जंगलाला आग लागली पळा पळा - भाग २

मागील भाग :  जंगलाला आग लागली पळा पळा

दक्षिण अमेरिका खंडातील अमेझॉनच्या जंगलाला लागलेल्या महाभयंकर वणव्यांची बातमी एव्हाना सर्वश्रुत झाली आहे. दबलेल्या आवाजात का होईना बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू झाली आहे. यजमान ब्राझीलने 'आग माझ्या घरात लागली आहे माझे मी बघून घेईन' असा सूर लावलाच आहे. प्रत्यक्षात आग विझविणाऱ्या कामगारांना पाण्याचे पाइप्स,होस किंवा इतर पुरेसे साहित्यही दिले गेलेले नाही. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे म्हणाल तर,"फार मोठी आग लागली आहे हो अमेझॉनच्या जंगलाला,छे छे फार वाईट! पण आपण इथे बसून काय करणार?" असं म्हणून आपल्या कामाला लागणाऱ्यांची संख्या सगळ्यात मोठी. हजारो मैलांवर लागलेल्या आगीचे परिणाम सगळ्या पृथ्वीवरच होऊ शकतात याची ही बऱ्याच लोकांना जाणीव ही नाही.

आग लागते,ती धुराचे लोट हवेत सोडते,त्यामुळे प्रचंड प्रमाणात कार्बनडाय ऑक्साइड हवेत सोडला जातो हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण इथे आगीमुळे होणाऱ्या विनाशाच्या साखळीतील ती फक्त पहिली कडी आहे. हवेतला कार्बन डाय ऑक्साइड कमी करून ऑक्सिजन सोडण्याचं जीवनदायी काम करतात ती झाडे इथे जळून जात हेत. आगीत साधारण दहा झाडे जळून गेली तर त्यामुळे निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे आजूबाजूच्या भागातील साधारणत: ३० झाडं वाळून जातात. हवेतील आर्द्रता कमी होते. बऱ्याचदा पुढच्या वर्षी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी होतं. याचा अधिकाधिक वाईट परिणाम जंगलांवर प्राण्यांवर आणि पर्यायाने माणसांवर होत जातो.


याशिवाय या कार्बन डायऑक्साइड,कार्बन मोनोक्साइड या वायूंमध्ये एक अजून क्षमता असते ती म्हणजे उष्णता धरून ठेवण्याची. या आगीमुळे वातावरणात प्रचंड प्रमाणात सोडला गेलेल्या कार्बन डाय ऑक्साइड आणि कार्बन मोनोक्साइड या दोन्हीही वायूंनी धरून ठेवलेल्या उष्णतेमुळे सरासरी तापमान अर्ध्या अंशाने जरी वाढले तरी ध्रुवीय बर्फ हिमनद्या यांच्या वितळण्याचे प्रमाण मात्र प्रचंड प्रमाणात वाढू शकते. एवढेच नव्हे तर समुद्रात असणारे अंतस्थ प्रवाह (उदाहरणार्थ एल् निनो जे सगळ्या जगाच्याच पर्जन्य चक्रावर परिणाम करतात) व त्यांचे तापमान यावर परिणाम होतो. अर्थातच त्यामुळे जगाच्या कुठल्याही भागात येणारी वादळे,पाऊस,चक्रीवादळे,दुष्काळ ही सारीच याच चक्राचा भाग आहेत. आणि या सर्वांवर परिणाम होणे ही अटळ आहे.

हे सगळे खरे असले तरी आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना प्रश्न पडतो की ब्राझीलमधल्या आगीसाठी मी इथे बसून करणार काय? आग विझवण्यासाठी कदाचित काही करू शकणार नाही पण हे परिणाम कमी करण्यासाठी मात्र ठरवले तर बरेच काही करता येईल. कारण आपणही याच निसर्गचक्राचा एक भाग आहोत. आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या परीने निसर्गचक्राला कमीत कमी हानी पोचवायची,जमतील तेवढी कुंडीत का होईना दोन चार झाडं लावायची,जोपासायची,शक्यतो इको फ्रेंडली प्रॉडक्ट्सचा वापर करायचा,युज अँड थ्रो प्लॅस्टिक यांचा वापर शक्यतो टाळायचा णि बरंच काही करण्यासारखं आहे. आपल्यासारखी बरीच सर्वसामान्य माणसं आपापल्या परिने ते करतही असतात. त्यांची ओळख कट्टयाच्या वेगळ्या अंकात.

गंधाली सेवक 





No comments:

Post a Comment