आत्मनिर्भर


'आत्मनिर्भर' हा शब्द तसा काही नवीन नाही आणि आपल्याला अपरिचित ही नाही. परंतु मा. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या संबोधनानंतर त्याचे  महत्व लोकांना जाणवू लागले  आहे. या शब्दाची व्यापकता तशी लवचिक आहे. म्हणजे आपण तो कशाच्या संदर्भात वापरतो यावर ती अवलंबून असते. म्हणजे बघा,आपण जर तो राष्ट्राच्या संदर्भात वापरला तर त्याचा व्याप अगणित असतो. जसजसा आपण संदर्भ बदलू तशी तशी व्यापकता कमी होत जाते. 'आत्मनिर्भर' समाज म्हटलं की आत्मनिर्भर राष्ट्रापेक्षा व्यापकता कमी आणि व्यक्तिगत पातळीवर अधिक कमी होते.


आपणाला जीवन व्यतीत करायला काय लागतं? अन्न, वस्त्र, निवारा आणि आता नव्याने आवश्यक असलेले 'मोबाईल' तंत्रज्ञान आणि त्या संबंधित उपकरणे! या ४-५ गोष्टी मिळाल्या की आपण सहज जीवन व्यतीत करू शकतो. परन्तु या गोष्टींसाठी आपल्याला कशावर तरी निर्भर राहावं लागतं, आणि या सगळ्या मिळाल्या तरी आपण फक्त जीवन व्यतीत करू पण जीवन जगू शकणार नाही. कारण जोवर जीवनात आनंद, प्रेम आणि समाधान नाही, तोवर जगण्याला काहीच अर्थ नाही. चौऱ्याऐंशी  लक्ष योनी पार करून मनुष्य जन्म घ्यायचा आणि फक्त मरण येईस्तोवर वाट बघत घालवायचा? मग हवाय कशाला हा मनुष्य जन्म? एखादं कीडा मुंगी होऊन पडून राहायचं.

आता आपण आपल्या शीर्षकाचा व्याप आणखी कमी करून फक्त आनंद या पुरताच विचार करू. खरंच आपण आपल्या आनंदाकरिता आत्मनिर्भर आहोत का? याचाही विचार करायला हवा. उत्तर 'हो' असे येण्याची शक्यता कमी आहे. कारण आपण आपला आनंद दुसऱ्या कशात तरी शोधतो. मोबाईल केवळ 'Discharge' जरी झाला तरी आपण विचलित होतो. समोरची व्यक्ती आपल्याशी कशी वागते यावर आपण आनंदी रहायचं की दुःखी, हे ठरवतो. एवढेच कशाला, एखादी व्यक्ती, दुसऱ्या एका व्यक्तीला आपल्याबदद्ल काहीतरी सांगत होती असे  आपल्याला तिसरी कुणी व्यक्ती सांगते आणि आपण अस्वस्थ होतो. इतकी आपली आनंदाची भावना कमकुवत आहे. मग त्याला आनंद म्हणायचंच कशाला?


सर्वं परवशम् दु:खम्, सर्वमात्वमशम् सुखम्|
एतद् विद्यात् समासेन, लक्षणम् सुखदु:खयो|| 
~मनुस्मृति


अर्थात, जे काही दुसऱ्यावर अवलंबून आहे, ते सारं दुःख आहे, जे काही आपल्यावर अवलंबून आहे, ते सर्व सुख आहे, हीच थोडक्यात सुख-दुःखाची व्याख्या आहे. मनुस्मृती आपल्याला अगदी स्पष्टपणे सांगते, सुख म्हणजेच आनंद, जो कधीच दुसऱ्यावर अवलंबून राहू शकत नाही. ही एक अतिशय व्यक्तिगत बाब आहे. त्या करिता आपण आत्मनिर्भरच असायला हवं.

समर्थ रामदास स्वामी देखील आपल्याला हेच सांगतात -

जो दुसऱ्यावरी विसंबला। त्याचा कार्यभार बुडाला।।
जो आपणची कष्टत गेला। तोचि भला।।


या महाश्लोकाचा संदर्भ आपल्या आनंदाशी जर जोडला तर आपल्याला आनंद प्राप्त होईल. जेव्हा जेव्हा आपला आनंद दुसऱ्या व्यक्ती किंवा वस्तूमध्ये शोधू अथवा त्यावर अवलंबून राहू, तेव्हा तेव्हा आपल्या हाती दुःखच येणार.

पंचकोश (अन्नमय, मनोमय, प्राणमय, विज्ञानमय आणि आनंदमय) आणि पंचवायू (प्राण, अपान, उधान, समान आणि व्यान) यावर आधारित असलेल्या या स्वरूपाला चिरकाल आनंदी ठेवण्याचं रहस्य "आत्मनिर्भर" हा पंचाक्षरी शब्दच आहे. प्रत्येक परिवार जेव्हा आनंदी होईल तेव्हा समाज आनंदी होईल आणि अंततः आपले राष्ट्रसुद्धा आनंदी होईल, चला आनंदी होऊया,
 " आत्मनिर्भर" होऊया!



श्री.समीर भालेराव



6 comments:

  1. उधरेत आत्मा आत्मनं, ना आत्मानं अवसदयेत...
    छान व्यक्ती सापेक्ष कल्पना!

    ReplyDelete
  2. Kaleshripad8@gmail.com
    अप्रतिम

    ReplyDelete
  3. अगदी सहज मांडलेले सूंदर विचार!

    ReplyDelete
  4. खूप छान लिहलेय

    ReplyDelete
  5. फार छान विचार आणि मांडणी.

    ReplyDelete