अधांतरी

गेल्या बऱ्याच वर्षांमध्ये विमानात बसण्याची बऱ्याचदा संधी आली. बहुतेक वेळा ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने तर काही वेळा खाजगी कामांसाठी, त्यामुळे खूप नसलं तरी सहसा वर्षातून ४-५ वेळा विमानात बसायची गरज पडते. सुरुवातीला टेक ऑफच्या वेळेसच्या प्रचंड गतीचे कौतुक वाटायचे, नंतर आभाळातील ढगांचे, कधी काळी आकाशातला सूर्योदयही बघायला मिळाला. मुंबई, न्यूयॉर्क सारखी शहरे आकाशातून बघण्याची मजा काही औरच. पण आता त्याचे कौतुक वाटेनासे झाले आहे. सुरुवातीच्या काळातील "कूड यू चेक फॉर विंडो सीट प्लीज, विथ अ नाईस व्ह्यू प्रेफरेबली", ही नेहमीची विनंती करण्याची आता आवश्यकता वाटत नाही. आता तर आपण एकटे प्रवास करत असताना आमच्या चेहऱ्याकडे पाहून "कुठून कुठून येतात" अश्या समजुतीने काउंटर पलीकडच्या एखाद्याने (किंवा एखादीने) चेहऱ्यावर खोटे स्मित ठेवून मुद्दामून मधली सीट माथी मारली तर कमितकमी शब्दात निषेध व्यक्त करून ती सीट बदलून कशी घ्यायची, याचे शास्त्रही अवगत झाले आहे.

इतके असले तरीही माझे एक दोन गोष्टींचे कुतूहल अजूनही शाबूत आहे. पहिलं म्हणजे, जर नागपूरहून मुंबईला दिवसा जायचे असले की मी विंडो सीट साठी प्रयत्न करून पाहतो. ते मुंबई पाहण्यासाठी मात्र नव्हे, तर मुंबई येण्याआधी लागणारा सह्याद्री आणि दोन डोळ्यात न मावणाऱ्या त्याच्या रांगा पाह्यला मला अजूनही आवडते. त्या अजस्त्र रांगा आणि काळ्याभोर कातळाचा वरून दिसणारा कणखरपणा छाती दडपतो. आणि त्यातून बाहेर पडताच मुंबईच्या अथांग समुद्राचे दर्शन होते. पंचमहाभूतातली दोन महाभूते पृथा आणि जल एका भव्यदिव्य स्वरूपात आपण तिसऱ्या महाभूतातून म्हणजे आकाशातून, उरलेल्या दोघांच्या म्हणजे अग्नी आणि वायूच्या मदतीने, प्रचंड वेगाने पाहत असतो. या सर्वांतून एकच जाणीव होते म्हणजे आपल्या अत्यंत क्षुद्रपणाची ! त्या वेळी आपले अस्तित्व एका धुळीच्या कणाइतकेही नसते. त्या पाच महाभूतांपैकी कोणीही ठरवले तर आपले अस्तित्व क्षणार्धात नष्ट होऊ शकते. त्या क्षुल्लक अस्तित्वापलिकडेही आपल्या इच्छा, आकांक्षा आणि जे मूळ अस्तित्व आहे, ते कुठे असते, हा प्रश्न आपल्याला "मी कोण" किंवा "कोSहम्" ह्या अखिल मानवजातीला पडलेल्या आदिम तसेच अंतिम प्रश्नाकडे नेऊ शकतो.

दुसऱ्या ज्या गोष्टीचे कुतूहल किंवा कौतुक अजूनही मला शाबूत आहे, ते म्हणजे विमानातील दोन विशिष्ट क्षणांचे. आता त्या प्रचंड वेगाचे काहीच वाटत नाही, पण आकाशात झेपावतांना ज्या क्षणी विमान जमिनीचा संबंध तोडून अधांतरी तरंगायचा वेध घेते, तो क्षण आजही मला एका ट्रान्समध्ये नेतो. यानंतर आपल्या हाती काहीच नाही, आपले अस्तित्व त्या "वरच्या"च्या हाती आणि त्याचा प्रतिनिधी म्हणून वैमानिकाच्या. पण वैमानिकाच्याही बऱ्याच मर्यादा आहेत. विज्ञान आणि निसर्ग यांनी एकमेकांना समजून साथ दिली तर ठीक, नाहीतर वैमानिकदेखील एक कळसूत्री बाहुली आणि त्या बाहुलिच्या हातातले आपण खेळणे. खरं तर ह्यावेळी लॅपटॉप उघडून काम करणे किंवा खायला/प्यायला काय आहे तिकडे लक्ष देणे म्हणजे जे जीवन आता आपल्या ताब्यातच नाही त्या जीवनाला उगाच गोंजारण्यासारखे आहे. खरं तर ही वेळ ध्यान लावायला सर्वात चांगली म्हणावी. यानंतर जमिनीवर उतरणे कसे होईल किंवा होईल का ह्यावर विचार व्हायला प्रवृत्त व्हायला हवे, पण ते करण्याची आपल्या मनाची लायकी (औका) नाही. मग सर्व काही; आशा, आकांक्षा, जबाबदाऱ्या; मनाने "त्याच्या" हवाली करून मोकळे व्हावे आणि मग जे काही काम करायचे निरर्थक नाटक करायचे आहे; त्याकडे वळावे; एवढेच आपल्या हाती. खाली उतरलो तरच हे नाटक पुढे जाणार, ह्याची जाणीव असली तरी पुरे. तसाच दुसरा कुतूहलाचा क्षण हा विमानाची चाके जमिनीला पुन्हा स्पर्श करतात तो. तो क्षण आपल्याला खऱ्या अर्थाने जमिनीवर आणतो. "त्याला" दिलेल्या आशा, आकांक्षा, जबाबदाऱ्या, परत घेण्याचा हा क्षण. इतरांशी संबंध पुन्हा सुरू राहणार, आयुष्याचं नाटक अजून बाकी आहे, हे सांगणारा हा क्षण. हा गाठला की एक मोठ्ठा श्वास घ्यावा व सोडावा. पुन्हा माणसांत जायचे, ओझे बाळगायचे, आणि आपण इतरांपेक्षा बुद्धिमान, धनवान, शक्तिमान, असल्याचे मुखवटे घालायचे. कशासाठी आणि कोणासाठी? आकाशात वर असतांना क्षणाचा हजारावा भागही आपली धूळधाण उडवून अस्तित्व शून्य करू शकला असता; आणि आता मात्र आपण पुढच्या दहा-वीस वर्षांचे प्लॅनिंग करायला मोकळे. कश्याच्या भरवशावर? ह्या आपल्याच हिपोक्रसीला हसावे आणि मोकळे व्हावे.

पण एक सांगा हो, ते आकाशात असतांना ज्या आशा, आकांक्षा, जबाबदाऱ्या "त्याला" अर्पण करून मोकळे झालो होतो आणि आपले काम करायला लागलो होतो, तेच आपल्याला जमिनीवर असतांना का नाही करता येत? जी जमीनच मुळात अथांग अंतराळात अशीच तरंगतेय; त्या जमिनीवर असतांना कुठल्या शाश्वतीच्या भरवशावर आपण आपल्या आयुष्याचे, करियरचे आणि नाव/पैसा/सत्ता/लौकिक मिळावा म्हणून प्लॅनिंग करत असतो; हे कोणी तरी सांगेल का?
          
रवींद्र केसकर


2 comments:

  1. Very nicely articulated. I could relate to this as everytime I am in the plane I feel the same way
    Thanks

    ReplyDelete