कथा: टर्निंग पॉईंट

(ह्या कथेला महाराष्ट्र टाईम्सने घेतलेल्या स्पर्धेमध्ये दुसरे पारितोषिक मिळाले. वीणा भागवत यांचे अभिनंदन)

रोजच्यासारखाच आजचा दिवस उजाडला. कालची रात्र तशी धावपळीतच गेली. हल्ली शांत झोप काय ती मिळतच नाही. जरा कुठं टेकलं की कुणीतरी येऊन हमखास हटकतं. एकदा रहदारी सुरू झाली की नेहमी दिसणाऱ्या माणसांची वाट बघणं सुरू होतं. सगळ्यांत आधी दिसतो तो रामूभैय्या, दूधवाला! त्याचा डोळा चुकवून एखादी पिशवी पळवता आली तर बघायची. नाहीतर आहेच नशिबी आजूबाजूचे उकिरडे पालथे घालणं आणि कुणाचंतरी उष्टंखरकटं शोधून खाणं. बरं ते तरी सहजासहजी कुठे मिळतंय? त्यासाठी किती चपळाई करावी लागते. जरा कुठं हयगय केली की आहेच मग उपास. कारण सगळे उकिरडे मग एकतर सफाट होतात किंवा सफाई कामगारांनी मनावर घेतलं तर स्वच्छ होतात. नातवंडांना सोडायला येणाऱ्या रोजच्या आजी दिसल्या आणि हा विचारांच्या तंद्रीतून भानावर आला. नेहमीप्रमाणे त्यांचा मोती कुत्रा होताच त्यांच्या मागेमागे. रोजच्या सवयीनुसार हा गेला त्यांच्याजवळ, पण मोती कायमच तोऱ्यातच असतो. आजही होता, मग हा वळला आजीबाईंच्या नातीकडे. ह्याला बघून तिला मात्र खरा आनंद होत असे. मग तिनं आईची नजर चुकवून गुपचूप आणलेली पोळी दिली. हा खूश होऊन शेपटी लवत चार पावलं तिच्याबरोबर चालला आणि  शाळेच्या बस स्टाॅपवर पोचला. बसमध्ये चढता-चढता तिनं हळूच त्याच्या डोक्यावर हात फिरवला, तिच्या त्या प्रेमळ स्पर्शानं तो हरखला.

रस्त्यावरची रहदारी आता खूपच वाढली होती. येणा
ऱ्या वाहनांनी रस्ता इतका भरून गेला की, ह्याला नाइलाजानं तिथून उठावं लागलं. हातपाय जरा ताणून, अंगावरची धूळ झटकून हा बसायला दुसरी जागा शोधत होता. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मोक्याची जागा दिसली. हा लगबगीनं तिकडं जायला निघाला. रस्ता ओलांडण्याच्या नादात वेगानं पुढं आलेल्या मोटारीकडे ह्याचं लक्ष गेलं नाही. अर्ध्या रस्त्यात गेल्यावर आता पुढं जावं की मागं फिरावं हेच त्याला समजेना. तो तसाच पळत पुढं गेला आणि बाजूनं ओव्हरटेक करणाऱ्या गाडीवर आदळला. त्या गाडीच्या ड्रायव्हरनं कचकन ब्रेक दाबला, पण तोपर्यंत ह्याचा एक पाय गाडीखाली आला होता. आत्यंतिक वेदनेनं हा कळवळला आणि कसाबसा बाजूला झाला. त्याला वाटलं चार लोकं जमतील, आपल्याला फार लागलंय का ते बघतील; पण त्याच्यासारख्या य:कश्चित प्राण्यासाठी वेळ कुणाकडे होता? त्याच्या भळभळणाऱ्या जखमेवर मलमपट्टी करणारं या भरल्या रस्त्यात कुणीही नव्हतं. वेदनेच्या दुःखापेक्षा हे दु:ख त्याला डाचत होतं. आज त्याला या गोष्टीची परत एकदा जाणीव झाली. त्याला आठवतंय तेव्हापासून तो एकटाच होता- बेवारशी, बेनाम! त्याला साधं नावही नव्हतं की कधी कुणी हाकसुद्धा मारली नव्हती. आपल्याला जवळ घेणारं, आपली प्रेमानं विचारपूस करणारं या जगात कुणी नाही या वास्तवानं त्याला रडू यायला लागलं. येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांपैकी कुणाच्या डोळ्यांत आपल्यासाठी प्रेम दिसतंय का, ते तो नेहमी शोधत असे. आपल्यालाही एक घर असावं. गळ्यात पट्टा घालून आपणही आपल्या मालकाबरोबर ऐटीत फिरायला जावं, असं त्याचं स्वप्न होतं. सकाळ-संध्याकाळ खायला मिळेल की नाही याची भ्रांत नाही, झोपायला मऊमऊ गादी आणि खायला स्वत:चं हक्काचं भांडं. सुखसुख म्हणतात ते याहून वेगळं काय असणार? गुपचूप पोळी देणारी आजींची नात आपल्याला घरी नेईल का? की दुधाची गळकी पिशवी आपल्याकडे भिरकावणारा रामूभैय्या आपला मालक होईल? रोज रिक्षातून जाताना ब्रेडचे दोन तुकडे देणारा पीटर आपला म्हणायचा का? मग आत्ता कुठं आहेत ती सगळी आपली माणसं...? खरंच ती आपली आहेत का? आपल्यावर त्यांचं प्रेम आहे का? का आपल्यावर दया दाखवतात म्हणून ती आपली वाटतात? आपल्यावर प्रेम करणारं, आपली काळजी घेणारं कोणी आपल्याला कधी भेटेल का? अशा काहीशा विचारांत तो तळमळत पडून राहिला.

अॅड. देसाई आज जरा गडबडीनं घराबाहेर पडले होते. त्यांना एका अशिलाला भेटायचं होतं, डोक्यात त्याच केसचे विचार घोळत होतेगाडीच्या स्टिअरिंगवरचे हात यांत्रिकपणे फिरत होते. समोरच्या गाडीचा वेग अचानक कमी झाल्यानं त्यांनी घाईनं ओव्हरटेक घेतला, त्या गडबडीत एक कुत्रा पलीकडच्या बाजूनं वेगानं पळत आलेला त्यांना दिसला नाही. लक्षात येऊन ब्रेक दाबेपर्यंत त्या कुत्र्याला गाडीचा जोरदार धक्का लागला आणि तो कुत्रा जिवाच्या आकांतानं
केकाटला. अॅड. देसाईंनी मनातल्या मनात एक शिवी हासडली आणि गाडी पुढे दामटवली. पण त्या कुत्राचं ते विव्हळणं त्यांच्या कानात खूप वेळपर्यंत घुमत राहिलं. निलीमाचा वेदनेनं पिळवटून निघणारा चेहेरा उगीचच त्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. अॅड. देसाईंसारख्या कणखर, वेळप्रसंगी कठोर माणसासाठी हे जरा अनपेक्षित होतं. त्यांच्या पत्नीच्या, निलीमाच्या निधनानंतर ते जरा हळवे झाले होते. ती हयात असेपर्यंत त्यांनी कधी तिला वेळ दिला नाही, तिच्याशी कधी मनमोकळ्या गप्पा मारल्या नाहीत की कधी हातात हात घालून दोघं समुद्रावर हिंडायला गेले नाहीत. निलीमाला सगळ्याची आवड- स्वयंपाकात तर ती सुगरण होतीच, पण ती एक उत्तम गृहिणी होती. तिला झाडांची पानाफुलांची, प्राण्यांची खूप आवड, आयुष्य भरभरून जगण्याचा तिचा स्वभाव. देसाई म्हणजे अत्यंत बुद्धिमान, व्यावहारिक पण आत्मकेंद्रित माणूस. त्यांना निलीमाची आवड, आयुष्यातल्या  छोट्या छोट्या गोष्टी जगण्याची तिची धडपड कधी उमजलीच नाही. ती दोघं एका सुरेल नात्यात बांधली गेली असली तरी त्या नात्यातून कधी सतारीचे सूर झंकारले नाहीत की कधी पहाटेचा मारवा गुंजला नाही. अॅड. देसाई तसं मुद्दाम वागले असं नाही, पण राहून गेलं निलीमाला वेळ देणं, तिच्याशी संवाद साधणं! मूलबाळ नसल्यानं त्यांच्यातला औपचारिकपणा फारसा कमी झालाच नाही, देसाईंनीही कधी तसा प्रयत्न केला नाही. अजून पुष्कळ आयुष्य पडलंय हे सगळं करायला, असं म्हणता-म्हणता एका बेसावध क्षणी निलीमा निघून गेली, पार पलीकडच्या जगात! आता आठवतं त्यांना तिचं वाट पाहणं, त्यांच्या सहवासासाठीचं झुरणं! कदाचित...
कदाचित त्यामुळेच ते हल्ली  मनानं हळवे झाले होते. त्यांच्याकडून निलीमावर नकळत झालेल्या अत्याचाराची बोच त्यांना सारखी छळत असे. आयुष्यात अचानक निर्माण झालेली पोकळी त्यांना बेचैन करत असे. या जगात आपली वाट बघणारं, आपली काळजी करणारं, आपल्यावर प्रेम करणारं आता कोणी नाही, ही जाणीव  हल्ली  त्यांना अस्वस्थ करत असे.

खरंतर सकाळी घडलेला गाडीचा तो प्रसंग काम आटपून परत येईपर्यंत देसाई विसरून गेले होते. पण का कुणास ठाउक आज त्यांना निलीमाची सारखी आठवण येत होती, त्यामुळे मनात कसलीतरी हुरहुर दाटली होती. विचारांच्या तंद्रीत गाडी चालवता-चालवता नेमकी सकाळच्या ठिकाणी गाडी आल्यावर त्यांना तो कुत्रा दिसला, खुरडत-खुरडत चालायचा प्रयत्न करणारा! त्यांना
वाटलं की काही तासांपूर्वी आपल्या गाडीचा धक्का लागलेला कुत्रा तो हाच असावा. आता नक्की आठवत नव्हतं, पण त्याच्या पांढऱ्या अंगावर काळे ठिपके बघितल्याचं आठवत होतं. आपल्या गाडीखाली ह्याचेच पाय आले असावेत बहुधा, असा विचार करत असताना त्यांनी  रस्त्याच्या कडेला गाडी कधी थांबवली ते त्यांचं त्यांनाच कळलं नाही. गाडीचं दार उघडून ते त्या कुत्र्याच्या दिशेनं चालायला लागले. चार पावलं मागे गेल्यावर त्यांना तो कुत्रा दिसला आणि त्यांची खात्री पटली की हाच तो सकाळचा कुत्रा! त्याच्या पायाला बरंच लागलं होतं. आजूबाजूला लागलेलं रक्त वाळलं असलं, तरी बराच रक्तस्राव झाला असावा असं दिसत होतं. त्या कुत्र्याच्या चेहेऱ्याकडे बघून त्याला होणाऱ्या वेदनेचा अंदाज येत होता. ह्याच रस्त्यावर थोडं पुढे प्राण्यांचा दवाखाना आहे, हे त्यांनी अनेक वेळा पाहिलं होतं. देसाईंनी जरा घाबरतच त्या कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला. कुठल्याही प्राण्याच्या इतक्या जवळ जायचा आणि त्याला हात लावायचा हा त्यांच्या आयुष्यातला पहिलाच प्रसंग! तो कुत्रा अगदी मलूल होऊन पडला होता. त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला, तो उठला, पण त्याला चालता येईना. मग देसाईंनी त्याला कसंबसं उचलून गाडीत ठेवलं. डॉक्टरांकडे जाऊन मलमपट्टी करू आणि याला सोडून देऊ असा विचार त्यांनी केला. डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, ड्रेसिंग केलं आणि चार दिवसांचं औषध दिलं. दिवसातून दोन वेळा जखम पुसून त्यावर लावायला क्रीम दिलं आणि 'चार दिवसांनी या', असं सांगून ते दुसऱ्या पेशंटला बघायला निघून गेले. 'अहो हा माझा कुत्रा नाही, रस्त्यावरचा कुत्रा आहे' असं  सांगायची संधीच देसाईंना मिळाली नाही. दवाखान्यातल्या पोऱ्यानं पटापट त्या कुत्र्याला त्यांच्या गाडीत नेऊनही ठेवलं. त्या पोऱ्याच्या मागे भराभर चालत देसाई गाडीपाशी पोचले, बघतात तर काय, पाठीमागच्या सीटवर ठेवलेल्या त्यांच्या काळ्या कोटावर तो कुत्रा अंगाचं मुकुळं करून अगदी विश्वासानं बसला होता. त्या कुत्र्याला तिथून हुसकून लावायचं त्यांच्या जिवावर आलं, आज खूप दिवसांनी कुणीतरी त्यांच्याकडे इतक्या आश्वासक नजरेनं बघितलं होतं. त्या डोळ्यांत आता वेदना नव्हत्या; त्यात होतं प्रेम, करुणा, उपकाराची जाणीव आणि अपार विश्वास; जो निलीमाच्या जाण्यानंतर देसा हरवून बसले होते. काहीशा गोंधळलेल्या मन:स्थितीतच देसाईंनी गाडी सुरू केली. इकडे तो कुत्रा मात्र समाधानानं झोपेच्या अधीन झाला होता.

--- वीणा भागवत

1 comment:

  1. एका रस्त्यावरील कुत्र्याचं मनोगत हे असू शकतं, ही कल्पना अगदी भिडणारी, दुःख वास्तविक आणि माणसाची दुर्लक्ष करण्याची आणि नंतर भूतदया दाखवण्याची वृत्ती सारंच सुंदर!खूप हृदयस्पर्शी कथा!

    ReplyDelete