कविता महाजन ..... एक दुर्मिळ समज असलेली मैत्रीण !!!

काय नव्हती ती? कवियत्री, लेखिका, कॉलमनिस्ट, एडिटर, लहान मुलांची पुस्तके लिहिणारी, पाककलेची पुस्तके लिहिणारी, भाषांतरे करणारी.....सगळ्या व्यापांत स्वतःला सांभाळणारी.... प्रचंड आवाका असलेली अचाट "कविता"

आमची ओळख फेसबुकवरची. पण मग बोलायला लागलो तर अजून नातीगोती उलगडत गेली पण आमच्यांतील नातं कायम मैत्रीचंच होतं.
सुरवात तिच्या पोस्टने झाली.....
"कोणी जागं आहे का गप्पा मारायला?
सध्या रात्री झोप येत नाहीये औषधांमुळे.
मेसेज करा इंबॉक्सात."
रात्री काही कारणास्तव जागी होते तर केला मेसेज नंबर इंबॉक्सात. लगोलग तिने नंबर दिला तिचा आणि फोन पण केला. ते बोलणे पुढे तसेच तीन एक तास चालू राहिले. सुरुवातीचे 2-3 मिनिटे तू कोण वगैरे औपचारिक बोलणे सोडले तर सगळा संवाद कैक वर्षांची ओळख असल्यासारखा चालू होता. ह्या सगळ्याचे क्रेडिट तिलाच. लोकांना लगेच आपलंसं करायाची तिची हातोटी खासच.

तिच्या घरात पाणी शिरलं आणि पेंटिंग्स पाण्यात भिजतायेत अस कळल्यावर न राहवून मी तडक गेलेले वसईला तर काहीही काम करवून न घेता मस्त छान कॉफी, खायला घालून गप्पा मारत बसवलं. शेवटी न संपणाऱ्या गप्पा बरोबर घेऊन पुण्याला निघाले तर पोचल्यावर कळव, इतकंच म्हणाली. हसू आसू डोळ्यात ठेवून निरोप घेताना म्हणाली, फोन च कर गं पोचल्यावर मी जागी असेंन तू पोहचे पर्यंत. मनाने जोडून घेणे तिला छानच जमायचे. काही आपलंतुपलं नसल्यानं तिच्या वागण्यात.
साधे केस कापून आली तरी जातांना सांगणार. आल्या वर डिटेल मधे तिथे काय झालं त्या गंमती जंमती सांगणार. स्वतःचं दुःख बाजूला ठेवून कायम लोकांना हसत ठेवणं सहज जमायचं तिला.

कित्येक विषयांत तिला खूप गती होती. अगदी पुराणांतल्या संदर्भांपासून ते आजकालच्या संदर्भ ग्रंथापर्यंत सगळया गोष्टींबाबतीत ती कायम अपडेटेड असायची. काही विचारलं आणि मेळ लागला नाही तर म्हणायची थांब अभ्यास करून सांगते. प्रचंड उत्साह आणि अभ्यासू वृत्ती. आजच्या नेटच्या जमान्यात अगदीच न दिसणारी. तेवढीच सिनेमा नाटक पण जगणारी. कित्येकदा म्हणायची अगं, इकडे वसईत येत नाहीत तर सिनेमे राहून जातात बघायचे. मग वेळ मिळेल तसे कॉम्पुटरवर बघते सिनेमे पण नाटकांची भूक राहून जाते. कलेच्या सगळ्या प्रकारांबद्दल आसक्ती होती तिला. बरेचदा अगदी मदतनीस आणि स्वयंपाकाच्या ताई आणि अश्या सगळ्यांना घेऊन मस्त तयार होऊन जायची सिनेमाला आणि मग त्यानंतर तिथल्या गंमती जंमती सांगणे हा एक छंद होता तिचा. वर वर करणे स्वभावात नव्हते. सगळं काही आतून आलेलं.

तिच्या मित्रमैत्रिणींबद्दल पण कायम मोकळेपणाने सांगायची.
ठकी आणि मर्यादा पुरुषोत्तम लिहिताना तिचा फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड असलेल्या मित्राबद्दल खूप बोलायची. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने ती खूप आतून दुखावली गेली होती. माझी आई गेल्यावर त्यातून बाहेर पडायला तिने मला खूप मदत केली. तेच सगळं तिलाच परत सांगवं लागेल असे कधी वाटलं पण नाही. आणि तिच्या जाण्याने स्वतःला पण हेच सगळं परत समजवावे लागेल असंही नव्हतं वाटलं.

पुढे कुठे तरी त्या मित्राच्या मृत्यूलाही आपलेसे केले तिने. 
आणि आता त्यांनाच घाईने भेटायला निघून गेलीये जणू......
माझ्या वाढदिवसाला सकाळी येणारा तिचा फोन आणि मस्त थट्टा मस्करीत झालेली सकाळ हे कायम स्मृतीतच राहणार.....
तिच्या स्मॄती जोपासणे ही माझ्या जगण्यातली समॄद्धी आहे !!!

                              वर्षा महाजन 









3 comments: