'युद्धस्य कथा रम्या:’ असे जरी संस्कृत सुभाषित असले तरी त्याचा अन्वयार्थ असा होतो की, युद्धाच्या कथा फक्त वाचणे, ऐकणे आणि दुरून पाहण्यासाठीच चांगल्या वाटतात.
१९०३ साली राइट बंधूंचे पहिले विमान आकाशात झेपावले तरी, त्याचा युद्धात उपयोग करण्याची कल्पना फ्रान्सशिवाय इतरांना आली नाही. पहिले जागतिक महायुद्ध (१९१४-१९१८) झाले होते, ते वसाहतींच्या साम्राज्यांसाठी झाले होते. या युद्धात ट्रेंच बंदुका, रणगाडे, मशीनगन्स, विषारी वायू (रासायनिक अस्त्रे), यांच्या सोबतीला बाल्यावस्थेतील विमानांचा वापर झाला होता. त्यावेळच्या विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडीमार करणे हे होते. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते. या महायुद्धात टेहळणी, बाँबहल्ले आणि हवाई झुंज यांसाठी विमानांचा मर्यादित उपयोग करण्यात आला. तेंव्हा विमान व फुगा यांद्वारे टेहळणी करत असत. कालांतराने वायुसेना सज्ज करण्याची आवश्यकता पटू लागली. युद्धनौकांवरून विमाने सोडणे-उतरविणे व त्या विमानांतून पाणतीर सोडणे शक्य झाले. तसेच नौकांना हवाई संरक्षण देणे आवश्यक ठरले.
छायाचित्र: 'जर्मन आल्बाट्रोस डी-३' - लढाऊ विमान (पहिले जागतिक महायुद्ध)
'आकाशझेपे'ची ही यंत्रे फारच मूलभूत असल्याने जीवितहानी जास्त होती. कॅनव्हास असलेल्या लाकडी चौकटीपासून हे विमान तयार केले जात असे. युद्धाच्या वेळी एकूण चार प्रकारच्या दुखापती होत असत.त्यामधली एक दुखापत ही विमान अपघातातून होणारी असायची.
'जर्मन आल्बाट्रोस डी-३' हे या युद्धात जर्मन आर्मी एअर सर्व्हिसने वापरलेले एक बायप्लेन लढाऊ विमान होते. १९१२ मध्ये स्थापन झालेली 'रॉयल फ्लाइंग कॉर्प्स' ब्रिटीश सैन्यांचा 'आकाशातील डोळा' ठरली. एप्रिल, १९१७ मध्ये अरसच्या लढाईदरम्यान 'रक्तरंजित एप्रिल' हे ब्रिटिश हवाई ऑपरेशन होते. रॉयल फ्लाइंग कॉर्प्सने 'जर्मन आर्मी एअर सर्व्हिस' यांचे खूप नुकसान केले. जर्मनांनी प्रथमच मोहरीचा विषारी वायू वापरला. त्याचप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सैन्यावर विमानातील मशीनगनचा गोळीबार केला. दोस्त सैन्यांच्या लढाऊ विमानांनी बाँबवर्षाव करून जर्मन सैन्याचे दळणवळण मार्ग व रसदपुरवठा व्यवस्था विस्कळित केल्याचा इतिहासात उल्लेख आढळतो. (१९२१ साली हिंदुस्थानात युद्धोपयोगी वस्तू व पुरवठा हे एक नवीन खाते उघडण्यात आले. भारतीय वायुसेनेचा पायाही या महायुद्धातच घातला गेला.) सुमारे चार वर्षे चाललेल्या या युद्धात जवळपास एक कोटी सैनिक आणि त्यापेक्षा जास्त नागरिक मारले गेले होते.
सहा वर्षे (१९३९-१९४५) चाललेल्या दुसऱ्या जागतिक महायुद्धात लष्करी पाणबुड्या, प्रगत रणगाडे, प्रगत रासायनिक बॉम्ब, आणि मशीनगन्स यांसोबत आधुनिक विमाने वापरली गेली होती. लुफ्तवाफे (जर्मन वायू सेना) व ब्रिटनच्या 'रॉयल एअर फोर्स'च्या लढाईला 'ब्रिटनची लढाई' म्हणतात. लुफ्तवाफेने सुरुवात केली ती रॉयल एअर फोर्सच्या विमानतळ व रडारचा वेध घेऊन. मोडक्यातोडक्या धावपट्ट्यांवरून देखील उड्डाणे भरून रॉयल एअर फोर्सच्या वैमानिकांनी त्यांचा प्रतिकार सुरू केला व धाव घेतली थेट बर्लिनकडे.राजधानी बर्लिनवरील झालेल्या बॉम्बफेकीमुळे ॲडॉल्फ हिटलरचा संताप झाला व त्याने लंडन शहरावर हल्ले सुरू करण्याचे आदेश दिले. ‘द ब्लिट्झ’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या या हल्ल्यांमध्ये लंडनचे अतोनात नुकसान झाले.
७ डिसेंबर, १९४१ रोजी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर, हवाई येथील नाविक तळावर आकस्मिक हल्ला चढवला. ३५३ जपानी लढाऊ विमाने, बॉम्ब व टॉर्पेडो विमाने यांचा वापर करून तळावर हल्ला केला. अमेरिकेची १८८ विमाने नष्ट झाली, २,४०२ अमेरिकन लोक मृत्युमुखी पडले, १,२८२ अमेरिकन लोक जखमी झाले. ह्या अनपेक्षित हल्ल्याने अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरण्यास भाग पाडले. ८ डिसेंबर, इ.स. १९४१ रोजी अमेरिकेने अधिकृतरीत्या जपानविरुद्ध युद्ध पुकारले व ती ब्रिटनच्या बाजूने युद्धात उतरली. अमेरिकेच्या बॉम्बफेकी विमानांनी जपानच्या चार विमानवाहू नौका बुडवल्या व जपानी आरमाराचा कणा मोडला.
छायाचित्र: अमेरिकन एअर फोर्स 'बोईंग बी-१७ - फ्लाईंग फोर्ट्रेस' आणि 'जर्मन स्टुका डाईव्ह बॉम्बर्स'
इकडे ब्रिटनने आपल्या सैन्यांना बर्मा रोड नावाने ओळखल्या जाणाऱ्या घनदाट जंगल व कठीण पर्वत पार करीत म्यानमार मार्गे रसद पुरवठा सुरू ठेवला होता. जपानने म्यानमार हस्तगत केल्यावर हा मार्ग बंद पडला. यावर उपाय म्हणून रॉयल एअरफोर्सने ईशान्य भारतातील विमानतळांवरुन ही मदत सुरू ठेवली होती.
जून, १९४४ मध्ये जर्मनीने सर्वप्रथम क्रुझ क्षेपणास्त्रांचा उपयोग युद्धात केला. व्ही-१ नामक उडत्या बॉम्बच्या
सहाय्याने युनायटेड किंग्डमवर प्रत्यक्ष हल्ले होऊ लागले. काही महिन्यांनी जर्मनीने ही कला अधिक विकसित केली व व्ही-२ हे द्रव-इंधन वापरणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे वापरण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांना उत्तर म्हणून व लुफ्तवाफेच्या कारवाया रोखण्यासाठी अमेरिका, यु.के. व कॅनडाच्या वायुदलांनी व्यूहात्मक बॉम्बफेकींनी सुरुवात केली. विन्स्टन चर्चिल यांनी दहशतवादी धाडी मारण्याचे आदेश दिले. यात विमानांच्या अनेक स्क्वॉड्रन (५०० ते १,००० विमाने) एकाचवेळी अनेक दिशांनी एकाच शहरावर चाल करून जायच्या व संपूर्ण शहरच्या शहर बेचिराख करण्याची ही योजना होती. हे पार पाडणारी विमानं अग्निजन्य बॉम्ब वापरुन आपली निशाणे संपूर्णतः उद्ध्वस्त करीत. अशा अनेक हल्ल्यांमध्ये विमानतळ, कारखाने, पाणबुड्यांची आश्रयस्थाने, रेल्वे-यार्ड, तेलसाठे तसेच व्ही-१ व व्ही-२ क्षेपणास्त्रांचे तळ नष्ट करण्याचा उद्देश होता. या हल्ल्यांमध्ये आसपासच्या नागरिक वस्त्याही बळी पडत.
या टोळधाडींचा मुकाबला करण्यास आता लुफ्तवाफे कमी पडू लागली व उरलासुरला विरोधही मोडून काढणे दोस्त वायुसेनांना सोपे झाले. १९४४ च्या अंतापर्यंत पश्चिम आघाडीवर लुफ्तवाफेकडे फक्त तुरळक प्रमाणात विमानांच्या तुकड्या उरल्या होत्या. परिणामतः १९४५ च्या मध्यापर्यंत जर्मनीतील जवळजवळ सगळी मुख्य शहरे बेचिराख झालेली होती. युद्धाच्या दरम्यान तंत्रज्ञानाच्या शोधामध्ये, जगातील पहिले प्रोग्राम करण्यायोग्य संगणक (झेड 3, कोलोसस आणि एएनआयएसी), मार्गदर्शित क्षेपणास्त्रे आणि आधुनिक रॉकेट्स, अण्वस्त्रांचा विकास झाला.
एवढा मोठ्ठा नरसंहार, त्यावर 'पश्चातबुद्धी' म्हणून की काय, २५ जून १९४५ ला विश्व शांतीच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाच्या स्थापनेचा मसुदाही तयार झाला होता. शिवाय 'ड्वाइट डी आयसनहॉवर' यांनी हल्ला न करण्याचा सल्लाही दिला होता, तोही न जुमानता अमेरिकेने ऑगस्ट, १९४५ मध्ये जपानमधील हिरोशिमा व नागासाकी शहरांवर विमानाच्याच साहाय्याने अमानुष व महाविध्वंसक असे अण्वस्त्र हल्ले केले. ६ ऑगस्ट, १९४५ रोजी एनोला-गे नावाच्या बी-२९ प्रकारच्या विमानाने 'लिटल बॉय' असे नामकरण केलेला परमाणु बॉम्ब हिरोशिमा शहरावर टाकला. यात हिरोशिमा नष्ट झाले. ९ ऑगस्ट, १९४५ रोजी बॉक्सकार नावाच्या बी-२९ विमानाने 'फॅट मॅन' नावाचा परमाणु बॉम्ब नागासाकी शहरावर टाकून तेही शहर नष्ट केले. त्यात अनुक्रमे १,२९००० आणि २,२६००० लोक मारले गेले. यावर राइट बंधुंच्या दुःखद प्रतिक्रिया आपण 'आकाशझेप - भाग ४' मध्ये पाहिल्या.
छायाचित्र: 'बी-२९ विमान'; हिरोशिमा व नागासाकी शहरांवर अणुबॉम्ब हल्ल्यानंतर मशरूम-रुपी ढग
जगभरातील देशांचा सहभाग व असा हा महायुद्धांमध्ये झालेला विमानांचा (गैर) वापर! त्याचा शोध घेताना माझेच मन हेलकावत होते. या लेखावर तुमच्याही प्रतिक्रया नक्की लिहा.
संदर्भ :विकिपीडिया, मराठी विश्वकोश, इंटरनेट
लेखन:
राकेश शांतीलाल
शेटे
विमानशास्त्र
अभियंता, बेंगलोर
संपर्क: 8951655367
Sundar 👌👍
ReplyDeleteमस्त व सुंदर
ReplyDeleteApratim !!!
ReplyDeleteKhup chhan !!!