष्टीने वरदानच ठरले. त्यामुळे विमानाचे उड्डाण प्रयोग विना अडथळा पार पाडू लागले. १९०३ सालच्या त्या पहिल्या यशस्वी यानाचे नाव होते, 'फ्लायर वन'. त्यांनी १९०४ ला ' फ्लायर टू' नावाच्या अधिक दणकट अशा हवाईयानाची बांधणी केली. त्याचे उड्डाण पाहण्यासाठी भरपूर प्रेक्षक येऊ लागले. १९०५ चा उन्हाळा संपता संपता त्यांच्या 'फ्लायर थ्री' ने विक्रम केला. त्याने थांबता अडतीस मिनिटांमध्ये २४ मैलांचे अंतर कापले. प्रसार माध्यमां इतकाच  सेनादलाचा प्रतिसादही थंड होता. १९०६ मध्ये युरोपच्या लोकांनी राइट बंधूंशी अधिक गांभीर्याने बोलणी सुरु केली, तेव्हा अमेरिकेच्या सेनादलाला जाग आली.

छायाचित्र: ओर्वील विल्बर राइट (१९०५) (सौजन्य: विकिपीडिया)


विल्बरने १९०८ मध्ये फ्रान्सच्या एका कारखान्यात आपल्या हवाईयानाची जुळणी केली. ऑगस्टला तेथील घोडे-शर्यतीच्या मैदानावरून आपले चाचणी उड्डाण केले. अगदी थोड्या दिवसात त्याने फ्रेंच लोकांची मने जिंकली. नाजुकशा चेहऱ्याच्या, सदा हसतमुख असणाऱ्या या धाडसी विमानचालकाला असंख्य चाहत्यांची शेकडो पत्रे येत होती. सप्टेंबरमध्ये त्याच्या एका फ्रेंच यजमानांच्या पत्नी - 'मॅडम ईडिथ (मिसेस हार्ट .) बर्ग' यांची - 'विमानातून प्रवास करणारी पहिली स्त्री' म्हणून नोंद झाली.


छायाचित्र: विल्बर राइट आणि ईडिथ (मिसेस हार्ट .) बर्ग हे दोघे विमानात बसले असताना. ( ऑक्टोबर, १९०८)

(सौजन्य: https://airandspace.si.edu/)


इकडे त्याच काळात १७ सप्टेंबर, १९०८ ला ओर्वीलच्या अमेरिकेतील विमानाला अपघात झाला होता. त्याच्यासोबत विमानात असलेल्या दोनपैकी एक - सेनाधिकारी थॉमस सेल्फरीज हे त्या अपघातानंतर इस्पितळात मृत्यू पावले. हा यांच्या विमानातील पहिला बळी! यानाचीही मोडतोड झाली होती. ओर्वील गंभीररीत्या जखमी झाला होता. त्याचा पाय मोडला बरड्यांना जबरदस्त इजा झाली. त्याच्या पार्श्वभागाची हाडे तीन ठिकाणी मोडली, मात्र त्या जखमांचे निदान पुढील बारा वर्षे झाले नाही.

तिकडे फ्रान्समध्ये विल्बरला हे ऐकून फार वाईट वाटले. नोव्हेंबरमध्ये ओर्वील दवाखान्यातून घरी आला. १९०९ च्या आरंभी त्यांची बहीण कॅथरीन सोबत फ्रान्सला जाऊन विल्बरला भेटला. कॅथरीन आपल्या भावाबरोबर दोनदा विमान प्रवास करून आली. फ्रान्सनंतर इटलीला विमानाची प्रात्यक्षिके, विमानविक्रीची बोलणी, नव्या उड्डाणपटूंना प्रशिक्षण या गोष्टीमध्ये त्यांचे दिवस जात होते. मे१९०९ मध्ये राइट बंधू - 'डेटन' या आपल्या गावी परतले. गावकऱ्यांनी त्यांचा केलेला स्वागत सोहळा दोन दिवस चालला होता. मिरवणूक, स्वागत समारंभ झाले. 'हॉथॉर्न स्ट्रीट'वर दहा हजार लोक त्यांना पाहण्यासाठी जमले होते. त्यांच्या जयजयकाराचा आवाज वॉशिंग्टन मध्ये पोहोचला. तेथे सेनादलाबरोबर विमान व्यवसायाची बोलणी यशस्वी झाली. त्यांनी नोव्हेंबर १९०९ च्या अखेरीस स्वतःची 'राइट कंपनी' स्थापन केली. डेटन गावी कारखाना उभारणे, चालकांना प्रशिक्षण देणे, विमान चाचण्या घेणे ही त्यांची दैनंदिनी झाली. सुरवातीचे 'किटी हॉक' चे थरारक विमान उड्डाण प्रयोग आणि त्यांच्या संशोधनामध्ये ते अगोदर रमायचे, पण आता ते मोठमोठे करार करणारे व्यावसायिक झाले होते. विल्बरचा सारा वेळ 'राइट कंपनी'चा संचालक या नात्याने कायदेशीर बाबींमध्ये जात होता. मे, १९१० ला आपल्या विमानातून विल्बरने 'हाफमॅन प्रेअरी' वरून सहजच एक फेरी मारली, ती त्याची शेवटची फेरी ठरली, ती एक विमान चालक म्हणून! त्यानंतर बरोबर २४ महिन्यांनी, वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी, ३० मे, १९१२ रोजी तो विषमज्वराने मृत्यू पावला.

आता ओर्वीलकडे कंपनीचे संचालक पद आले. १९१५ नंतर त्याचा कंपनीतील रस संपला, त्याच्या मालकीचा भाग त्याने विकून टाकला. त्याच्या आवडत्या विमान संशोधनाकडे तो वळला. त्याने लग्न केले नाही. त्याची बहीण कॅथरीन, इतर दोन भाऊ आणि ८४ वर्षांचे त्यांचे वडील 'बिशप राइट' हे एकत्रच होते. ओर्वीलने आपल्या वडिलांना विमानातून फिरवले. पहिलाच अनुभव, त्यातही विमान ३५० फुटावर असताना ते वृद्ध बिशप निर्भयपणे म्हणत होते, "अरे, आणखी उंच, आणखी उंच ने!"

तिकडे यूरोपमध्ये १९१४-१९१८ दरम्यान पहिल्या महायुद्धात विमाननिर्मिती लक्षणीय वेगाने होऊ लागली. तेव्हा लढाऊ विमानाचा वेग ताशी ११३ मैल होता, शेकडो मैलांचे अंतर ते पार करू शकत होते. १९१९ नंतर तर विमाने अटलांटिक महासागर पार करू लागली. १९२०-१९३० काळात विमानाद्वारे लांबची प्रवासी मालवाहतूक व्यवस्था सुरु झाली. अगोदरचा जहाजाने लागणारा जास्त वेळ आता विमानामुळे बराचसा कमी झाला. दूर पल्ल्याची ही विमाने चांगले पैसेही मिळवून देऊ लागली. १९३९ ला दुसऱ्या महायुद्धावेळी विमानातील सुधारणांना मोठीच गती आली. १९४५ ला जपानमधील हिरोशिमा नागासाकी या शहरांवर विमानाच्याच साहाय्याने अत्यंत क्रूर असा अणुबॉम्बचा हल्ला केला गेला. मानवाचा ओढा सुरुवातीपासूनच विनाशकारी शक्तींकडे जास्त राहिला आहे. विमानाच्या शोधकर्त्यांवर पश्चाताप करण्याची पाळी आली. ओर्वीलने असे विधान केले की ,"आम्ही एक कल्याणकारी शोध लावला होता जो पुढे जाऊन जगामध्ये शांतता नांदण्यास मदत करेल, असे आम्हाला सुरुवातीच्या काळात वाटायचे, पण तो एक निव्वळ गैरसमज होता. माणसामध्ये असणारी द्वेषभावना तसेच स्वार्थासाठी कोणत्याही पातळीस जाऊन चांगल्या गोष्टींचा विनाशासाठी वापर करण्याची वृत्ती ओळखण्यास आम्ही कुठे तरी कमी पडलो."

शेवटी ३० जानेवारी १९४८ ला ओर्वीलचे वयाच्या ७७ व्या वर्षी हृदयाच्या झटक्याने निधन झाले. 'आकाशझेपे'चे वेड बाळगणारे, ते स्वप्न सत्यात उतरवणारे, जगाला जवळ आणणारे 'विल्बर ओर्वील' हे दोन्ही 'राइट बंधू' आकाशाच्या पडद्यावर अजरामर झाले. (क्रमश:)

 


छायाचित्र: राइट बंधू स्मारक, किल डेव्हिल हिल्स, नॉर्थ कॅरोलिना (सौजन्य: Wright Brothers National Memorial)


संदर्भ:

1. पुस्तक: 'राइट बंधू' (लेखिका: आना स्प्राउल, रूपांतर: मीना वैशंपायन)

2. https://airandspace.si.edu/

3. Google, Wikipedia, Quora pages

राकेश शांतीलाल शेटे

विमानशास्त्र अभियंता, बेंगलोर

संपर्क: 8951655367






1 comment:

  1. खूप छान वाटला हा ही भाग. तुमच्या पुढील लिखाणासाठी खूप खूप शुभेच्छा👍

    ReplyDelete