कोपेनहेगेन डायरी - १

 


जावे त्यांच्या देशा....

डेन्मार्क एक छोटासा देश, त्याची राजधानी कोपनहेगन. या ठिकाणी माझ्या नवऱ्याची कामानिमित्ताने बदली झाली आणि येथे वास्तव्याचा योग आला. युरोपच्या उत्तरेला स्वीडन, नॉर्वे, डेन्मार्क, फिनलंड हे चार देश Scandinavian किंवा Nordic countries म्हणून ओळखले जातात. त्यातला डेन्मार्क हा सगळ्यात लहान देश. Jutland peninsula आणि अनेक लहान मोठ्या बेटांनी हा देश बनलेला आहे. युरोपातल्या इतर देशांच्या मानाने या देशाची जरा कमीच माहिती मिळाली. Scandinavian देशांच्या प्राचीन संस्कृती व इतिहासावर आधारित Netflix वर येत असलेली "Vikings" ही  सिरियल मुलांच्या सांगण्यावरून इथे येण्यापूर्वी पाहिली. तेवढीच काय ती थोडीफार तोंडओळख या देशाच्या पूर्व संस्कृतीची झाली. या देशांमध्ये अतिशय जास्त थंडी असते, ही तिथल्या हवामानाची प्रमुख ओळख. यामुळे इथे येताना मनात थोडी धाकधूकच होती.


 

कोपेनहेगन हे डेन्मार्कच्या राजधानीचे शहर असले तरी इथला विमानतळ त्या मानाने तसा लहान आहे. म्हणजे साधारण बंगलोरच्या विमानतळासारखा. दिल्ली किंवा मुंबई सारखा मोठा नाही. विमानतळावरून बाहेर पडल्यावर पहिला अनुभव आला तो टॅक्सी ड्रायव्हरचा. आमच्याकडे सामानाचे डाग जास्त असल्याने ते सगळे चढवणे, उतरवणे, ठेवणे कसे काय जमणार याची काळजी वाटत होती. पण टॅक्सी ड्रायव्हर चक्क मदतशीर निघाला. दुसरा ड्रायव्हरही मदतीला आला. कुठे कुरकुर नाही, तक्रार नाही आणि चेहऱ्यावर वेलकम हसू. हाच अनुभव पुढेही काही दिवसांमध्ये यायला लागला. बहुतेक सर्व लोक friendly आहेत. पटकन मदतीला येतात. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतं. जगातल्या सगळ्यात आनंदी लोकांच्या देशांमध्ये आपण पोहोचलो याची त्यामुळेच मनोमन खात्री पटली.

इतर परदेशांप्रमाणे इथे ही माणसं तुरळकच. रस्त्यावर बरेचदा वाहनांच्यापेक्षा जास्त प्रमाणात सायकली फिरताना दिसतात. सायकली चालवणार्‍यांसाठी मोठ्या रस्त्यांपासून ते अगदी छोट्या, छोट्या गल्लींमध्येही वेगळी लेन आढळते. कोपनहेगनमधील ६२% जनता मुख्यत्वे सायकलवरूनच वेगवेगळ्या कामांसाठी प्रवास करते, अगदी ऑफिस साठी सुद्धा. सायकलला दिवे असणं सक्तीचं आहे. पण सायकलस्वारांनी हेल्मेट घालणं मात्र इथे अनिवार्य दिसलं नाही. अनेक सायकली अशाही होत्या, ज्यांना समोर दोन चाकांवर मोठा डबा लावलेला होता आणि ज्यातून मुलं, जड सामान यांची ने-आण होत होती. Cargo bikes म्हणतात त्यांना. सायकलवरून प्रवास करण्याकरता इथे  super highways" पण आहेत. या देशात ग्रीन एनर्जीचे महत्त्व खूप आहे. त्यामुळे सायकल चालवणं हे कार चालवण्यापेक्षा जास्त गर्वाचं मानलं जातं. इथले लोकही तुम्हाला "इथे सायकल चालवणार ना? " असा प्रश्न हमखास विचारतात.

 

नीना वैशंपायन

इतर युरोपियन देशांमध्ये असते त्याप्रमाणे इथे सुद्धा प्रवास करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली आहे. त्यासाठी एकच कार्ड विकत घ्यावं लागतं, जे साध्या ट्रेन, मेट्रो, बसेस आणि फेरीज् करताही चालतं. ट्रेन मधून सायकली नेण्याकरता वेगळ्या डब्यांमध्ये खास व्यवस्था केलेली असते. त्या डब्यात स्टॅन्ड बसवलेले असतात, ज्यात सायकलचं चाक अडकवून ठेवायचं म्हणजे सायकल हलत नाही आणि गाडी चालू असताना पडत नाही. कोपेनहेगन मध्ये फिरण्याचा प्रश्न तर सुटला होता. पुढचा प्रश्न मात्र जरा बिकट होता. 

 

तो म्हणजे भाषेचा. डॅनिश ही इथली भाषा. पण एक लक्षात आलं की बहुतेकांना चांगलं सफाईदार इंग्लिश बोलता येते आणि हुश्श झाले. म्हटलं चला, आपली समस्या सुटली. पण, छे!! इतक्या सहजासहजी सगळे प्रश्न मिटले तर काय हवं !!! बाहेर खायला गेलो तर मेनूकार्ड डॅनिश भाषेत लिहिलेले!!! सुपर मार्केटमध्ये सामान विकत आणायला गेलो तर तिथेही तेच. मग काय गुगल गुरुंच्या पाया पडलो आणि धडाधड डॅनिश मधून इंग्लिश मध्ये ट्रान्सलेशनला सुरुवात झाली. स्थानिक भाषा येणे खरंच किती महत्त्वाचं असतं हे पदोपदी जाणवायला लागलं. जास्त काळ इथे येऊन राहणाऱ्या परदेशी लोकांनी डॅनिश भाषा शिकावी असा इथल्या लोकांचा आग्रह असतो. आणि ते स्वतः पण हे पाळत असावेत बहुतेक!! कारण त्याचा अनुभव आम्हाला तिथे आला.   

 

एक ठिकाणी फिरत असताना अचानक एक  डॅनिश तरुण आमच्या समोर आला आणि "नमस्ते, कैसे हो आप? " असं बोलायला लागला. आमची दांडी गुल!!!  चांगलं छान हिंदी बोलत होता तो. Investment banker असलेला हा तरुण गेली सहा वर्षे मुंबई आणि कोपनहेगन या दोन शहरात वास्तव्य करून आहे. बायको सुद्धा चक्क मारवाडी केली आहे. आणि वरून आम्हाला म्हणतो की,  "आपको तो पता होगा मारवाडी फॅमिली को पटाने के लिए मुझे कितनी तकलीफ उठानी पडी होगी"😍😍

अतिशय सुखद धक्का होता हा.

क्रमश:

 

नीना वैशंपायन




2 comments:

  1. सुंदर प्रवासवर्णन! मी पण काही वर्षे स्वीडनला राहिलो होतो आणि कामानिमित्त नेहमी डेन्मार्कला पण जायचो. स्टॉकहोम ते कोपनहेगन हा ट्रेनचा प्रवास निसर्गरम्य आहे. या सगळ्याची आठवण झाली. पुढील भागांची प्रतीक्षा आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. Neena very nicely narrated.
      It felt good and courageous to listen to your experience. All the best.

      Delete