निरागस मन |
वैजू, अग किती उशीर ? किती
वेळा तुला सांगायचं लवकर घरी येत जा म्हणून ? चल पटपट हातपाय
धू आणि शुभंकरोती म्हणून अभ्यासाला बस. गृहपाठ काय आहे आज
?
मी म्हणाले, "हो करते ग बाई, किती मागे लागतेस सारखी. एकतर आधीच भूक लागली आहे.
पोटात कावळे ओरडतायत नुसते."
आई म्हणाली, "गृहपाठ करून जेवायला ये
, जेवण तयार आहे. मी सांगितले होते का इतक्या उशिरा
पर्यंत खेळायला?" कसाबसा गृहपाठ संपवून जेवायला आले.
पहाते तर समोर मोठंच संकट उभं होतं, ' वांग्याची भाजी '. मला अज्जिबात
आवडत नाही. मी मोठी झाले की कध्धी म्हणून वांगी आणणार नाही असं
पुटपुटत कसंबसं जेवण केलं.
खरंतर टेबलावर
पडलेला, आजच आलेला किशोरचा ताजा अंक केंव्हाचा खुणावत होता.
पण........ जेवण झाल्याबरोबर आईने गणितं करायला बसवलं. उद्या परीक्षा
होती ना. शेवटी सगळं आवरून दप्तर भरून एकदाची
झोपले.
दुसर्या दिवशी शाळेत गणिताचा तास सुरु
झाला बाई आल्या. त्यांनी पटापट गणितं फळ्यावर लिहून दिली.
मला अचानक काही आठवेना, एकही गणित येईना अगदी घाम
फुटला. बाईंनी विचारले काय वैजू येतायत ना गणितं ? कशीबशी हो म्हणत उभी राहिले. आणि....... आणि अचानक जाग आली.
पहाते तर काय,
हे सगळं स्वप्न होतं.
लाईट गेल्याने एसी बंद
झाला होता आणि शरीर घामाने थबथबले होते. घड्याळात बघितलं तर उठायची वेळ
झालीच होती. वेळेवर नाही उठलं तर ऑफीसला उशीर मग लेटमार्क,
बॉसची नजर आणि बरंच काही..... पटकन उठून कामाला
लागले. चहाचे आधण ठेवले , कुकरची तयारी
केली. सवयीने हात पटापट आवरत होते.
पण मनात सारखा विचार येत होता, शाळा संपून
जवळपास चाळीस वर्षे झाली आणि आता हे स्वप्न का पडलं. मग आठवलं
घर - ऑफीस – घर, अशी
रोज तारेवरची कसरत करताना काल अचानक दहा मिनिटे बोनस मिळाली होती म्हणून येताना मंदिरात
पाच मिनिटे टेकले. समोर ग्राउंडवर मुलांचा खेळ रंगात आला होता.
ते पाहून मला माझे लहानपण आठवले. आमच्या कॉलनीत
खूप मोठे ग्राउंड होते. आम्ही खूप खेळायचो. लगोरी, विट्टी दांडू, लंगडी खूप
मजा यायची. क्षणभर वाटले पुन्हा लहान होऊन ते निरागस अल्लड वय
पुन्हा अनुभवावे.
लहानपण देगा देवा | मुंगी
साखरेचा रवा ||
तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या या ओळी आपण अनेकदा
म्हणतो. कुणी दोन
जुने मित्र भेटले की लहानपणीच्या आठवणी हमखास निघतातच आणि मग खरंच काय मस्त होतं रे
ते आयुष्य, खावं, प्यावं, खेळावं आणि जमेल तसा अभ्यास करावा. आणि मग पुन्हा एकदा
बालपण जगायला मिळावे. त्या वेळी केलेल्या गमती जमती,
धमाल मस्ती पुन्हा करता यावी या विचारावर तो विषय संपतो.
अनेकदा मुलं ग्राउंडवर खेळताना पाहिली की आपल्या
जबाबदारीचे ओझे फेकून देऊन लहान होऊन त्यांच्यात जाउन खेळावेसे वाटते. कधीकधी
पहाटे उठून आवरून ऑफीसला जाणे जीवावर येते आणि त्याचवेळी साखरझोपेत असलेल्या आपल्या
मुलाचा हेवा वाटतो आणि पुन्हा लहान व्हावेसे वाटते. पांघरुणात
गुरफटून झोपावेसे वाटते. पण मला प्रश्न पडतो की आपल्याला खरंच आपले लहानपण परत हवे असते का ? की त्यावेळेचा निरागसपणा,
आणि जबाबदारी नसलेले स्वच्छंद आयुष्य आपल्याला भावते?
आज आपण स्वतंत्र आहोत. कुठल्याही
गरजेकरता कुणावर अवलंबून नाही. कुठलीही गोष्ट करायला कुणाच्या
परवानगीची गरज नसते. नकळत आपल्याला या स्वातंत्र्याची
सवय झालेली असते. या वयात आपण संसार, मुले,
नोकरी, व्यवसाय आणि त्यातल्या जबाबदाऱ्या हे सगळ
आपल्याला हवे असते म्हणूनच स्वीकारलेले असते. आज जी सुखे,
स्वातंत्र्य आपण उपभोगत असतो ती आपल्याला नको आहेत का ? खरं तर एखाद्याला मूल झाले, प्रमोशन
मिळाले, स्वतःचा बंगला झाला, गाडी झाली
की आपल्याला सुखाच्या शिखरावर असल्याचे जाणवते. या सुखाच्या शिखरावर
असताना तर कधीच आपल्याला पायी वणवण फिरलेले किंवा सायकलवर फिरलेले आपले बालपण आठवत
नाही.
आता लहानपण म्हणले की प्रत्येक निर्णयासाठी मोठ्यांवर
अवलंबणे आले.
शाळा, अभ्यास, परीक्षा,
गृहपाठ, नावडते विषय हे पण सगळे आलेच. या प्रत्येक वेळी मात्र आपल्याला वाटत असते की कधी एकदा मोठं होऊ,
आणि या सगळ्या कष्टांतून
आपली सुटका होईल. खेळ अगदी रंगात आलेला असतो आणि आईची हाक आली की नाईलाजाने
खेळ सोडून घरी जाऊन अभ्यासाला बसावचं लागतं. त्यावेळी खेळ पूर्ण
न झाल्याच त्या वयात दुःख असतं.
कधी हवेहवेसे पाहुणे येतात. शाळा बुडवावीशी वाटते. पण आईमुळे शाळेत जावेच लागते. त्यावेळी मनासारखं न वागता आल्याचं दुःख असतं. म्हणजे बालपणातल्या जबाबदाऱ्या, दुःख यांचा त्रास होतोच. त्यावेळी कधी एकदा मोठं होऊ असं वाटत असतं. त्यावेळेला आपल्याला लहानपण आवडत नाही. आई-बाबांचा, ताई-दादाचा हेवा वाटत असतो. लहान मुलांना सुद्धा आनंद, राग, दुःख या भावना असतातच. त्या वेळोवेळी प्रकटही होत असतात. आई रागावली की ते रडतात, चिडतात, रागवतात आपल्या भावना व्यक्त करून मोकळे होतात. आणि थोडावेळ गेल्यावर सगळे विसरून तितक्याच प्रेमाने आईला बिलगतात सुद्धा. खरे तर हा निरागसपणाच मोठ्यांना भुरळ घालत असतो.
कधी हवेहवेसे पाहुणे येतात. शाळा बुडवावीशी वाटते. पण आईमुळे शाळेत जावेच लागते. त्यावेळी मनासारखं न वागता आल्याचं दुःख असतं. म्हणजे बालपणातल्या जबाबदाऱ्या, दुःख यांचा त्रास होतोच. त्यावेळी कधी एकदा मोठं होऊ असं वाटत असतं. त्यावेळेला आपल्याला लहानपण आवडत नाही. आई-बाबांचा, ताई-दादाचा हेवा वाटत असतो. लहान मुलांना सुद्धा आनंद, राग, दुःख या भावना असतातच. त्या वेळोवेळी प्रकटही होत असतात. आई रागावली की ते रडतात, चिडतात, रागवतात आपल्या भावना व्यक्त करून मोकळे होतात. आणि थोडावेळ गेल्यावर सगळे विसरून तितक्याच प्रेमाने आईला बिलगतात सुद्धा. खरे तर हा निरागसपणाच मोठ्यांना भुरळ घालत असतो.
मग माणसाला नक्की काय हवे असते? मला वाटते, आपल्याला
कोणत्याही वयातल्या त्रासदायक, कदाचित न झेपणाऱ्या किंवा त्या पार पाडताना होणारी
दमछाक आणि तरीही नाईलाजाने त्या पार पाडाव्या लागतात तेव्हा आपल्याला लहान किंवा मोठे
व्हावेसे वाटत असते. मग लहानपण हवे म्हणजे नेमके
काय हवे असते आपल्याला?
मला वाटतं ते निरागस, लवचिक
मन हवे असते. लहान मुले अपमान वगैरे फार लवकर विसरतात.
तसेच आपल्याला पण नकोशा गोष्टी विसरून पुन्हा आयुष्याला तितक्याच उमेदीने सामोरे जाता आले पाहिजे. छोट्या
छोट्या गोष्टीत आनंद घेता आला पाहिजे.
म्हणूनच वारंवार आपण त्या गेलेल्या लहानपणाची आठवण काढत असतो. मनमोकळे, निरभ्र मनाने
जगण्यासाठी!!!!
खरं आहे, लहान असताना कधी मोठे होऊ असे वाटते आणि मग लहानपण दे गा देवा म्हणावेसे वाटते
ReplyDeleteछान लेख
ReplyDelete'किशोरचा ताजा अंक' - nostalgic!
ReplyDelete