भोग सरंल . . . सुख येईल. . .

२५ मार्च २०२० ला भारतात तीन आठवड्यांसाठी लॉक डाउन होणार हे जाहीर झाले. तशी प्रत्येकाला आपलं काय होणार याची चिंता होतीच पण नाशिकमध्ये COEP (College of Engineering Pune) च्या जुन्या मित्रांचे टोळके जमले. यातील काही सिव्हिल इंजिनिअर्सच्या मोठमोठ्या कन्स्ट्रक्शन्सचे काम अर्ध्यावर होते आणि मुख्य म्हणजे यावर काम करणारी बरीच मंडळी नाशकाच्या किंवा महाराष्ट्राच्याही बाहेरची होती. या लोकांसाठी आपण अत्यंत तातडीने काहीतरी केले पाहिजे याची जाणीव सर्वांना झाली. 

काही जणांनी आपल्या बाकी मित्रांनाही यात सामावून घेतले. आपल्या ज्यांच्याकडे शेती आहे अशा काही मित्रांशी संपर्क साधून वाजवी दरात धान्याची व्यवस्था केली. प्रत्येकानेच आपापले संपर्क आणि सामग्री वापरली आणि पहिल्या दिवशी साधारणत: पाचशे लोकांना जेवण देण्यात आले. दुसऱ्या दिवशी हा आकडा दुप्पट झाला आणि हळूहळू दोन तीन दिवसांतच हा पसारा खूपच वाढतोय हे लक्षात यायला लागलं. 


अत्यंत जाणीवपूर्वक केलेल्या प्लॅनिंगमुळे आणि खूप लोकांनी स्वतःहून दिलेल्या वेळामुळे per meal खर्च अत्यंत वाजवी होता - १५रु. आवाका वाढला तसे मदतीसाठी अजून हात पुढे आले आणि नाशिकमध्ये चार ठिकाणी सेंट्रलाइज्ड पद्धतींनं सैपाक करणे सुरू झाले. आत्तापर्यंत हा काही मित्रांनी एकत्र येऊन तात्पुरता हातात घेतलेला एक प्रोजेक्ट होता. पण सतत वाढणारी गरज आणि मिळणारा प्रतिसाद पाहून सातव्याच दिवशी नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आला आणि त्यांनी या कामाचा आवाका वाढवण्याची विनंती केली.

तोपर्यंत वेगवेळ्या शहरात देशात राहणारे सीओईपीमधले व इतर मित्र आर्थिक मदत करत होते पण सतत वाढता आवाका पाहता नाशिक मधल्याच संदीप इंजिनीअरिंग कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पाटील यांनी या कामात पहिल्या दिवसापासूनच पुढाकार घेतला. नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यांचा रॉबिन हुड आर्मीशी संपर्क साधून दिला. या सर्वांमुळे ठरलेल्या सेंटर्सवर जेवण देणे तर चालू राहिलेच पण त्या सोबत दररोज कित्येक हजार अन्नाची पाकिटे बनवली जाऊ लागली व रॉबिन हूड आर्मी मार्फत हजारो गरजूंपर्यंत पोहोचू लागली. 

हे काम करत असतानाच असे लक्षात आले की सर्वसामान्य लोकांना कायमच लहान मोठ्या कारणांसाठी डॉक्टर्स किंवा वैद्यकीय सेवेची गरज भासते. लॉक डाऊनच्या या काळात यासाठी काय करावे, न मिळणाऱ्या गोळ्यांसाठी काय करावे हे लोकांच्या लक्षात येत नव्हते. पुन्हा एकदा याच मित्रांनी आपल्या अजून काही डॉक्टर मित्रांशी संपर्क साधला. लवकरच संदीप फाउंडेशनच्या अंतर्गत नाशिक मधल्या चौदा डॉक्टरांची एक समिती स्थापन झाली. त्यांचे नंबर्स वर्तमानपत्र व अनेक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आले. या डॉक्टरांनी पेशंटशी फोनवर बोलून गरज पडली तर व्हिडिओ कॉल करून मोफत सल्ले द्यायला सुरुवात केली. prescription लिहून फोटो काढून WhatsApp वर पाठवण्यात येऊ लागले. नाशिक जिल्ह्यातील हजारो लोक या सेवेचाही सध्या फायदा घेत आहेत. 

हे सर्व करताना पोलिस यंत्रणेवर विशेष ताण पडत आहे. बऱ्याच लोकांना नेहेमीच्या तासांपेक्षाही जास्त काम करावे लागत आहे. पण रेस्टॉरंट्स, हॉटेल्स, अगदी चहाच्या टपऱ्या सुद्धा बंद असल्यामुळे तासनतास या लोकांना काहीही मिळू शकत नाही. हे लक्षात घेऊन नाशिकच्या काही महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये automatic tea vending Machines बसवण्यात आली आहेत. 

या तीन ही उपक्रमांचे विशेष कौतुक अशासाठी की मुळात हे उपक्रम समाजसेवी संस्था किंवा एनजीओ मधून सुरू झाले नाहीत. तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी या कठीण परिस्थितीत आपण काही तरी केले पाहिजे म्हणून एकत्र येऊन सुरू केलेले हे उपक्रम. यात काम करणारे सर्व लोक उपजीविकेसाठी स्वतःची नोकरी/व्यवसाय करतात. आपली मानसिकता पूर्णपणे बदलून या वेळात त्यांनी समाजासाठी, देशासाठी तन मन धन या सर्वच माध्यमातून काम केले आहे. आपली टेकनिकल आणि मॅनेजेरिअल स्किल्स इथेही वापरल्यामुळे कामाचा दर्जा उत्तम राहिला. आवाका अपेक्षेबाहेर वाढला पण आपल्या मूळ प्लॅनमध्ये बदल करून त्यांनी ही वाढती गरज सामावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कामाची वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे त्याची काही छायाचित्रे इथे जोडत आहे. 


नावे अनेकांची घेता येतील पण प्राचार्य प्रशांत पाटील व त्यांचे मित्र आणि टीम यांचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार. अशा अगणित कार्यकर्त्यांच्या बळावरच देश या कठीण काळातून बाहेर पडेल आणि प्रगती करेल याची खात्री आहे. 

अशी कामे फक्त अन्न आणि औषध उपचारांपुरती सीमित राहात नाहीत अनेक धास्तावलेल्या मनांना ती हे ही दिवस जातील आणि चांगला काळ परत येईल याची शाश्वती देत राहतात. 






 गंधाली सेवक



1 comment:

  1. I am from Nashik, and now I am feeling proud of the work done by all the students, doctors, farmers and thousands of helping hands.

    ReplyDelete