आकाश झेप' भाग १२-मोहक हेलिकॉप्टर्स

 

मित्रांनो, भारतीय 'प्रजासत्ताक दिना'ची चित्तथरारक प्रात्यक्षिके असोत, किंवा हॉलिवूड, बॉलीवूड चित्रपटांमधील कितीतरी रोमांचकारी, साहसी दृश्ये असोत, 'हेलिकॉप्टर्स' आपल्या भुवया नक्कीच उंचावतात. तुम्हालाही केंव्हातरी त्यात बसून आकाशातून फेरफटका मारण्याची इच्छा झाली असेल, नाही का? त्याबद्दलच आपण या भागात जाणून घेऊयाचक्राकार (Helix) पंख (Pteron) या ग्रीक शब्दांवरून हेलिकॉप्टर (Helicopter) हा शब्द तयार झाला आहे. 'हेलिकॉप्टर' ची chopper, copter, eggbeater, helo, whirlybird ही आणखी काही समानार्थी नावे आहेत

छायाचित्र: 'हेलिस्मार्ट' नावाचे हेलिकॉप्टर (आहे ना नावाप्रमाणे गोंडस?)

हेलिकॉप्टरचा शोध लागला हे फार बरे झाले. कारण अशा बऱ्याच प्रसंगी जिथे विमाने वापरता येत नाहीत, तिथे हेलिकॉप्टर खूपच शिताफीने काम करते. हेलिकॉप्टर हे उभ्या दिशेने वर उडू शकते, तसेच सरळ रेषेत खाली उतरू शकते. ते सभोवताली, पुढे किंवा मागेही उडू शकते. यामुळे ते अवघड, जास्त लोकसंख्या असलेल्या जागेत किंवा निर्जन जागेत, साध्या विमानापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने वापरण्यात येऊ शकते. हेलिकॉप्टर विमानापेक्षा खूप लहान जागांवर उतरू शकते. तसेच लष्करी, पोलीस आणि खाजगी क्षेत्र, वैद्यकीय उपकरणे आणि रूग्ण वाहतूक, रहदारी पाहणी, एका जागी स्थिरपणे अंतराळी तरंगणे, घिरट्या घालणे, आपत्कालीन बचावकार्य, आग विझवणे, शेती-औषध फवारणी, कमी उंचीवर उड्डाण क्षमता, मनोरंजन, आकाशातून पर्यटन, छायाचित्रण व चलचित्रण असे हेलिकॉप्टरचे अनेक उपयोग आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर हेलिकॉप्टरचा अनेक क्षेत्रांतील व्यापारी उपयोग जोमाने वाढला.

हेलिकॉप्टर हा घूर्णक-विमानाचाच (Rotor-Craft) एक प्रकार आहे, ज्यात उचल (Lift) 'प्रणोद'(रेटा) (Thrust) घुर्णनाद्वारे (rotation) पुरवले जातात. हेलिकॉप्टरवरील घूर्णकाची पाती (Blades of Rotor) हे फिरणारे पंख (Rotary Wings) असतात. इंजिन घूर्णक फिरविते व हवेत पाती गरगर फिरल्याने उच्चालक प्रेरणा (Lift) निर्माण होते. उच्चालक प्रेरणेमुळे ते गुरुत्वावर (Gravity) मात करते, हवेत वर जाते व तरंगत राहते. एका घूर्णकाचे हेलिकॉप्टर हा सर्वांत सामान्य प्रकार आहे. याला एकच मुख्य घूर्णक (Main Rotor) असून तो हेलिकॉप्टरच्या कायेवर (Shaft) बसविलेला असतो, तसेच याला दुसराही लहान घूर्णक (Small Rotor) असून तो त्याच्या पुच्छावर (Tail) बसविलेला असतो. मुख्य घूर्णकाला २ ते ८ पाती (Blades) असू शकतात. या घूर्णकामुळे हेलिकॉप्टराला उच्चालक प्रेरणा (Lift) व प्रचालन (Operation) मिळते. पुच्छ घूर्णकाला २-१३ पाती असतात. हा घूर्णक बहुधा पुच्छाच्या एका बाजूवर उदग्र (उभ्या) दिशेत व मुख्य घूर्णकाला काटकोनात बसविलेला असतो. पुच्छ घूर्णक हा मुख्य घूर्णकाच्या दिशेविरुद्ध दिशेला वळण्याच्या हेलिकॉप्टराच्या प्रवृत्तीवर मात करतो व त्याच्या दिशा-नियंत्रणाला मदत करतो.

उडता भोवरा (फ्लाइंग टॉप)' या - घूर्णकाद्वारे उडणाऱ्या यंत्राचा इ. . ३२० चा चीन मधील सर्वांत प्रथम उल्लेख आहे. दोरी ओढून घूर्णकाची पाती फिरविणे हे हेलिकॉप्टरचे तत्त्व वापरणारी खेळणी मध्ययुगात होती. पंधराव्या शतकाच्या उत्तरार्धात लिओनार्दो दा व्हींची यांनी हेलिकॉप्टराची रेखाचित्रे काढली होती. १८४३ मध्ये यशस्वी हेलिकॉप्टरच्या तत्त्वांची वैज्ञानिक मांडणी स्पष्टपणे करण्याचे काम सर जॉर्ज केली यांनी केले. लॉऊनॉय (Launoy) व बिनव्हेन्यू (Bienvenue) या फ्रेंच संशोधकांनी फिरणारे पंख असलेले व वर जाऊन उडणारे खेळणे तयार केले. फ्रेंच लेखक पॉनडॉन डी अमेकॉट यांनी या खेळण्याला 'हेलिकॉप्टर' असे नाव दिले. त्यांनी चक्राकार फिरण्याला 'हेलिको' आणि पंखांसाठी 'प्टर' असे शब्द वापरले. १९०७ साली 'पॉलकॉर्नु' यांनी पहिल्यांदा हेलिकॉप्टर चालवले. १९३६ मध्ये हेलिकॉप्टरच्या विकासात जर्मनी अग्रभागी आला, त्याचे कारण म्हणजे जर्मनीमध्ये 'फोक आकगेलिस रू-६१' हे हेलिकॉप्टर तयार झाले



छायाचित्रे : 'इगोर इवानोविच सिकॉर्स्की' त्यांच्या Sikorsky R-4 या हेलिकॉप्टर मध्ये बसलेले असताना

इगोर इवानोविच सिकॉर्स्की (१८८९ -१९७२) हे रशियन-अमेरिकन होते. ते 'हेलिकॉप्टर', 'स्थिर-पंख विमान', तसेच 'उडणारी बोट' या तीनही मध्ये आद्यप्रवर्तक होते. १९१९ मध्ये अमेरिकेत स्थलांतर केल्यानंतर, सिकॉर्स्की यांनी १९२३ मध्ये 'सिकॉर्स्की एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन'ची स्थापना केली, आणि १९३० च्या दशकात 'पॅन अमेरिकन एअरवेज'च्या महासागर ओलांडून उडणाऱ्या बोटी विकसित केल्या. १९३९ मध्ये, सिकॉर्स्की यांनी 'व्हॉट-सिकोरस्की व्हीएस -३००' ची रचना केली आणि उड्डाण केले. ते पहिले व्यवहार्य अमेरिकन हेलिकॉप्टर होते, ज्याने आज बहुतेक हेलिकॉप्टरद्वारे वापरल्या जाणाऱ्या घूर्णक धाटणी (Rotor Configuration) चे नेतृत्व केले. सिकॉर्स्की यांनी त्यात बदल करून 'सिकॉर्स्की आर -' नावाचे हेलिकॉप्टर तयार केले, जे १९४२ मध्ये जगातील पहिले मोठ्या प्रमाणात उत्पादित हेलिकॉप्टर बनले.

भारतामध्ये 'हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमिटेड' या कंपनीचे 'ध्रुव, चिता, चेतक, लान्सर, रुद्र, चितल, एल. सी. एच., एल. यू. एच.' असे काही हेलिकॉप्टर्स प्रसिद्ध आहेत. ध्रुव हेलिकॉप्टर बद्दलच बोलायचे झाले तर, त्यामध्ये १२ + जण बसू शकतात. ते जवळपास १६ मीटर लांब, १३ मीटर रुंद, मीटर ऊंच आहे. ते ५५००-५८०० किलो वजन उचलू शकते. त्याचा वेग ताशी २९२ किमी आहे. ते ६३० किमी जाऊ शकते आणि .६५ तास प्रवास करू शकते. त्याला २०५ किलो वजनाचे 'शक्ती' नावाचे इंजिन आहे, जे १०३२ किलो-वॅट शक्ती देते. 'ध्रुव'चा उपयोग प्रवासी रसद वाहतूक, शोध बचाव मोहीमा, भारतीय हवाई दलाचे गन, रॉकेट्स, मिसाईल्स वाहून नेणे, अशा बऱ्याच ठिकाणी होतो.

छायाचित्र: . एल. एच. 'ध्रुव' हेलिकॉप्टर्स असे तिरंगी 'फ्लायपास्ट' सादर करताना

'बेल एअरक्राफ्ट कॉर्पोरेशन'ने 'ऑर्थर यंग' यांच्या नेतृत्वाखाली बेल मॉडेल-४७ हे सर्वाधिक महत्त्वाचे हेलिकॉप्टर तयार केले. जुळ्या समाक्ष (अनुक्रमी) घूर्णकांमुळे अगदी मोठ्या घूर्णक पात्यांविना हेलिकॉप्टरचे आकारमान जवळपास दुप्पट मोठे करणे शक्य झाले. शिवाय यामुळे गुरुत्वमध्याचा मोठा पल्ला उपलब्ध झाला.

रशियन MIL Mi-26, जगातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर पैकी एक आहे. ते रशियन हवाई दल,एरोफ्लोट रशियन एअरलाइन्स,अल्जेरियन हवाई दल, भारतीय हवाई दल यांच्याकडे आहे. खूप मोठ्या मोहिमांसाठी हे वापरले जातात.


नासा 'इंजेनुइटी' (Ingenuity) या हेलिकॉप्टरद्वारे मंगळ ग्रहाबद्दल काय शिकता येईल हे पाहण्यासाठी आणि मंगळाचे सर्वेक्षण करण्याची योजना आखत आहे. मंगळावर पृथ्वीपेक्षा जास्त पातळ हवा असल्याने त्याच्या क्षमतेपेक्षा ते दहा पट वेगाने फिरेल, असा अंदाज आहे.

छायाचित्रे: ) रशियन MIL Mi-26 हेलिकॉप्टर एक विमान घेऊन जाताना,

) 'नासा'चे 'इंजेनुइटी' (Ingenuity) हेलिकॉप्टर

आहे की नाही मजेशीर? सांगा मग मित्रांनो, केंव्हा करताय प्लॅन हेलिकॉप्टरने 'आकाशझेप' घेण्याचा?

शुभास्ते सन्तु पन्थानः!

संदर्भ: विकिपीडिया, मराठी विश्वको, एच. . एल., इंटरनेट, इत्यादी.

लेखक:

राकेश शांतीलाल शेटे

विमानशास्त्र अभियंता, बेंगलोर

संपर्क: 8951655367






6 comments:

  1. आतापर्यंत चे सर्वच भाग खूप माहितीपूर्ण आणि उत्सुकतावर्धक आहेत..

    ReplyDelete
  2. जे काही माहीती नव्हतं हेलिकाँप्टर बद्दल ते तुमच्यामुळेच समजले, त्याबद्दल आभारी आहे शेटेसाहेब आपला..इथुनपुढेही जास्तीत पुराणकाळाकील व नवनवीन माहीती मिळोत ही विनंती.

    ReplyDelete
  3. Well articulated and explanatory article.

    ReplyDelete
  4. खुपच छान सर, आम्हाला पण Helicopter ची आकाशझेप घ्यायला नक्कीच आवडेल.
    तुम्ही आम्हाला खूप छान माहिती दिली .

    ReplyDelete