सेवा कॅफे


…. Somethings money can”t buy!
काही दिवसांपूर्वी मी आणि माझा मित्र आशय अहमदाबादला गेलो होतो. कामासाठी आणंदला जायचं होतं. आमचा तिथला मित्र आशुतोष म्हणाला, “मी गाडी अरेंज केली आहे. आणि हो, ड्रायव्हर म्हणून तुमच्यासाठी एक खास माणूस देतोय. हा ड्रायव्हर कोणी मामुली माणूस नाही. अहमदाबादचा सेलिब्रिटी ड्रायव्हर आहे.
विविध चित्रांनी रंगवलेली एक टॅक्सी आमच्या समोर उभी होती. त्यातून एक व्यक्ती खाली उतरली. पन्नास वगैरे वय. सावळा रंग. मध्यम उंची. अंगात पांढरा झब्बा. डोक्यावर गांधी टोपी. चेहऱ्यावर अतिशय दुर्मिळ असं प्रसन्न हास्य. हसून पुढे येत त्या व्यक्तीने आमचं स्वागत केलं.
Welcome to my taxi! असं म्हणत त्यांनी एक heart shaped” बिल्ला आमच्या खिशावर खोवला. पुन्हा एकदा प्रसन्नपणे हसून त्यांनी आम्हाला त्यांच्या टॅक्सीत बसायची विनंती केली. रोज मुंबईतल्या रिक्षावाल्यांनी / टॅक्सीवाल्यांनी अशा प्रकारे प्रत्येक गिऱ्हाईकाचे स्वागत केले, तर काय काय घडेल? याची कल्पना करत आम्ही त्या टॅक्सीमध्ये बसलो.
आपका नाम ?”
सर, मेरा नाम उदय जाधव?”
मराठी ?”
नही सर, गुजराती.
आमचा प्रवास सुरू झाला. टॅक्सीमध्ये वर्तमानपत्र, थंड पाण्याची बाटली, डस्टबीन, पुस्तके, आणि नानाविध सुविचार! बसल्याबसल्या गाडीतल्या सीडी प्लेयरवर सर्वधर्म प्रार्थना सुरु झाली होतीच! आमची उत्सुकता चाळवली होती. उदय जाधवांना आम्ही अनेक प्रश्न विचारले. त्यांना बोलतं केलं. जाधव मोकळेपणाने बोलले. त्यांनी जे काही सांगितलं ते अक्षरशः थक्क करणारं आहे.
उदय जाधव रोज रिक्षा चालवतात. गेली अनेक वर्षे. आठ-दहा वर्षांपूर्वी एक अंध व्यक्ती त्यांच्या रिक्षात बसली. मुक्कामाचे ठिकाण आल्यावर ती व्यक्ती जाधवांना म्हणाली, “सॉरी. पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाहीत.
जाधव म्हणाले, “नो प्रॉब्लेम!
ती व्यक्ती हसून म्हणाली, “थँक्स. यापुढे जेव्हा कधी माझ्या कानावर उदय जाधव ही अक्षरं येतील, तेव्हा माझ्या ओठांवर स्मित येईल!!

झालं! जाधवांचं आयुष्य बदललं! जाधव आता काय करतात माहित्ये? रिक्षातून उतरल्यावर लोक भाड्याचे पैसे देतात तेव्हा जाधव सांगतात, “तुमचे पैसे आधीच्या माणसाने दिलेत. तुम्ही आता पुढच्या माणसाचे तुम्हाला योग्य वाटतील तितके पैसे द्या! यासाठी त्यांनी एक सुंदर लाकडी पेटी देखील करून घेतली आहे! त्यात Pay by your heart” असं लिहिलंय.

या नियमाने जाधव रोज रिक्षा चालवतात आपल्या कुटुंबाचे पोट भरतात. त्यांच्या रिक्षातअक्षय पात्र
उदय जाधव आणि त्यांची रिक्षा 
नावाची एक दानपेटी असते. त्यात जे पैसे साठतात ते पैसे जाधव चांगल्या संस्थांना दान करतात! अहमदाबाद नू रिक्षावाला अशी त्यांची ख्याती आहे. अमिताभ बच्चन पासून अनेक मान्यवर अभिनेते राजकीय नेते उदय जाधव यांचे फॅन्स आहेत!

जाधव बोलत होते. आम्ही फक्त गपगार होऊन त्यांचं ऐकत होतो. त्यांचा उत्साह पाहून आम्हालाच दमल्यासारखं वाटत होतं. उदय जाधव भरभरून बोलतात. प्रत्येक दोन वाक्यांत जोरदार हा शब्द पेरतात! ज्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं होतं, त्यांच्याबद्दल त्यांना काहीही तक्रार नाही. प्रत्येकाला असतात तशा कौटुंबिक अडचणी त्यांनाही आहेत, पण माणूस संतुष्ट आहे. समाधानी आहे. स्वतःच्या कामाचा त्यांना प्रचंड अभिमान आहे. प्रत्येकाने आपापल्या हृदयात असलेला दिवा प्रज्वलित केला तर सगळं काही छान होतं इतकी सोपी आणि म्हणूनच कठीण अशी त्यांची फिलॉसॉफी आहे.
आमचं काम संपल्यावर त्यांना म्हटलं, उदयभाई, “सेवा कॅफे जाना है!
अरे जोरदार! वहा तो मै volunteer हुं!
कॅफे? Volunteer? आम्हाला काहीच कळत नव्हतं.

सेवा कॅफे - चित्र - गुगल वरून 
काही वेळाने आम्ही सेवा कॅफेमध्ये पोहोचलो. इतर कुठल्याही कॅफेप्रमाणे वातावरण. मंद संगीत वगैरे. ओपन किचन. तिथे एक परदेशी मुलगी काम करताना दिसली. आम्ही प्रश्नार्थक चेहऱ्याने उदय भाईंकडे पाहिलं. उदय भाई म्हणाले, इथे कोणीही येऊन कुकिंग करू शकतं. फक्त आधी तसं सांगायला लागतं. त्यामुळे, तुम्ही जे बनवाल, तो त्या दिवसाचा मेन्यू! तुम्हाला जेवण करता येत नसेल, तर तुम्ही इथे लोकांना खाणे सर्व्ह करू शकता. भांडी घासू शकता. या कामाचा तुम्हाला कुठलाही मोबदला मिळत नाही. फक्त आनंदासाठी काम करायचं! तिथे खूप वर्ष काम करणारा भास्कर आमच्याशी गप्पा मारायला आला. अवघा पस्तिशीचा वगैरे असेल. शांत आवाज. चेहऱ्यावर स्मित हास्य. म्हणाला, आपण शहरात आलो आणि वस्तूंना प्राईस टॅग लावायला शिकलो. आम्ही ही झंझट काढून टाकली! तुमचं खाऊन झालं की तुम्हाला एक बिल दिलं जातं. त्यावर लिहिलेलं असतं, की तुमचे पैसे आधीच्या माणसाने भरलेत. तुम्ही आता तुम्हाला योग्य वाटतील ते पैसे भरा पुढच्या माणसाचे! आम्ही खायच्या आधीटिका लावून आमचे पुन्हा एकदा स्वागत झाले. भास्कर म्हणाला, आम्ही आज वर भरवसा ठेवतो. काल जितके जमले, त्यावर आजचं हॉटेल चालतं!
अरे, काय चाललंय काय ? आपण नक्की २०१८ मध्ये आहोत ना ? आपण स्वप्नात तर नाही ना हे चेक करण्यासाठी हातावर गरम कॉफी सांडून पाहिली! शेवटचा घाव अर्थातच भास्करने घातला. म्हणाला, इथे एक पेटी आहे. लोक त्यात पैसे टाकतात. या पेटीतील पैसे चांगल्या कामांसाठी वापरले जातात. त्या पेटीला आम्ही कुलूप लावत नाही. आज मी तुम्हाला विनंती करतो की अशी गोष्ट करा जी तुम्ही यापूर्वी कधीच केली नसेल. पेटी उघडा. त्यात काही पैसे असतील तर घेऊन जा. आमचा तुमच्यावर विश्वास आहे, की त्या पैशांचा उपयोग तुम्ही चांगल्या गोष्टींसाठीच कराल!

निरोप घेताना भास्करची गळाभेट घेतली. निःशब्दपणे त्याच अवस्थेत आम्ही काही सेकंद तसेच राहिलो. गेले काही दिवस आजूबाजूला पाहतोय. चुकूनही कोणी वाईट माणूस दिसत नाहीये. या जगात काही वाईट घडत असेल यावर मन विश्वास ठेवायला तयार नाही. आर्थिक अडचणी, लोकांनी वेड्यात काढणं या सर्वांच्या पलीकडे गेलेला उदय जाधव यांचा हसतमुख चेहरा आठवतोय. प्रेम आणि विश्वास या हरवलेल्या मुल्यांचा शोध घेणारा सेवा कॅफेतला भास्कर आठवतोय. आमच्या गळाभेटीत त्या हृदयीचा दिवा या हृदयी लागलाय याच्याच खुणा सर्वत्र जाणवतायत!
नविन काळे 

2 comments:

  1. सेवा कॅफे - आता उत्सुकता नक्कीच चाळवली गेली आहे !

    ReplyDelete