कैकेयी

 आज राम योध्येत परत येणार! खरंच माझा राम येणार! पण...पण, रामाला वाटेल का तसे? म्हणेल का तो मला आई? का भरताने जशी माझ्याकडे पाठ फिरवली तशीच रामही पाठ फिरवेल का माझ्याकडे? रामा, तू चौदा वर्ष वनवास भोगलास.प्रचंड पराक्रम गाजवून विजय मिळवला आणि मी इथे राजवाड्यात एकांतवास भोगते आहे, सगळ्यांच्या जळजळीत नजरा सहन करतेय. मला सगळे जण विघ्नसंतोषी, पतीहत्यारी समजतात. रामा, खरंच कारे मी तशी आहे? विझत चाललेल्या दिव्यासारखी मी चौदा वर्षे मनातल्या मनात जळत राहिले. कोणीच मला जाणले नाही. रामा तू तरी जाणशिल ना रे? रामा, तुझ्यासाठीच हे दिव्य मला करायला लागले हे तुला तरी जाणवेल ना? एक दुष्ट सावत्र आई म्हणून लोक माझ्याकडे पाहतात आणि पुढेही पाहतील, पण याचे दुखः मी मानणार नाही, पण रामा तूही मला तसेच नाही ना समजणार?

अजूनही ती १४ वर्षांपूर्वीची संध्याकाळ मला आठवते आहे.रामाला उद्या युवराज्याभिषेक होणार असे सांगणाऱ्या दासीला मी आनंदाने माझा मोत्याचा कंठा बहाल केला.किती आनंदात होते मी!इतक्यात वर्दी आली, राजगुरू वशिष्ठ मुनी काही खास कामासाठी मला भेटायला येत आहेत.त्यांची पाद्यपूजा झाल्यावर त्यांना राजकारणातल्या चर्चेसाठी एकांतात बोलायचे होते.

"दक्षिणेत दंडकारण्यात लंकापती रावणाचे सैनिक धुमाकूळ घालत आहेत. ऋषीमुनींना त्यांनी आणि रावणाची बहिण शुर्पणखा  हिने सळो की पळो करून सोडले आहे. महाराजांकडे ते मदतीची याचना करत आहेत. पण महाराज त्यांच्या मुलांमध्ये इतके व्यस्त आहेत की त्यांना राज्यकारभराकडे देखील लक्ष द्यायला वेळ नाही.कदाचित वयोमानाप्रमाणे त्यांना युद्धाची दगदग नको वाटतं असेल!" मी म्हटले “रामाच्या युवराज्याभिषेकानंतर त्यालाच चतुरंग सेना देऊन रावणाचा निःपात करायला पाठवले तर? गुरुदेव कितीतरी मोठ्यांदा हसले!म्हणाले, "युद्धशास्त्र राजकारणात निपुण असलेल्या राणी सरकार हे बोलत आहेत? राम दक्षिणेकडे सैन्य घेऊन येतोय हे कळाल्यावर रावण सावध होईल.त्याच्या मोठ्या सैन्यापुढे आपला पाडाव लागणार नाही. देवराज इंद्राशी सलोखा असावा म्हणून इंद्राच्या बाजूने दानवांशी लढण्याचा सल्ला तूच दिला होतास ना राजाला? महाराजांबरोबर तू युद्धालाही गेली होतीस.रथाचे निसटत असलेले चाक सावरून तू रथ कोसळू दिला नाहीस.राजे विजयी झाले आणि तुझ्या या समयसूचकतेवर प्रसन्न होऊन त्यांनी तुला दोन वर दिले.तेव्हा तू त्यांना काही मागितले नाहीस, पण आता वेळ आली आहे".असे सूचकपणे म्हणून ते महालातून बाहेर पडले.

गुरुदेवांच्या म्हणण्याप्रमाणे दक्षिणेतील लोकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मनात रावणाविरुद्ध लढण्याची मानसिकता तयार करायला हवी.हे कार्य राम करू शकेल.पण महाराज रामाला दंडकारण्यात पाठवायला कधीच तयार होणार नाहीत.

गुरुदेव महालात  परत आले आणि म्हणाले, "नीट विचार कर कैकेयी.राज्याचे धर्माचे रक्षण तुझ्यामुळे होणार आहे.मला माहित आहे की यात तुझी निंदा अपकिर्ती आहे पण लक्षात ठेव, मंदिराच्या कळसाचे वैभव पायात गाडलेल्या चिऱ्यामुळेच अबाधित राहते. पण त्या चिऱ्याला मात्र लोकांच्या पायांचा प्रसाद मिळतो. पण त्या काळासाठी चिऱ्याला ते सहन करावेच लागते.नीट विचार कर! आणि ते निघून गेले.

काय विचार करू मी? ममता आणि कर्तव्य ह्या कात्रीच्या दोन पात्यात अडकले होते मी. शेवटी ममता हरली.क्षत्रिय आहे मी! धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण करणे हे कर्तव्य पार पाडायला हवेच.त्यामुळेच रामाचा पराक्रम जगाला समजेल, त्याच्या हातून हे होणार आहे.

कैकेयी - क्रोधागारात
(by Ramachandra Madhwa Mahishi,
Illustrated by Balasaheb Pandit Pant Pratinidhi )
मी क्रोधागरात गेल्याची बातमी महाराजांना समजली आणि ते लगबगीने आले. इतक्या आनंदाच्या प्रसंगी मी रुसू नये म्हणून विनवू लागले.आणि काय हवे ते माग असे म्हणाले. मी त्यांना माझ्या दोन वरांची आठवण करून दिली आणि त्यांची आता पूर्ती करायाची वेळ आली असल्याचे सांगितले. महाराजांनी मान्य केले.पहिल्या वरात मी भरताला गादीवर बसवण्याची मागणी केली.आणि दुसऱ्या वरात रामाला १४ वर्षांसाठी वनवासात पाठवण्याची मागणी केली. महाराज हतबल झाले.पण सत्यवचनी असल्याने त्यांनी माझे हे दोन्ही वर मान्य केले. अतीव दुःख झाल्याने ते बेशुद्ध पडले. इतक्यात सालंकृत राम महाराजांच्या पाय पाडायला आला. त्याला सर्व प्रकार कळाल्यावर वल्कले परिधान करून तो वनवासात जायला निघाला. त्याच्याबरोबर सीता लक्ष्मण देखील वनवासात निघाले. सर्व योध्यावासी त्यांना सोडायला वेशीपर्यंत गेले आणि इकडे दुखःरितेकाने महाराजांनी प्राण सोडला.

सर्व जनतेला क्षोभ झाला.भरतही माझ्याशी अवाक्षरही बोलता ताड ताड  रामाला आणायला निघून गेला. रामाने त्याची समजूत घालून त्याला परत पाठवले आणि भरत रामाच्या पादुका घेऊन आला त्याने पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार करायला सुरुवात केली.

पुढची कथा सर्वश्रुत आहे.वनवासात चित्रकूट पर्वतावर मग रामाला अत्री, भारद्वाज वगैरे ऋषी भेटले. दंडकारण्यात खर, दूषण वगैरे राक्षसांनी मांडलेला उच्छाद त्यांनी सांगितला रामाला पंचवटीत जायला सांगितले.तेथे जाऊन, राहून रामाने परिस्थिती प्रत्यक्ष पहिली. तेथील लोकांशी  ऋषींशी संवाद साधला सर्वांना अभय दिले. भिल्ल, कोळी, वानर वगैरे मूळ आदिवासी लोकांशी त्याचे सख्य जमले. हळूहळू त्या लोकांचे जीवन पूर्वस्थिती वर येऊ लागले. यज्ञयाग इतर ठिकाणी त्रास देणाऱ्या राक्षसांना राम - लक्ष्मण शासन करू लागले. आपल्या राक्षसांवर वचक बसवणारा हा कोण मानव आहे हे पाहण्यासाठी रावणाची भगिनी शूर्पणखा त्याच्याकडे आली आणि रामाला पाहून तीच मोहित झाली त्याने आपल्याशी लग्न करावे अशी इच्छा व्यक्त केली. रामाने तिला लक्ष्मणाकडे पाठवले. त्याने तिचे कान, नाक कापले. अपमानित शूर्पणखा आपल्या भावाकडे गेली. तिखट मीठ लावून सर्व प्रकार त्याला सांगितला सीतेच्या सौंदर्याचे वर्णन केले.रावणाच्या मनात सीतेविषयी अभिलाषा उत्पन्न झाली. मायावी मारीच हरणाचे रूप घेऊन  दंडकारण्यात गेला. सीतेला त्याचा मोह पडला रामाला तिने त्याची शिकार करायला पाठवले. त्याच्या मदतीसाठी लक्ष्मणही गेला.सीता कुटीत एकटी आहे हे पाहून साधुवेधारी रावणाने सीतेचे अपहरण केले.

हेरांकडून तसेच गुरुदेवांकडून मला ह्या बातम्या समजत होत्या. सीतेच्या सुटकेसाठी त्याने रावणाशी युद्ध पुकारले. किष्किंधा नगरीचा राजा सुग्रीव तसेच जांबुवंत इतर एतद्देशिय लोकांचे रामाला सहाय्य मिळाले. सहा महिने घनघोर युद्ध सुरू होते. अखेर रावणाचा वध करून रामाने युद्ध जिंकले. रावणाचा भाऊ बिभीषण यास लंकेच्या गादीवर बसवले.

राम, सीता लक्ष्मण त्यांच्या अनुयायांना घेऊन योध्येत येत होता.आज तो राजवड्यावर येणार आहे. येईल का तो माझ्याकडे? की भरताप्रमाणे तोही....?

(c) https://www.ishtadevata.com/blog/wp-content/uploads/
2015/10/Rama-returns-to-AyBBBodhya.jpg
महालाच्या दाराशी पाऊले वाजली. भरताला हाताने धरून राम हसत हसत महालात प्रवेश करीत होता.माझ्या पाया पडून राम म्हणाला, " माते, तुझा राम भरताला घेऊन वंदन करायला आला आहे, आशीर्वाद दे."  त्याला जवळ घेऊन त्याच्या मस्तकाचे अवघ्रा केले. किती आनंद झाला मला! वाटले चौदा वर्षांचे हे दुःस्वप्न पडले होते मला! राम भरताची समजूत घालत होता."  मातेवर रागावू नकोस, तिच्यामुळेच मला बलाढ्य रावणावर  वेळीच विजय मिळवता आला, नाहीतर उत्तरेतही त्याचेच राज्य झाले असते. तसेच दक्षिणेतील लोकही आता आपलेच झाले आहेत. असे म्हणून राम पुन्हा माझ्याकडे पाहून हसला. आत्ता समजले तेव्हा राम का हसला होता ते! म्हणजे, हा सर्व त्याचाच बेत होता तर! धन्य आहेस रामा आणि अजाणतेपणी तुला साथ देणारी मी ही धन्यच म्हणायची की!!
मीनाक्षी टोणगांवकर


2 comments: