कऱ्हाडला कोयनेकाठी वसलेली आमची पाटण कॉलनी. कॉलनी कसली? ते तर आमचं एक मोठं कुटुंबच होतं. निरनिराळ्या जातीधर्मांची
कुटुंबं असलेलं एकत्र कुटुंब. एकमेकांच्या सुखदुःखात सदैव आपलेपणाने साथ करणारी जिवलग माणसं. सणवार असोत, लग्नंकार्यं असोत, अथवा एखादी दुःखद घटना असो कायम हे जीवलगजिवलग एकमेकांसाठी हक्काने पाठीशी
उभे.
पहाटे सडासंमार्जनासाठी घरांची दारं उघडली जायची आणि
देवपूजेच्या फुलांच्या देवाण घेवाणीने दिवसाची सुरुवात व्हायची . पहाटे सताड
उघडलेली दारं अगदी रात्रीच्या जेवणांची आवरा आवर करून, थोडावेळ एकत्र कट्ट्यावर बसून, एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारूनच बंद होत असत. त्यामुळेच
मला वाटतं कंटाळा, डिप्रेशन असे शब्दही कुणाला माहीत नव्हते. मनमोकळं, मनमिळावू, सहज असं जगणं होतं सगळ्यांचं. आणि तोच सगळ्या व्याधींवरचा रामबाण उपायही होता
.
कुठलेही सणवार एकत्र येऊन साजरे केल्याशिवाय ते काही
आम्हाला साजरे केल्यासारखेच वाटायचे नाहीत. ती मजा काही औरच होती. प्रत्येकाच्या घरचे गणपती आणताना आम्ही सगळी मुलं मिळून
अगदी जयघोषात वाजतगाजत घेऊन यायचो तर आम्ही सगळ्या मुली अगदी नटून थटून एकत्र
मिळून कोयनेवर जाऊन गौरीची गाणी म्हणत गौर घेऊन यायचो. नवरात्रात तर नऊ दिवस
सगळ्या घरांमधल्या माय लेकी, सुसूना भल्यापहाटे उठून आवरून अगदी चार वाजता सगळ्याजणी
मिळून कोयनेकाठी जुन्यापुलाजवळ असलेल्या दैत्यनिवारीणीच्या दर्शनाला जात असू.
एवढ्या पहाटेपण तिथे भली मोठी दर्शनासाठी रांग असायची. लता, आशा यांच्या आवाजातली
देवाची भजनं, गाणी लावलेली
असायची. मोठा मंडप, देवळाला लायटिंग असं सगळं पवित्र वातावरण असायचं. फुलांच्या हारांसोबतच देवीला
कडकण्यांचेही हार वाहिले जायचे. दिवे लावले जायचे. कोयनेची पूजा करून कोयनेतही
दिवे सोडले जायचे अशा सुंदर वातावरणात देवीच्या दर्शनाने मन अगदी प्रसन्न होऊन
जाई.
दिवाळी जवळ आली की घरांची रंगरंगोटी, साफसफाई करून सगळ्यांच्या घरी फराळाचे पदार्थ बनवण्याची
धावपळ सुरू व्हायची. सगळ्यांचीच त्यावेळी एकत्र कुटुंबं होती. त्यामुळे राबताही
तसाच मोठा असायचा. प्रत्येकाचं किमान दहाबारा लोकांचं कुटुंब. त्यामुळे फराळाचंही
भरपूर करायला लागायचं. शिवाय पोस्टमन, कामगारवर्ग, कामाला येणार्या बायका, शेजारी सगळ्यांकडे फराळाची ताटं / डबे दिले जायचे. मग चकली, करंजी, चिरोटयांसारखे किचकट आणि वेळखाऊ पदार्थ करायला, ठरवून सगळ्याजणी मायलेकी आपापली पोळपाट लाटणी घेऊन एकमेकांकडे मदतीला जायचो.
गप्पागोष्टीत, दंगमस्तीत, गाण्याच्या भेंड्यात फराळाचे पदार्थ अगदी चुटकीसरशी करून
पार पडायचे.
ठोंबरेंच्यातल्या करंज्या, छायाच्याआईंच्यातला लसूण घालून केलेला चिवडा, सुकरेंच्यातले शंकरपाळे, तर आईच्या हातचे अनारसे आणि भाभींच्या हातचे चुरम्याचे लाडू अशी प्रत्येकाची एकेक खासियत. आठवूनही माझ्या तोंडाला पाणी सुटले आत्ता.
"चुरम्याचे लाडू!" 'चुरम्याचे लाडू' म्हटलं की सर्वात आधी माझ्यासमोर दिसतात त्या भाभी. भाभी... जणु माझी आईच.
माझा जन्म झाला आणि माझ्या आईचे आणि भाभींचे मैत्रीचे धागे अगदी घट्ट झाले.
भाभींचं ही कुटुंब तसं मोठंच. एकत्र जैन कुटुंब. स्वतःची
सहा अपत्यं(चार मुली आणि दोन मुले) असून विधुर भावाच्या आईविना असलेल्या दोन
छोट्या मुलींनाही आपलंसं करून अगदी ममतेनं वाढवणारी ती माय माऊली. सगळेजण त्यांना
भाभीच म्हणत असत. काय ऋणानुबंध असतात मागच्या जन्मीचे ते देवच जाणे. मी अगदी
तान्ही असल्यापासून मला भाभी आणि त्यांच्या मुली, म्हणजे माझ्या सगळ्या ताया त्यांच्या घरी घेऊन जायच्या. तिथेच भरवायच्या,खेळवायच्या,अगदी अंगाई गाऊन झोपवायच्याही. आईलाही तिच्या रामरगाड्यातून थोडा आधार वाटत
असे. खूप लाड व्हायचे माझे. हा त्यांचा दिनक्रमच झाला होता. त्यामुळे मला त्यांचा
आणि त्यांना माझा इतका लळा लागला की मी त्यांचीच एक होऊन गेले. मला रोज सकाळी तर
भाभींच्याच मांडीत बसून दहीचटणी खाकरा असा आवडीचा खाऊ खायचा असे. मला घेऊन
खेळण्यावरून तर ह्या सगळ्या तायांची भांडणही होत असत. अगदी मधेच मला आईची
आठवण आली की मगच माझी रवानगी आईकडे होत असे.
पुढे मामांनी म्हणजे भाभींच्या यजमानांनी सत्यमेव सोसायटीत
घर बांधलं आणि सर्वजण तिकडेच राहायला गेले. तरी माझं येणं जाणं सतत चालूच राहिलं.
बऱ्याचदा तिथेच अभ्यास करणं, मधेच स्वयंपाकघरात सगळ्यांमध्ये लुडबूडलुडबुड करत दशम्या, खाकरे असं काय काय करायला शिकणं, भाभींसोबत देवळात जाणं, महावीर स्वामींची पूजा करणं चालूच असे.
असं करता करता माझ्यावर शिस्तीचे, स्वच्छतेचे आणि देवधर्माचेही संस्कार त्या करत होत्या. इकडे आईकडून आणि तिकडे
भाभींकडून असे दुहेरी संस्कार माझ्यावर होत राहिले.
दोन्ही घरांमध्ये शेंडेफळ असल्यामुळे माझे लाड, कोडकौतुकही भरपूर झाले. कुठल्याही सणावारांना पहिली खरेदी
माझ्यासाठी ठरलेली. घागरा असेल, नथणी असेल एक ना अनेक. मी मोठी होत होते, अभ्यासही वाढत होता तसं माझं येणं जाणं जरा कमी होत होतं. पण भाभींचे
माझ्यावरचं प्रेम मात्र सदैव तसच राहिलं. एकमेकींच्या सुखदुःखात सदैव साथ करणारी, पाठीशी उभी असणारी निर्व्याज मैत्री होती खरंचखरच आई आणि
भाभींची. घरामध्ये काहीही बनवले तरी एकमेकींना पोचतं केल्याशिवाय चैन पडायची नाही
दोघींनाही.
दर दिवाळीला धनत्रयोदशीला देवळात जातानाच सर्वात पहिला सर्व
फराळाच्या पदार्थांनी भरलेला मोठा डबा आमच्याकडे पोचता होत असे. सोबत दुसरा
डबा असे तो गुळात बनवलेल्या चुरम्याच्या लाडवांचा. डबा कसा नीटनेटका भरावा हे
खरंच भाभींकडूनच शिकावं. गोड पदार्थ, तिखट पदार्थ वेगवेगळे, दोन पदार्थांमध्ये एक पांढरा स्वच्छ कागद(त्यावेळी papernapkins/ प्लास्टिक पिशव्याही नव्हत्या). शिस्त, स्वच्छता, नीटनेटकेपणा यात आई आणि भाभी म्हणजे एक नंबर. सर्वच फराळाचे पदार्थ अगदी
अप्रतिम चवीचे. गुळाचे कानोले, करंज्या, त्यात रिकामी
जागा कुठेही दिसणार नाही . सारणाने अगदी गच्च भरलेल्या, एकसारख्या तळलेल्या. चिरोटे अगदी खुसखुशीत साजूक तुपातले.
चकली, चिवडा, मोहनथाळ, बेसनाच्या तिखट
पुऱ्या आणि चुरम्याचे गूळ घालून बनवलेले लाडू. असा साग्रसंगीत थाट असे त्या
डब्याचा. असे सुगरणीच्या हातचे मस्त मस्त पदार्थ त्याच्या पोटात गेले, की तो डबाही अगदी तृप्त होत असेल .
मी कॉलेजमध्ये असताना भाभी हे जग सोडून देवाघरी गेल्या.
देवालाही बहुतेक त्यांच्या प्रेमळ हातचं खायची इच्छा झाली असावी. आता त्या नसल्या
तरी त्यांच्या त्या निर्व्याज ममतेने भरलेल्या स्मृती मात्र सदैव माझी साथ करत
असतात. चुरम्याचे लाडू दिवाळीत आणि महावीर जयंतीलही त्या करायच्या. अप्रतिम चवीचे
असे "चुरम्याचे लाडू". बघुयात माझ्या लाडक्या भाभींच्या हातचे चुरम्याचे
लाडू कसे असायचे ते ....
साहित्य:-
* कणिक - चार वाट्या( गहू पोळीच्या कणकेपेक्षा थोडे जाडसर दळून आणले तर उत्तम.)
* गूळ- चिरलेला दीड वाटी (आवडीप्रमाणे थोडा कमीजास्त करणे)
* तूप - दोन वाट्या
* तेल - तळणीसाठी (आवडत असल्यास तूपही चालेल)
* मीठ - चवीपुरते
* वेलदोड्याची पूड - दोन चमचे
कृती:-
* कणकेमध्ये गरम तुपाचे मोहन व चवीपुरते मीठ घालून कणिक घट्ट
मळून घेणे.
* थोडावेळ कणिक ठेवून चांगली मुरली की त्याचे मुटके बनवून
तेलात / तुपात तळून घेणे.(जाडसर पोळ्या बनवून शंकरपाळे सारखे कापून तळले तरी
चालते).
* कोमट झाल्यावर त्याचे तुकडे करून मिक्सर मधून बारीक करून
घेणे.
* आवश्यक वाटल्यास चाळणीने चाळून घेणे.
* चिरलेला गुळ थोडा कढईत गरम करून तो वितळला की लगेच गॅस बंद
करून त्यात वरील चुरमा
* वेलदोड्याची पूड घालून मिश्रण एकजीव करावे.
* तूप गरम करून घेऊन आवश्यकते प्रमाणे त्यात थोडे थोडे घालत
लाडू वळावेत.
* (आवडत असल्यास ह्या लाडवांत डिंक, सुकामेवा, खसखस ही घालतात)
आम्हाला हे असेच आवडतात. तयार आहेत भाभींचे "चुरम्याचे
लाडू "
श्वेता अनुप साठये
इतके दिवस नुसताच गोष्टी, कथांमधून ऐकलेला हा पदार्थ - कृती बघून आता करणे शक्य आहे.
ReplyDeleteपदार्थांची लज्जत त्याच्या आधीच्या आठवणी आणखीन वाढवताहेत ..
धन्यवाद
Deleteधन्यवाद
Deleteधन्यवाद
Delete