कटिंग



"अरे थांब ना. एक कटिंग हो जाए."
"नको रे. पाच पन्नासची फास्ट चुकेल माझी. मग जाम गर्दी होते."
"साल्या, तू फर्स्टक्लासने जाणारा! तू असा रडला तर मग आमच्यासारख्या सेकंडवाल्यांचं काय?"
"अरे असं नाही. आमचा पत्त्यांचा ग्रुपच शिफ्ट झाला फर्स्टला गेल्या महिन्यात. मग मी पण केलं शिफ्ट. कंटाळा येतो रे नाही तर."
"काही नाही. लग्न झालं ना तुझं गेल्या महिन्यात? बायको बोलली असेल, लवकर ये. उगाच मित्रांच्या नावाने बिलं नको फाडू. आणि काय रे, पार्टी कधी देतोयस लग्नाची? आज सापडलायस निदान वडा-पाव, चहा तरी खिलव?"

हा बोलत सुटलेला आणि मी ह्याला मनात शिव्या देत होतो. माहिती आहे ना, आत्ताच लग्न झालंय? मग जाऊ द्यायचं ना? मलाही पटकन नाही म्हणता येत नाही कोणाला. नाही म्हणायला शिकलं पाहिजे.

गप्पा, वडा-पाव, कटिंग सगळं वसूल झाल्यावर तो व्हीटीला निघाला आणि मी धावत चर्चगेटला आलो. साडे सहा झालेले. आजही चिडणार. तेवढ्यात फोन वाजला. तिचाच. मेलो!!!!!
"कुठे आहेस तू?" तिचा स्वर रडवेला होता.
"अगं सॉरी, जरा एक मित्र भेटला आणि अडकलो. जस्ट स्टेशनला आलोय..." आता ती ओक्साबोक्शी रडत होती.
"तुझ्या पाचपन्नासच्या फास्टला स्फोट झालाय माटुंग्याला. फर्स्टक्लासमधे. आता प्लीज ट्रेन घेऊ नकोस. देवा. थँक्स थँक्स थँक्स...".. तिचे पुढचे शब्द मला ऐकूच येत नव्हते. मित्राचे आभार मानावेत की आतापर्यंत दोष वाटणाऱ्या, "नाही म्हणता येणाऱ्या" स्वभावाचे आभार मानावेत हे कळत नव्हतं!!
आजही कितीही घाई असली तरी कोणी मित्राने कटिंग चहाला थांबवलं, की कारण देता थांबतो. तो दिवस डोळ्यासमोर पुन्हा जिवंत होतो.
मी जिवंत असल्याचा पुरावा देतो.

मानस.

1 comment: