विल्बर
व ओर्वील हे 'राइट बंधू', त्यांचे बालपण आणि त्यांची 'आकाश-झेप' करण्याची धडपड आपण भाग २ मध्ये पाहिली. १९०२ च्या हिवाळ्यात त्यांनी तरंगयान (glider) बांधले होते. वात-नळा/ वात पेटी (wind tunnel) मधील प्रतिकृतीच्या प्रयोगाच्या मदतीने वास्तविक उड्डाणे यशस्वीरित्या करता आली. फक्त चाळीस दिवसांमध्ये एक हजार उड्डाणे (म्हणजे एका दिवसात जवळपास २५ उड्डाणे ) यशस्वीपणे पूर्ण केली. वळणे(yaw), कलणे (roll) व वर-खाली जाणे (pitch- up/ pitch-down) या तीनही क्रियांवर त्यांना पूर्णपणे नियंत्रण मिळवता आले होते.
छायाचित्र: वळणे (yaw), कलणे (roll) व वर-खाली जाणे (pitch- up/ pitch-down) इत्यादी. (सौजन्य: नासा) |
राईट बंधूंचे
अंतिम ध्येय 'पहिले-वहिले संपूर्णपणे यांत्रिक शक्तीवर उडणारे विमान तयार करणे’ हेच होते. पूर्व अनुभवाने त्यांचा उत्साह, आत्मविश्वास वाढला होता. विमानासाठी बनवलेल्या वायू-पेटीसाठी जे इंजिन
बांधले होते, ते एका सिलिंडरचे होते, असे चार सिलिंडर शेजारी-शेजारी बसवून इंजिन तयार करण्याचे त्यांनी ठरवले. काही महिन्यात ते तयारही झाले. त्यांनी पंखा (propeller) तसेच कार्ब्युरेटर विशेष पद्धतीने तयार केले. त्याबाबतीत राईट बंधू खरेच तज्ज्ञ समजायला हवेत. आता इंजिन व इंधनाचे मिळून वजन ८५ किलो, अधिक वैमानिकाचे वजन म्हणजे जवळपास ७५ किलो. एवढे
सगळे वजन पेलणारे पंख हवे होते, ते ४२ फूट लांबीचे झाले. आता विमानाचे एकूण वजन ३७० किलोग्रॅम होणार होते. एवढे मोठे विमान पाटावर ठेवून, लाकडी रुळावर चाकाच्या साहाय्याने घरंगळत नेवून उड्डाण करण्याचे ठरले. या योजनेसाठी
त्यांना एक महिना
लागला.
१५
डिसेंबर १९०३, रोजी उड्डाणाची सर्व तयारी झाली. विमान उडविण्यासाठीही त्या दोघांमध्ये नाणेफेक
झाली. त्याचा कौल विल्बरच्या बाजूने लागला. विमानाच्या खालील पंखावर विल्बर आडवा झाला, आणि त्याने विमान सुरू केले. पण त्याचा गतीचा अंदाज चुकला आणि पुरेशी गती घेण्याच्या अगोदरच विल्बरने उद्वाहक (elevator) थोडा वर उचलला. विमानाचे नाक वर झाले, पण उड्डाण झाले नाही. तेवढ्यात रूळ संपला,आणि विमान वाळूमध्ये घसपटत गेले. विमानाची मोडतोड झाली. ते दुरुस्त करण्यात त्यांचा एक दिवस गेला.
छायाचित्र: नमुना विमान व आडवा होऊन स्वार झालेल्या वैमानिकाची प्रतिकृती
(सौजन्य: National Air and Space
Museum, Washington, DC) |
१७
डिसेंबर, १९०३! त्या दिवशी 'किटी हॉक' च्या दक्षिणेला 'किल डेव्हिल' टेकड्यांवर ओर्वीलने पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन, विमान चालू केले. विमानाला पुरेशी गती येऊ दिली. रूळ संपण्याच्या थोडे अगोदर त्याने उद्वाहक (elevator) हलकेच वर उचलले आणि काय आश्चर्य! ते ४२ फूट लांब विमान हवेत झेपावलं.
जमिनीपासून केवळ पाच-सात फूट उंचावर उडत हे विमान जवळ जवळ १२० फूट अंतर गेल्यावर हलकेच आणि सुरक्षितपणे जमिनीवर उतरले. हुर्रे!! इंजिन शक्तीवर चालणारे, हवेपेक्षा जड, मानव नियंत्रित, आपल्या बळावर झेपावणारे, आणि हवेत काही काळ राहिलेले असे हे जगातले पहिले यशस्वी यांत्रिक उड्डाण होते.
छायाचित्र: ऐतिहासिक यशस्वी विमान-उड्डाण (सौजन्य: https://airandspace.si.edu/)
राइट
बंधूंनी त्या दिवसभरात चार उड्डाणे केली. शेवटचे उड्डाण २० फुटांपेक्षा जास्त उंचीवरून, ८५२ फूट अंतराचे, आणि जवळ जवळ एक मिनिट हवेत राहणारे झाले. “उड्डाण यशस्वी झाले. हवेतील वेग सरासरी ताशी ३१ किमी असताना चार उड्डाणे केली. सर्वात मोठे उड्डाण ५७ सेकंदाचे ठरले. वर्तमानपत्रांना कळवावे. घरी नाताळासाठी येतो.” अशी
तार (telegram) राइट बंधूंनी आपल्या वडिलांना केली. वर्तमानपत्रांनी त्यांच्या यशाच्या बातमीकडे जराही लक्ष दिले नाही. १९०४ पासून डेटन या त्यांच्या गावाजवळ 'हाफमॅन प्रेअरी' येथे दोघे यशस्वी प्रयोग करू लागले आणि त्यानंतर त्यांना प्रसिद्धी मिळू लागली. १९०५ ते १९०७ या वर्षांत त्यांनी आपल्या विमानांची प्रात्यक्षिके इंग्लंड आणि फ्रान्समध्ये केली. फ्रान्समधील जगप्रसिद्ध 'एअर शो' मध्ये दोघांना प्रसिद्धीही मिळाली, पण पैसा नाही. शेवटी, अमेरिकेच्या संरक्षण खात्याने त्यांना विमान पुरवठा करण्यासाठी २५,००० डॉलर्स एवढी रक्कम दिल्यानंतर विमान उत्पादन सुरू करता आले.
कोणत्याही
व्यक्तीचे चरित्र किंवा कथेचे तात्पर्य आपल्याला महत्वपूर्ण बोध देते. राइट बंधूंकडून आपण काय शिकलो, यावर तुम्ही नक्की अभिप्राय द्या.
(क्रमश:)
संदर्भ:
1. लेख: दैनिक लोकसत्ता, १५ डिसेंबर, २००२ (लेखक: माधव खरे, पुणे)
2. पुस्तक: 'राइट बंधू' (लेखिका: आना स्प्राउल, रूपांतर: मीना वैशंपायन)
3. सौजन्य: Google, NASA,
airandspace.si.edu
खूप छान लिखाण... पुढील भागांसाठी खूप खूप शुभेच्छा👍
ReplyDeleteVery good 👍👍 keep it up
ReplyDeleteराईट बंधू,जगा ने प्रतिसाद दिला नाही म्हणून थांबले नाहीत तुम्हीही अशी माहिति पूर्ण लेख माला चालू ठेवा
ReplyDeleteखूप छान माहिती आणि अगदी सहज शब्दात...������
ReplyDeleteRakesh, can you pls tell about Shivkar Bapu Talpade ?
ReplyDeleteI told it in 'part 1'.
DeleteLink:
https://mitramandal-katta.blogspot.com/p/blog-page_964.html?m=1
Thank you!