अंतिम सत्य - अर्थात मराठीत Enlightenment!

 



मी इयत्ता ६वीत असताना गौतम बुद्धाची कथा आम्हाला - बहुधा - इतिहासाच्या पुस्तकात होती. त्या धड्यात राजपुत्र गौतमाचे अत्यन्त सुरक्षित जीवन - नंतर त्याचे सत्य शोधण्यासाठी बाहेर पडणे; आणि खडतर प्रयत्नानंतर ३५ व्या वर्षी त्याला झालेला साक्षात्कार, अंतिम ज्ञान याचे वर्णन होते. या ज्ञान प्राप्तीमुळे गौतमाला 'बुद्ध' पदवी मिळाली वगैरे मजकूर होता. पण त्या महत्वाच्या ज्ञानोद्दीपना (enlightenment ला हा आणखी एक मराठी प्रतिशब्द!) बद्दल मात्र फारच त्रोटक माहिती होती. "तृष्णा ही सर्व दुःखाचे मूळ आहे. .." हे ज्ञान गौतमाला प्राप्त झाले असं काहीसं वर्णन होते. मला त्यातून फारसं कळलं नाही, पण माझे शिक्षकही तेवढेच clueless आहेत हे मात्र छानच समजलं. त्यानंतर कित्येक दिवस अगदी खूप तहान लागली तरी ते काहीतरी वाईट असतं असं मला वाटायचं!

अर्थात परीक्षेपुरता रट्टा मारून, बरे मार्क मिळवूनपुढच्या वर्गात ढकललावगैरे रीतसर सर्व झाले - पण मनात कुठेतरी हे 'अंतिम सत्य' काय आहे वगैरे राहिलेच. त्यामुळे मी जेव्हा विपश्यनेबद्दल ऐकले तेव्हा विपश्यनेत शिकवल्या जाणाऱ्या चिन्तनतंत्राबरोबर - बुद्धाच्या या 'अंतिम सत्या'चा काही उलगडा होईल असे वाटले. विपश्यनेचा, १० दिवसांचा, संपूर्ण मौनव्रत पाळत करायचा अभ्यासक्रम करायचा उत्साह जरा कणभर वाढला.

बुद्ध हे नाव नाही तर ती एक पदवी आहे. ज्ञानी व्यक्तीला मिळणारी ती एक उपाधी आहे. असं म्हणतात की गौतमाच्या आधी कितीतरीबुद्धहोऊन गेले आणि गौतमानंतर कितीतरी लोकांना बुद्ध म्हणता येईल असे ज्ञान मिळाले. गौतम बुद्ध या सर्वात प्रसिद्ध होण्याचं कारण त्यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार करण्यात आयुष्य घालवले. ‘शहाणे करून सोडावे, सकळ जनही उक्ती त्यांनी आचरली.

विपश्यना - हे गौतम बुद्धांनी प्रचलित केलेले तंत्र. अर्थात त्यातला तंत्र हा शब्दही अवजड आहे. सांगायचे तर - एका जागी बसून, घेतला जाणारा आणि सोडला जाणारा श्वास याकडे लक्ष देणे अपेक्षित असते. श्वास जसा येतो आणि जसा जातो हे बघणे एवढेच. प्राणायामासारखे काही विशिष्ट पद्धतीने श्वास घ्यायचा वगैरे काही नाही. किंबहुना - विपश्यना शिकवताना प्राणायामाचे इतर सर्व प्रकार काही वेळ बाजूला ठेवण्याची आग्रहाची विनंती असते. त्याच्या मागचं कारण मला नंतर कळलं. हे श्वासावर लक्ष ठेवणे दिसायला सोपे असले तरी आचरणात आणायला अत्यंत कठीण आहे. ‘अचपळ मन माझे, आवरे नावरेना ..’ - याचा प्रत्यय क्षणोक्षणी येतो. श्वासाच्या लयीवरले लक्ष बाजूला गेले आहे असे लक्षात आले की परत पहिल्यापासून सुरुवात करायची इतका साधा विचार आहे.

 

श्वासावर लक्ष ठेवणं एकदा जमलं कि मग शरीरात उठणाऱ्या वेगवेगळ्या संवेदना लक्षात येतात - त्यांची जाणीव होऊ लागते. विपश्यना साधकाने या उठणाऱ्या संवेदनांकडे कुठलीही प्रतिक्रिया न देता - दुर्लक्ष करायचे असते, एखाद्या शांत तलावाच्या शेजारी बसून त्यावर उठणाऱ्या जललहरी पहाव्या त्याप्रमाणे आपल्याच मनावर उठणारे तरंग न्याहाळणे म्हणजे विपश्यना. आपल्या नकळत, आपले सुप्त मन क्रिया करत असते. शरीराच्या बाहेरून येणाऱ्या उत्तेजकांना (stimuli) आपलं शरीर उत्तर देत असतं. थोडा विचार करा - किती वेळा आपण अचानक आपल्या केसांवरून हात फिरवतो, किंवा बसलो असताना पाय हलवतो ... याच त्या प्रतिक्रिया आणि या अत्यंत विचारपूर्वक थांबवणे ही विपश्यनेची साधना.

 

बुद्धाला मिळालेलं ज्ञान हे या इतक्या साध्या तंत्रातून आलं. पण हे ज्ञान काय? तो विचार काय? "तृष्णा हे सर्व दुःखाचे मूळ आहे .." हे काय? जेव्हा गौतम आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्या शरीरात उठणाऱ्या या तरंगांकडे बघत होता तेव्हा त्याने जीवनातल्या दुःखाची एक साखळी जाणली - ती पट्टीकासमुप्पाद (https://www.budsas.org/ebud/ebsut057.htm) या सूत्रात सांगितली आहे.

पुढील शब्द पाली भाषेतले आहेत.

अविज्जापच्चया संकारा, संकरापच्चया नामरूपम,

नामरूपच्चया सलायतनम, सलायतनपच्चया फस्सो,

फस्सपच्चयो वेदना, वेदनापच्चयो तनहा

तनहापच्चयो उपादानम,उपादान पच्चयो भाव

भावपच्चयो जाती,

जातीपच्चयो जऱा-मरण-सोक-परिदेव-दुःख-दोमनस्स-उपायासा संभवंति!

एवमेतस्स केवलस्स दुःख-खंधास्सा समुदयो होतु!

 

अविज्जायत्वेवा असेसाविरागनिरोधा संखारनिरोधो,

संखारनिरोधो विन्याननिरोधो, विन्यानम निरोधा नामरूपनिरोधो,

नामरूपनिरोधा सलायतननिरोधो, सलायतननिरोधा फस्सनिरोधो,

फस्सनिरोधा वेदनानिरोधो, वेदनानिरोधा तनहानिरोधो,

तनहानिरोधा उपादाननिरोधो, उपादाननिरोधा भावनिरोधो,

भावनिरोधा जातीनिरोधो,

जातीनिरोधा जऱामरण सोक-परिदेव-दुःख-दोमनस्स-उपायास निरूज्यंति!

एवमेतस्स केवलस्स दुःख-खंधास्सा निरोधो होति!

अज्ञानातून (अविज्ज) संस्कार (संकार) उदभवतो ...

संस्कारातून जाणीव (विन्यान) उदभवते ...

जाणिवेतून मन आणि शरीर (नाम रूप) यांची जाण होते.

नाम रूप यातून षटेंद्रियांची (सलायतन) यांची जाण होते.

सलायतनांतून स्पर्श (फस्स )उत्पन्न होतात ..

स्पर्शातून वेदना आणि आणि वेदनेतून तृष्णा (तनहा) उत्पन्न होते

तृष्णेतून आसक्ती (उपादानम) उत्पन्न होते, आसक्तीतून भाव, भावातून जाती, जातीतून जरामरण, शोक, दुःख, इत्यादी उदभवतात ...

अविज्जेचा नाश केला (म्हणजे ज्ञान प्राप्त झाले) की संस्कारावर ताबा येतो. संस्कारांवर ताबा आला की एक एक करून जाणीव, शरीर, षटेंद्रिय, स्पर्श, नष्ट होत जरा, मरण, शोक, दुःख या साखळीचा नाश होतो (आणि पर्यायाने जन्म-मरण-पुनर्जन्म) या साखळीतून मुक्ती मिळते.

 

यातला संकार हा पाली भाषेतला शब्द फार महत्वाचा आहे. सहा ज्ञानेंद्रियांद्वारे आपण जे अनुभवतो, त्याला प्रतिक्रिया म्हणून काही प्रतिक्षिप्त क्रिया होतात. या बाहेरून येणाऱ्या stimuli ची जाणीव म्हणजे 'संकार'. आपल्या हातावर डास हळूच येऊन बसतो - ती संवेदना म्हणजे 'संकार'. वाऱ्याच्या झुळुकेने डोक्यावरचा केस हलतो ते जाणवणे हा 'संकार'.कुठे कच्च्कन ब्रेक लागल्याचा आवाज आल्याने अंगावर नकळत येणारे शहारे हे - संकार आणि त्यावरची प्रतिक्षिप्त क्रिया! केवळ श्वासोच्छ्वासाकडे लक्ष ठेवत जेव्हा मन केंद्रित होतं, तेव्हा एरवी न जाणवणाऱ्या या संवेदना जाणवू लागतात. मन सजग होतं - या संवेदना जाणवणं आणि त्यावर प्रयत्नपूर्वक दुर्लक्ष करणं (वरच्या सूत्राचा दुसरा भाग), काही वेळासाठीका होईना ही साखळी तोडणं म्हणजे विपश्यना!

 

विपश्यनेत दहा तास काहीही न करता एकाजागी बसून राहण्यामागे उद्देश मोठा छान आहे. एकतर एका जागी बसण्याने मन केंद्रित व्हायला मदत होते. पण त्याचबरोबर स्नायू आखडतात - दुखायला लागतात. त्या वेदनेकडे तटस्थपणे लक्ष देणं, दुर्लक्ष करायचा प्रयत्न करणं, यात एक गोष्ट लक्षात येते, की ही वेदना पाण्यावर उठणाऱ्या तरंगांप्रमाणे cyclic आहे. वेदनेची कळ येते, मग ती कमी होते, परत वाढते, कमी होते. गौतम बुद्धांची शिकवण हे सांगते की शरीरात उठणाऱ्या या संवेदनांप्रमाणेच आयुष्य अस्थिर, अनिश्चित आहे, तेव्हा आला हा क्षण जगा, भूतकाळात गुंतून पडू नका, भविष्याकडे उत्सुकतेने बघा, चिंतेने बघू नका.

 

गौतम बुद्धांना मिळालेलं आत्मज्ञान हे होतं. येणाऱ्या प्रत्येक अनुभवाला प्रतिसाद देण्याचा अट्टाहास - ही तृष्णा!, त्यातून येणारे नवीन अनुभव, त्यांना प्रतिसाद - हे दुष्टचक्र आणि त्यात अडकलेलं मानवी मन - "तृष्णा ही सर्व दुःखाचं मूळ आहे!" हा तो विचार. ही साखळी निर्धाराने तोडत, संपूर्णपणे वर्तमानात जगून त्या महात्म्याने मुक्ती मिळवली!

 

त्या पौर्णिमेच्या रात्री गौतमाला जेव्हा हे ज्ञान झालं - आपल्या शरीरात होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रियांवर काबू ठेवून, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्ती मिळण्याचा मार्ग जेव्हा त्याला दिसला तेव्हा अतिशय आनंदाने त्याने जे म्हटलं ते सूत्र सुद्धा फार छान आहे - त्याचा थोडक्यात आशय असा - हे जगन्नियंत्या, या निसर्गच्याअस्थिर, अनिश्चित स्वरूपाची मला जाणीव झाली आहे. मला जन्ममरणात अडकवणाऱ्या त्या 'गृहकारकाला' (शरीररूपी घर बांधणाऱ्याला! ) मी आता पाहिलं आहे, आणि घर बांधण्याचं सगळं सामान मी मोडून टाकलं आहे - आता त्याला माझ्यासाठी घर बांधता येणार नाही (मला परत जन्म नाही)

(हे सूत्र ऐकायला आणि त्यावरचं सुरेख भाष्य वाचायचं असेल तर https://www.movedbylove.org/projects/tunes/143 इथे क्लिक करा.)

 

विपश्यनेच्या अभ्यासामुळे मला समजलेलं गौतम बुद्धांचं हे आत्मज्ञान किंवा ज्ञानोद्दीपन. खुद्द गौतम बुद्धांना काय समजलं होतं हे फक्त तेच जाणे! झेन वाड्मयामध्ये एक सुरेख वाक्प्रचार आहे - "जर तुम्हाला रस्त्यावर बुद्ध भेटले तर त्यांना मारून टाका! If you meet the Buddha on the road, kill him!" त्याचा अर्थ असा की अंतिम सत्य हे प्रत्येकाचं खास स्वतःचं असं खाजगी असतं. अगदी गौतम बुद्धांना जरी मुक्ती मिळाली असली तरी त्यांचा मार्ग वापरून तुम्हाला मुक्ती मिळेलच असं नाही, तुमचा मार्ग तुम्हालाच शोधावा लागेल, तेव्हा तुम्ही जेव्हा तुमच्या अंतिम सत्याच्या शोधात असाल तेव्हा मदत करू पाहणाऱ्या कुणालाही - अगदी बुद्धांना सुद्धा - बाजूला करा (kill him, kill his thought) आणि स्वतःचा मार्ग स्वतःच शोधा. विचार करायला लावणारं फार सुरेख वाक्य आहे

 

तेव्हा या उक्तीनुसार मी जे काही वर लिहिलं आहे, ते विसरून जा. जर तुम्ही मानसिक शांततेच्या शोधात असाल तर तो मार्ग खास तुमच्या स्वतःच्या पद्धतीने स्वतःच शोधा !!

 

अभिजित टोणगांवकर



2 comments:

  1. आज पुन्हा लेख वाचला, शेवटचा परिच्छेद उत्तम लिहिला गेला खुपच छान. विपश्यनेचा अनुभव तर घेतलेला आहेच.ती अनुभूतीही छानच आहे.

    ReplyDelete