M.A (English) Final च्या
वर्षात श्रीमती शशी देशपांडे यांची ‘That long silence’ ही
कादंबरी अभ्यासाला लावलेली होती.या कादंबरीच्या सोळाव्या पानावर नायिका 'जया' तिच्या लहानपणी
तिने आई कडून ऐकलेली काऊ-चिऊची गोष्ट आठवताना दिसते. सध्या एका विचित्र परिस्थितीत
सापडलेली ही प्रौढ नायिका(जया) तिने पूर्वी राहुलला, तिच्या मुलाला, तो लहान असताना काऊ-चिऊची गोष्ट
सांगायचा केलेला प्रयत्न व पूर्ण न आठवलेली गोष्ट याबद्दल इथे सांगते.
गोष्टीतील काऊ जेंव्हा चिऊकडे जातो, तेंव्हा चिऊ बाळाला आंघोळ घालत
असल्याने लवकर दार उघडत नाही, एवढेच तिला आठवत असते. पुढे नक्की
काय होते? काऊ एकदाचा आत जातो की नाही? चिऊ त्याच्याशी कशी वागते? हे सुद्धा तिला
आठवत नसते. ती आईला त्याबद्दल विचारतेही. आईला सुद्धा ही गोष्ट पूर्ण आठवत
नाही. ती म्हणते "गोष्ट खूप मोठी
आहे. पूर्ण
आठवत नाही मला; पण
बहुतेक चिऊ,
काऊला चुलीजवळ तापल्या तव्यावर बसायला सांगते आणि त्या मुळे काऊ भाजून मरतो". ही अशी गोष्ट
ऐकून जया तेंव्हा ही संतापली होती, हे तिला आत्ता ही आठवते.
"अशी कशी गोष्ट?
इतकी निर्दय, अजब आणि मुलांना काहीही बोध न देणारी? लहान मुलांना कोणी अशी गोष्ट सांगतं का?" ती फणकारते. आत्ता मात्र ती त्यातून वेगळाच अर्थ
काढू पहाते. "कदांचित ही गोष्ट बरोबरच असेल; मुलांना नाही तरी हुशार मुलीना ती
बरोबर समजेल. बाहेरच्या
जगाला बाहेरच ठेवले पाहीजे नाहीतरी..." तिला वाटते.
मला मात्र ही गोष्ट खूप आवडते. आजी कडून मी ती वारंवार अगदी मोठी
होईपर्यंत ऐकलेली आहे. त्या मुळे की काय, मला ती आजही पूर्ण आठवते. आता मी ६३ वर्षांची आजी झाल्यावर तर तिच्यातील
सुंदर बोध मला खूप आवडतो; कळतो. मनात विचार येतो की किती लोकांनां ही
गोष्ट पूर्ण आठवत असेल? तिच्यातील बोध आणि ती सांगण्यामागची आई/आजीची भूमिका कितपत
कळत असेल? मग
ठरवलं, की पुन्हा
एकदा सांगावी पूर्ण गोष्ट काऊ-चिऊची.
तर काऊ आणि चिऊ हे तसे शेजारी. काऊचं घर शेणाचं, तर चिऊचं घर मेणाचं. एक दिवस काय
झालं? मोठ्ठा पाऊस आला. काऊचं
घर वाहून गेलं. चिऊचं
घर तस्सचं राहीलं. काऊ
गेला चिऊकडे. त्याने दार वाजवलं आणि हाक मारली. (त्या काळी दार वाजवत आणि हाक मारत).
"चिऊताई चिऊताई
दार उघड!"
चिऊ बाळाला आंघोळ घालत होती.
ती म्हणाली, "थांब.माझ्या
बाळाला आंघोळ घालतेय." मग हीच प्रश्र्नोत्तरे लांबतच
जातात.
"चिऊताई चिऊताई
दार उघड!"
"थांब. माझ्या
बाळांचं अंग पुसतेय."
"थांब. माझ्या बाळाला झबलं,टोपडं
घालतेय."
"थांब माझ्या बाळाला काजळं, तीटं
करतेय.
"थांब.माझ्या बाळाला दूदू पाजते. इ.इ.
मग चिऊताईने दार उघडलं.
काऊ आत आला. काऊ होता गारठलेला.(साहजिकच होतं ते.).
त्याने कुडकुडतच विचारलं, "चिऊताई चिऊताई
कुठे बसू?"
चिऊ म्हणाली, "बस जा चुलीजवळ".
चिऊला बहुतेक काऊची दयाच आली असणार.(आणि बायका असतातच दयाळू).
तर,काऊ आत गेला आणि स्वयंपाकघरात
जाऊन चुलीजवळ पाटावर बसला. चुलीवर छान छान पदार्थ (बाळासाठी खीर, मऊ भात इ.) शिजत होते. छान वास सुटला होता. काऊ शेकत
बसला. त्याला हळूहळू ऊब आली.
तिथेच चुलीजवळ चिऊने दुसऱ्या पाटावर
भिजकी डाळ पसरलेली होती. भिजकी डाळ म्हणजे चण्याची डाळ रात्री भिजत घालून (पाण्यात घातलेली) सकाळी रोवळीत
उपसून थोडी पसरून सुकवायची. त्या काळी अशा कितीतरी गोष्टी स्वयंपाकघरात दिसत.
डाळी, दाणे, वाल,
चणे इ.गोष्टी भिजत घालून उपसून पसरल्या जात, मग त्या चटण्या, कोशिंबीरी, भाज्या, उसळी यांत वापरल्या जात. तर चिऊने
भिजकी डाळ पसरलेली होती.
काऊचे लक्ष आता डाळीकडे गेले आणि
त्याची भूक जागी झाली. (बरोबरच
होतं ते.) पावसातून गारठून येऊन बसल्यावर
सकाळपासून घराशिवाय असलेल्या काऊला ऊब मिळताच आणि समोर डाळ दिसताच भुकेची आठवण
झाली. (डाळ हे
पक्ष्यांचे तसेच लहान मुलांचे आवडते खाणे असे.) काऊ भराभर डाळ खाऊ
लागला. गारठ्यातून येऊन अधाशाप्रमाणे डाळ खाल्ली की जे होतं तेच काऊचं झालं आणि त्याला शी
लागली.
काऊ होता एक नंबरचा आळशी! त्याने
तिथेच पाटावर शी केली. शिवाय
डाळ खाणे तर थांबवले नाहीच.
डाळ खाल्ली, शी केली. डाळ खाल्ली, शी केली. डाळ खाल्ली, शी केली.(माझी आजी ही
वाक्ये तालात म्हणत असे.)
सगळी डाळ काऊने संपविली आणि सगळ्या पाटभर
शी करून ठेवली.
काऊचं आता पोट भरलं होतं, ऊबही आलेली होती, शी ही झालेली होती, आणि बसायचा पाट ही घाण झालेला होता. अर्थातच त्याला बाहेर जायची घाई
झाली.
"चिऊताई जातो ग…"
असे ओरडून सांगून काऊ दार उघडून उडून गेला. चिऊताई बाळाला अंगाई म्हणत होती ती
धावतच आली आणि तिने दार बंद केलं. मग ती स्वयंपाकघरात गेली. पाहते तो काय?(इथे आजी चे डोळे अस्से
वटारून मोठे मोठे होत.) सगळा पाट काऊच्या शी ने भरलेला आणि सगळी डाळ संपलेली.
चिऊला खूऽऽप राग आला. तिच्या डोळ्यात पाणी येऊ लागले. तिने मनांत ठरवलं, निश्चय केला की काऊला चांगली अद्दल
घडवायची. त्याची खोड मोडायची. दाताखाली ओठ दाबून, डोळ्यांत प्रयत्नाने पाणी न येऊ देता चिऊने
सर्व स्वयंपाकघर साफ केले. परत डाळ भिजवली.
इकडे काऊने परत घरटे बांधले.
पहिल्याच जागी बांधले. त्याने पुन्हा शेणाचं घरटं बांधले. (बळकट, मजबूत, कायमचं टिकणारं, छान, वगैरे घर करायच्या भानगडीत काऊ
लोक बहुतेक पडत नाहीत.) चार,
दोन पावसात ते टिकलंही; पण
पुन्हा एकदा काय झालं? (बरोब्बर
ओळखलंत). मोठ्ठा पाऊस आला आणि काऊचं घरटं
वाऽऽहूऽऽन गेलं. चिऊचं घरटं तस्सचं राहीलं. काऊ गेला चिऊकडे.(आणखी कुठे जाणार?). त्याने दार वाजवलं आणि हाक मारली, "चिऊताई चिऊताई
दार उघड".
मागच्या वेळेप्रमाणेच चिऊ बाळाला
आंघोळ घालत होती. ती म्हणाली, "थांब माझ्या बाळाला आंघोळ घालतेय." मागचीच प्रश्नोत्तरे या वेळी सुद्धा
झाली (आणि थोडी ज्यास्तच लांबण लागली).
चिऊताईने काय केलं? तवा तापवून
लालभडक केला. पाटाऐवजी
तिने तवाच चुलीजवळ ठेवला; मग काऊला दार उघडलं. काऊ आत आला.मागच्या वेळेची आठवण
त्याला होतीच. (फक्त
आपण काय पराक्रम करून ठेवला होता हे त्याच्या खिजगणतीतही नव्हते.)
"चिऊताई,चिऊताई
मी चुलीजवळ बसतो".तो म्हणाला.
चिऊनेही मान डोलावली. काऊ आत गेला
आणि घाईघाईने चुलीजवळच्या तव्यावरच (पाट समजून) बसला. आता काऊ चुलीजवळ कसा बसला? हे ही लक्षात घ्यायला हवे. तो पक्ष्यासारखा दोन्ही पाय ठेवून
तव्यावर बसला नाही,तर दोन्ही पाय पुढे ठेवून बूड टेकून माणूस जसा बसेल तसा तव्यावर
बसला.(आजी हे बसणे action
करून दाखवत असे.) बसता क्षणीच काय झालं? चुर्र असा आवाज झाला आणि काऊच्या
बूडाला चांगलाच चटका बसला, त्याचं ढुंगण भाजलं.
ओय!ओय!ओय!ओय! काऊ ओरडू लागला, “चिऊताई, चिऊताई, माझी ढेरी भाजली. “चिऊताई, चिऊताई, माझी ढेरी भाजली”
काऊ ओरडतच बाहेर आला आणि दार उघडून
उडून पळून गेला.
चिऊ त्याची फजिती बघून हसत दारात उभी
राहीली. ती
म्हणाली,
"बरी खोड मोडली. पुन्हा करशील का अशी घाण?"
साधारणतः दीड-दोन वर्षांपासून (म्हणजेच काऊ-चिऊशी
गट्टी होऊन; शी,शू कळू लागण्याच्या वयापासून) ते पाच-सहा वर्षांचे मूल होईपर्यंत त्याला ही
गोष्ट आई किंवा आजीकडून ऐकायला मिळत असे. आपल्या मनाप्रमाणे वाटेल तिथे 'शी' किंवा 'शू' करायची नसते, हा संस्कार तिच्यातून केला जात असे. स्वयंपाकघर हे खाऊ देणारे, उबदार, स्वच्छ असते; तिथे घाण करून ठेवणं हे खूपच वाईट
असतं हे ही कळे. काऊसारखा बेपर्वा, घाणेरडेपणा केला तर कडक शिक्षा मिळेल
हा धाक ही मनाला लागे.
कुणाला या गोष्टीत काऊला मिळालेली
ढुंगणाला चटका देण्याची शिक्षा क्रूर वाटू शकेल; पण आपल्या मूळच्या निसर्गरम्य देशाला
ठिकठिकाणच्या काऊंनी आणलेली घाणेरडी
कळा पाहिली, आणि आज सरकार स्वतः अनेक संस्थांच्या
मदतीने स्वच्छता करण्याचा प्रयत्न करत असूनही, आपल्या देशाला स्वच्छ देश हा किताब
मिळू शकलेला नाही हे वास्तव लक्षात घेतले तर अशा प्रकारच्या शिक्षेचा धाक हा
गरजेचा वाटू लागतो.
या गोष्टीतील 'काऊ' हा पुरुष असून तो स्वच्छतेविषयी
बेपर्वा, आळशी, (चिऊताईच्या उबदार घरट्याचे कौतुक
मुळीच नसलेला) अशा
वृत्तीचा प्रतिनिधी आहे. चिऊ
अर्थातच सुगरण गृहिणी, एक प्रेमळ आई, उबदार घरटे सांभाळणारी दक्ष
गृहस्वामिनी आहे. आज
जरी चित्र वेगाने बदलू लागलेले असले तरी घरातील स्वच्छता, ही आजही बहुतांशी स्त्रीचीच जबाबदारी
असते. स्त्रियांनी
घराच्या स्वच्छतेसाठी निर्माण केलेली शिस्त किंवा व्यवस्था मुळीच न जुमानता, अस्ताव्यस्तपणे वागणारे, इकडे तिकडे
कचरा टाकणारे, 'काऊ'
समाजात मुळीच दुर्मिळ नाहीत.
या गोष्टीतील प्रतिमा सृष्टी अत्यंत सुंदर व
प्रभावशाली आहे. मोठ्ठ्या पावसात उत्तम टिकलेले मजबूत घरटे; त्यातील बाळाला निगुतीने आंघोळ घालणारी
चिऊ; तिचे उबदार
स्वयंपाकघर; तिथली
चूल; भिजकी डाळ; इ.तपशील मनासमोर चित्र उभं करतात. गोष्टीतील काऊ-चिऊचा संवाद (चिऊताई
चिऊताई दार उघड.)कथेला चैतन्यपूर्ण (Live) बनवितो.
काही शतकांपूर्वी बहुतेक ही गोष्ट
कुणा आई/आजीच्या सुपीक प्रतिभेतून निर्माण झालेली आहे. एका उपपत्तीप्रमाणे ती चक्रधर स्वामींनी प्रथम कुणा शिष्याच्या लहान
मुलाला सांगितली होती. पण कथेचा बाज, त्यातील वर्णने, तपशील, काऊला मिळालेली
ढुंगणाला चटका देण्याची शिक्षा इ. सर्व गोष्टी ही कथा कुणीतरी स्त्रीनेच रचली
असल्याची ग्वाही देतात. पूर्वी
स्त्रियांनी लिहीणे/वाचणे हे निषिध्द मानले जाई. 'स्मृतिचित्रे'
पुस्तकामधील लक्ष्मीबाई टिळकांनी त्यांच्या सासूबाईंचा कविता
करण्याबद्दल सासऱ्यांनी केलेला छळ आणि त्याच सासऱ्यांच्या हातून सासूबाईंना आलेला
मृत्यू या बद्दल जे लिहीले आहे ते आजही हृदय हलवून जाते.
ही गोष्ट रचणारी मूळ स्त्री लेखिका, आज काळाच्या पडद्याआड गेलेली आहे. पूर्वी एका घरात एकत्र कुटुंब
पद्धतीमुळे पुष्कळ मुले असत. आज प्रमाणे Toilet training हा
शब्द नव्हता. परंतु
गोष्टीतून शिकवण्याची पद्धत मात्र होती. मूळ लेखिकेच्या नातवंडांनी त्यांच्या
नातवंडाना, आणि त्यांनी
त्यांच्या नातवंडांना सांगत व ऐकत पिढ्यानपिढ्यांपासून ही गोष्ट आज आपल्यापर्यंत
आलेली आहे, म्हणूनच
ती आपला सांस्कृतिक ठेवा आहे हे नक्की.
"That long silence" मधील ‘जया’ प्रमाणेच बहुतेक
नातवंडे ही पूर्ण गोष्ट ऐकायला जागी राहात नाहीत. काऊ-चिऊच्या पहिल्या
प्रश्नोत्तरांमधेच ती झोपलेली असतात. कित्येकांना काऊची ढेरी भाजली होती
हे अंधुक आठवते, पण कां? याचे
तर्कसंगत उत्तर माहीत नसते. त्यामुळे गोष्ट निर्दय, अजब, बोधरहीत वाटू शकते. पण पहा नां! ही गोष्ट मुलांच्या मनावर मुख्य ठसा
उमटवते, तो
भाजलेल्या काऊच्या ढुंगणाचा नाही, तर खूप पावसात ही आंघोळ करून, दूदू पिऊन पाळण्यात निवांतपणे
झोपलेल्या बाळाचा. इथेच
ही गोष्ट नक्की जिंकली आहे असे नाही का वाटत तुम्हांला?
ही खरं तर अगदी माहितीची वाटणारी गोष्ट इतकी मोठी होती हे माहिती नव्हते - रंजकता, अतिशयोक्ती, अद्भूतता - यांचं सुरेख मिश्रण आहे ... आपल्या गोष्टी हा एक मोठा ठेवा आहे - त्यात भर ...
ReplyDelete