जंगलाला आग लागली पळा पळा. . .

जगाचे फुप्फुस म्हणून ओळखले जाणारे अमेझॉनचे  जंगल सध्या त्यात लागलेल्या अनेक वणव्यांमुळे चर्चेत आले आहे. सर्वप्रथम जाणून घेऊ या अमेझॉनचे हे जंगल आहे तरी काय?

भर दुपारी सुद्धा सूर्याचा किरण जिथे जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही अशा घनदाट जंगलांचे जे वर्णन आपण ऐकले आहे त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अमेझॉनचे जंगल. दक्षिण अमेरिकेत ५५ लाख स्क्वेअर किलोमीटर भूभागावर पसरलेले हे जंगल जगातील सर्वात मोठे जंगल म्हणता येईल. या जंगलाचा ६०% भाग ब्राझीलमध्ये,१३% पेरूमध्ये आणि १०% कोलंबियामध्ये आहे. एकूण नऊ देशांमध्ये विस्तारलेल्या या प्रचंड जंगलात ४०००० प्रकारची झाडे आहेत. संपूर्ण पृथ्वीला दररोज लागणाऱ्या ऑक्सिजनच्या २०% ऑक्सिजन हा अमेझॉनच्या जंगलातून तयार होतो. त्यामुळेच या जंगलाला पृथ्वीचे फुप्फुस असे म्हणतात. हे जंगल इतके घनदाट आहे की तिथे मिळणाऱ्या सूर्यप्रकाशापैकी केवळ एक टक्का सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचू शकतो.

पण या जंगलाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे इथे सापडणारे जीव-वैविध्य. सुमारे ३००० प्रकारचे पक्षी,७०००प्रकारचे प्राणी व अडीच लाख प्रकारचे कीटक आणि जीवजंतू या जंगलात वास्तव्यास आहेत. अनाकोंडा सारखे आपण फक्त चित्रपटातच पाहिलेले प्राणी सुद्धा अॅमेझॉनच्या जंगलात सापडतात.

या जंगलात असणाऱ्या सुमारे साडेचारशे नद्या-नाल्यांमधील सर्वात मोठी नदी म्हणजे अमेझॉन. तिच्यामुळेच या जंगलाला अमेझॉन हे नाव पडले आहे. या पशु पक्ष्यांबरोबरच अमेझॉनच्या  या खोऱ्यात आदिवासींच्या पन्नास जमाती वास्तव्यास आहेत. सुमारे अडीच लाख माणसे आणि त्यांच्या जवळजवळ सातपट प्राणी असणारे हे जंगल जगातील एकमेव अद्वितीय जंगल आहे.

गेल्या महिन्यापासून या जंगलात विविध वणवे लागल्याची बातमी सगळीकडेच प्रसारित होत आहे. विशेष म्हणजे ही आग एकाच भागात लागलेली नसून अनेक वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या आगी लागलेल्या आहेत. फक्त ब्राझीलमध्ये २५०० वेगवेगळ्या आगी लागलेल्या असून यातिल बहुतेक मानवनिर्मित असाव्यात अशी शंका आहे.

या वणव्याच्या धुराने जवळजवळ अर्धा ब्राझील व्यापल्याचे satellite मधून घेतलेल्या चित्रात स्पष्ट दिसत आहे. ब्राझीलच्या सा पाउलो शहरात भर दुपारी धुरामुळे झालेल्या अंधारामुळे रात्री सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.


गेले ३ आठवडे धुमसत असलेल्या या आगीचे जगावर आणि वातावरणावर काय परिणाम होत आहेत याची कल्पनाच अंगावर शहारे आणणारी आहे. प्राण्यांच्या,पक्षांच्या, वनस्पतींच्या अनेक जाती नामशेष होण्याची शक्यता आहे. जंगलाच्या आतील भागात राहणाऱ्या आदिवासींचे काय होत आहे याची जगाला कल्पनाही नाही. ७०००० स्क्वेअर किलोमीटर म्हणजे जवळपास फ्रान्सच्या क्षेत्रफळाएवढा भाग जळून नष्ट झाला आहे. या वणव्यांमुऴे होणाऱ्या परिणामांना तोंड देण्यासाठी ब्राझीलने राष्ट्रीय आपत्ती म्हणजे आणीबाणी घोषित केली आहे. पण ही आपत्ती आता ब्राझील किंवा आजुबाजूच्या देशांपुरती सीमित राहिलेली नाही. संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणावर त्याचा परिणाम होणार या शंका नाही. २०० मिलियन टन कार्बनडाय ऑक्साइड या वणव्याने वातावरणात सोडला आहे.



या भीषण आगीमुळे वातावरणाच्या तापमानात वाढ होणार यात शंकाच नाही. पण पुढील काही वर्षांच्या पर्जन्यमानावर काय परिणाम होईल,वादळे,चक्रीवादळे कशी तयार होतील याचा अभ्यास अजूनही चालू आहे. ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळण्याच्या प्रमाणात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून काही बेटे पाण्याखाली जाऊ शकतील. नष्ट झालेल्या अनेक प्राणी वनस्पतींमुळे वातावरणाचा जो समतोल बिघडेल त्याची तर आज कल्पनाही करवत नाही.

कोरड्या हवामानात जंगलांना वणवे लागणे ही नैसर्गिक घटना आहे. पण या वर्षी या वणव्यांमध्ये ७८% ने वाढ झाली आहे. ही वाढ मात्र नक्कीच नैसर्गिक मानता येणार नाही. या आगीला जबाबदार कोण? यावर ब्राझीलमध्ये तर राजकीय चिखलफेक चालू आहेच.G-7 राष्ट्रांनी या आपत्तीचा सामना करण्यासाठी मंजूर केलेली आर्थिक मदतही ब्राझीलने नाकारली आहे. वातावरणाचा ऱ्हास असाच चालू राहिला तर पुढील काही शतकांमध्ये पृथ्वी राहाण्या योग्यच राहणार नाही अशी शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. मूठभर लोकांच्या अति स्वार्थी वागण्यामुळे आणि निसर्गाच्या चक्राशी खेळ करण्यामुळे तो दिवस खुपच लवकर येईल की काय अशी भीती वाटू लागली आहे.



आपल्या पुढच्या पिढीला निदान श्वास घ्यायला ऑक्सिजन आणि प्यायला पाणी मिळावं असं वाटत असेल तर आपण सर्वांनी आतापासून या क्षणापासून त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. #prayforamazon ही चळवळ उभी रहात हे. पण फक्त प्रार्थना करून भागणार नाही. निसर्गाचा समतोल काही प्रमाणात तरी परत आणण्यासाठी सर्वांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे.


                                            गंधाली सेवक


1 comment:

  1. I was expecting article on this topic from you. You have covered all the points in a short way. Time only tell us it's consequences

    ReplyDelete