चांदण भरती




चंद्र आतूर लाटांची ओली चांदणं भरती

रवी धूसर धूसर दूर क्षितिजावरती

अलवार येई सांज पंख सावळे लेऊन                                            

बट सोडता सोनसळी कृष्णघन विखुरती

डोकावी हलके सर सांज सखीच्या साथीने

तिच्या माळेतले मणी सागरात मिसळती


थेंब रुप्याचे बोलती बोली सावळ्या घनाची

शुभ्र चांदण शिडकावा गर्द निळाई वरती

पक्षी दडवी मनात गोड गुपित सांजेचे

दूर क्षितिजाच्या पार एकमेकास सांगती

वारा ऐकवी कहाणी निळ्या सावळ्या लाटांची


त्यांच्या नक्षत्र देहात लाख चंद्र झिरपती

पडे अशी चांदभूल अशा चांदण किनारी

ठसे निळ्या पावलांचे वाळूवर उमटती

चंद्र हासतो नभात लाज लाजली धरती



तिच्या मोहक खळीत त्याची ओहोटी भरती

तिच्या मोहक खळीत त्याची ओहोटी भरती

                                                    प्रेरणा चौक

4 comments:

  1. प्रेरणा खूप छान वर्णन

    ReplyDelete
  2. प्रेरणा, कविता अतिशय सुंदर व तरल भाव दर्शक आहे. असाच अविष्कार चालू ठेवावा तुझे मन:पूर्वक अभिनंदन !!!

    ReplyDelete