बॉम्बे हलवा/माहीम हलवा


उन्हाळा सुरू झाला की वाळवणाचे वेध लागतात. पापड, चिकवड्याकुरडया,सांडगे करायचा प्लॅन करते मी बऱ्याचदा. पण थोडं ऊन वाढलं की पल्याइथे बंगलोरला पावसाची चिन्हं दिसायला लागतात. 
एक वर्षी तर मी पाच किलो गव्हाचा चीक बनवला होता. पण ऊन्हाच्या अभावाने कुरडया न करता थोडा चीक मी मैत्रिणींना दिला आणि थोडा सावलीत वाळवून खीर बनवण्यासाठी ठेवुन दिला. त्यामुळे तो काही घाट मी आता इच्छा असून घालत नाही. 
पण अशीच चीक खायची इच्छा झाली होती, म्हणून गहू घातले होते भिजत तीन दिवसांपासून. आज त्याचा चीक काढला. थोडा तसाच कुरडयांसाठी उकडतो, तसा उकडून मस्त तूप तिखट घालून खाल्ला एकदम वाटी चाटून पुसून!!

पण मुलाला काही फारशी अशी चव आवडत नाही. खा ,खा, म्हणून मागे लागून आणि पौष्टिकपणाचे गोडवे गाऊन, बरंच समजावून झालं पण काही उपयोग होईना. 
त्याच्या पोटात हा पौष्टिक पदार्थ कसा जाईल अशा विचारात होते. "खीर करावी का? की त्याला साखर घालून देऊ? " तेवढ्यात आईचा फोन आला, नातवाला परीक्षेसाठी बेस्ट लक द्यायला. नेहमीप्रमाणे लगेच मी तिला माझी काळजी बोलून दाखवली. तिच्याकडे एकवीस अपेक्षित गाईड सारखी असतातच उत्तरं तयार माझ्या कुठल्याही प्रश्नांना!
आईने सांगितले, ह्या चीकाच्या वड्या, माहीम हलवा /बॉम्बे हलवा कर चितळेंकडे मिळतो ना तसा. मग बघ कसा चट्टामट्टा करून संपवेल ते.

माझी तर एकदम ट्यूबच पेटली. मनात आले हे नक्की खाणारच तो. त्यात संकष्टीही होती. म्हटलं बाप्पालाही सारखे मोदक खाऊन कंटाळा येत असेल नाही का! तर त्यालाही जरा व्हरायटी होईल नैवेद्यात! मग काय, लगेचच तयारीला लागले...

आईने सांगितल्या प्रमाणे एक वाटी साखरेचा साधारण एकतारीच्या अलीकडचा पाक केला त्यात गव्हाचा अर्धी वाटी चीक, आणि चमचाभर तूप घालून गॅस मंद ठेवून एकसारखं मिश्रण हलवत राहिले. चीक घट्ट होत आल्यावर त्यात केशरी रंग, रोझ इसेन्स, सुक्यामेव्याचे काप घातले. मिश्रण चांगलं एकजीव होऊन, कढईपासून सुटून येईपर्यंत चीक चमच्याने हलवत राहिले. छान गोळा झाल्यावर तूप लावलेल्या ताटात तो गोळा ओतून एकसारखा थापून गार झाल्यावर वड्या पाडल्या.


आता दुसऱ्या पद्धतीचा...

दीड वाटी दूध, एक वाटी चीक, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी साखर सगळं छान एकजीव करून कढई मंद गॅसवर ठेवून हे मिश्रण एकसारखं चमच्याने ढवळत राहिले. वरीलप्रमाणेच छान गोळा तयार होत आल्यावर त्यात वेलदोडापूड, सुक्यामेव्याचे काप घालून, मिश्रण एकजीव होईपर्यंत चमच्याने हलवत राहिले. 
त्यात गाठी होता कामा नये असं एकजीव व्हायला हवं. तो गोळा अल्युमिनियम फॉईल वर घालून त्यावर केशराच्या काड्या घालून वरून परत दुसरी फॉईल त्यावर घालून, लाटण्याने मिश्रण गरम असतानाच अगदी पातळ होईल असे लाटून घेतले. व्यवस्थित गार झाल्यावर आयताकृती काप केले झाला तयार माहीम हलवा, बॉम्बे हलवा!!

असा कलरफुल हलवा पाहून मुलानेच बाप्पाला पटकन नैवेद्य दाखवला आणि काहीही आढेवेढे न घेता मस्तपैकी गट्टम पण केला.

माझ्या एकवीस अपेक्षितच्या गाईडच्या उत्तराचे शंभर पैकी शंभर गुण ही मिळाले. परत एकदा मी मनोमन सरस्वती,अन्नपूर्णारुपी माझ्या आईला नमस्कार केला आणि देव्हाऱ्याजवळ जाऊन नमस्कार करायला वाकले, समईच्या उजेडात पाहते तर काय बाप्पाही माझ्याकडे पाहून गालातल्या गालात हसत होता!

गणपती बाप्पा मोरया!

© सौ. श्वेता अनुप साठये


1 comment:

  1. मला जमला..धन्यवाद मला हवीच होती रेसिपी... लगेच करुन बघितला..

    ReplyDelete