मागच्या आठवडयात माझी गाडी दुरुस्तीला गेली होती आणि कुठेतरी परगावी जाण्याचा योग आला. सध्याच्या परिस्थितीत सार्वजनिक गर्दीच्या वाहनातून प्रवास टाळायचा होता. मग एकच पर्याय होता, तो म्हणजे ओला किंवा उबर. दोघांचंही ऍप उघडून पाहिलं तर दोघांनीही गंतव्य स्थळी पोहोचण्यासाठी पंचवीसशेचा आकडा दाखवला. माझ्यातला मध्यमवर्गीय काटकसरी स्वभाव अशावेळी चटकन नकळत डोकं वर काढतो. म्हणजे हा आकडा परवडणारा नाही अशी ईश्वरकृपेने सद्यस्थिती नाही तरी एकट्यासाठी टॅक्सीवर पंचवीसशे रुपये खर्च करायचे हे मनाला मान्य करणं जरा जडच जात होतं.
अशावेळी पूर्वी अशाच एका प्रसंगात माझा माझ्या आईबरोबर झालेला एक संवाद आठवला. मला तेव्हा आयटी मध्ये नोकरी करुन साधारण ५-६ वर्षे झाली होती त्यामुळे 'आयटीत' काम करणारी माझ्या वयाची माणसं जितकी 'ऐटीत' राहायची तितके पैसे खिशात खुळखुळत होते. घरात गाडी आली होती. स्वतः चं वाहन असण्याचं स्वातंत्र्य आणि त्याची नशा चाखली गेलेली होती.
त्यावेळी एका प्रोजेक्टच्या निमित्ताने काही काळासाठी मला घरापासून बऱ्याच दूरच्या ऑफिसमध्ये जावं लागणार होतं. कंपनीने आम्हा दूर राहणाऱ्या सर्वांसाठी बसची व्यवस्थाही केली होती. मी बसने जावं की आपल्या गाडीनेच आरामदायी प्रवास करावा असे दोन पर्याय माझ्यासमोर आले. "मोफत बस असताना उगाच कशाला पेट्रोलचे पैसे खर्च करायचे" असा स्वभावतः उपजलेला काटकसरी विचार करून मी बसने जायचं ठरवलं.
ही भीती बहुतेक माझ्या चेहऱ्यावर नकळत प्रतिबिंबित झाली असणार किंवा आईच असल्याने माझ्या मनातलंही तिने ओळखलं असावं बहुतेक. पण तिने काळजीपोटी "काय रे ! काय झालं?" असा प्रश्न विचारला आणि माझा संयमाचा बांध फुटला. मी रस्त्यापासून ते अगदी बसच्या ड्रायव्हरपर्यंत सगळ्यांवर आगपाखड करून माझ्या उरातली मळमळ बाहेर काढली.
"मग असं असेल तर कशाला जातोस बसने? गाडीनी का जात नाहीस आरामात?" असा तिने
पुनर्प्रश्न केला.
"इतक्या लांब जायचं तर पेट्रोलवर खूप खर्च होतो. तो वाचवावा म्हणून बसने जायचं ठरवलं मी." प्रांजळपणे मी सांगून टाकलं. त्यानंतर आमच्यात घडलेला संवाद असा -
आई :. "समजा पेट्रोलचे पैसे वाचवलेस तर
काय होईल?"
मी : "ते पैसे शिलकीत पडतील."
आई : " शिलकीत पडले तर काय होईल?"
मी : "पुढे काही इतर आवडीच्या,
आरामच्या, आनंदाच्या गोष्टींवर खर्च करता
येतील"
आई : "पैसे पेट्रोलवर खर्च झाले तर इतर गोष्टींवर खर्च करता येणार नाहीत अशी आर्थिक परिस्थिती आहे का तुझी?"
आई : "मग नंतर आनंद विकत घेता येईल म्हणून आत्ता आनंदाचा बळी कशाला देतोयस? शिवाय तब्येत ढासळवून आत्ता पेट्रोलचे पैसे वाचवशील आणि नंतर ते डॉक्टरला देशील..डॉक्टरसाठी वाचवतोयस का पैसे? "
आईचा युक्तिवाद बिनतोड होता आणि त्यावेळी मला आयुष्यातला एक मोठा धडा
मिळाला होता. भविष्यासाठी हातचं जरूर राखावं, त्याचं
नियोजनही करावं पण शक्य असेल तर उद्याच्या आनंदासाठी आजच्या आनंदाचा बळी देऊ नये
कधी...
उद्याचा अशाश्वत आनंद मिळण्यासाठी आजचा शाश्वत आनंद उपभोगायचा राहून जात नाहीये ना?
उद्याचा आराम मिळवण्यासाठी आजचा आराम हराम होत नाहीये ना?
आणि अधिक मुळातला प्रश्न म्हणजे आसक्तीलाच आनंद समजायला नाही लागलेलो ना आपण!
वस्तू मिळवण्यात आसक्ती असते आणि आनंद हा सद्यस्थिती उपभोगण्यात असतो. आसक्ती भविष्याची असू शकते पण आनंद फक्त आणि फक्त वर्तमानातच भोगता येऊ शकतो. भूतकाळात आनंदाची आठवण असते आणि भविष्यकाळात आनंदाची आशा. पण अनुभूती? आनंदाची अनुभूती फक्त वर्तमानात भोगता येते. आपली शास्त्र, साधुसंत हे हेच सांगतात ना?
मग असं असेल तर भविष्यातल्या आनंदाच्या आशेसाठी वर्तमानातल्या आनंदाच्या
अनुभूतीचा बळी देणं सुयोग्य आहे का? हा
विचार आला आणि तंद्री भंगली.
आई आणि माझ्या संवादाची आठवण होऊन विचारांच्या तंद्रीत गेलो आणि तंद्री
तुटली तेव्हा अर्थात आनंदाने माझ्या परगावतील वारीसाठी ओला बुक केली हे वेगळे
सांगणे न लगे...
राजेंद्र वैशंपायन
rajendra.vaishampayan@gmail.com
सुंदर व योग्य विचार! व्यक्तही छान झाला आहे.
ReplyDelete