'आकाश झेप' - भाग १०अग्निबाण व क्षेपणास्त्रे

 

दिवाळीच्या निमित्ताने, किंवा इंग्रजी नववर्षाला फटाक्यांमधला अग्निबाण (rocket) उडवायला कोणाला आवडत नाही? एका क्षणात आकाशात झेपावून, विविध रंग उधळणारे हे अग्निबाण प्रत्येकाच्या काळजाचा ठाव घेतात.पहिला दारू-गोळा वापरून अग्निबाण (रॉकेट) हा तेराव्या शतकात तयार झाला. तो मध्यकालीन चीनमध्ये सॉन्ग राजवंशाच्या काळात विकसित झाला. मंगोल्यांनी चीनी रॉकेट तंत्रज्ञान स्वीकारले आणि ते शोध मध्य-पूर्वेकडे आणि युरोपमध्ये तेराव्या शतकाच्या मध्यापर्यंत पसरले.

 

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? सर्वप्रथम लोखंडी आच्छादन असलेले अग्निबाण (रॉकेट) हे 'मैसूर'चे! हे एक असे सैन्य-शस्त्र होते, जे हैदर अली आणि त्याचा मुलगा टीपू सुलतान यांच्या नेतृत्वात मैसूरच्या सैन्याने १७८०-१७९० च्या दशकात, ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध प्रभावीपणे वापरले. त्यांच्यात झालेल्या संघर्षामुळे ब्रिटिशांना हे तंत्रज्ञान अवगत झाले, जे नंतर १८०५ मध्ये 'कांग्रेव्ह रॉकेट' म्हणून - युरोपमधून प्रसिद्ध पावले. विशेष बाब म्हणजे, अमेरिकेतील नासाच्या 'वॉलॉप्स फ्लाइट' सुविधेच्या स्वागत-कक्षामध्ये 'ब्रिटिश कॅव्हलरी' येथे टीपू सुलतानच्या सैन्याने 'म्हैसुरियन रॉकेट' चालविल्याची चित्रे दाखविली आहेत.

चित्र: 'म्हैसुरियन रॉकेट' चा सामना करताना ब्रिटिश सैन्य (सौजन्य: नासा)

अग्निबाण (rocket) एक असे प्रक्षेपक आहे, जे अंतरिक्ष यान, विमान किंवा इतर वाहने 'रॉकेट इंजिन'मधून जोर (thrust) मिळविण्यासाठी वापरतात. रॉकेट इंजिन निकास (exhaust) संपूर्णपणे अग्निबाणामध्ये वाहून नेलेल्या प्रणोदक (propellant, एक इंधन) पासून तयार केले जाते. रॉकेट इंजिन हे 'क्रिया प्रतिक्रिया' या न्यूटनच्या तिसऱ्या गती-नियमानुसार कार्य करते. त्यांच्या निकासांना ते वेगाने उलट दिशेने बाहेर टाकून अग्निबाण पुढे ढकलते आणि म्हणून ते अवकाशातसुद्धा (vacuum) कार्य करू शकते.

 

अग्निबाणात अनेक कप्पे (stages) असतात. त्यामधील इंधन हे त्याच्या वजनाच्या जवळपास ९०% पेक्षा जास्त असते. त्यामुळे इतकं इंधन साठवायला तितक्याच मोठ्या टाक्या लागतात. इंधन संपून गेल्यावर राहिलेल्या टाक्यांचं वजन पुढे ओढत नेण्यात काहीच अर्थ नसतो. म्हणून कार्य संपलेल्या टाक्या ह्या मुख्य अग्निबाणापासून विलग होऊन पृथ्वीवर पडतात अथवा वातावरणात नष्ट होतात. जगातील जवळपास प्रत्येक अग्निबाण याच तत्वावर काम करतो. रॉकेट हे 'स्टेज' मध्ये काम करत आपल्यावर असलेल्या उपग्रहांना त्यांच्या योग्य कक्षेत प्रक्षेपित करते. आजवर जगातील सगळेच देश प्रत्येक वेळी नवनवीन टाक्या प्रत्येक उड्डाणाला वापरत होते. पण नवीन तंत्रज्ञान आले. अमेरिकेच्या 'स्पेस एक्स' ह्या कंपनीने पहिल्यांदा ह्या टाक्या पुन्हा जमिनीवर उतरवण्याची कल्पना मांडली आणि यशस्वी केली. ह्यामुळे उपग्रह प्रक्षेपणाच्या खर्चात कमालीची बचत होणार आहे. पुन्हा वापरण्याच्या ह्या तंत्रज्ञानावर 'इस्रो'सुध्दा काम करत आहे.

 

इस्रो (ISRO) कडे ध्वनीत अग्निबाण (sounding rockets) हे एक वा दोन थराचे घन-प्रणोदक अग्निबाण (solid propellant rockets) आहेत, जे वरच्या वातावरणीय क्षेत्राच्या तपासणीसाठी आणि अंतराळ संशोधनासाठी वापरले जातात. उपग्रह प्रक्षेपण वाहन-3 (Satellite Launch Vehicle-3 - 'SLV-3') प्रकल्पाच्या यशस्वी समाप्तीने ऑगमेंटेड उपग्रह प्रक्षेपण वाहन (ASLV), ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV) आणि भू-सापेक्ष सम-क्रमित उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV) सारख्या प्रगत प्रक्षेपण वाहनांचा मार्ग दाखविला.

छायाचित्र: इस्रो (ISRO) मधील विविध अग्निबाण

अग्निबाणाचे कितीतरी प्रकार आहेत. हवेच्या फुग्याचे, पाण्याचे, फटाक्यांतील अग्निबाण, अवकाश-अग्निबाण, चारचाकी, दुचाकी, अग्निबाण-चलित विमान (पारंपारिक विमानांच्या रॉकेट सहाय्यक 'टेक-ऑफ'सह - आरएटीओ), रॉकेट स्लेड्स, आगगाड्या, टॉर्पेडो, जेट पॅक, स्पेस प्रोब, जलद बचाव प्रणाली जसे की, इंजेक्शन सीट आणि लाँच एस्केप सिस्टम तसेच अग्निबाणाचे अनेक उपयोगही आहेत. उदा. सैन्य, विज्ञान, संशोधन, अवकाश-प्रक्षेपण, बचाव, छंद, खेळ आणि मनोरंजन. 'रॉकेट फेस्टिव्हल'(Bun Bang Fai) हा पारंपारिकपणे पूर्वोत्तर थायलंड आणि लाओसच्या बऱ्याच भागांमध्ये थाई आणि लाओ लोक साजरा करतात. ओल्या हंगामाच्या सुरूवातीस असंख्य गावे आणि नगरपालिका यांच्यात यामुळे स्पर्धेचं स्वरूप आलेलं असतं.

                                            

क्षेपणास्त्र (Missile) हासुद्धा एक अग्निबाणांचाच प्रकार आहे. सैनिकी भाषेमध्ये, ज्याला 'मार्गदर्शित अग्निबाण' असेही म्हटले जाते. हे एक मार्गदर्शित हवाबंद शस्त्र आहे, जे सहसा 'जेट इंजिन' किंवा 'रॉकेट मोटर'द्वारे स्वयंचलित उड्डाण करण्यास सक्षम असते. मार्गदर्शनाची सर्वात सामान्य पद्धत म्हणजे क्षेपणास्त्राला लक्ष्य करण्यासाठी काही प्रकारचे रेडिएशन, जसे की इन्फ्रारेड, लेसर किंवा रेडिओ लाटा वापरणे.दुस-या महायुद्धात 'नाझी-जर्मनी'ने विकसित केलेल्या क्षेपणास्त्रांची मालिका अशा प्रकारे एखाद्या मोहिमेत वापरली जाणारी प्रथम क्षेपणास्त्रे होती. यापैकी बहुतेक प्रसिद्ध 'व्ही - फ्लाइंग बॉम्ब' आणि 'व्ही - रॉकेट' आहेत. त्यांच्यासाठी पूर्व-निवडलेल्या मार्गावर क्षेपणास्त्र उडवण्यासाठी 'मेकॅनिकल ऑटोपायलट'चा वापर केला गेला.

 

क्षेपणास्त्राचे वापरानुसार वेगवेगळे प्रकार पडतात.पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग आणि हवा-ते-पृष्ठभाग क्षेपणास्त्रे (बॅलिस्टिक, समुद्र-पर्यटन, जहाज-विरोधी, रणगाडा-विरोधी .), पृष्ठभाग-ते-हवा क्षेपणास्त्र (आणि बॅलिस्टिक-विरोधी), हवा-ते-हवा क्षेपणास्त्रे आणि उपग्रह विरोधी शस्त्रे. एकात्मिक मार्गदर्शित क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (IGMDP) - यासाठी, डॉ. अब्दुल कलाम यांना, जे पूर्वी इस्रो येथे एसएलव्ही-3 प्रोग्रामचे प्रोजेक्ट डायरेक्टर होते, त्यांना सुरुवात नेतृत्व करण्यासाठी डीआरडीएल संचालक म्हणून १९८३ साली सामील केले गेले. त्यांनी निर्णय घेतला की डीआरडीएल एकाच वेळी या भागातील अनेक प्रकल्पांचा पाठपुरावा करेल. उदाहरणार्थ: लहान पल्ल्याचे पृष्ठभाग-ते-पृष्ठभाग, असे 'पृथ्वी' क्षेपणास्त्र, लहान पल्ल्याचे निम्न-स्तरीय पृष्ठभाग-ते-हवा. असे 'त्रिशूल' क्षेपणास्त्र, मध्यम पल्ल्याचे पृष्ठभाग-ते-हवा असे 'आकाश' क्षेपणास्त्र, तसेच तिसऱ्या पिढीतील रणगाडा-विरोधी असे 'नाग' क्षेपणास्त्र, 'री-एंट्री व्हेईकल' प्रकल्प, 'अग्नि' क्षेपणास्त्र. त्यानंतर K-Series, शौर्य, ब्रम्होस (भारत-रशिया संयुक्त विद्यमाने), निर्भय, प्रहार, अस्त्र, हेलिना, अमोघ, साम्हो, सूर्य, प्रलय, मैत्री, स्वनातीत (hypersonic) तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वाहन- अशा यशस्वी क्षेपणास्त्रांची मालिकाच आहे.

 

भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांना म्हणूनच 'मिसाईल-मॅन' म्हणत असत. आता भारतीय शास्त्रज्ञ - टेस्सी थॉमस यांना 'मिसाईल-वूमन' संबोधले जाते. भारतीय शास्त्रज्ञांच्या या अशा अथक परिश्रमामुळे आपण जगात सुरक्षिततेचा अनुभव घेत आहोत. त्या सर्वांना सलाम!

छायाचित्र: भारताकडील विविध क्षेपणास्त्रे


संदर्भ: विकिपीडिया, इस्रो वेबसाईट, इंटरनेट

लेखक: राकेश शांतीलाल शेटे

विमानशास्त्र अभियंता, बेंगळुरू

संपर्क: 8951655367





2 comments:

  1. खूप महत्त्वपूर्ण माहिती. .खूप छान.. पुढील लिखाणासाठी सदिच्छा 👍

    ReplyDelete