नैमिषारण्य तीर्थयात्रा


नैमिष तीर्थ नमोस्तुभ्यम्, नमामि ऋषि परम्परा ।

नमो सनातन गुरुभूमि, दिव्य तपोभूमि नमो नमः ।।


गुरुमुखातूनभगवतगीता ऐकण्यासाठी आम्ही खरे तर नैमिषारण्य यात्रा करायची ठरवली. त्या प्रदेशाबद्दल फारशी माहिती नव्हती. पण चारही युगातील विशिष्ठ घडामोडींचा संबंध नैमिषारण्य-पुण्यभूमीशी आहे हे कळल्यावर अगदी धन्य वाटले. सद्गुरूंची आणि माता-पित्याची कृपाअसल्याशिवाय हे नक्कीच शक्य नाही.

आपलीभारतीय संस्कृती जगातील अतिप्राचीन संस्कृती आहे. आपले भाग्यच थोर कारण आपण हजारो वर्षांची परंपरा असलेल्या मंगल देशात जन्म घेतला. ही मर्यादापुरुषोत्तम रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णांची कर्मभूमी असून, प्रत्येकयुगात अद्वितीय अशा महापुरुषांनी इथे अवतार घेतला आणि जप-तप-न्याय-धर्म याद्वारे जगाला प्रकाशित केले. जिथे त्यांनी साधना केली, त्यांना ज्ञान प्राप्त झाले, ती तपोभूमी तीर्थस्वरूप झाली. अयोध्या, मथुरा, माया, काशी, कांची, अवंती आणि द्वारका ह्या सप्तपुरी म्हणूनप्रसिद्ध आहेत तर सैंधवारण्य, दंडकारण्य, नैमिषारण्यइत्यादीनऊ पवित्र अरण्य प्रसिद्ध आहेत.नैमिषारण्याचा उल्लेख छांदोग्य उपनिषद, रामायण, महाभारत, पुराणे आदि ग्रंथात आला आहे.

तीरथ वर नैमिष विख्याता, अति पुनीत साधक सिध्दि दाता ||

गोस्वामी तुलसीदास यांनी नैमिषारण्य या भूमीला सर्वोच्च तपोभूमी म्हटले आहे. तप, पूजन, अनुष्ठान यासाठी हीदिव्यभूमी आहे असे म्हटले आहे.अनेक ऋषीमुनींच्या वास्तव्याने ही भूमी पावन झाली आहे.प्राचीन काळी हे घनदाट अरण्य होते.आता अरण्य नाही पण शेतीप्रधान प्रदेश आहे हे नक्कीच जाणवते.नैमिषारण्य हे उत्तर प्रदेशातील सीतापुर जिल्हातील एक तीर्थस्थान आहे.लखनौपासून जवळजवळ ९० km अंतरावरअसणारे हे ठिकाण गोमती नदीच्या किनाऱ्यावर वसले आहे.बऱ्याच पुराणांमध्ये ह्या स्थानाचा उल्लेख आहे.त्याच्या नावाबद्दल ह्याकथा सांगितल्या जातात.
१. भगवान विष्णूंनीनिमिषातमहापराक्रमी राक्षस दुर्जय याचा व त्याच्या असुरी सेनेचा संहारकेला म्हणून ह्याचे नैमिषारण्य असे नाव पडले.ही कथा वराह पुराणात सांगितली आहे.
२. प्राचीन काळी शौनकादी ८८००० ऋषीमुनी तपासाठी योग्य भूमीच्या शोधात होते. हे जाणण्यासाठी ते ब्रह्माजींकडे गेले. ऋषीमुनींची प्रार्थना ऐकून ब्रह्माजीनीमनोमय चक्र उत्पन्न केले आणि सांगितले कि कीया मनोमय चक्राचीनेमीजिथे स्थिर होईल तेठिकाण तपास्ययोग्यअसेल. हे चक्र इथे मंदावले आणि स्थिर झाले म्हणून ह्या स्थानाला नैमिषारण्य असे नाव पडले.ही कथा देवी भागवतात सांगितली आहे.
चारही युगात देव-देवतांनी,ऋषीमुनींनी इथे तपःश्चर्या केली आहे आणि त्यांचे वास्तव्य इथे होते.


सत्ययुग
चक्रतीर्थ आणि ललितादेवी मंदिर
ललितादेवी मंदिर
चक्रतीर्थ  
प्राचीन काळी शौनकादी ८८,००० ऋषीमुनींना तपासाठी ही भूमी कशी मिळाली ते वर नमूद केले आहे.  या ठिकाणी परमात्म्याचे द्रवीभूत स्वरूप प्रकट झाल्याने हे स्थान चक्रतीर्थ नावाने प्रसिध्द झाले. हे मनोमय चक्र जरी स्थिर झाले तरी प्रचंड पाण्याचा लोट उसळला. सर्वऋषी परत ब्रह्माजींकडे गेले आणि संकट निवारणाची याचना केली. तेंव्हा त्यांनी तिथेच वास करण्याऱ्या ललिता देवींची प्रार्थना करण्याचा उपाय सांगितला. ऋषीमुनींनी ललिता देवींची आराधना केली. त्यांनी प्रसन्न होऊन चक्र स्थिर केले आणि पाण्याचा लोट थांबवला. भक्तांच्या प्रेमाखातर आदिशक्ती ललिता देवी इथेच वास्तव्याला आल्या अशी आख्यायिका आहे. चक्रतीर्थाच्या जवळच ललिता देवींचे मंदिर आहे. स्वयंभू मूर्ती आहे. सोमवती अमावास्येला इथे मोठी यात्रा भरते.

मनु-शतरूपा तपस्थली
राजामनु यांना आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये मुमुक्षत्व अंतःकरणात उदयास आले त्यावेळी त्यांनी ठरवले की यापुढे आता आपण करत असलेल्या राज्याचाया सर्व सेवांचा त्याग करून मनुष्यजन्माचे परमहित प्राप्त करून घ्यावे. म्हणून त्यांनी आपला मोठा भाऊ उत्तानपादाकडे सर्व राज्य सोपवले आणि मग राजामनु आपली पत्नी शतरूपासह साधना करण्यासाठी अत्यंत पवित्र व साधकांना सिद्धी देणाऱ्या तीर्थांमध्ये श्रेष्ठ असलेले असलेल्या नैमिषारण्यात आले. एवढ्या विश्वाचा हा राजा परंतुकेवळ अंगावरील वस्त्रांसह आपल्या पत्नीला घेऊन सर्व वैभवांचासर्व सुखांचा त्याग करून अरण्यात आले. सर्व तीर्थांमध्ये स्नान करून नित्य पुराणश्रवण केल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती वृद्धिंगत झाली. जे या संपूर्ण विश्वाचे सम्राट होतेज्यांच्या आधाराने या विश्वाला खर्‍याख-या अर्थाने आकार प्राप्त झाला होताज्यांनी आपल्या शास्त्राधाराने या विश्वामध्ये असलेले अनंत भोग शोधून काढले, त्या भोगांचे त्यांनी सेवन देखील केले असे मनु-शतरूपा या सगळ्यांचा त्याग करून पालेभाज्याफळे आणि कंद याचा आहार करत सच्चिदानंद ब्रह्माचे स्मरण करू लागले.अत्यंत निरासक्त अवस्थेत या दोघांनी अनेक वर्ष कठोर तप केले. (२३,००० वर्षे तप केले असा उल्लेख आहे) त्यांच्या तपस्येने प्रसन्न होऊन भगवंताने त्यांना सगुणरूप दर्शन दिले. ते ठिकाण इथे मनु-शतरूपा तप:स्थली म्हणून प्रसिध्द आहे.
मनू-शतरूपा तपस्थली
त्यांनी भगवंताला मनोभावे प्रार्थना केलेली आहे
, की जे रूप महादेवाने आपल्या ह्रदयामध्ये खोलवर दडवून ठेवलेले आहे त्या रूपाला आम्ही या डोळ्यांनी पाहू इच्छित आहे. भगवंत विष्णू आपल्या निळसर स्वरूपात त्यांच्यासमोर प्रगट झालेले आहे. या भेटीचे अत्यंत रसाळ वर्णन रामचरितमानस ह्या ग्रंथात गोस्वामीजींनी केलेले आहे.  मनु-शतरूपा भगवंताला मोठ्या धैर्याने त्यांच्या समान पुत्र मिळावा अशी इच्छा व्यक्त करतात. भगवंत तस्थास्तु असा वर देतात. (पुढच्या जन्मी हेच दोघे दशरथ-कौसल्या होऊन भगवंत विष्णू, श्रीराम म्हणून त्यांच्या पोटी जन्म घेतात)
मिश्रीख तीर्थ-दधिची आश्रम
मिश्रीख येथे दधिची ऋषींचा आश्रम सीतापुर गावापासून २० मैलावर आहे. दधिची ऋषी महान तत्ववेत्ता, तपस्वी आणि दानी वृत्तीचे होते. अथर्वण कुळात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पत्नीचे नाव गभस्तिनी (लोपामुद्रेची बहिण) होते. दोघे पतीपत्नी पतिपत्नी तपोनिष्ठ होते.
एकदा दैत्यांना जिंकून इंद्रदेव आणि त्यांचे गण दधिची ऋषींच्या आश्रमात आले. इंद्रानेत्यांची अस्त्रे सुरक्षित अशा दधिची आश्रमात ठेवावी जिथे दैत्य येऊ शकणार नाहीत अशी विनंती केली. ऋषींनी ती अस्त्रे ठेऊन घेतली. त्यानंतर हजारो वर्षे उलटली परंतु देवता ती अस्त्रे घेण्यासाठी आले नाहीत. तेंव्हा ह्या ऋषी पतीपत्नींनी विचार करून त्या अस्त्रांचे रक्षण करण्यासाठी,अस्त्रांवर जल अभिमंत्रित केले.  ते जल दधिचीऋषींनी प्राशन केले.

एके दिवशी अचानक इंद्रादि देव अस्त्रे परत मागण्यासाठी आश्रमात आले. दधिची ऋषींनी झालेली गोष्ट सांगितली. सर्व अस्त्रे आता निरुपयोगी झाल्याचे सांगितले. अस्त्रांचे तेज समाप्त झाले तरी ते तेज माझ्या हाडांमध्ये आहे तेंव्हा योग्य ते सांगावे. जर गरज असेल तर माझ्या हाडांची आयुधे बनवावीत त्यामुळे तुमचे रक्षण होऊ शकेल. दधिचीऋषींनी सांगितले की मी योगासीन होतो,  तुम्ही गायींकडून माझे मांस चाटवून घ्या आणि हाडे उरतील त्याची आयुधे करा. दधिची ऋषींचे हे श्रेष्ठ बलिदान ऐकून भगवान विष्णू प्रसन्न झाले आणि वर मागण्यास सांगितले. त्यांनी एकच वर मागितला की अत्यंत पवित्र अशा तीर्थात स्नान व्हावे. इंद्रदेवांनी साडे तीन करोड ठिकाणांच्या तीर्थांचे जल एकत्र करून इथे मिसळले. तेच तीर्थ मिश्रित तीर्थ म्हणून आता ओळखले जाते आणि हे ठिकाण मिश्रीख (अपभ्रंश) म्हणून ओळखले जाते. या तीर्थात स्नान केल्यांनतर दही-मीठ लावलेले शरीर गायींकडून चाटवून घेतले. मांस नाहीसे झाले. फाल्गुन पौर्णिमेला दधिची ऋषींनी लोककल्याणासाठी आपल्या अस्थी देवतांना दान केल्या. दधिची ऋषी आपल्या दानाने अमर झाले. देवांनी वृत्रासुर असुराला मारण्यासाठी ऋषींच्या हाडांची ४ आयुधे बनवली.

१. वज्र –वृत्तासुराला मारण्यासाठी युद्धातइंद्रांनी वापरले
२. पिनाक – शंकरांनी वापरले नंतर हेच धनुष्य सीतास्वयंवराच्या वेळी श्रीरामांनी तोडले
३. सारंग (शारंग) – श्रीविष्णूनी वापरले
४. गांडीव धनुष्य – आधी अग्नीदेव व द्वापारयुगात अर्जुन यांनी महाभारत युद्धात वापरले.

त्रेतायुग
प्रभू रामचंद्रांचे नैमिषारण्यात अनेकदा आगमन
श्रीराम तीर्थयात्रेच्या निमित्याने अनेकदा नैमिषारण्यात आले होते असा उल्लेख रामायणात मिळतो. विद्याध्ययन झाल्यावर भ्रमण करण्याकरता, राज्याभिषेक झाल्यानंतर इथे आले होते. रावणाला मारल्यानंतर ब्राह्मणहत्येचे पातक लागल्यामुळे त्याचे निवारणासाठी इथेच अश्वमेध यज्ञ केला होता.श्रीरामांनी सीतेचा त्याग केल्यानंतर लक्ष्मण सीतेला इथेच सोडून गेला.लव-कुशाचा जन्म इथेच झाला. लव-कुशांनी इथेच श्रीरामांसमोर रामायण गायन केले. सीतामाईने इथेच दिव्य केले आणि धरती दुभंगून भूमातेने त्यांना इथेच सामावून घेतले. भूमाता सीतेला मांडीवर घेऊन बसली आहे असे इथे देऊळ आहे.
हनुमान गढी
इथे हनुमानाची २१ हात उंच उभी स्वयंभू मूर्ती आहे. हे हनुमंताचे सिद्धपीठ आहे. कथा अशी आहे – जेंव्हा श्रीराम-रावणाचे युध्द सुरु होते तेंव्हा रावणाचे सर्व वीर योद्धे मारले गेले. रावणाने पाताळातून अहिरावण ह्या भावाला बोलावून घेतले. अहिरावण रात्रीच्या वेळेस बिभिषणाचे  रूप घेऊन आला. मोहिनी अस्त्राने श्रीराम आणि लक्ष्मण यांना बद्ध करून पाताळात घेऊन गेला. श्रीरामाच्या सैन्यामध्ये हाहा:कार उडाला. बिभिषणाने बिभीषणाने ओळखले की हे फक्त अहिरावणाचे काम आहे.
फक्त हनुमंतच पाताळात जाऊ शकतो त्यामुळे बिभिषणाने बिभीषणाने पवनसुताला तत्काळ पाताळात पाठवले. पाताळात श्रीराम-लक्ष्मण यांना देवीला बळी द्यायचे अहिरावण यांनी ठरवले होते. हे पाहून हनुमंतांनी देवीचे रूप घेतले. मोठमोठ्या गर्जना करू लागले. अहिरावणाला वाटले, आज देवी खूपच प्रसन्न झाली आहे. म्हणून त्यांनी देवीची प्रार्थना केली आणि पूजा आरंभली. श्रीराम-लक्ष्मण यांना घेऊन येण्यास सांगितले. अहिरावण श्रीराम-लक्ष्मण यांना म्हणाला, की आपल्या इष्ट देवतेचे स्मरण करा. हे ऐकून हनुमंत इतक्या जोरात गरजले की असे वाटले जणू आकाशच फाटले. अहिरावणाने भीतीने डोळे घट्ट मिटून घेतले. इतक्यात हनुमंतानी अहिरावणाची तलवार ओढून त्याचे मस्तक उडवले. अहिरावणाचा वध करून श्रीराम-लक्ष्मण यांना खांद्यावर बसवून पाताळातून थेट नैमिषारण्यात प्रकट झाले. सर्व ऋषीमुनींचे दर्शन घेऊन त्यांनी लंकेला प्रस्थान केले.
गोमती राजघाट-दशाश्वमेध घाट
गोमती नदी नैमिषारण्यातून लखनौ, सुलतानपूर, जौनपुर अशी वाहत गाजीपुरला गंगेला जाऊन मिळते. गोमतीच्याअंतरंगात ब्रह्मावर्त, रुद्रावर्त आणि ब्रम्हांडवर्तअसा तीनही महादेवांचा द्रवरुपात वास आहे अशी समजूत आहे. गुरु वशिष्ठांच्या सांगण्यावरून गोमतीच्या काठी प्रभू श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ केला. त्या प्रसंगी महामुनी वाल्मिकी लव-कुश यांना घेऊन आले होते. इथेच श्रीरामांना त्यांच्या दोन्ही पुत्रांचा परिचय करून दिला होता.

द्वापारयुग
व्यासगद्दी (आद्यव्यासपीठ)
व्यास गद्दी 
श्री व्यास यांचा जन्म द्वापार युगात झाला. महर्षी पराशर आणि सत्यवती यांचे पुत्र व्यास होते. ज्या ठिकाणी त्यांनी चार वेद, सहा शास्त्रे, अठरा पुराणे यांची रचना केली त्या जागेला व्यासगद्दी म्हणतात. वेदांची रचना केली म्हणून त्यांना वेदव्यास म्हणतात. वेदांचे चार भागात वर्गीकरण त्यांनी आपल्या शिष्यांना इथेचसांगितले.
  • पैलवऋषी – ऋग्वेद
  • जैमिनीऋषी – सामवेद
  • वैशंपायनऋषी – यजुर्वेद
  • सुमन्तुऋषी – अथर्ववेद
व्यासगद्दीचे महात्म्य मोठे असून जवळच अक्षय वटवृक्ष आहे, जो ५,००० वर्षापासून याची साक्ष देत उभा आहे. आदर्श गुरु म्हणून वेदव्यास सर्वांनाच वंदनीय आहेत म्हणून आजही वक्ता जिथून व्याख्यान देतो त्याला व्यासपीठ म्हणतात. इतकी विपुल ग्रंथरचना करुनसुद्धा करूनसुद्धा त्यांचे मन अशांत होते. नारदांनी व्यासजींना भगवंताच्या चरित्रलीलांचे गुणवर्णन करायला सांगितले. १८,००० श्लोकांचे महाभागवत पुराण नैमिषारण्यात इथेच बसून लिहिले.
सहा शास्त्रे – सांख्य, योग, न्याय, मीमांसा, वैशेषिकआणि वेदांत शास्त्र
अठरा पुराणे– विष्णूब्रम्ह, शिवनारद, पद्म, गरुड, कूर्म, मार्कंडेयवराह, मत्स्य, वामन, अग्नी, वायू, ब्रम्हांडस्कंद, लिंग, ब्रम्ह वैवर्तक आणि भागवत पुराण
सूतगद्दी
भगवान व्यासजींचे चार प्रमुख शिष्य होते. त्यांना व्यासजींनी वेदशास्त्र पारंगत केले. श्री सूतजी व्यासजींचे शिष्य असून त्यांनीही पुराण आणि शास्त्रे यांचा अभ्यास केला. ते पुराण सांगण्यात अतिशय कुशल होते. ते निरुपण निरूपण इतके रसाळपणे सांगत की श्रोत्यांच्या अंगावर रोमांच-लोम उभे रहात म्हणून त्यांना लोमहर्षण असे म्हणू लागले. व्यासरचित सर्व पुराणकथांचाशौनकादी ८८,००० ऋषीमुनीना सुतजीनी सूतजींनी ह्याच स्थानावरून प्रसार केला.
म्हणून ह्या स्थानाला सूतगद्दी म्हणतात. श्रीसत्यनारायण कथेचा जन्म इथेच झाला. सर्व पुराणांनी नैमिषारण्याचे गुणगान गायले आहे, पण नैमिषारण्य महात्म्य सत्यनारायण कथेमुळे घराघरात पोचले.
पांडव किल्ला
महाभारताचे युद्ध संपल्यानंतर पाची पांडवानी द्रौपदीसह इथे तप केले होते. त्यावेळी त्यांनी इथे कूप-विहीर बांधली याचा उल्लेख पुराणात आहे. आतापांडवकिल्ला नावालाच राहिला आहे. सगळीकडे पडझड दिसून येते. सध्या तिथे सर्वांच्या मूर्ती ठेवल्या आहेत.

कलियुग
समर्थ रामदास मंदिर
हनुमानगढीच्या जवळच खटूमल मंदिर आहे. जिथे नेहमी भागवत कथा सप्ताह चालू असतो. जवळपासहजार माणसे बसू शकतील अशी प्रशस्त जागा आहे.तिथेच सत्यनारायण मंदिर, राम पंचायतन आणि समर्थ रामदासांचे सुंदर मंदिर उभारले आहे. समर्थांनी नैमिषारण्यात जाऊन साधना केली. नक्की केंव्हा (साल) हे मात्र कळले नाही.

ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर
ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज गुरुशोधार्थ तीर्थाटन करीत असताना काशीहून अयोध्येस आले. तिथे त्यांना नैमिषारण्याबद्दल समजले. आपल्या सत्तर वर्षाच्या आयुष्यात महाराज तीनदा नैमिषारण्याला साधनेसाठी आले. अनुग्रह होण्यापूर्वी, अनुग्रह झाल्यानंतर आणि श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा यांच्याअंतकाळी असे तीन वेळा आले.
काली पीठ संस्थान येथे महाराजांचे मंदिर स्थापन केले आहे. तेथील पुजारी, श्री गोपाल शास्त्री ह्यांनी सांगितलेली कथा –
२००५ साली एक साधक काली पीठ येथे बसलेले असताना त्यांना काही संकेत मिळाले. त्याच वेळी गोंदवल्यातही असेच संकेत मिळाले की काली पीठ येथे महाराजांचा निवास होता. हे कळल्यावर तिथे खुदाई चे काम केले असता महाराजांच्या पादुका मिळाल्या. त्या पादुकांची प्रतिष्ठापना काली पीठ संस्थानाने केली आहे. गोंदवले संस्थानांनीसुद्धा महाराजांची मूर्ती आणि मोठा फोटो पाठवला आहे. काली पीठ संस्थानाच्या एका भागात हे मंदिर आहे. थोड्याच दिवसात त्याचा जीर्णोद्धार होणार असल्याचे श्री गोपाल शास्त्री ह्यांनी सांगितले.
महाराजांनी नैमिषारण्य कथनाचा उल्लेख त्यांच्या अभंगातून केला आहे. हनुमानाचे वर्णन करताना महाराज म्हणतात
नैमिषारण्य किल्यावर, मूर्ती विशाल दुर्धर ||
तेज फाके जैसे नभा, तेथे मारुती असे उभा ||
रूप पाहाता नयनी, भक्तभय रानोरानी ||
भावे करिता नमस्कार, काळा कंप सुटे फार ||
नैमिषारण्य महात्म्य सांगताना म्हणतात
नैमिषारण्य भूमिपासी, होती हरण पापराशी ||
तेहतीस कोटी देव जाणा, सीता कुंडी शिवराणा ||
लक्ष्मीसहित नारायण, चौऱ्यांशी सिद्धांचे आसन ||
नैमिषारण्य पहा प्रांत, योगी जनासी विश्रांत ||
तीर्थे साडेतीन कोटी, सिद्धमुनी नित्य भेटी ||
पुराण मंदिर
माँ आनंदमयी यांचे नाव संतांप्रमाणेनैमिषारण्यात घेतले जाते. या दुर्लक्षित भूमीकडे साऱ्या जगाचे लक्ष वेधण्याचे काम त्यांनी केले आहे. मध्ये झालेल्या अनेक आक्रमणांमुळे ह्या स्थानाची बरीच पडझड झाली. या भूमीला अवनती प्राप्त झाली. बाराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंत इथे ऱ्हासच होत गेलेला सगळीकडे दिसतो. मधल्या काळात नैमिषारण्याचे वर्णन कुठल्याही साहित्यात सापडत नाही.माँमा आनंदमयी यांच्या प्रेरणेमुळे पुरातत्व विभागाचे आणि राज्य सरकारचे लक्ष इकडे वळले. त्यांनीचारहीवेद आणि पुराणे यांचा संग्रह करून त्यांनी इथे पुराण मंदिर उभारले.
आम्ही २२ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर २०१८ या कालावधीत ही यात्रा केली.पण ह्या प्रदेशाचा दैदिप्यमान इतिहास पाहिल्यावर, आपल्या पूर्वजांच्या कथा ऐकल्यावरअगदी धन्य वाटले. आम्ही कालीपीठ संस्थान येथे राहिलो होतो. त्यांनीच सर्व व्यवस्था केली होती. पण ह्या यात्रेमध्ये एक गोष्टजाणवली की ज्यांचा आपल्या उज्ज्वल इतिहासावर विश्वास आहे, ज्याघटना आधीच्या चार युगात (हजारो, लाखो वर्षांपुर्वी) झाल्या ह्यावर विश्वास आहे त्यांनींच ही यात्रा करावी. आपले आयुष्य ७०-८० वर्षे असते त्यामुळे आपण खूप संकुचित विचार करतो. ह्या घटना झाल्या असतील का? हेकसे शक्य आहे? असेच झाले असेल कशावरून असे अनेक विकल्प मनात येण्याची शक्यता असते. तसेच एकंदरीत ह्या प्रदेशात गरीबीचे प्रमाण जास्त आहे. त्यातून सगळीकडे अस्वच्छता त्यामुळे यात्रेचा अनुभव प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. पणज्यांचा भाव आहे, विश्वास आहे अशा साधकांनी नैमिषारण्याला जरूर जावे. स्थानमहात्म्य नक्कीच आहे, तेथे साधकांना चांगला अनुभव नक्कीच येईल.

नैमिषारण्य इथे जाण्यासाठी
नैमिषारण्य उत्तर प्रदेशातील सीतापुर जिल्ह्यात आहे. आम्ही बंगलोर हून Direct flight नी लखनौलागेलो. तिथून कारने नैमिषारण्यला २-३ तासात पोचलो.
Nearest Railway Station : Lucknow
Nearest Airport: Lucknow : मुंबई, पुणे, दिल्ली, बंगलोर इथून फ्लाईट आहेत
लखनौ – सीतापुर-नैमिषारण्य अंदाजे १०० कि.मी आहे
मंजिरी विवेक सबनीस

7 comments:

  1. सुरेखच माहिती, मंजिरी. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. मस्त माहिती मंजिरी

    ReplyDelete
  3. मस्त माहिती मंजिरी

    ReplyDelete
  4. मस्त माहिती मंजिरी

    ReplyDelete
  5. फार छान अभ्यासपुर्ण लेख.

    ReplyDelete
  6. Khup chhan ani abhyaspurna mahiti.

    ReplyDelete
  7. खुप छान माहिती मिळाली आम्ही अत्ता सप्टेंबर मध्ये जायचे की नाही हे ठरवत होते पण मला याबद्दल काहीच माहिती न्हवते म्हणून जरा शासंक होते पण माऊली तुमच्यामुळे खुप छान आणि वेळेवर माहिती मिळाल्यामुळे मला निर्णयापर्यंत जाण्यासाठी खुपचं उर्जडायक ठरली आहे तुमचे खूप खूप आभार

    ReplyDelete