आठवणी

आठवणी.  न बोलावता येणाऱ्या. नातेवाईकांच्या, मित्रमैत्रिणींच्या. वेगवेगळ्या प्रसंगांच्या ..
आठवणी. जवळच्या, दूरच्या, जीवलगांच्या, तर कधी नको त्यांच्याही!
आठवणी.  दाटून येणाऱ्या.  रिकामपणी तर हमखास येतात भेटायला. रिकामपणाचा विरंगुळा बनून.
आठवणी. येतातच. धावपळीच्या वेळीही, धुळभेट देत.
आठवणी . घरातल्या गोठ्याच्या. गोठा आता नाही, पण गोठ्यातल्या गाई म्हशी, न शिंगरू पारडी, अजूनही अस्वस्थ करतात.
आठवणी. बहुतांश हुरहूर लावून जाणाऱ्या, पण क्वचित कधी मन शांत आणि आनंदी करू शकणाऱ्या. 
आठवणी.  दु:ख देणाऱ्या. मन बेचैन करणाऱ्या. निराशेत बुडवणाऱ्या. मनाला चुटपूट लावणाऱ्या.
तर काही - आनंदाचा पुन:प्रत्यय देऊन जाणाऱ्या.
आठवणी. मन हळवं अन हळुवार करणाऱ्या, डोळे भिजवणाऱ्या, अश्रू वाहवणाऱ्या.
आठवणी. मनाच्या कप्प्यात लपलेल्या. मुलामुलींच्या विरहाच्या. आणि कोवळ्या नातेसंबंधांच्या.
आठवणी. आवतन न धाडता येणाऱ्या. आगंतुक पाहुण्यासारख्या. पण पाहुण्याच त्या! निघून जातात मग थोड्या वेळात. पाहुणा तरी निरोप घेईल.  आठवणी? जातात नकळत निसटून.
आठवणी. कधी वळवाच्या सरीसारख्या येणाऱ्या. मन भिजवून, चिंब करत आल्हाद देणाऱ्या!
तर काही रिमझिम पावसासारख्या. अधून मधून बरसणाऱ्या ..
काही मुसळधार. विजांच्या कडकडाटासह. घाबरवून, हादरवून सोडणाऱ्या ..
आठवणी. मन हलकं करणाऱ्या. मनाला कोंब फुलवणाऱ्या.
आठवणी. हजार पाकळ्यांचं फुल असणाऱ्या. आणि प्रत्येक पाकळी एक अनुभव असणाऱ्या.
कधी तरतरी देणाऱ्या तर कधी धीर देणाऱ्या. कधी निराशेत लोटणाऱ्या तर कधी हळुवार फुंकर घालणाऱ्या
आठवणी. काही नकोशा. तरी लोचटपणे प्रवेश करणाऱ्या
आठवणी. कधी काढली नाही म्हणून कुणा जवळच्याला रुसवणाऱ्या.  आमंत्रण विसरलं म्हणून रागे भरणाऱ्या
आठवणी. जशा त्या हव्यात तशाच ‘आठवण’ही हवी असे सांगणाऱ्या
आठवणी. टपरीवर चहाला जातांना मित्राला विसरल्यावर त्याच्यासमोर नाक धरायला लावणाऱ्या
आठवणी. जुन्या फोटोचा अल्बम काढल्यावर धबधब्यासारख्या अंगावर येणाऱ्या
तर कधी आठवण आली म्हणून अल्बमकडे धाव घ्यायला लावणाऱ्या
आठवणी. म्हातारपणीच्या जिवलग मैत्रिणी. माणूस संपला तरी न संपणाऱ्या. किंबहुना जास्तच उफाळून येणाऱ्या
आठवणी. भावूक मनाशी जवळीक दाखवणाऱ्या, तर रोखठोक बुद्धीशी जरा फटकूनच असणाऱ्या
आठवणी. मनाच्या गाभाऱ्यात बिलगून राहणाऱ्या. अन उर्मी अनावर झाली की आपल्यापर्यंत येणाऱ्या.
आठवणी. काळवेळेचं बंधन न जुमानणाऱ्या. माहेरच्या सख्ख्या मैत्रिणींसारख्या. लाडक्या लेकीसारख्या.
आठवणी. त्यांच्याशिवाय जगू न देणाऱ्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणाऱ्या.
आठवणी. परमेश्वराच्या आठवस्वरूप. त्याचा बोलवा येईपर्यंत सावली बनून राहणाऱ्या ...

अंजली टोणगांवकर



1 comment: