चाळीशीची मिस्ट्री

५-६ वर्षांपूर्वीची गोष्ट. उन्हाळ्यातील एका संध्याकाळी आम्ही ६-७ समविचारी लोकांचा जेवायला जाण्याचा बेत ठरला. त्यामध्ये जेवणापेक्षा गप्पा  करणे हा हेतू मुख्य होता. त्यात आम्ही २-३ पस्तिशीचे आणि बाकी चाळीशी ओलांडलेले होते. ग्रुप मधले सर्व उच्च विद्याविभूषित. देश विदेश फिरलेलेउच्च पदांवर नोकरी केलेले!! सगळ्यांना खाण्यात आणि बोलण्यात जास्त रुची असल्यामुळे तोंडी लावायला जगातील कुठलाही विषय वर्ज्य नव्हता.

अनेक विषयांचा चोथा करून झाल्यावर, का कोणास ठाऊक गाडी चाळीशीवर घसरली. वयोगट ४४-४५ असणारे अधिकारवाणीने पस्तिशीच्या लोकांना सांगू लागले "बाबांनोसांभाळून. चाळीशी जवळ येते आहे. हे जरा वेगळंच प्रकरण आहे. प्रत्येक बाबतीत जाणीव होते की चाळीशी ओलांडली म्हणून." आम्हा ३५ च्या लोकांना अनुभव नसल्यामुळे आम्ही विचारायचा प्रयत्न केला की वेगळं म्हणजे नक्की काय आणि इतका फरक का पडावा पण कुठल्याही विषयाचे विश्लेषण करू शकणारे, हे मित्र याविषयी मात्र काही सांगू शकेनात. शेवटी असे ठरले, की पस्तिशीचे लोक जेव्हा चाळीशीत प्रवेश करतील तेव्हा त्यांनी त्यांची कारणे शोधून घ्यावीत. विषय तिथेच संपला पण चाळीशीबद्दल एक अनामिक उत्सुकता निर्माण करूनच.

पण व्यक्तिगतरीत्या खरं सांगायचं, तर चाळीशी केव्हा येऊन गेली ते एकदम समजलेच नाही. नोकरीसंसार सांभाळून कन्येच्या जपलेल्या आवडीनिवडी व त्यासाठीचे क्लासेसइंडस्ट्रीतून शिक्षणक्षेत्रात नोकरी म्हणून उशिरा प्रवेश केल्यामुळे अपरिहार्य असे पेलावे लागणारे PhD चे शिवधनुष्यत्यातच धाकट्या चिरंजीवांची झालेली एन्ट्री आणि मोठी कन्या शांत असल्याने धाकट्याने तयार केलेला त्याच्या बंडखोरीचा धाकह्या सर्व धामधुमीत चाळीशी केव्हा ओलांडली ते जरी वाढदिवसाच्या दिवशी समजलें तरी अजून एक वर्ष उमगलेच नाही.

गंमत म्हणजे ह्याच दरम्यान शाळामित्रांच्या Whats App ग्रुपवर चाळीशी संबंधित पोस्ट्स यायला लागले. त्यात "Forty is new thirty !", "चाळीशी म्हणजे नवी सुरुवात", "चाळीशी म्हणजे जीवनाचा (!) आढावा घेण्याची वेळ" इत्यादी. (आता हे मेसेजेस पाठवणाऱ्या लोकांना कसे समजले की आम्ही चाळीशी गाठली?). हे सर्व लिखाण वाचायला चांगले वाटत असले तरीही जीवनाकडे नवीन नजरेने बघायचे म्हणजे नक्की कुठे आणि कसे बघायचेकिंवा नवीन सुरुवात करा म्हणजे आता जे काही आहे आणि जे काही सुरु आहेत्याचे काय लोणचे घालायचेहे काही कळेना. त्यामुळे विचारांची नुसती दंगल झालेली.

शा मानसिक आणि वैचारिक गोंधळाच्या (मराठीत "लोच्या") परिस्थितीत एका मित्राने व.पुं. ची काही वाक्ये उचलून ग्रुपवर टाकली आणि बऱ्याच जणांना (अस्मादिकांना धरून) आपण चाळीशीत काय करतोय आणि काय करायला पाहिजे हे एकमेकांना सांगायची इच्छा होऊ लागली. काही जणांच्या मते चाळीशी हे आढावा घेणारे वय असल्यामुळे मागचा अदमास घेऊन पुढची पाऊले ठरवायची. किती इच्छाआकांक्षा पूर्ण झाल्याकिती व्हायच्या आहेत याचे नफा-तोट्याचे गणित मांडून पुढची मोहीम आखायची. तर काही जणांच्या मते "आहे मनोहर तरी गमते उदास" अशी परिस्थिती नक्की कोणत्या कारणामुळे आहेआणि ह्या अपूर्णतेला पूर्णत्वाकडे कसे नेता येईल (म्हणजे नक्की काय राजे हो?), याचे चिंतन (!) करण्याची वेळ. (तसेही सोशल मीडिया आल्यापासून चिंतन वगैरे करण्याच्या भानगडीत कोणी पडत असेल असे वाटत नाहीअसो.) तर अजून काहींच्या मतेआपलं सर्व छान सुरु आहेआपण आनंदी आहोतआनंदाने जगू याजगाला आनंद देऊ याआला दिवस आनंदाने घालवू या असे समजायला सोप्पे पण वागायला महाकठीण धोरण उत्तम राहीलअसे त्यांचे म्हणणे.
आता हे सर्व आपापल्या जागी बरोबर असले तरीही हे सर्व विचार ४० ह्या आकड्याच्या आसपासच का यावेतहा प्रश्न उरतोच आणि ही "चाळीशीची मिस्ट्री" आताच का लक्षात यावीहा ही लाखमोलाचा प्रश्न आहेच.

कदाचित एक कारण असे असावे की वय वर्षे चाळीस हा अंदाजपंचे संपूर्ण आयुष्याचा तसेच कार्यायुष्याचा (working life ) चा मध्य-बिंदू. हा मध्य ओलांडला की आपण जातो on the wrong side of the curve ! त्यामुळे कदाचित वयाच्या (आणि तारुण्याच्या) शिखरावर पोहोचून आता उतरणीला लागतोय (लागावं लागतंय !) ही चुटपुट जन्म घेते आणि व्हायोलिनचे स्वर मनात रुतून बसावे तशी रुतून बसते. शारीरिकदृष्ट्या देखील स्वतःकडे लक्ष देण्याचा हा काळकारण काहीतरी दुखणे-खुपणे सुरु झालेले असते. त्यामुळे हा मध्य गाठल्यावर आपण काय मिळवले आणि काय गमावले याची आकडेमोड सुरु होते. एकप्रकारे चाळीशीत "वेळ" (the Timeless Time ) आपण असल्याची” (आणि हातातून सुटण्याची) जाणीव करून देत असतो.

गंमत अशी की सर्वसाधारण संसारी माणसांच्या आयुष्यात चाळिशीतच अनेक दोरखंड बांधलेले असतात आणि नवीन आखणी करण्यासाठी ह्या सर्व बंधनांतून (constraints) मार्ग शोधायचा असतो. मुलं कुमारवयात आलेलीत्यांचे रागरंग/आवडीनिवडी सांभाळून पालक असण्याचे कर्तव्य पार पाडायचे. आपले स्वतःचे आई-वडील आता सत्तरीत आलेलेत्यामळे जवळ असो वा नसोपण त्यांच्या तब्येतीच्या कुरबुरी हाताळतांना करावी लागणारी धावपळ (आणि दूर असलात तर कसरत’), ही सर्व समीकरणे मनात सुप्तपणे दडलेली असतात.

वाढू लागलेले वय लपवण्याचा अट्टाहासही वाढलेला. तसेच गप्पा मारत आणि टीवी पाहत उत्तररात्रीपर्यंत केलेली जाग्रणे आता सहन होत नाहीत (आणि केली तरी दुसऱ्या दिवशी सकाळी १०-१२ वाजता उठण्याची मुभा तुम्हाला कोणी देत नाहीत.) आता ह्या सर्व बंधंनांतून नवीन आखणी करणे आणि नवीन आयुष्य जगणे कर्मकठीण. (टीप - ह्या साऱ्यात लग्न न केलेल्या लोकांची गोष्ट वेगळी. त्यामुळेच साठीचे मोदीजी युवा-नेते असताततर चाळीशीचे नेते बालिश गणले जाऊ शकतात. )

बरंजे सुरु आहे तेच तसेच सुरु ठेवावे म्हटले तर एकसूरीपणाचा जाच (tyranny of monotony). तेच ते आयुष्य दरररोज जगण्याने त्यातील मजाच निघून गेलेली. जे मिळवलं त्याचं कौतुक संपलेलंजे गमावलं त्याची फक्त जाणीव आणि जे मिळवू शकतो त्याची अनिश्चिततता. ह्यातूनच एका अपूर्णतेचा जन्म होतो. पूर्णत्वाकडे तर जायचंयपण पूर्णत्व म्हणजे नक्की काय ते माहीत नाही आणि कसं जायचं तेही माहीत नाही. मग कुठे लक्षात येतं की सिनियर लोकांनी सांगितलेले मध्यायुष्यातील संकट म्हणजेच चाळीशीची मिस्ट्री!
थोडा विचार केला तर ह्या मध्यजीवन संकटाला सामोरे जाण्याचे दोन मार्ग दिसतात. एक म्हणजे स्वतःहून आपल्याच जीवनाची दिशा बदलून एक खळबळ निर्माण करणे व आपल्या मागचा खटाटोप वाढविणे. त्यात नोकरी बदलणेसामाजिक बांधिलकी वाढवणे, "काहीतरी वेगळं" करण्याचा हिरीरीने प्रयत्न करणेजर ह्या नवीन गोष्टी करण्याची मनातून उर्मी असेल तर बात निराळी. नवीन खेळासाठी धावपळ, धडपड करून ते 'यश', 'समाधान', (किंवा पूर्णत्व की काय ते) मिळेलच याची काहीही शाश्वती नाही. हांपण खेळातील आनंद जरूर मिळू शकेल आणि tyranny of monotony ला हा जालीम उपाय आहे.

पण हे सर्व करायचे नसेल तर कायत्यासाठी मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने बघावे लागेल. एकंदरीतरित्या बघितले तर चाळिशीतले १० वर्षे म्हणजे प्रवाहासोबत तरंगण्याचा काळ. प्रवाहाचा जोर इतका आहे की शक्तीचा अदमास घेता कितीही हात-पाय मारले तरीही तरंगण्याशिवाय काहीच हाती लागणार नाही (पण हात-पाय मारावेच लागतीलनाहीतर बुडण्याची भीती). ही जाणीव होणे महत्वाचे. ती एकदा झाली की मग मात्र तरंगण्याची मजा यायला लागते. एकदा प्रवाहातील वेगवान पाण्यावर तरंगण्याची किमया जमली की मग प्रवाहात मध्येच येणाऱ्या अडथळ्यांची भीती वाटत नाही आणि अवेळी येणाऱ्या वादळाची पण नाही.

हे तरंगणे म्हणजे एक प्रकारची साधना आहे. बरंच काही करायचे पण काहीच न करता गुपचूप पडून राहिल्यासारखे करायचे आणि येईल ते कर्तव्य पार पाडायचे. हे वाटते तितके सोपे नाही. ही तरंगण्याची साधना म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर संगीतातील प्रत्येक स्वरावर 'थांबण्याचीकला. मग तार सप्तक असो का मंद्र असोही 'ठेहरावा'ची सतरावी जीवनकला ज्याला जमली त्याने आयुष्याची अर्धी मैफिल जिंकली. ही 'थांबायचीकलाच शारीरिक ऱ्हास थांबवतेमानसिक शक्ती अक्षय ठेवते आणि आध्यात्मिक शक्ती (किंवा आत्मबल) वाढवते. आणि एकदा जीवनप्रवाहाचा वेग कमी झाला की हीच शक्ती नवीन सृष्टी निर्माण करण्याच्या कामी येते.
एकदा हे लक्षात आले की कधीतरी हे पण ध्यानात येते की जगातील सर्व गोष्टी अपूर्ण आहेत व बाह्य गोष्टींचा (नावलौकिकपैसानाती) आधार घेऊन पूर्णत्व किंवा समाधान कधीही मिळू शकत नाही. मग कुठे अंतरंगाचा प्रवास सुरु होतो. अचानक लक्षात येतं की समाधान आपल्या आतच आहे. त्यामुळे बाहेर धावण्याची किंवा धडपड करण्याची गरज नाही. 'मोक्षकिंवा 'निर्वाणम्हणतात ते तरी ह्याहून काय वेगळे असणार ?
रवींद्र केसकर

2 comments:

  1. दैनदिन आयुष्यातले अनुभव वेगळ्या चष्म्यातून पहायला लावणारे हे लेख. सुरेखच ...

    ReplyDelete
  2. छान! चाळिशी वरील पु. लं. चा लेख आठवला! वाचला नसेल तर अवश्य वाचावा!

    ReplyDelete