जगातील सर्व देशा-धर्मांच्या सीमा
ओलांडलेला, अतिगरीब व्यक्तीपासून
अतिश्रीमंत व्यक्तीपर्यंत सर्वांची झोप उडवणारा, कोरोना नावाचा एवढासा विषाणू खरं तर आपला गुरू
बनून आलाय!! त्याने सगळ्यांची झोप उडवली आहे खरी, पण तरीही झोपेचं सोंगच घेऊन बसलो असलो तर आपण जागे होणार का, हाच प्रश्न आहे. ‘कोरोना’ - शाप की वरदान? - असा निबंध लिहायचा झाला तर दोन्ही बाजूंनी बराच विचार होईल. या लेखात त्याला वरदान मानून, त्याला गुरू मानून, त्याच्याविषयी कृतज्ञता
व्यक्त करण्याचा प्रयत्न आहे.
फक्त करिअर, पैसा यांच्या मागे धावणाऱ्या आंधळ्यांच्या
शर्यतीत सहभागी होणं हे सर्वस्व नाही तर घरच्या
माणसांना योग्य प्रकारे वेळ देणं आणि आपल्याच घरातली कामं करून घर व्यवस्थित ठेवणं यात एक आगळं समाधान व प्रसन्नता आहे हे कळतंय.
मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटता येत नाहीये. पण कोणाला तरी भेटण्यावर आपला आनंद आपण अवलंबून ठेवावा का? तरी प्रचंड प्रमाणावर सोशल मीडिया उपलब्ध आहे. तो आपण वापरतही आहोत. मग प्रत्यक्ष न भेटताही आनंद मिळवता येईलच की !
कदाचित जरा जास्त वेळ लागेल, पण कधीतरी यातून जग बाहेर पडेल,
पुन्हा पहिल्यासारखे दिवस नक्की येतील, जग कात टाकून
नव्याने जन्म घेईल, हा
पक्का विश्वास आपल्या मनात आपण बाळगून राहणं हे
फार महत्त्वाचं आहे! तोपर्यंत सगळ्यांनी धीराने घेऊ. संशोधक व शास्त्रज्ञ युद्धपातळीवर काम करत आहेत. त्यांना लागत असलेल्या शोधांमधून नक्कीच उपाय सापडतील. कोणी यज्ञ, अनुष्ठाने,
स्तोत्र-मंत्रपठण करताहेत. त्यांतून काय
होणार अशी टीका न करता, ज्याला जे हवं ते करू द्यावं; ज्याची-त्याची श्रद्धा असं म्हणून आपण शांत राहावं. जैविक युद्ध आहे की खरी महामारी ही चर्चा करून तरी काय साधणार?
हा एक प्रकारचा प्रलयच आहे! एक एवढासा विषाणू प्रलयंकारी बनून येतो आणि थैमान उडवून देतो. कशामुळे घडलं हे? खरं तर ही महामारी निर्माण होण्याचं कारण आपण
अनेकानेक वर्षं महामूर प्रमाणात अत्यंत बेफिकीरपणे
केलेला निसर्गाचा ऱ्हास!! त्या निसर्गशक्तीचं फार फार
देणं आपण लागत आहोत. त्यामुळे त्या निसर्गशक्तीने एकच
जोरदार तडाखा असा दिलाय, की आपले नसते अहंकार सोडून आपल्याला तिच्यापुढे नमतं घ्यावंच लागलं आहे. आता
तरी शिकणार नि शहाणे होणार का आपण?
सामाजिक स्तरावर कोरोना आपल्याला काय
शिकवतोय?
वाहनं तुरळक असल्याने धूळ आणि सर्व प्रकारचं प्रदूषण यांचं प्रमाण लक्षणीय कमी होऊन ओझोनचा थर सुधारला आहे. प्राणी, पक्षी यांना पुन्हा स्वातंत्र्य मिळालं आहे. वातावरणातली
शांतता हवीशी वाटते आहे. निसर्गातले हे ठळक दृश्य
परिणाम आहेत.
स्वच्छतेचं महत्त्व आपल्याला कळत आहे. वारंवार हात धुण्याच्या, आणि शिंकताना,
खोकताना घेण्याच्या काळजीच्या सवयी लागत
आहेत. शासकीय आदेश गांभीर्याने पाळायचे असतात कारण तेच सामाजिक हिताचं असतं, हे काही जणांना
कळत आहे. बाकी बेफिकीर लोकांनाही हे कधीतरी कळेल अशी अपेक्षा आहे.
अत्यावश्यक
सेवा अव्याहतपणे पुरवणाऱ्या लोकांविषयी म्हणजे - डॉक्टर्स,
नर्सेस, पॅरामेडिकल कर्मचारी, पोलीस, सर्व स्तरांवरचे शासकीय कर्मचारी,
स्वच्छता कर्मचारी, बँक कर्मचारी,
विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी - या
सर्वांविषयी कृतज्ञता बाळगावी हे शिकत आहोत. अनेकानेक
स्वयंसेवी संस्था खेड्यापाड्यांत आणि शहरांमध्येही सर्वदूर
अनेक प्रकारच्या सेवा पुरवण्यासाठी झटत आहेत. वरील सर्व
मंडळी बहुसंख्य नागरिकांसाठी मोठा धोका पत्करून आणि
स्वतःच्या घरापासून दूर राहून काम करत आहेत, याची जाणीव आपण ठेवत आहोत.
पण पुढे जाऊन असंही घडेल का?
वरील सगळ्या गोष्टी आपण आयुष्यभर सातत्याने करत राहू का? रस्त्यावर कधीच कोणी थुंकणार नाही असं होईल का? नोटा मोजताना किंवा कागद उलटताना त्यांना थुंकी
लावणार नाही असं होईल का? गरज नसताना कोणी एकमेकांना
स्पर्श करणार नाही; आणि त्यामुळे वेडेवाकडे स्पर्शही
थांबतील का? नीट रांगेत उभं राहून कामं करण्याची सवय नेहमीसाठी लागेल का? अनेक ठिकाणी उडणारी झुंबड
कमी होईल का? वाट पाहण्याची, सहनशीलतेची
सवय लागेल का? वाहतुकीचे नियमही आपण पाळू लागू का? की पुन्हा आपल्या मूळ स्वभावाला जागून बेशिस्तीचा
कारभार सुरू करू? आत्ताच्या काळात डॉक्टर मंडळींनी केलेल्या
अखंड सेवेमुळे आणि आता सरकारने केलेल्या कायद्यामुळे
तरी त्यांच्यावर होणारे
अनाठायी हल्ले थांबतील का?
कौटुंबिक स्तरावर कोरोना गुरू आपल्याला
काय शिकवतोय?
२१ दिवस घरात राहायचं म्हणून खूप लोकांनी अधिक प्रमाणात पदार्थांची, अन्नधान्याची
साठवणूक केली. पण खरं तर आपल्या गरजाही फारच कमी आहेत, हे आपल्या लक्षात येतंय. केवळ जीवनावश्यक कशाला
म्हणायचं हे समजतंय. गरजा कमी कशा करायच्या हेही कळतंय. वस्तू आणि पदार्थ तोलूनमापून व काटकसरीने (चिक्कूपणाने नव्हे हं) कसे वापरायचे हेही कळतंय. आपल्यापैकी अनेकांना सहज पैसे खर्च करून, महाग
असलेला भाजीपाला घेऊनही, अशी साठवण करणं
शक्य होतं, पण ज्यांचं
हातावरचं पोट आहे त्या अनेकांचं काय, असा प्रश्न मनात
निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यांच्याकडे अनेक गोष्टींचं दुर्भिक्ष्य असेल, हे सतत लक्षात ठेवू म्हणजे काही वाया
जाणार नाही ही काळजी घेतली जाईल. एखादे वेळी आपल्याकडची
एखादी वस्तू संपली तर त्याशिवाय राहण्याची तयारी ठेवू
या. रामचंद्रांना किंवा पांडवांना वनवासात काय खायला मिळालं असेल? सावरकर,
टिळक वर्षानुवर्षं तुरुंगात कसे राहिले असतील? आणि काय खायला मिळालं असेल त्यांना? संभाजी महाराज
औरंगजेबाच्या कैदेत कसे राहिले असतील? आपण या सगळ्यांची
आठवण केली तर हे काही दिवस स्थानबद्ध राहणं काहीही कठीण
नाही. या सर्वांच्या तुलनेत आपल्याला अनंत सुविधा घरात उपलब्ध आहेत आणि शासनही
उपलब्ध करून देत आहे. मग कुरकुर का करावी?
घरात राहण्याचे साइड इफेक्टस
सतत घरात एकत्र राहण्यामुळे, कदाचित आपण आपल्या कुटुंबियांना वेगळ्या प्रकारे ओळखू लागू. बहुधा जरा जास्त
प्रेमाने वागू लागू. आपल्याला एकमेकांची किंमत कळेल. अधिक सहकार्याने कामं करू लागू. आपला व्यक्तिगत
किंवा सामूहिक वेळ अधिक चांगल्या पद्धतीने (quality
time) कसा व्यतीत करायचा याचा विचार आपोआपच करू लागू. अनेकांची प्रतिभा फुलू लागली आहे, जुने छंद
जागे होत आहेत. ही किती चांगली गोष्ट आहे!
आपल्या कामवाल्यांचीही किंमत आपल्याला
कळेल. इतक्या घरी कामं करून त्या किती दमत असतील ते कळेल. आणि त्यांना सर्व कामांसाठी गृहीत धरणं थांबेल. श्रमांचं मूल्य कळेल. श्रम केल्यामुळे तब्येत चांगली राहायला मदत होते हेही कळेल. आपल्यालाच भांडी घासायची आहेत हे लक्षात आल्यामुळे एरवीपेक्षा कमी भांडी वापरून काम करता येईल.
कदाचित पुरुष मंडळी घरकामाला जास्त
हातभार लावू लागतील. त्यांना गृहिणींची
किंमत अधिक कळू लागेल. घरात असल्यामुळे मुलांना विविध
जीवनकौशल्यं शिकवण्याची संधी आईवडिलांना मिळू शकेल. घरात आजी-आजोबा असतील तर कदाचित त्यांच्या सहवासाचा काही फायदा नातवंडांना मिळेल. त्यांच्याकडून काही चांगलं पाठांतर शिकण्याची संधी घेता येईल.
आजी-आजोबांची काळजी आईबाबा कशी घेतात तेही पाहायला
मिळेल.
घरातल्या सगळ्या कामांसाठीही बरीच
बुद्धिमत्ता लागते आणि हातासरशी कामं
करण्यामुळे आपली लांबणारी कामं कमी करता येतात हे
लक्षात येईल. छोट्या छोट्या कामांत नीट सावधता ठेवून
काम केलं तर पुढचे कष्ट वाचतात हेही लक्षात येईल. (उदाहरणार्थ कपडे नीट झटकून वाळत टाकले तर त्यांना
सुरकुत्या कमी पडतात व घड्या नीट घालता येतात नि
इस्त्रीही वाचते.)
बहुधा यापुढे आपण एकमेकांचं उष्टं खाणार
नाही. एकमेकांचे कपडे वापरणार नाही. एकमेकांचं अंथरूण-पांघरूण-उशी वापरणार नाही. बाहेरून आल्यावर हात-पाय-तोंड
धुण्याचे काम न विसरता आवर्जून करू. घरातली सगळी कामं न कंटाळता करू. ती आपण करू
शकतो यावर आपला विश्वास बसल्यामुळे, ती करताना मनाने
दमणारही नाही. पण पुन्हा हा प्रश्न आहेच, की यांतले सगळे नाही पण निदान काही बदल तरी कायमस्वरूपी
घडतील का?
व्यक्तिगत स्तरावर कोरोना गुरू आपल्याला
काय शिकवतोय?
कौटुंबिक स्तरावर जीवनावश्यक गरजा काय हे
जसं कळतंय तसंच व्यक्तिगत गरजाही
किती कमी असतात हेही कळतंय. कपडे
किंवा अन्य वस्तूही खूप कमी लागतात हे कळतंय. त्यामुळे
हौस म्हणून भारंभार कपडे, दागिने किंवा
अन्य वस्तूंची अनावश्यक खरेदी थांबतेय. हॉटेलिंग, सिनेमा,
चैनीचे प्रवास, शॉपिंग मॉल्स, पार्ट्या या सगळ्या गोष्टींशिवाय आपल्याला
राहता येतं हेही कळतंय.
मित्रमंडळींना, नातेवाईकांना भेटता येत नाहीये. पण कोणाला तरी भेटण्यावर आपला आनंद आपण अवलंबून ठेवावा का? तरी प्रचंड प्रमाणावर सोशल मीडिया उपलब्ध आहे. तो आपण वापरतही आहोत. मग प्रत्यक्ष न भेटताही आनंद मिळवता येईलच की !
आपलं चिंतन काय आहे?
इतके दिवस घरात राहताना - चरफडत, शासनाला शिव्या घालत, काय मेलं वाट्याला आलं असं म्हणत राहत आहोत, की
याकडे एक शिकण्याची संधी म्हणून सकारात्मक दृष्टीने बघत
आहोत?
मनात अनाठायी भीती न बाळगणं, किंवा काळजी न करणं, तर योग्य
ती काळजी घेणं एवढंच करायचं आहे. जे चिंतन आपण करतो तेच आपण आपल्याकडे आकर्षित करतो.
रिक्षापासून विमानापर्यंत सगळी सार्वजनिक वाहनं बंद आहेत असं पहिल्यांदाच घडलंय. सोनं
गडगडलंय, स्टॉक मार्केट गडगडलंय, अनेक क्षेत्रांत मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय, हे सगळं खरंच ! पण
म्हणून आपण कशाला गडगडायचं? ‘नाही रे’ वर्गाकडे पाहिल्यावर आपल्या लक्षात येतं, की
तुलनेनं आपल्याकडे खूपच बेगमी केलेली आहे !! त्या वर्गाविषयी अधिक संवेदनशील राहणं व आपल्याला जमेल ती मदत करत राहणंच योग्य.
आत वळू या!
आणि बाहेरचे स्टॉक गडगडले म्हणून काय
झालं?आपल्या आतला स्टॉक आहेच की ! तो तर कोणी चोरून नेऊ शकत नाही.
जगभरातली तत्त्वज्ञ नि संतमडळी आनंदाचा बाजार मांडून
बसली आहेत. त्यांचा हात धरून चाललं म्हणजे तो आतला स्टॉक सापडायला मदत होते.
या निमित्ताने आपल्याला अंतर्मुख
होण्याची संधी आहे.
मनाच्या स्वच्छतेची सवय लावून घेऊ या. अगदी पूर्ण झाडून सगळ्या प्रकारची जळमटं काढून टाकू
या. जगभर मृत्यूचं थैमान चालू
आहे. आपणही मरणाचं स्मरण ठेवून राहिलो
तर आपोआपच सर्वांशी चांगले वागू लागतो असं संतमंडळी सांगतात. सर्वांविषयीची
मनातली किल्मिषं काढून टाकू. क्षमा
करू आणि क्षमा मागूही! कोणाविषयी आपलं मन
मलिन झालं असेल, नि आपण अबोला धरून बसलो असलो तर सोडून
देऊ. निसर्गशक्तीपुढे आपण किती साधारण आहोत हे आपल्या
लक्षात आलं आहे. त्याचं नित्य स्मरण राहिलं म्हणजे किरकोळ अहंकारांमधून बाहेर पडता येईल. आपण नक्की कशासाठी जगतो आहोत, याचा विचार करू.
अलीकडे सगळ्या बाबतींत ग्लोबल थिंकिंग
करतात. आपल्या आतमध्येही एक ग्लोब आहे- (जुनी मंडळी दिव्याला ग्लोब म्हणत). तो आतला ग्लोब म्हणजे ‘आत्मदिवा’ प्रकाशित करण्याच्या मार्गावर चालायला या
निमित्ताने सुरुवात करता येईल. बाह्यमुखी मनाला
अंतर्मुखी करता आलं, तर सगळ्या प्रकारचं भयही पळून
जातं. करू या हा प्रयत्न आणि सगळ्यांच्या कल्याणासाठी प्रार्थनाही!
Well written and covered most of the points. Aatma diva very nice concept. I just want to say as to who we are, to take care of Earth, she is taking care of herself. Hopefully habits will change positively.
ReplyDelete