पारंपारिक रेसिपी - अक्काची आमटी

फेसबुकवर पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृतींचा एक ग्रुप आहे, "अंगतपंगत". तिथे "पाटपाणी" नावाची एक स्पर्धा आयोजित केली होती. त्यामध्ये मी भाग घेतला होता आणि मिळालं की हो पाहिलं बक्षीस.

त्या ग्रुपची एक admin आणि लेखिका प्रीती देव ह्यांनी "पाटपाणी" नावाचं मराठवाडयाच्या पारंपरीक पाककृतींचं पुस्तक प्रकाशित केलं आहे. त्या निमित्ताने ही स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती. 
मी एक गृहिणी असून पाककलेची आणि चित्रकलेची मुळातच मला आवड आहे. त्यामुळे निरनिराळ्या प्रांतातल्या नवनवीन पाककृती नेहमी करून बघत असते. माझी आजी आणि आई दोघीही सुगरण. "पाटपाणी”च्या निमित्ताने मी माझ्या आजीचीच आमटीची पाककृती अंगतपंगतवर पोस्ट केली होती. तीच पाककृती खाली देत आहे. 

 #PaatPaani contest
"अक्काची आमटी"
     अक्का, माझी आजी, आईची आई म्हणजे साक्षात अन्नपूर्णाच. एकदम शांत, सात्विक, सोज्वळ, हसरी अशी नऊवारीतील शिडशिडीत बांध्याची छोटीशी मूर्ती. तिच्या हातचे सर्वच पदार्थ म्हणजे साक्षात अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद!

    
माझं आजोळ कोल्हापूर. मोठं घर. पुढे मोठालं अंगण तर मागेही मोठं परसदार. आजूबाजूला भरपूर फ़ुलं, फळझाडं. घरामध्ये माजघरात कडीपाटाला टांगलेला मस्त मोठा सागवानी झोपाळा. आमचा गोतावळा तसा मोठाच. पाच मावश्या आणि एक मामा. आम्ही सर्व मिळून मावस-मामे भावंडं वीस जणं.

     मे महिन्याची सुट्टी लागली रे लागली की मामाच्या घरी जायची ओढच लागायची. सर्व भावंडं सुट्टीत कोल्हापूरला जमायचोच. भरपूर खेळ, दंगा, मस्ती. मोठ्ठी भावंडं आम्हा लहान भावंडांना अगदी मस्त मायेने सांभाळायची.

     सकाळी सगळे लवकर उठून, आवरून आम्ही पहिले कट्ट्यावर म्हशीचे धारोष्ण दूध प्यायला जायचो. मोठया पितळी ग्लासमधून फेसाळलेलं दूध पिऊन दिवसाची सुरुवात होत असे. मग समोरील बागेत, अंगणात, परसात खेळत अगदी धुडगूस घालत असू. थोडी उन्हं वर यायला लागली की अंगणातून आम्ही आत येऊन माजघरातल्या झोपळ्यावर झोके घेत बसायचो. एकीकडे दादांची (आजोबांची) देवपूजा चालू असायची. चंदन, गंध, फुलांच्या, उदबत्तीच्या वासाने वातावरण अगदी सुगंधाने दरवळून जायचं. झोके घेत ती पूजा अगदी तल्लीन होऊन पाहत राहायचो. तर एकीकडे अक्काच्या हातच्या स्वयंपाकाचा सुवास सगळीकडे दरवळत राहायचा.
अहाहा!! 

     त्यातून अक्काच्या आमटीचा वास तर अप्रतिमच. अगदी अंगणात जरी खेळत असू तरी तिथपर्यंत तो वास दरवाळायचा आणि नुसत्या त्या आमटीच्या वासानेच आम्ही घराकडे जेवण्यासाठी धाव घ्यायचो. खेळून खेळून जाम भूकही लागलेली असायची.

     एकीकडे दादा देवांची आरती करत असत तर दुसरीकडे आक्का, आई, मावश्या, मामी सर्वांची पाने वाढायला सुरुवात करीत असत. दादांनी दिलेलं देवाचं तीर्थ घेऊन आम्ही वाढलेल्या पानांवर जाऊन बसत असू.

     त्यात एक मोठया मण्यामण्याचं स्टीलचं, नक्षी असलेलं ताट आम्हा सर्वांचंच लाडकं होतं. त्या ताटात जेवण्यावरून आम्हा भावंडांची नेहमी भांडभांडी चाले. मग सरतेशेवटी रोज एकेकाला त्यात जेवायला मिळेल अशा समझोत्यावर समजूत निघे.

     अक्का मस्त मोठया पितळी तपेल्यात भात शिजवत असे. आणि मोठ्या पितळी पातेल्यात आमटी बनवत असे. पातेल्यात गोडं तेल घालून ते चांगलं तापलं की त्यात मेथ्या, जिरं, मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घालून फोडणी चांगली तडतडली की मगच त्यात शिजवून घोटून घेतलेली डाळ घालून मग क्रमाक्रमाने इतर जिन्नस पडत असत. तो खास फोडणीचा आवाज आणि सुवास मला स्वर्गसुख देणाराच वाटे.

     सर्व जण पंगतीत येऊन बसलो की एकसुरात "वदनी कवळ घेता" म्हणत असताना एकीकडे अक्का तो गरमगरम पहिल्या वाफेचा पांढराशुभ्र भात तपेलीतून उकरून मोठ्या ताटात घेऊन एकेकाला वाढत असे. सोबत तिने केलेलं लिंबाचं गोड लोणचं आणि नंतर पातेल्यात रटरट उकळत असलेली गरमागरम आमटी छोट्या पातेल्यात काढून घेऊन वाटीत वाढत असे. वरून मस्त लोणकढं तूप.

     शेवटचं एकदाचं "उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म" अशी प्रार्थना भरभर उरकून आम्ही त्या आमटी भातावर हल्ला करून यथेच्छ ताव मारायचो. तो अक्काच्या हातचा आवडीचा आमटी-भात ओरपून खाऊन मन अगदी तृप्त होत असे. शेवटी ताजं ताजं बनवलेलं आणि वर पांढराशुभ्र मऊ लोण्याचा गोळा असलेलं ताक पिऊन आमच्या यज्ञकर्माची सांगता मोठी ढेकर देऊन होत असे. प्रत्येक नातवंडाच्या चेहऱ्यावर अक्काचा ममतेने भरलेला मायेचा मऊ हात फिरत असे. "भरलं का बाळा पोट?" अशी मायेची विचारपूस.

     आता अक्का काही राहिली नाही. पण तिची मायेची आठवण मात्र सदैव मनाच्या कप्प्यात जपून जतन करून ठेवली आहे. आता माझा मुलगाही माझ्या माहेरी गेल्यावर आईकडे, म्हणजे त्याच्या आजीकडे आमटी भाताचीच फर्माईश करतो. आणि मलाही नेहमी आमटी करताना बजावतो, "आई, आजीसारखीच आमटी कर अगदी." 
अक्काच्या आमटीचा वारसा आता आई चालवत आहे.

     मी आमटी करते, पण अजून अक्काच्या "त्या" आमटीची सर काही येत नाही, घटक पदार्थ तेच असले तरी.
    
अक्काच्या आमटीचा वारसा चालवण्याच्या प्रयत्नात...
                      
"अक्काची आमटी"
साहित्य:-
एक वाटी तुरीची डाळ
दोन चमच गोडं तेल
एक चमचा मेथ्या
दोन चमचे मोहरी
एक चमचा जिरं
अर्धा चमचा हिंग
एक चमचा हळद
थोडा कढीपत्ता
बारीक चिरलेली कोथिंबीर
चिंचेचा कोळ दोन चमचे
दोन लिंबाएवढा गूळ
मीठ चवीनुसार
दोन चमचे गोडा मसाला
तीन/चार चमचे लाल तिखट (ब्याडगी)
भरपूर माया 

कृती:-
प्रथम तूरडाळ धुवून त्यात डाळीच्या वर दोन पेर पाणी घालून त्यात चिमूटभर हिंग, हळद, एक चमचा तेल घालून कूकरमध्ये चार शिट्या देऊन शिजवून घ्यावी.
शिजलेली डाळ रवीने चांगली घोटून एकजीव करून घ्यावी.
कढईत तेल गरम करून त्यात क्रमाने मेथ्या, जिरं, मोहरी, हिंग, हळद, घालून फोडणी चांगली तडतडली की लगेच कढीपत्ता, घालून  त्यावर घोटलेली डाळ ओतावी. त्यात  दोन ते तीन ग्लास पाणी घालून एकसारखी ढवळून त्यात चिंचेचा कोळ, मीठ, तिखट, गोडा मसाला, गूळ घालून छान उकळावी. सर्वात शेवटी कोथिंबीर घालून एक उकळी आणून गॅस बंद करावा.
तयार होईल मस्त "अक्काची आमटी"

श्वेता अनुप साठये

  


1 comment:

  1. खूप सुंदर लिखाण. चव जिभेवर रेंगाळली

    ReplyDelete