जेव्हा राइट बंधूंनी १९०३ साली जगातील पहिले 'हवेपेक्षा जास्त वजनदार' अशा विमानाचे उड्डाण केले, तेव्हा 'वाहतुकीच्या मोठ्या उद्योगाचा' त्यांनी पाया रचला. त्याआधी लोक फक्त गरम हवेचे फुगे आणि ग्लायडर्समधूनच हवाई प्रवास करत होते. १९०८ मध्ये पॅरिसच्या बाहेर गवताच्या कुरणातून फ्रेंच पायलट 'हेन्री फरमान' सोबत प्रवासी म्हणून प्रवास करणाऱ्या पहिल्या व्यक्तीचे नाव 'लिओन डेलाग्रांज' होते. त्यावर्षी नंतर 'किट्टी हॉक' येथे 'ऑर्व्हिल राइट' बरोबर उड्डाण करणारे 'चार्ल्स फर्नास' हे पहिले अमेरिकन विमान प्रवासी बनले.
'एअरलायनर' म्हणजे प्रवासी आणि हवाई मालवाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या विमानाचा एक प्रकार आहे. अशी विमाने चालविणाऱ्या कंपन्यांना 'एअरलाईन्स' म्हणतात. १६ नोव्हेंबर १९०९ रोजी जर्मन एअरशिप कंपनी - 'देलाग' ही पहिल्या विमान कंपनीची स्थापना झाली. पण १ जानेवारी १९१४ रोजी सेंट पीटर्सबर्ग आणि टँम्पा, फ्लॉरिडा ही जगातील पहिली निश्चित पंख (फिक्स्ड विंग) प्रकारच्या विमानाची नियोजित प्रवासी विमानसेवा सुरू झाली.या विमानाचे उड्डाण व उतरण पाण्यावर होत असे. सेंट पीटर्सबर्ग – टांपा एयरबोट लाइन अल्प कालावधीसाठी म्हणजे केवळ चार महिने चालली. परंतु यामुळे आजच्या दैनंदिन आंतर-खंडीय विमान उड्डाणाचा मार्ग मोकळा झाला.
व्यावसायिक एअरलाइन्सचे पहिले उड्डाण!
(विमान चालक : टोनी जॅनुस, 'बेनोइस्ट एअरबोट'मध्ये.छायाचित्र सौजन्य:
दक्षिण फ्लोरिडा विद्यापीठ)
व्यावसायिक विमान वाहतूक सामान्य लोकांच्या प्रवासासाठी खूपच मंद होती. त्यापैकी बहुतेक जण नवीन अशा हवेत उडणाऱ्या या यंत्रांमध्ये स्वार होण्यास घाबरत होते. विमानाच्या रचनेमध्ये सुधारणा देखील संथ गतीने होत होती. तथापि पहिल्या महायुद्धानंतर अटलांटिकच्या दोन्ही बाजूंच्या सरकारांकडून विमानाची लष्करी किंमत लवकर ओळखली गेली आणि लक्षणीय प्रमाणात विमानांचे उत्पादन वाढले.
१९१९ मध्ये, पहिले महायुद्ध संपल्यानंतर मोठ्या संख्येने बाजारात युद्धात वापरलेल्या विमानांचा पूर आला. फ्रान्सचे 'फार्मन एफ ६०- गोलिएथ' हे त्यापैकीच एक. युद्धातील भारी बॉम्बवर्षावानंतर त्याचा उपयोग १४ प्रवासी बसतील असा केला जाऊ लागला. विमान वाहतुकीला प्रचंड महत्त्व देणारा आणखी एक विकास म्हणजे रेडिओ. एव्हिएशन आणि रेडिओ जवळजवळ सोबतच विकसित झाले. राइट बंधूंच्या किट्टी हॉक येथे पहिल्या उड्डाणाच्या अवघ्या दोन वर्षांपूर्वी मार्कोनीने एटलांटिकच्या पलीकडे हवेद्वारे पहिला संदेश पाठविला होता. पहिल्या महायुद्धानंतर, काही पायलट त्यांच्याबरोबर हवेत रेडिओ घेऊन होते, जेणेकरून ते जमिनीवर लोकांशी संवाद साधू शकू शकतील. युद्धानंतर, एअरलाइन्सने वादळं टाळता यावीत तसेच हवामानाची माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या विमान चालकांकडे रेडिओचा वापर अवलंबला.
भारतात फेब्रुवारी १९११ साली आधुनिक नागरी उड्डाण झाले. अलाहाबादह ते नैनी म्हणजे ६ मैल (९.७ कि.मी.) अंतरासाठी. येथे अलाहाबाद प्रदर्शनाच्या दरम्यान, फ्रेंच विमानप्रमुख हेनरी पेक्वेट यांनी 'हंबर बायप्लेन' या विमानातून ६५०० टपाल (मेल) प्रदर्शनातून अलाहाबाद येथील कार्यालयात नेले. ही जगातील पहिली अधिकृत विमान डाक (एयरमेल) सेवा आहे.
१५ ऑक्टोबर १९३२ रोजी जे. आर. डी. टाटा यांनी स्वतः विमान चालवून कराचीहून जुहू विमानतळावर मेलची वाहतूक केली. त्यांची एअरलाइन्स नंतर 'एअर इंडिया' झाली.
जरी अमेरिकन अनुभवाने कधीकधी युरोपियन प्रवृत्ती प्रतिबिंबित केल्या, तरी त्यामध्ये देखील स्पष्ट फरक दिसून आला. अमेरिकेन सरकार व तेथील टपाल खाते यांच्या संयुक्त विद्यमाने विमान निर्मितीला चालना देण्यासाठी आणि प्रशिक्षित वैमानिकांचा चमू तयार करण्यासाठी युद्धकालीन प्रयत्न म्हणून १९१८ मध्ये एअरमेल ऑपरेशन सुरू करण्यात आले.
बोईंग कंपनीने सामान्यत: पहिले आधुनिक प्रवासी विमान - बोईंग २४७ - तयार केले. त्याचे अनावरण १९३३ मध्ये झाले आणि युनायटेड एअर लाईन्सने तातडीने त्यापैकी ६० विमाने विकत घेतली. १९३५ मध्ये 'डग्लस डीसी - ३' प्रवासी वाहक विमानाने प्रथम उड्डाण केले होते. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीपर्यंत, डीसी- ३ ने एअरलाइन्सच्या व्यवसायावर प्रभुत्व मिळवले. १९४० मध्ये बोईंगचे स्ट्रॅटोलिनर - एक असे वाहतूक विमान बनवले ज्यात प्रेशरयुक्त केबिनची निर्मिती केली. त्याचा फायदा असा झाला की, प्रवाशांना प्रतिकूल हवामानाच्या वरच्या उंचीवर घेऊन जाण्यास विमान सक्षम बनले. शिवाय अधिक उंचीवर, विमानांना प्रत्यक्षात वातावरणातील कमी घर्षणाचा अनुभव आला, ज्यामुळे त्यांची कार्यक्षमता आणि इंधन कार्यक्षमता वाढली. दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान आणि त्यानंतर जेट विमानांचा शोध व वापर वाढला.
'एरोस्पाइल' व 'ब्रिटीश एरोस्पेस' यांनी मिळून, तंत्रज्ञानाचा एक उत्कृष्ट नमुना तयार केला - 'कॉन्कोर्ड एअरलाइनर'; ज्याचे पहिले विमान उड्डाण २ मार्च १९६९ रोजी झाले. त्याचा वेग ध्वनीपेक्षा जास्त (सुपरसॉनिक) होता; म्हणून त्याला 'टाइम मशीन' असेही म्हणत असत. 'एअरबस ए-३२०' विमानाने १९८७ मध्ये प्रथम उड्डाण केले आणि त्याच्या पुढील वर्षी ते व्यावसायिक सेवेत रूजू झाले. या विमानात साधारणत: १५० प्रवासी बसू शकतात. आज हवेमध्ये जी प्रवासी विमाने आपण पाहतो; त्यात 'एअरबस' व 'बोईंग' या कंपन्यांची विमाने सर्वांत जास्त आहेत.
विमान प्रवास हा त्या काळापासून
एक रुबाबदार अनुभव होता आणि आजही आहे. पुरुषांनी कोट आणि टाय परिधान केले. स्त्रिया हॅट्स आणि ड्रेसमध्ये दिसू लागल्या. विमानतळांवर प्रथम श्रेणी रेस्टॉरंट्स सुरु झाले; एअरलाइन्स केबिन सेवेमध्ये दर्जा वाढू लागला; जसे की - प्रथम श्रेणी (फर्स्ट क्लास), व्यवसाय श्रेणी (बिजनेस क्लास).
(संदर्भ: विकिपीडिया, इंटरनेट)
२०१२ - २०१३ साली माझे 'क्वेस्ट ग्लोबल' या कंपनी मार्फत 'एअरबस, युनाइटेड किंग्डम' येथील चार महिन्यांचे परदेशातील प्रशिक्षण संपवून मी जेंव्हा 'मँचेस्टर- बेंगळुरू ' असा विमान प्रवास केला, तेंव्हा सुचलेली ही माझी कविता तुम्हा वाचकांसाठी:
- 'विमान प्रवास' –
वेगळाच एक येतो आनंद,
विमानाच्या खिडकीतून बाहेर पाहताना
मोठाल्या प्राण्यासारखी ही विमानं
दिसतात धावपट्टीवर ये-जा करताना
कुठेतरी आकाशात विरतात काही
दिसतात काही अलगद उतरताना.
विमान आपलं जसं झेपावते वर,
दिसतात क्षितीजाच्या कक्षा रुंदावताना.
होतो भास स्वर्गीय अनुभवाचा,
पांढुरल्या ढगातून विमानं जाताना.
मावत नाही आनंद गगनात,
खूप दिवसांनी मायदेशी परतताना.
वेगळाच एक येतो आनंद,
वाचक मित्रांनो, अभिप्राय लिहिताना तुमच्या पहिल्या विमान प्रवासाचा अनुभव नक्की लिहा. धन्यवाद!
Very nice sir👍
ReplyDeleteहोतो भास स्वर्गीय अनुभवाचा,
ReplyDeleteहा लेख वाचताना.
राकेश सरांनी लिहिलंय म्हणजे वाचनीय
Nice Sir
ReplyDelete