भारतीय संस्कृती कृषिप्रधान असल्याने आपले बहुतेक सण शेती, सुगी, पाउस-पाणी, जनावरे इत्यादींशी संबंधित असतात. तशी इथल्या संस्कृतीशी आपली ओळख
नसल्याने अमेरिकन सण आणि त्यामागची कारणे - सगळं आपल्याला वरवरचं वाटतं. त्यांचे
सण म्हणजे 4 जुलै....अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन! नंतर इस्टर,
हॅलोवीन, ब्लॅक फ्रायडे आणि ख्रिसमस.
चार जुलैला-अमेरिकेच्या स्वातंत्र्यदिनी सगळी दुकाने बंद असतात फक्त
कपड्यांची आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुकाने चालू असतात. ह्यात खूप मोठा सेल
लागलेला असतो. अमेरिकेत बर्याचदा लोक दोनदाच खूप शॉपिंग करून घेतात. एक चार
जुलैला आणि दुसरे ब्लॅक फ्रायडे ला.
स्वातंत्र्यदिनी एखाद्या पार्कमध्ये मोकळ्यावर ‘फायर शो’ असतो. वर्षभरात अमेरिकेत
तुम्ही एकही फटाका फोडू शकत नाही. त्यामुळे हे फायरवर्क बघायला तुफान गर्दी असते.
आपल्याकडे गणपतीची आरास बघायला असतं तसं वातावरण ह्यावेळी बघायला मिळतं.
ईस्टरच्या सणाला मुलांसाठी ‘एग हंट’ हा खेळ ठेवतात. अंडं हे पुनर्निमितीचं प्रतीक मानलं जातं. म्हणून त्यांना गोळा करायचं. प्लास्टिकची डबीसारखी झाकण असलेली रंगीत अंडी दुकानात मिळतात. त्यात चॉकलेट्स भरतात आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवली जातात. मग मुलांना चिठ्ठ्यांमधून क्ल्यू लिहून देतात. क्ल्यूप्रमाणे जात जात मुले अंडी शोधून काढतात. मग त्यांना ती अंडी त्यातल्या चॉकलेट्सह गिफ्ट म्हणून देतात.
ब्लॅक फ्रायडेला ‘थँक्स गिव्हींग डे’
पण म्हणतात. आपल्याकडे पाडव्याला जशी लहान मंडळी वडिलधार्यांच्या
पाया पडायला जातात तशीच इथली मंडळी वडिलधार्यांना ‘धन्यवाद’
द्यायला जातात. एकमेकांना भेटतात. एकत्र जेवतात, खातात, पितात.
ह्या दिवशी अमेरिकेतला सगळ्यात मोठा सेल लागतो. गुरूवारी संध्याकाळपासून रविवार दुपारपर्यंत हा सेल चालतो. ह्या पंधरा दिवसांत म्हणजे ख्रिसमसच्या पंधरवड्यात इथल्या ‘स्नो फ्लेक स्ट्रीट’ वर, रोज रात्री मिरवणूक असते. कॉलेजमधली मुलं-मुली गेल्या काही वर्षांपासून हा उपक्रम राबवतात. निरनिराळी बर्फाशी संबंधित पात्रे रंगवून त्या रस्त्यावर ही मिरवणूक चालू असते. म्हणजे, हिमगौरी, स्नोमॅन, रेनडियर.... अशी सोंगे घेतात, आणि रस्त्याच्याकडेने उभ्या असलेल्या मुलांना अभिवादन करत रोड शो करतात. हे सगळं पाहून मला भारतातल्या विविध सणावारी निघाणार्या पौराणिक देखाव्यांच्या मिरवणुका आठवल्या. आपल्याला असलेल्या प्रचंड मोठ्या सांस्कृतिक वारशाची जाणीव झाली.
मला भारतातल्या घराघरांतली ऐंशी-नव्वदीची म्हातारी माणसं आठवली, अशीच गतकाळाच्या, माणसांनी
गजबजलेल्या, श्रीमंत आठवणींच्या जत्रेत, हरवलेल्या पोरांसारखी भिर भिर करत फिरणारी.....
देश बदलले तरी अंतरीच्या खुणा सारख्याच....!!!
नीलिमा क्षत्रिय
पुस्तकासाठी संपर्क : नीलिमा क्षत्रिय
81495
59091
भारतीय आणि अमेरिकन संस्कृती मधील साम्य छान मांडलंय तुम्ही😊
ReplyDelete