मोहराची भाजी


मोहराची भाजी (गाबोळी / उळशीचा मोहोर)

भारतामध्ये प्रांतानुसार निरनिराळी खाद्यसंस्कृती आपल्याला पाहायला मिळते. एवढेच काय तर आपल्या महाराष्ट्रातच बघा ना, दर पन्नास मैलांवर खाद्यपदार्थांमध्ये विविधता दिसून येते. कोल्हापूरचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा प्रसिद्ध तर साताऱ्याचा म्हाद्या. तेच थोडं पुढं पुण्याकडे गेलं की तुलनेने अळणी किंवा कमी तिखटातला कांदे बटाट्याचा रस्सा – असे पदार्थ केले जातात.

नोकरीनिमित्त बरेच ठिकाणी देशात परदेशात आम्हाला फिरण्याचा योग आला. त्यामुळे त्या त्या प्रांतातील निरनिराळे पदार्थही शिकता आले. आता तर काय फेसबुक आणि व्हाट्सप मुळे जग इतकं जवळ आलंय की घरबसल्या बऱ्याच नवीन गोष्टी सहज पाहायला आणि शिकायला मिळत आहेत. 

अशाच एका फेसबुक ग्रुप मध्ये असलेले 'सुगरण शेफ', श्री. शिवप्रसाद मेढे यानी पोस्ट केलेली ही अत्यंत दुर्मिळ अशी मोहराची भाजी पाहण्याचा आणि शिकण्याचा फेसबुकीय योग आला. 
पावसाळा सुरू झाला की निरनिराळ्या रानभाज्या यायला सुरुवात होते. डोंगराळ भागामध्ये येणारी ही मोहराची भाजी त्यातलीच एक अत्यंत दुर्मिळ अशी भाजी. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यानंतर उळशीच्या वेलीला मोहोर फुटायला सुरवात होते. नंतर हाच मोहोर काढून त्याची भाजी केली जाते. माश्यांच्या अंड्यांसारखी दिसणारी ही भाजी. त्यामुळे त्याला गाबोळीची भाजी असेही म्हणतात.
साहित्य:-
आलं - एक इंच
लसूण 5 ते 6 पाकळ्या
ओला नारळ मध्यम तुकडा
हिरव्या मिरच्या 3,4
कोथिंबीर
(
थोडे पाणी घालून वरील साहित्याचे वाटण करून घ्यावे. अथवा सर्व साहित्य बारीक चिरून घ्यावे.)
तेल - ४ टेबलस्पून
मोहरी - एक चमचा
जीरे - एक चमचा
हिंग - अर्धा चमचा
हळद - अर्धा चमचा
बारीक चिरलेला एक कांदा
कोथिंबीर
गरम मसाला
मीठ
पाणी
आणि उळशीचा मोहोर.
कृती :-

* मोहराचे मोठे देठ काढून, दोन तीन वेळा धुवून घ्यावा. त्यामुळे त्यातील बारीक खर निघून जाते.
*
आलं,  लसूण, ओला नारळ,  हिरव्या मिरच्याकोथिंबीर यांचं मिक्सरमधून  वाटण बनवून घ्यावं अथवा बारीक चिरून घ्यावं.
*
कढईमध्ये तेल गरम करून, त्यात मोहरी जीरे हिंगाची फोडणी करून ती तडतडली की त्यात हिरव्या मिरच्या, कढीलिंब, हळद आणि कांदा घालून गुलाबी  रंगावर परतून घ्यावा.
*
ओल्या नारळाचे वाटण आणि गरम मसाला घालून परत दोन मिनिटे परतून घ्या.
*
मग त्यात पाणी निथळलेला मोहोर घालून एक ते दोन मिनिटं परतून झाकण लावून वाफ काढा. नंतर मीठ घालून, परतून, परत एक वाफ काढा.
*
कोथिंबीर आणि खोवलेलं खोबरं वर घालून कांदा आणि शेंगदाण्याच्या चटणी सोबत गरमागरम वाढावी. ही भाजी भाकरी बरोबर छान लागते.


सौ. श्वेता अनुप साठये




No comments:

Post a Comment