बैलपोळा






अमावस्या आली श्रावणाची
साजरा ढवळ्या-पवळ्याचा सण
बळीराजा करीतसे खांदेमळण
आदल्या दिशी देई कानी आवतण

हळद-तूपाचे मालिश खोंडास
ओढ्यावर होई खरारा स्नान
रंगली शिंगे, डोक्याला बाशिंग
सर्वांगावर गेरुचे ठिपके छान

नवी वेसण, नवा कासरा
पाठीवर विसावली नक्षीदार झू
पायात चमकती करदोड्याचे तोडे
साजशृंगारीत वृषभाची पडे भूल

बैलजोड्या येती खळाळत
गळा कवड्या, घुंगुरमाळा
गाऊनी लोकसंस्कृतीच्या झडत्या
वाजंत्र्यांच्या गजरात फुटे बैलपोळा

आया बाया करती औक्षण
गोडाधोडाचा भरवती घास
नैवेद्याचाही मोठा थाटमाट
पुरणपोळी आणि अन्न सुग्रास

हलगीच्या तालावर मिरवती बैल
विश्रांतीचा दिन, नसे औताची घाई
जीवाभावाचा सवंगडी धन्याचा
कृषीवल होई त्याचा उतराई




शिल्पा शेडगे

1 comment: