'आकाश झेप' भाग ११: 'ड्रोन'च 'ड्रोन' चोहीकडे!

 

'मोठी बातमी :- भारतावर ड्रोनचा हल्ला!' परवा जून महिन्यात जम्मू येथे दहशतवाद्यांकडून ड्रोनद्वारे प्रथमच झालेल्या हल्ल्याने  संपूर्ण भारत संरक्षण खाते खडबडून जागे झाले आहे. जगासाठी 'ड्रोन' तसा नवा नाही. मुळतः विसाव्या शतकामध्ये ड्रोन हे सैन्य अभियानासाठी विकसित केले गेले होते, जे मानवासाठी देखील 'कंटाळवाणे, गलिच्छ किंवा धोकादायक' (3D: Dull, Dirty or Dangerous) होते.

 

मानव रहित हवाई वाहन (यूएव्ही-UAV) सामान्यत: 'ड्रोन' म्हणून ओळखले जाते. हे मानवी चालक वा प्रवासी नसलेले विमान आहे. यूएव्ही हा मानवरहित विमान प्रणालीचा (UAS) चा घटक आहे, ज्यात याव्यतिरिक्त एक भू-स्थित नियंत्रक (ground-based controller) आणि 'यूएव्ही'शी संप्रेषण प्रणाली (communication system) यांचा समावेश आहे. फिरते पाते असलेले, गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध सरळ वरती आकाशात झेपावणारे 'ड्रोन' हे 'क्रिया प्रतिक्रिया' या न्यूटनच्या तिसऱ्या गती-नियमानुसार कार्य करते. क्षेत्रानुसार, आकारानुसार, कामानुसार, कौशल्य खर्च यानुसार 'ड्रोन'चे विविध प्रकार आहेत.

 

आकार (Size):- नॅनो, मायक्रो, लहान, मध्यम, मोठा

पंख (Wing):- फिरते, निश्चित

पाते (Rotor):- हेली-, बाय-, ट्राय-, क्वाड-, पेंटा-, हेक्सा, ऑक्टो-कॉप्टर

ऊर्जा (Power):- जेट, बॅटरी, संकरित

उपयोग (Use):- नागरी, व्यावसायिक, सैन्य

ड्रोनचे विविध प्रकार

युद्धासाठी मानव रहित हवाई वाहनाचा सर्वांत लवकर नोंद झालेला वापर, हा जुलै १८४९ चा. फुगे वाहक जहाज - नौदल उड्डाणातील हवाई शक्तीचा हा पहिला आक्षेपार्ह वापर होता. व्हेनिसला ऑस्ट्रियन सैन्याने वेढले होते. ठराविक वेळेपर्यंत पेटणारी वात देऊन, फुग्यामधून खाली टाकण्यात येणाऱ्या, सुमारे २०० आग लावणाऱ्या प्रत्येक फुग्यामध्ये १० ते १३ किलो वजनाचे बॉम्ब होते. फुगे प्रामुख्याने जमिनीपासून उडवले गेले; तसेच, काही ऑस्ट्रियाच्या 'एसएमएस वोल्कॅनो' जहाजावरूनही प्रक्षेपित करण्यात आले. परंतु बहुतांशी असे आगलावे फुगे वाऱ्याच्या बदलत्या दिशेमुळे अपयशी ठरले.

चित्र: आगलावे फुगे आणि जहाज


पहिले मानव रहित विमान पहिल्या महायुद्धाच्या शेवटी म्हणजे १९१७ मध्ये तयार केले गेले होते. सुरुवातीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणी तंत्रज्ञानामध्ये १९१७-१९१८ मध्ये '.एम.लो' यांच्या मार्गदर्शनाने झेपेलिन्सवर हल्ला करण्यासाठी, दूरस्थपणे नियंत्रित मानवरहीत विमानाचा विकास करण्यासाठी 'ब्रिटीश ड्रोन शस्त्रास्त्र' विकसित झाले. '.एम.लो' यांना 'रेडिओ मार्गदर्शन प्रणालीचे जनक' म्हणून ओळखले जाते. हळूहळू यामध्ये स्वयंचलित विमान, उडता बॉम्ब, हवाई टॉर्पेडो (आजच्या क्रूझ क्षेपणास्त्रांची प्रारंभिक आवृत्ती) अशी प्रगती होत गेली.


१९५९ मध्ये अमेरिकेच्या हवाई दलाने विरोधी प्रदेशात वैमानिक गमावू नये यासाठी मानव हि विमानांच्या वापराची योजना सुरू केली. १९६० मध्ये सोव्हिएत युनियनने 'यू -' हे गुप्तहेर विमान पाडल्यानंतर हे नियोजन अधिक तीव्र झाले. काही दिवसातच 'रेड वॅगन' या सांकेतिक नावाखाली उच्च वर्गीकृत यूएव्ही

प्रोग्राम सुरू झाला. अट्रिशन युद्धाच्या काळात (१९६७-१९७०) टेहळणी-कॅमेऱ्याद्वारे बसविलेल्या यूएव्हीची चाचणी इस्त्रायली गुप्तचर विभागाने सर्वप्रथम केली. त्याने आकाशातून सुएझ कालवा ओलांडून यशस्वीरित्या छायाचित्रे आणली. 'डेटन-राइट एअरप्लेन' कंपनीने एक 'मानव हि हवाई टॉरपेडो' चा शोध लावला जो ठरवलेल्या वेळेवर फुटत असे. १९४० मध्ये डेन्नी यांनी 'रेडिओप्लेन कंपनी' सुरू केली आणि दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान ड्रोनचे आणखी प्रकार उदयास आले. विमान-विरोधी सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि हल्ला मोहिमेत उड्डाण करण्यासाठी याचा उपयोग केला. दुसऱ्या युद्धाच्या वेळी नाझी जर्मनीने विविध यूएव्ही विमानांची निर्मिती केली आणि त्यांचा वापर केला.

छायाचित्र: 'डी हॅव्हिलंड क्वीन-बी' या 'लक्ष्यीत-ड्रोन'चे प्रक्षेपण पाहताना विन्स्टन चर्चिल ( जून, १९४१)


बगदाद मध्ये जन्मलेले 'अब्राहम करीम' वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच विमानाचे नमुने बनवत. त्यांनी इस्राईल मधून एरोनॉटिकल इंजिनीरिंगची पदवी घेतली. इस्त्रायली हवाई दलासाठी 'योम किप्पुर' युद्धाच्या वेळी त्यांनी पहिला यू व्ही (ड्रोन) तयार केला. १९७० साली त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केलं, आणि घराच्या गॅरेज मधूनच स्थापलेल्या 'लिडिंग सिस्टीम इंक.' या कंपनीतून 'अल्बाट्रॉस', 'अँबर' आणि प्रसिद्ध असे 'प्रिडेटर' ड्रोन तयार केले. त्यामुळे त्यांना 'यू व्ही (ड्रोन) तंत्रज्ञानाचे जनक' म्हणून संबोधले जाते.

'उबेर वाहतूक कंपनी' ही 'करीम एअरक्राफ्ट लि.' सोबत Uber Air नावाची 'उडती गाडी' (Flying Car) तयार करत आहे, ते आपण पुढील भागामध्ये पाहूया. नियंत्रण तंत्रज्ञान सुधारत असताना आणि खर्च कमी होत असताना, एकविसाव्या शतकात ड्रोनचा उपयोग अनेक क्षेत्रांत होत आहे, त्याचा वापर झपाट्याने वाढत आहे. 'Just Drone It!' ड्रोनचा वापर कुठल्या क्षेत्रात नाही? एखाद्या क्षेत्राचं नाव घ्या, आणि त्यापुढे 'जस्ट ड्रोन इट' अशी म्हण आता रूढ होत चालली आहे. 'हवाई ड्रोन' प्रमाणेच पाण्यामध्ये (हायड्रोन: Hydro + Drone = Hydrone), जमिनीवर, आकाशात आणि अवकाशातही वापरले जाणारे विविध प्रकारचे ड्रोन आहेत.

 

ड्रोनचा वापर कुठे होत नाही सांगा बरे? शेती, विमा, पायाभूत सुविधा, रस्ते, रेल्वे, आणीबाणी, भू-संपत्ती, संवर्धन, सुरक्षा दल, पोलीस सहाय्य, आपत्ती व्यवस्थापन, शोध बचाव मोहीम, कायदा अंमलबजावणी, भौगोलिक नकाशे, वन विभाग, वन्यजीव निरीक्षण, जमाती अन्वेषण, हवामान अंदाज, ज्वालामुखी वादळ निरीक्षण, समुद्री अवकाश कचरा नियोजन, वाहतूक नियोजन, बांधकाम, खाणी, वाळू-खाण निरीक्षण, भारत सरकारचे 'स्मार्ट सिटी' अभियान, नगररचना नियोजन यामध्ये; तसेच जनसुरक्षा, खाद्यपदार्थ, वैद्यकीय, इत्यादी वस्तूंच्या घरपोच सेवा; जाहिरात, पुष्प-वर्षाव, बातम्या, समारंभ छायाचित्रण, चलचित्रण, संशोधन, अभ्यास, करमणूक, ड्रोन-शर्यत, खेळ, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपण कल्पनाही करू शकणार नाही, अशा पद्धतीने ड्रोन वापरले जात आहेत, आणि म्हणूनच बालकवींची माफी मागून मला लिहावेसे वाटले,


पाहावे ते नवल घडे, 'ड्रोन' 'ड्रोन' चोहीकडे,

वरती खाली पाते फिरे, वायूसंगे 'ड्रोन' फिरे,

नभांत भरला, दिशांत फिरला, जगांत उरला,

'ड्रोन' विहरतो चोहीकडे!


ड्रोनचे फायदे आपण पाहीले. तसेच दहशतवाद्यांचे हल्ले, गुन्हेगारी, लोकांशी ड्रोनची टक्कर, इमारती, संरचना, मोठी स्मारके, मोठ्या विमानाशी ड्रोनची टक्कर, दुखापतीचा धोका - अशी 'ड्रोन'ची काही आव्हाने देखील आहेत. त्यासाठीच भारतात 'भारतीय गुणवत्ता परिषद' (Quality Council of India) आणि 'नागर विमानन महानिदेशालय(Directorate General of Civil Aviation- DGCA) हे 'नागरी उड्डाण मंत्रालय' (Ministry of Civil Aviation) अंतर्गत 'ड्रोन'संदर्भात नियम आणि कायदे पाहतात. 'नॅनो ड्रोन' (२५० ग्रॅम पेक्षा लहान) व्यतिरिक्त त्या पेक्षा मोठ्या ड्रोन साठी कायदेशीर परवानगी लागते. जगभरातील, तसेच भारतीय सरकारी, खाजगी कंपन्या या क्षेत्रात संशोधन, कार्य करत आहेत.

चला, नव्या युगासोबत आपणही आकाशात झेप घेऊया! पाहूया 'मानव-सहीत ड्रोन' पुढील भागात. धन्यवाद!

संदर्भ: विकिपीडिया, इंटरनेट

 

लेखक: राकेश शांतीलाल शेटे

संपर्क: 8951655367

विमानशास्त्र अभियंता, बेंगळुरू

लेखक सध्या 'Edall Sytems' या 'ड्रोन उत्पादन  सेवा कंपनी' मध्ये 
'प्रकल्प व्यवस्थापक' म्हणून कार्यरत आहेत.




8 comments:

  1. Khoopach Mahatvapurn lekh Drone baddal ekdam detail mahiti. Charoli hi mast👌. Pudhil Lekhnis Shubhechcha 👍

    ReplyDelete
  2. Drone बद्दल नावाव्यतिरिक्त इतर काहीच माहिती नव्हती.
    ह्या लेखातून ती मिळाली.

    ReplyDelete
  3. Very informative,Yet easy to under stand for common people.
    -supriya

    ReplyDelete
  4. Very informative yet easy to understand for common people
    _ supriya

    ReplyDelete
  5. Your each part is interesting.. Keep it on.. 👍🏼👍🏼

    ReplyDelete