दिवाळीची मजा
संपून आमची शाळेची चाचणी परीक्षा पार पडलेली असायची आणि मग आम्हाला वेध लागायचे ते
एक दिवस रेणुकेला जायचे. पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत कऱ्हाडला रेणुकेचा उत्सव
असतो. कऱ्हाडमधून आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्यातूनही लोक देवीच्या दर्शनाला हमखास
जातात. माझ्या बालपणी तर रेणुकेला जायचं म्हणजे एक सोहळाच असे. देवीचं दर्शन आणि
त्यासोबत होणारी एक दिवसाची सहल.
आई आणि आमच्या
कॉलनीतल्या तिच्या मैत्रिणी आम्हा सगळ्या मुलांना सोबत घेऊन रेणुकेच्या दर्शनाला
जायचा एक दिवस पक्का करत असत. मग दोनतीन दिवस आधीपासूनच सर्वजणी तयारीला लागत.
तेव्हा काही बाहेर खाण्याचं एवढं फॅड नव्हतं आणि उपलब्धताही नव्हती. सर्वजणी ठरवून
लवकर उठून डबे बनवून घ्यायच्या आणि मग आम्ही सगळे रेणुकेला जायला निघायचो.
घरापासून देऊळ
साधारण सात आठ किमी अंतरावर असेल. त्यामुळे घरापासून निघताना रिक्षा करून जायचो.
कृष्णापूल ओलांडून विद्यानागरच्या रस्त्यावर एक चौक लागतो. तिथून डावीकडे जाणारा
एक फाटा आहे. त्या चौकातच फाट्याजवळ रिक्षा सोडून देऊन आम्ही सर्वजण चालायला
सुरुवात करायचो. त्या वाटेला सोबत घेऊन वाहणारा एक कालवा आहे. कृष्णेवर खोडशीला
बांधलेल्या धरणाचा तो कालवा एकीकडे वाहतो तर दुसरीकडे शेती,
आमराई, फळबागा आणि मधोमध हा अगदी कच्चा रस्ता. तो थेट खोडशी
धरणापर्यंत जातो. साधारण तीनेक किमी. चा तो पायी प्रवास. रिक्षातून उतरून
आम्ही सगळी चिल्लर गँग आयांबरोबर यात्रेला
सुरवात करायचो. होय यात्राच ती आमची ! छोटीशी ! पण अगदी कैलासाच्या यात्रेचा आनंद
देणारी.
थंडीच्या गार
वाऱ्यात उगवतीच्या सूर्याची सोनेरी किरणं त्या कालव्यामधल्या पाण्यावर पडून
हिऱ्यासारखी चमकत असायची. मधूनच कापसासारखं धुकं पाण्यावर अलगद तरंगताना दिसायचं.
कालव्याच्या बाजूने असलेली गर्द हिरवी घनदाट झाडं त्यांवर पडलेल्या धुक्याने आणि
दवाने भिजलेली दिसायची. त्यांवर टांगलेले सुगरणींचे असंख्य खोपे. त्यांवर
भिरभिरणाऱ्या सुगरणी. पिल्लांची राखण करणाऱ्या, त्यांना खोप्यात जाऊन भरवणाऱ्या. बगळे,
खंड्या, साळुंख्या, भारद्वाज, कोकिळा, पोपट, कबुतरं, बुलबुल, चिमण्या असे अनेक पक्षी अगदी मुक्त विहार करत त्यांचा किलबिलाट चालू असायचा. चालता चालता ती घरटी बघणं,
पिल्लं दिसतायत का ते शोधणं, दिसली तर हळूच घोळका करून बाजूला थांबून त्यांचा चिवचिवाट
ऐकणं,
पक्षी त्यांना कसे चोचीने भरवतात हे बघणं हा आमचा आवडीचा
छंद. तेव्हा हेच बिल्डर्स आणि त्यांनी बांधलेली घरटी ह्याच बिल्डिंग्ज आम्हाला
तिथे दिसायच्या. स्वर्गाहून सुंदर सृष्टी होती ती. वाटेत आजूबाजूच्या खेड्यांमधून
येऊन बायका रस्त्याकडेला वेताच्या बुट्ट्यांमधे पेरू,
बोरं, आवळे, चिंचा, चणे, शेंगदाणे, फुटाणे असं काय काय रीघ करून विकायला बसायच्या. कागदी
कोनाकार पुडे तयार करून त्यात मापं भरून घालून त्या द्यायच्या.
ते पुडे हातात घेऊन
आवडीचा खाऊ खात खात पुढची वाटचाल आम्ही चालू ठेवायचो. थोडी उन्हं वर आली की
शेतकऱ्यांनी पाण्यासाठी आणलेल्या म्हशी कालव्यात डुंबताना दिसायच्या. त्यांच्या
पाठीवर शुभ्र पांढरे बगळे स्तब्ध उभे
असायचे. त्या शेतकऱ्यांची मुलं मधेच म्हशींच्या पाठींवर उभं राहून पाण्यात मनसोक्त
उड्या ठोकायची. ते बघून आम्हाला जाम अप्रूप वाटायचे. त्यांच्यातला एखादा मुलगा
पोहत पलीकडे जाऊन पलीकडच्या झाडांवरून रिकामा झालेला खोपा आणून आम्हाला भेट
द्यायचा. "कोन ऱ्हात न्हाय आता त्यात. उडाया शिकल्याती पिल्लं. गेली उडून
समदी. घ्या तुम्हांस्नी." असं म्हणून प्रेमानं आम्हाला द्यायची. मग आम्हीही
घेतलेले पेरू, बोरं त्यांना द्यायचो. त्या सुंदरशा खोप्याचं घोळका करून निरीक्षण व्हायचं.
अगदी मजबूत बांधणी असलेलं,
आत कप्पे असलेलं. त्या कप्प्यांमध्ये पिल्लांसाठी ठेवलेला
मऊ कापूस पण असे. किमया निसर्गाची! बघून आम्ही खरच खूप भारावून जायचो. एवढीशी ती
सुगरण पण केवढा मोठा तिचा खोपा.
नुकतीच बाईंनी
शाळेत शिकवलेली बहिणाबाईंची कविता ,
अरे खोप्या मधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिल्लासाठी तिनं
झोका झाडाले टांगला...
आठवत ,
म्हणत आमची स्वारी पुढं चालायची. मघाशी घेतलेल्या खाऊच्या
पुड्यांच्या आता कागदांचा चेंडू आता बनलेला असायचा. तो उडवत,
खेळत खेळत जाताना आम्हाला मधेच दिसायचं ते डाव्या बाजूने
ऊसांच्या शेतात वाहत जाणारं पाटाचं पाणी . नदीवर मोटारी लावून पाणी ओढलेलं असायचं.
त्या नळ्यामधून जोरात कारंज्यांसारखं वाहणारं थंडगार पाणी तोंडावर उडवून पोटभर
पिऊन झालं की शेतात काम करणाऱ्या माणसांकडून दोन तीन ऊस तोडून मिळायचे. ते पायाने
परत एकसारखे तोडून एकेक कांडकं आई आम्हाला द्यायची. तो खात ,
चघळत चघळत , दंगा मस्ती करत चालत असताना शेवटी धरणाची भिंत दिसू लागे.
चालायचा उत्साह अजूनच वाढे. 'त्या धरणाच्या भिंतीजवळच जायचंय'
, असं कुणाचं तरी वाक्य ऐकलं
की आमचा चालण्याचा वेग दुप्पट होई. धावत धावत जाऊन तिथल्या झाडापर्यंत पहिलं
पोहचण्याची मग स्पर्धा लागे. मागून आयांच्या हाका येत,
" सांभाळा रे
पोरांनो ,
पाणी खोल आहे बरंच." त्यांचाही मग चालण्याचा वेग
आपसूकच वाढे. धरणातल्या पाण्यात कधी एकदाचे पाय बुडवतो असे अगदी झालेलं असायचं
आम्हाला.
सगळेजण मग त्या धरणाच्या भिंतीवर हळूहळू जाऊन उभे राहत असू. धरण भरून
त्या भिंतीवरून पाणी खाली कोसळत असे. त्या पाण्यात पाय बुडवायला त्या भिंतीवरून
चालायला कोण आनंद होई आम्हाला. तिथूनच धरणाच्या अगदी समोरच झाडीत असलेल्या
रेणुकेच्या मंदिराचा कळस दिसे. मग आमची धाव आता देवळाकडे असे. देऊळ तसं अगदी साधं,
कौलारू होतं. पण निसर्गाच्या हिरवाईने आणि वैभवाने नटलेलं.
मंदिरात प्रवेश केला की काळ्या दगडामधे कोरलेली रेणुकेची शांत मूर्ती दिसे. भाळी
मळवट भरलेली, हिरवी साडी ल्यालेली, हातभर हिरव्या बांगड्या घातलेली. मंद समयांच्या ज्योतीमध्ये
त्या तेजस्वी मूर्तीचे दर्शन होई. एकदम शांत , प्रसन्न वाटे. देवीचे दर्शन घेऊन प्रदक्षिणा घालताना तिथून
धरणाच्या भिंतीवरून खडकांवरून खळखळत जाणारं पांढरं शुभ्र फेसाळतं पाणी दिसे.
थोडावेळ देवळात शांत बसून मग आमची गँग जवळच असलेल्या आमराईत आमची सर्वांची
अंगत पंगत मावेल असं मोठं डेरेदार झाड पाहून बस्तान बसवत असू. मघाशी बनवलेला चेंडू
परत कोणाच्यातरी खिशातून बाहेर निघत असे. कोणीतरी बाजूच्या झाडांच्या चिंचा
पाडण्यात मग्न होई. कोणीकोणी आंब्याच्या झाडांवर चढून बसे. धरणाचं पाणी वरून कसं
दिसतं ते बघण्याचे खटाटोप चालत. अशातच मग सगळ्यांच्या आयांच्या हाका येत,
" पोरांनो,
येताय ना रे जेवायला? " मग झाडांवरून खाली उड्या मारून आम्ही सर्वजण गोल करून, बसून उदरभरणाला सज्ज होत असू. सगळ्यांच्या घरचे वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेले डबे
पिशव्यांमधून बाहेर निघायचे. एकदोघीजणी घागर घेऊन कृष्णेचं धरणातलं पाणी आणायला
जायच्या,
कोणी हाताने कांदे फोडण्यात दंग होई,
तर कोणीतरी सगळ्यांना ताटं द्यायला सुरुवात करी.
अशी सगळी
पूर्व तयारी झाली की मग मधे मांडून ठेवलेले सगळ्यांचे डबे एक एक करून उघडले जात.
मस्त थाटमाट असे त्या डब्यांचा. झुणका, भाकरी, ठेचा, मसालेभात, दहीभात, मटकीची उसळ, बटाट्याचा रस्सा, दशम्या , पोळ्या आणि सुकरे मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या. वा!
वा! मस्तच!! तोंडाला अगदी पाणी सुटायचं. एवढी चाल करून आल्यामुळे जाम भूक लागलेली
असायची. आम्ही सगळेजण मग त्या चविष्ट जेवणावर यथेच्छ ताव मारायचो. त्यात मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या मला फार आवडायच्या. सोबत नेहमी
भुईमुगाच्या शेंगा आणायच्या त्या. ताजी
आलेली लाल गाजरं, मुळे, ओले हरभरे, डिंगऱ्या ही असायचे. असं सर्व पदार्थांनी भरलेलं ताट आणि
सोबत शेंगा ,दही. मजा यायची खायला अगदी. पोटभर जेवून तिथेच आंब्याच्या झाडाखाली थंड वाऱ्यात छोटीशी
डुलकी पण होत असे सर्वांची. गप्पा रंगत असत.
आईला सगळ्या जणी गाणी म्हणायचा आग्रह
करत. सुंदर आवाज तिचा. मग भेंड्याही रंगत.
परत एकदा धरणात भिंतीवरून वाहणाऱ्या पाण्यात पाय बुडवायची इच्छा पूर्ण होई.
तिथेच बाजूला ताटं ही धुतली जात. झाडाखाली बसून जेवलेला परिसर सगळे मिळून स्वच्छ
करत. 'प्लास्टिक' नामक राक्षसाचा थोडासाही शिरकाव तेव्हा तिथे नव्हता
त्यामुळे सगळं कसं स्वच्छ होई किंवा खत होई. पर्यावरणाचा ही आदर राही. आमची स्वारी
मग परतीच्या प्रवासाला सज्ज होत असे. त्यादिवासात कृष्णेच्या पाण्याची पातळी
खालावलेली असे. त्यामुळे बऱ्याचदा मग सर्वानुमते जाताना कृष्णनदीचं पात्र ओलांडून
घरी परतण्याचा ठराव पास होई. आणि मग आमचा रोमांचकारी परतीचा प्रवास सूरु होई.
त्याच रस्त्यावरून परतताना मधेच लागणाऱ्या एका ओढ्याजवळची पायवाट थेट नदीपात्राकडे
नेते. त्यावरून उतरण असल्यामुळे एकमेकांना आधार देत ,
धडपडत, हळूहळू चालत नदीपात्रा पर्यंत पोहचत असू. तिथून उजवीकडे नजर
वळवली की कृष्णाकोयनेचा प्रीतिसंगम
दिसायचा. तर थेट पलीकडच्या तीरावर असलेलं कृष्णाबाईचं मंदीर,
घाट आणि इतर देवळं दिसायची.
नदीचं पाणी एकदम स्वच्छ असायचं. आकाशाचं प्रतिबिंब त्यात
पडलेलं दिसायचं. पात्रातल्या पाण्याचा अंदाज घेऊन तिला नमन करून एकमेकांना हातांनी
धरून साखळ्या करून आम्ही नदीच्या पात्रात प्रवेशकरते व्हायचो. हळूहळू अंदाज घेत
चालायला सुरुवात करायचो. साधारण मध्यापर्यंत गेलो की पाण्याची पातळी मध्यभागी
जास्त वाटायची. पाण्याला धारही असायची. अगदीच पाणी आमच्या गळ्यापर्यंत यायला लागलं
असेल तर मोठी भावंडं पाठकुळी घ्यायची किंवा आया खांद्यांवर बसवायच्या.
एकमेकांच्या आधाराने नदी पार करत राहायचो. पाण्याची पातळी
कमी असेल तिथे परत खाली उतरून पाण्यातल्या गोल गोट्यांवरून चालत नदी अखेर पार
व्हायची. ज्यांना चांगलं पोहायला यायचं ते
पोहत पलीकडचा तीर गाठायचे. पलीकडच्या तीरावर सुखरूप पोहचल्यावर सगळेजण तिथून परत
एकदा रेणुकेला आणि कृष्णेलाही नमस्कार करून कृतज्ञता व्यक्त करायचे. कृष्णेचं
तीर्थ आई आमच्या डोळ्यांना लावायची. तिथून घाटावरच्या कृष्णाबाईच्या मंदिरात जाऊन
तिचं दर्शन घेऊन सरतेशेवटी रमतगमत आमची स्वारी घरात येऊन सुखरूप दाखल होई आणि
रेणुकायात्रेची सांगता होई.
घरी परतून मस्त गरम गरम खिचडी खात खात बाबांना आणि आजी-आजोबांना सगळा सविस्तर वृत्तांत आम्ही सांगायचो. दिवसभराच्या पायपिटीनं दमल्यामुळं अंथरुणावर पडल्या पडल्या रेणुकायात्रेच्या सुखद स्वप्नात मग्न होऊन निद्राधीन होऊन जायचो. खरं तर तेव्हा आमच्याकडे कॅमेरे नव्हते पण मनावर कायमचेच कोरले गेलेले हे क्षण फोटोंपेक्षाही सुस्पष्ट आमच्या स्मृतींमध्ये आहेत. तेव्हाच तो परिसर पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करायला हवा होता असं वाटतं. पाच सहा वर्षांपूर्वी भरतपूरचं पक्षी अभयारण्य पाहण्याचा आम्हाला योग आला आणि ते पाहताना मला प्रकर्षानं रेणुकेची आठवण आली. तेवढीच किंबहुना त्याहूनही सुंदर असलेली ही रेणुकेची यात्रा होती.
बऱ्याच वर्षांनी, दोन वर्षांपूर्वी, मला रेणुकेला
जायचा योग आला. मन फार खिन्न झालं. सगळंच हरवून गेल्यासारखं वाटलं. ती झाडं,
सुगरणींचे ते खोपे, ते पक्षी, काहीच कशाचाच मागमूस लागला
नाही. खोप्यांची जागा तर आता पूर्ण काँक्रिटच्या जंगलाने घेतलीय. त्या
रस्त्यावरच्या झाडांची संख्या फारच घटलीय. अगदी मोजकेच, हातांच्या बोटांवर मोजता
येण्याएवढेच खोपे दिसले. रुक्ष वाटलं सगळं. कालव्यातही दूषित पाण्याने शिरकाव
केलाय. "प्लास्टिक"आणि "मनुष्याची हाव" ह्या दोन राक्षसांनी
त्या वाटेवर आपलं बस्तान बसवलंय. चित्र बदलायला हवंय. काहीतरी करायला हवंय. आपणच
आपली जंगलं गिळंकृत करत चाललोय. रेणुकेचं
दर्शन घेऊन एकच मनाशी खूणगाठ बांधून आलीय, जिथे जमतील जशी जमतील तशी झाडं लावत रहायचं. तेवढाच
काँक्रिटच्या जंगलात खारोटीच्या प्रयत्नांचा छोटासा वाटा. जागोजागी घटत चाललेल्या
जंगलांची आणि नैसर्गिक संपत्तीची पुन्हा वाढ होवो हीच रेणुकेचरणी प्रार्थना.
।।श्री
रेणुकामाता की जय।।
पाहुयात
मामींच्या हातच्या बाजरीच्या पुऱ्या....
साहित्य:-
बाजरीचं पीठ - ३
वाट्या
गहू,
तांदूळ, हरभरा पीठ (सर्व मिळून) - १ १/२ वाटी
तीळ - ४ ते ५
चमचे
ओवा- १ चमचा
आलं-लसूण-मिरचीचा ठेचा - २ ते ३ चमचे
मीठ - चवीनुसार
हळद - १ चमचा
हिंग - ३/४ चमचा
तेलाचे मोहन - २
चमचे
तेल (तळण्यासाठी) - ४ ते ५ वाट्या
पाणी - पीठ
मळण्यासाठी
कृती:-
*वरील सर्व (बाजरी, गहू, तांदूळ, बेसन) पीठं एकत्र करून त्यात हिंग,
हळद ,मीठ, ठेचा, ओवा असं सर्व एकत्र करून त्यात कडकडीत तेलाचं दोन चमचे मोहन
घालावं.
*त्या पिठात पाणी घालून घट्ट मळून घ्यावं.
*अर्धातास हे पीठ झाकून छान मुरू द्यावं.
* कढईत तेल चांगलं तापलं की एक एक पुरी थापून तळून काढावी.
*तयार बाजरीच्या खमंग पुऱ्या!
*दाण्याची / जवसाची / कारळ्याची चटणी,
दही ओल्या शेंगां सोबत सर्व्ह कराव्यात.
सौ. श्वेता अनुप साठये
ह्रद्य आठवणी आणि खमंग बाजरीच्या पुऱ्या ! मस्त !
ReplyDelete