हॅम्लेट आणि त्याचे द्वंद्व


 "टू बी ऑर नॉट टू बी" हे वाक्य ऐकले की सर्वांनाच ह्याचा उद्गाता हॅम्लेट आठवतो. हॅम्लेट हे नाटक बघितले असो की नसो,  या वाक्याचा नायक आणि त्याचे हे वाक्य अजरामर झाले आहेआणि पर्यायाने त्याचा खरा भाष्यकार विलियम शेक्सपियर देखील ! 
William Shakepere
By John Taylor - Official gallery link,
Public Domain,
https://commons.wikimedia.org/
w/index.php?curid=5442977
खरं तर माणसाच्या मनातील द्वंद्व हे माणूस नावाचा प्राणी असल्याइतकेच जुने आहे. पण अगदी मोजक्या आणि तंतोतंत शब्दात विलियम शेक्सपियरने त्या द्वंद्वाची परिभाषा (definition) दिली म्हणून विलियम शेक्सपियर महान ! आपल्याला क्षणोक्षणी ह्या द्वंद्वाचा सामना करावा लागतो. "हवं की नको", "असं की तसं", "असावं की नसावं", "हो की नाही", “हे की ते”, ही सगळी ह्या द्वंद्वाचीच विविध रूपे. हे द्वंद्व निर्माण होतं ते केवळ मानवाला बुद्धी आहे म्हणून नव्हे. तसं पाहिलं तर प्राण्यांनाही बुद्धी असते आणि आवश्यक अश्या गोष्टींसाठी काही क्षणांसाठी का होईनापण तेही विचार करत असतातच. सृष्टीचे चक्र चालण्यासाठी ते जरुरी आहेच. "I  think. Therefore, I am." असे रेने डेकार्ट म्हणाला खरं. त्यात थोडा बदल करून  "I think that I can think; therefore I am" असं म्हणायला पाहिजे. म्हणजेच माणसाचे वैशिष्ट्य तो केवळ विचार करतो हेच नव्हे तर  "आपण विचार करतो" ह्याचाही तो विचार करू शकतो! ही अंतर्मुखता (introspection किंवा contemplation) आणि त्याची शक्ती भगवंताने (किंवा निसर्गाने) फक्त मानवालाच बहाल केली असावी. ही शक्ती इथेच थांबत नाहीतर योग्य/अयोग्य यांतून एकाची निवड करणे म्हणजेच विवेकबुद्धी वापरणे हे केवळ मानवजातीचे लक्षण असावे. जोपर्यंत ही विवेकबुद्धी एखादा निर्णय घ्यायला मदत करतेतोपर्यंत ती शक्ती मदतनीस समजावी. पण जेव्हा ही बुद्धीच निर्णय घेण्याच्या आड येते आणि द्वंद्वात अडकते तेव्हा माणूस दुःखात सापडतो. माणसाच्या बहुतेक मानसिक दुःखांचे लक्षण म्हणजे हे द्वंद्व. प्राण्यांना हे द्वंद्व बहुधा नसावंचअसलं तरी क्षणांचं असेलपण अख्खे दिवसच्या दिवस ह्या द्वंद्वापायी दुःखात घालवणारा पृथ्वीतलावरचा एकमेव प्राणी म्हणजे माणूस. विचार खरं तर एक शक्ती आहेपण कधी कधी ह्या विचारामुळेच माणसाची बुद्धी आणि कृती दोन्ही खुंटतात.  हा विचारच "टू बी ऑर नॉट टू बी" या सहाच शब्दांमधून मधून विलियम शेक्सपियर प्रकट करतो आणि त्यातच त्याचे मोठेपण सामावलेले आहे.

हे सगळं सुचण्याचं कारण म्हणजे झी मराठी निर्मित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित "हॅम्लेट" हे नाटक पाहण्याचा योग काल आला. सुमीत राघवनतुषार दळवीमुग्धा गोडबोलेमनवा नाईकसुनील तावडेभूषण प्रधान असे आघाडीचे कलाकार घेऊन ही अजरामर कलाकृती मराठी रंगमंचावर पुन्हा अवतरली आहे. विलियम शेक्सपियरने चारशे वर्षांपूर्वी लिहिलेले आणि जागतिक रंगभूमीवरचे सगळ्यात जास्त गाजलेले हे नाटक! मराठी रंगभूमीवरच्या सुरुवातीच्या काळातील आद्य नटसम्राट गणपतराव जोशी ह्याच नाटकाने घडवले. नागपूरच्या नाना जोगांनी हॅम्लेटचे मराठी भाषांतर तेवढ्याच ताकदीने केले. मोठमोठी पल्लेदार अशी एलिझाबेथीयन इंग्लिश मधील वाक्ये त्याच ताकदीच्या मराठी साजात आणि शब्दलयीत सर्व पात्रांच्या तोंडी येतात.

नाटकाची थोडक्यात कथा अशी की डेन्मार्कच्या राजाचा मृत्यू झाल्यावर त्याचा भाऊ क्लॉडियस सिंहासन तर बळकावतोच पण आपल्या दिवंगत भावाच्या पत्नीशी म्हणजे आपल्या वहिनीशी विवाह करून तिचे राणीपद अढळ ठेवतो. राजपुत्र हॅम्लेट आपल्या पित्याच्या मृत्यूने अजूनही उद्विग्न अवस्थेत असतांना त्याच्या बापाचे (दिवंगत राजाचे) भूत त्याला भेटते आणि क्लॉडियसने आपली निर्घृण हत्या केली असून त्याचा सूड घेण्यास सांगते. मात्र राणीला म्हणजे हॅम्लेटच्या आईला त्याचा धक्का न लागण्याचे वचनही ते भूत हॅम्लेटकडून घेते आणि इथेच हॅम्लेट "टू बी ऑर नॉट टू बी" मध्ये अडकतो.


त्यातून मार्ग काढतांना एकामागून एक घटना अश्या घडतात की त्याचे पर्यवसान एका महाशोकांतिकेत होते आणि हॅम्लेटत्याची आईत्याचे काकात्याची प्रेयसीप्रेयसीचे वडीलतिचा भाऊया साऱ्यांना आपल्या कवेत घेऊन रंगमंच शेवटी निस्तब्ध होतो. एका मूळ घटनेने अनेक घटनांना जन्म मिळतो आणि नाटकातील सारी पात्रे कठपुतळीसारखी नियतीच्या तालावर नाचतातदमतात आणि शांत होऊन विरतात. ह्या साऱ्याचे साक्षीत्वाच्या दृष्टीने दर्शन शेक्सपियर आपल्याला ह्या नाटकातून घडवतो आणि आपणही आयुष्याच्या अपरिहार्यतेकडे एका असहायतेच्या भूमिकेतून पाहताना दिग्मूढ होतो.


सुमीत राघवन 
मराठी नाटकाची सध्याची स्टारकास्ट आणि दिग्दर्शकाचे नाव यातच नाटकाच्या सादरीकरणाच्या दर्जाबद्दल सारे काही आले. सुमित राघवनचा हॅम्लेटतुषार दळवींचा क्लॉडियस म्हणजे हॅम्लेटचा कपटी काकामुग्धा गोडबोलेंची राणी म्हणजे हॅम्लेटची आई गेरत्रुडमनवा नाईकची ऑफिलिया म्हणजे हॅम्लेटची प्रेयसीऑफिलियाचे वडील आणि प्रधानजी म्हणजे सुनील तावडे आणि ऑफिलियाचा भाऊ म्हणून भूषण प्रधानसारेच अप्रतिमया साऱ्यांच्या अभिनयाबद्दल बोलावे तरी कायनाटकातील सगळ्या गोष्टी एखाद्या आदर्श नाट्यप्रयोगात जश्या असायला हव्या तश्याच आहेत. सर्वांच्याच भूमिका सुंदरमात्र नाटक संपल्यावर सुमित राघवनचा हॅम्लेट जसा लक्षात राहतो तेवढाच किंबहुना अंगुलीमात्र अधिक तुषार दळवींचा क्लॉडियसहीकपटी असूनहीअभिनयाने मनात घर करतो. तुषार दळवींचा क्लॉडियसच्या भूमिकेतील भारदस्तपणात्याचा पाताळयंत्री स्वभावसंशयखोर वृत्ती पण क्षणार्धात निर्णय घेण्याची क्षमता आणि एखाद्या क्षणी अनपेक्षित असलेला त्याचा पश्चात्तापसारेच त्या भूमिकेविषयी एक गूढ निर्माण व्हायला हातभार लावतात. हे दळवींच्या अभिनयाचे जसे यश तेवढेच शेक्सपियरच्या लेखणीचेही! त्याच्याच अगदी विरुद्ध स्वभाव असलेला सुमित राघवनचा हॅम्लेट. मनाचा साधासच्चेपणापारदर्शी स्वभावजे मनात असेल तेच कृतीत उमटणारएकीकडे जवळच्या लोकांवर उत्कट प्रेम तर दुसरीकडे काकाचा पराकोटीचा तिरस्कारआणि स्वभावाच्या मुळात असलेली द्विधा मनस्थिती सुमितने छान उभी केलीय. ज्या भूमिकेसाठी नटसम्राट श्रीराम लागूंनी सुमितचे स्वतः कौतुक केले त्याबद्दल आपण अजून काय बोलायचे?  

वयाच्या १५-१६ व्या वर्षी फास्टर फेणेपासून दूरदर्शनवर सुरुवात केलेला हा नट आज मराठी रंगभूमीवरील हॅम्लेट उभा करतोयह्यापेक्षा एका अभिनेत्याला, (जो मूळचा मराठी नाही हे सांगूनही खरे वाटणार नाही)अजून काय हवे तुषार दळवींचे आणि सुमितचे व्यक्तिमत्व तसेच रंगमंचावरील वावर यातील कॉन्ट्रास्ट चंद्रकांत कुलकर्णींनी छान पकडलाय. दोन प्रमुख व्यक्तिरेखांमधील सर्व बाबतीतील फरक प्रकर्षाने दाखवणे (ज्यात त्यांची उंचीआवाज सारे काही आले)हा दिग्दर्शकीय विचार ह्या दोघांना त्या भूमिका देण्यामागे असावी. मुग्धा गोडबोले बऱ्याच प्रवेशांत असल्या तरी त्यांच्या २-३ प्रमुख प्रवेशांतून त्या एका आईची तसेच पत्नीची/राणीची तगमग छान प्रकट करतात. बाकी मनवा नाईकसुनील तावडेभूषण प्रधान सारेच आपल्या भूमिकेत तंतोतंत फिट्ट! एकच गोष्ट खटकलीनाटकाची प्रकाशयोजना अप्रतिमपण एकच सेट सर्व प्रसंगांना वापरण्या ऐवजी फिरता रंगमंच वापरता आला असता किंवा अंकांप्रमाणे सेट बदलता आला असता तर नेपथ्य अधिक उठावदार झाले असतेअसो. हे नाटक आज पुनरुज्जीवित होऊन गाजतंय याचं श्रेय या साऱ्या कलाकारांना आहेचतसेच हे धाडस केल्याबद्दल झी मराठी आणि चंद्रकांत कुलकर्णींचे  अभिनंदन करावे तेवढे थोडेच. पडदा पडल्यावर जेव्हा सारे नट प्रेक्षकांना अभिवादन करायला जेव्हा पुन्हा रंगमंचावर येताततेव्हा प्रेक्षकांना झालेला आनंद पाहून अभिनेत्यांना जो आनंद होतोत्या आनंदाने प्रेक्षकांच्या आनंदात अजून भर पडते. संधी आली तर एकदातरी जरूर बघण्यासारखं हे नाटक आहेजरूर बघा.


"टू बी ऑर नॉट टू बी" हे द्वंद्व या नाटकाचा गाभाहे तर आधी सांगितलंच. पण हे द्वंद्व मांडणे किंवा एका घटनेने घडवलेल्या नियतीच्या अपरिहार्यतेचा खेळह्या वैशिष्टयांपलीकडेही या नाटकाची अनेक वैशिष्ट्ये आहेत ज्यामुळे हे नाटक अजरामर झाले. इंग्लिश भाषेत सुभाषितांचा दर्जा मिळालेली अनेक वाक्ये ही या नाटकाची देण आहेत. मग त्यात “To be or not to be, that is the question”, हे तर असायलाच हवं तसंच "Sorrow does not come alone but in battalions" असेलकिंवा "Brevity is the soul of wit" असेलकिंवा "There  is  nothing good or bad; but thinking makes it so" असेल, "The play is the thing" असेलकिंवा "The readiness is all" असेलअशी किती वाक्ये हुडकावीत आणि सांगावीतह्या नाटकातील पात्रांचा आणि त्यांच्या संवादांचा तसेच वर्तणुकीचा जगभर अतोनात अभ्यास झाला आहे. यातील सर्व पात्रांची अंतर्मुखता जागी आहे. विदुषकी थाटात वावरणारा प्रधानजी पोलोनियस देखील अचानक तत्वज्ञान सांगून जातो तर खलनायक क्लॉडियस एकटा असतांना पश्चात्तापदग्ध होतो. त्या अर्थाने सर्व पात्रे स्वतःचा स्वभाव जरी बदलू शकली नसली तरी विचारी आणि विश्लेषक आहेतआणि म्हणूनच ह्या पात्रांना खरे मानून (हे नाटककाराचे खरे यश) त्यांचेच विश्लेषण झाले आणि त्यांच्या स्वभावाचा अभ्यास करण्यात आला. तत्वज्ञानातील तसेच मानसशास्त्रातील अनेक शाखांचा उगम या नाटकात आहे हे वाचल्यावर चकित होण्याची पाळी आपल्यावर येते. या नाटकाचे विश्लेषण काही लोकांनी तत्वज्ञानात गाजलेल्या Existentialism ने केलेकिंवा काही लोकांनी २० व्या  शतकात आलेल्या Feminism ने ही केले. 
Freud with his mother
http://people.jmoro.ru/Freud/freud.html,
Public Domain, https://commons.wikimedia.org/
w/index.php?curid=14690939
सिग्मन्ड फ्रॉइड या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने या नाटकाचा वेध त्याच्या गाजलेल्या आणि क्रांतिकारी समजल्या जाणाऱ्या "इडिपस (Oedipus) कॉम्प्लेक्स" ने घेण्याचा प्रयत्न केला. पण हे नाटकच ४०० वर्षे जुने असल्यामुळे Existentialism, Feminism आणि "इडिपस (Oedipus) कॉम्प्लेक्स" या संकल्पनाच मुळात "हॅम्लेट" या नाटकाचे विश्लेषण करण्यासाठी त्यांच्या कर्त्यांकडून जन्मास घातल्या गेल्याहे समजल्यावर आपण अगदी थक्क होतो. एखादी कलाकृती अनेक विचारांना चालना देऊन काही विद्याशाखांनाच जन्म देते म्हणजे नाटककाराची काय सृजनशक्ती असेल होतसं बघायला गेलं तर शेक्सपियर केवळ एक नाटककार. नाटकाची कथा लिहिणे आणि पात्रांचे संवाद लिहिणे हे कुठल्याही नाटककाराचे मुख्य काम. पण जेव्हा एखादी कलाकृती मानवाच्या विचारांच्या गाभ्यालाच जेव्हा हात घालतेतेव्हाच असे होऊ शकते. "पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा" ही मानवी जीवनाची असहायता सांगताना शेक्सपियर जवळजवळ मृत्यूगीत गातो. आयुष्याच्या या असहायतेला कंटाळून या नाटकात सारीच पात्रे केव्हा ना केव्हा तरी यातून सुटकेसाठी मृत्यूची आळवणी करत असतात आणि त्यातच या शोकांतिकेची बीजे दडली आहेत. शेक्सपियर या मृत्यूची भलामण मग "The rest is silence" या वाक्याने अश्या पद्धतीने करतो की प्रेक्षक म्हणून प्राप्त परिस्थितीत आपल्यालाही तोच योग्य पर्याय वाटतो. एके ठिकाणी हॅम्लेट म्हणूनही जातो की मृत्यूची कल्पना आताशा गोड वाटू लागली आहे. त्या अर्थाने "हॅम्लेट" हे नाटक केवळ शोकांतिकाच नसून मृत्यूचे जणू स्वागतगीत आहेआणि पात्रांना मृत्युशिवाय दुसरा पर्याय नसणेहीच या नाटकाची खरी शोकांतिका आहे. ही शोकांतिका मांडणारापटवणारा आणि जगवणारा शेक्सपियर हा कोणीतरी आधीच्या जन्मीचा योगभ्रष्टच असला पाहिजे.

पण खरंच का मानवी जीवनाची अपरिहार्यता मृत्यूत आहेमृत्यू अटळ आहे हे साऱ्यांनाच ठाऊक आहे. पण आयुष्य जगतांना अपरिहार्यता आणि असहायता गळफास का बनते ? "टू बी" चे द्वंद्व का निर्माण होते आणि त्यातून बाहेर निघण्याचा उपाय कायया प्रश्नांची उत्तरे मात्र तत्वज्ञानात किंवा मानसशास्त्रात नसून अध्यात्मात आहेत. "टू बी"चे द्वंद्व हे महाभारतात अर्जुनाचेही द्वंद्व होते आणि तेच नष्ट करण्यासाठी श्रीकृष्णाने रणांगणावर अर्जुनाला गीता सांगितली. अठरा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेले उपाय म्हणजे योगाचे तितकेच प्रकार. शाब्दिक परिभाषा जरी बघितली तरी योग (“to join”) हा सर्व प्रकारची द्वंद्वे नष्ट करण्याचा प्रभावी उपाय आहेमग ती द्वंद्वे शरीर/मनमन/बुद्धी किंवा मनाचेच मनाशी द्वंद्व अशी काहीही असो.
Credit: https://www.alamy.com/
stock-photo/krishna-arjun.html
केवळ मृत्युबद्दलच नव्हे तर जीवनाबद्दलचाही विचार भारतीय अध्यात्माने जेवढा केला असेल तेवढा जगभरातील इतर तत्वज्ञानानेही केला नसावा. त्यातही आपण मराठी लोक अधिक नशीबवान. बाराव्या शतकातील ज्ञानेश्वर माउलींपासून सुरु झालेली अध्यात्मिक परंपरा वारकरी दिंडीचा मार्ग क्रमून विसाव्या शतकातील गोंदवलेकर महाराजांपर्यंत येऊन पोहोचते. त्या ८०० वर्षांच्या मार्गातील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरसंतशिरोमणी नामदेव महाराजजगद्गुरू तुकाराम महाराजशांतिब्रह्म एकनाथ महाराजसमर्थ रामदासस्वामीपरिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती किंवा ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज  यांच्यापैकी कोणाचीही ग्रंथसंपदा घेतली तरी माणसाला दुखावणाऱ्या आणि शेक्सपियरने मांडलेल्या जवळजवळ सर्वच प्रश्नांची उत्तरे त्यातून मिळू शकतील.


आपल्याला सर्वच संतांनी सांगितले आहे की "द्वंद्व", "असहायता" किंवा "अपरिहार्यता" हे प्रमुख आजार नसून आजाराची केवळ लक्षणे आहेत. मूळ रोग आहे तो कर्तेपणाचा. "मी कर्ता" म्हटले की ह्या आजाराच्या पाठोपाठ त्याची लक्षणे येणारच. ते कर्तेपणच जर भगवंताला दिले किंवा सर्व कर्मे मानसिकरीत्या भगवंताच्या साक्षीने केलीत की कर्तेपण राहत नाहीमग कर्म तरी आपले कुठून राहणार ज्यांना भगवंत ही संकल्पना मान्य नसेल त्यांनी "स्वरूप" (Self) किंवा सृष्टीचे "चैतन्य" (consciousness किंवा awareness) ही संकल्पना पकडावी. हा ज्ञानमार्ग. दिसतो वेगळा पण पोचतो तिथेच जिथे कर्ता म्हणून आपली भूमिका नाहीशी झालेली असते. आता कर्ता व कर्म दोन्ही राहिले नाहीत तर त्यातून निर्माण होणारे सुख आणि दुःखाचे फळ पण भोगायला नको. आपल्याला सुख हवे असते मात्र दुःख नको असते. आपले चुकते ते हेच की सुखाच्या हव्यासापायी आपण कर्तेपण स्वीकारतो आणि त्यापाठोपाठ आपसूक आलेल्या दुःखाला आपण चिकटतो. हा सुखाचा हव्यासच जर सोडला तर दुःखाचा संगही दुरावतो. "हे हवे आणि ते नको"हेच ते "टू बी" चे द्वंद्व ! भगवान बुद्धांनी सांगितलेली तृष्णा ती हीच. "हेच हवे-नको-पण सोडले तर द्वंद्व आपोआपच नष्ट होते" असे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात. त्यासाठी भगवंतभक्ती हा भक्तीचा आणि द्वैताचा मार्ग आहे तसेच एकोहं हा निर्गुणाचा आणि अद्वैताचा  मार्गही आहे. तसेच कर्म करतांना फळाची अपेक्षा न करणे हा कर्ममार्गदेखील आहे. किंवा शरीर आणि मनाचा योग साधणारा राजयोगाचा देखील आहे. आणि या साऱ्या योगांची शृंखला म्हणजे भगवदगीता. सर्व मार्गांचा उपाय एकचकर्तेपण सोडले की मन नष्ट होतेमग कुठले द्वंद्व आणि कुठले काय हे द्वंद्वच जर संपले तर मग सर्व आनंदच आहे. मग दुःख नष्ट होण्यासाठी मृत्यूची आळवणी कशाला तसाही मृत्यू आल्यावर सर्व काही नष्ट होते की पुनर्जन्मातून पुन्हा भोगावे लागते हे कोणाला माहित शेक्सपियरला खरे तर उत्तर सापडले होते पण ते उत्तर तो ओळखू शकला नसावा किंवा चलाखपणे त्याने ते उत्तर तसेच सोडून दिले असावे. एके ठिकाणी हॅम्लेट "The play is the thing" म्हणतोहेच ते उत्तर आहे. नाटकाकडे आयुष्यासारखे बघण्याऐवजी आयुष्याकडेच नाटकासारखे बघितले की काम झाले. हीच गोष्ट अध्यात्म दुसऱ्या शब्दांत सांगतेकर्तेपण नष्ट होणे वगैरे. म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात तसे "जे जे होईल ते ते पाहावे". असे जमले की "आनंदाचे डोही आनंद तरंग" काही दूर नाही. नाही तर न जाणो, (इतक्यात व्हाट्सअप वर वाचलेल्या एका लघुकथेप्रमाणे)मृत्यूनंतर भगवंताने जर विचारले की,  "काय रेकसा होता स्वर्ग"तर काय उत्तर द्यायचे?

रवींद्र केसकर

1 comment:

  1. रवींद्र,
    आणखीन एक सुरेख लेख. मी एक नाटक परीक्षण म्हणून वाचायला घेतला - पण अभ्यासू चिंतन म्हणून वाचत संपवला. हॅम्लेटमध्ये प्रेक्षकांना, समीक्षकांना बरेच काही सापडले आहे - तुम्ही अध्यात्म्याशी घातलेली सांगड अप्रतिम आणि विचारनीय. पुढच्या लेखाची आता उत्सुकता आहे.

    ReplyDelete