मार्च पासून कोविडमुळे सर्वांचंच घर एके घर चालू होतं. 'वर्क फ्रॉम होम', 'कॉलेज फ्रॉम होम' आणि साहजिकच माझं ही 'चौपट होम वर्क'. सततच्या ह्या धावपळीमधून सर्वांनाच थोडा बदल हवा होता. कोविडची रिस्क बघता हो-नाही, हो-नाही करत शेवटी आम्ही सर्वानुमते छोटीशी ट्रिप प्लॅन केली. फार गर्दीचंही ठिकाण नको, म्हणून ३/४ दिवस चिकमंगळूर, शृंगेरीला एखाद्या रिसॉर्ट वर किंवा होम स्टे बुक करून निवांतपणे राहून,आराम करुन होऊन परतायचा प्लॅन झाला.
ठरल्याप्रमाणे मुलाच्या परीक्षा झाल्यावर २९ ला सकाळी कारने थंडी, धुक्यात मस्त प्रवास करून चिकमंगळूरला पोहचलो. तिथे गुड्डदा मने होम स्टे मध्ये मस्त राहिलो. घरगुती मंगलोरी पद्धतीचे एकदम पारंपरिक साधं जेवण, बाजूला घनदाट झाडी, मसाल्यांची बाग आणि संध्याकाळी शेकोटी (बॉनफ़ायर) असा सगळा थाट.
दुसऱ्या दिवशी सकाळी जाताजाता फार दगदग न करता फक्त कुद्रेमुख टॉप व्ह्यू बघून शृंगेरीला देऊळ, मठ पाहून परत एका होमस्टेमधे दोन दिवस निवांत राहून घरी जायचे असा साधा सरळ प्लॅन ठरला. बऱ्याचदा आपण ठरवतो एक आणि पुढ्यात वाढून ठेवलेलं असतं वेगळंच.
ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवसाचा आमचा प्रवास छान उत्साहात सुरू झाला. संथ वाहणाऱ्या तुंगा नदीच्या बाजूनेच जाणारा हायवे आणि घनदाट झाडी अशा निसर्गरम्य वातावरणात पुढे धावणारी गाडी. मधे मधे गाडी थांबवून फोटो सेशन ही चालू होतं. असा निवांत प्रवास चालू होता.
एक नदीवरचा पूल ओलांडताना एकदम
कारखाली कसलासा कडकडकड आवाज झाला...टायर पंक्चर झाला असं वाटून गाडी कडेला लावून
आम्ही उतरून बाहेरून सर्व चेक केले. पण कार तर एकदम ठीकठाक दिसत होती. पूल आणि
त्याला सांधलेल्या रस्त्यामध्ये बांधकामाची थोडी गॅप राहिली होती आणि सिमेंटच्या
पुलाची वर आलेली कड कारला जोरात खालच्या बाजूने आदळल्यामुळे असा आवाज आला असावा
असा अंदाज आला. पण कार ही एकदम ठीक, सुस्थितीत चालत होती, त्यामुळे पुढचा प्रवास चालू झाला.
पुढे थोड्या अंतरावर अभयारण्याची
हद्द चालू झाली. कोविडमुळे बाकी सगळे टुरिस्ट स्पॉट्स बंद ठेवले आहेत, त्यामुळे डायरेक्ट
घाट उतरून शृंगेरीलाच जा असं सांगून त्या फॉरेस्ट ऑफिसरनी आम्हाला दीड तासाचा
एन्ट्री पास दिला. घनदाट अभयारण्य असल्यामुळे जंगली जनावरं वाटेत येऊ शकतात
त्यामुळे मध्ये कुठेही न थांबता दीड तासातच घाट उतरून जावा असा सल्लाही त्यांनी
दिला.
पुढचा प्रवास चालू झाला. एकदम घनदाट
जंगलातून जाणारा रस्ता, झाडांची सळसळ, पक्षांचे आवाज असं एकंदरीत आल्हाददायक
वातावरण. सगळं बंद असल्यामुळे तशीही रस्त्याला रहदारीही फारशी नव्हती. चिटपाखरूही
अख्ख्या रस्त्यावर दिसत नसल्यानं मनात थोडी भीती, तर कुठेतरी जंगली जनावरं दिसतील
याची उत्सुकता अशा संमिश्र भावनांनी जंगल सफरीचा आनंद घेत आमची गाडी पुढे धावायला
लागली. वाटेत एकेक पाट्या दिसायला लागल्या..." Elephant zone"🐘🐘, DON'T STOP...."Tiger
Zone" 🐅,🐯DRIVE SAFE".... Bison zone 🐂,
No parking....Deer crossing, king cobra🐍🐍...”
आम्हाला दिसत नसले तरी ह्या
सगळ्यांचं अस्तित्व आजूबाजूला आहे अशी जाणीव होऊन नाही म्हटलं, तरी थोडंसं दडपण आलं. जवळजवळ निम्मं अंतर आम्ही पार केलं
असेल ... तोच एक वानरसेना भर रस्त्यातून निवांत चाललेली दिसली. दहा पंधरा जणांची
ती सेना पाहून गाडी एकदम जपून चालवणं चालू होतं... वानर गॅंग ही उत्सुकतेने
आमच्यावर लक्ष ठेऊन होती.. त्यातले काही जण कार जवळ आमच्या भेटीला
येण्याच्याच तयारीत होते. त्यांना कसंबसं मागे टाकून गाडी एखाद् किलोमीटरभर पुढे
आली असेल आsssणि गाडीतून थाडथाड...धडधड...टर्रर्रर्रर्र खटर्रर्रर्रर्रर्रर्र् खट असे
चित्रविचित्र आवाज यायला सुरवात झाली. आधी वाटलं रस्त्यातली खडी उडत असेल, खडबडीत
रस्त्यामुळे आवाज येत असेल...पण नंतर लक्षात आलं की गाडीतच काहीतरी बिघाड झालाय.
त्यामुळे नाईलाजाने गाडी भर जंगलात बाजूला घेऊन पार्क करून कशामुळे आवाज येतोय हे
पाहणं चालू झालं...वरवर पाहता तर कार एकदम ठीकच दिसत होती. निघण्या आधीच सर्विसींगही
करून घेतले होते ...इंजिन ही सुस्थितीत दिसत होते. पेट्रोल टाकी गळत नाही ना ते ही चेक करून झालं... प्रॉब्लेम काही
लक्षात येईना...मगाशी वाचलेल्या सगळ्या पाट्या आता आठवून धडकी भरायला लागली.
तेवढ्यात मगाचच्या वानरसेनेतल्या एका
अती जिज्ञासू कपीन्द्राचे🐒 लक्ष आमच्याकडे गेले आणि धावतच ते आमच्याकडे
यायला निघाले. बाकीची गॅंग ही त्याच्या मागोमाग येईल की काय अशी लक्षणं दिसायला
लागल्यावर ते पाहून मी आणि अनीश पटकन कारमधे जाऊन बसलो आणि काचा बंद केल्या...पण अनुप कारमधे येऊन बसेपर्यंत त्या
कपीन्द्राने कारवर उड्डाण करून कारचा ताबा घेतला आणि गाडीच्या टपावर जाऊन बसले.
ह्या गडबडीत कारची एक काच उघडी
राहिली आणि त्यातून आत येण्यासाठी त्याची खटपट चालू झाली...हुसकवण्याचा प्रयत्न
केला तर ते दात फिसकारून अंगावर यायला लागले. कसं तरी करून पाच-दहा मिनिटांनी त्याचं लक्ष दुसरीकडे
वेधून घेऊन एकदाचा अनुप कारमध्ये येऊन बसला. काच बंद करून जशी होईल तशी कार चालू
करून हळूहळू पुढे जायला लागलो. तसं ते वानरही कारवरून उतरून गेलं. बाकीची वानरसेना
यायच्या आत कार आहे त्याच स्थितीत हळूहळू दामटवत आम्ही पुढचा रस्ता धरायचे ठरवले.
कारमधून येणारा आवाज तसाच होता...त्यात भरीसभर आता कार थोडी थडथडायला ही लागली
होती. अजून साधारण चाळीस पंचेचाळीस किमीचा प्रवास अभयरण्यातला बाकी होता. फॉरेस्ट
ऑफिसला कॉल करायचा प्रयत्न केला...पण आमच्या कुणाच्याही फोनला ना सिग्नल, ना मोबाईल डेटाला रेंज. त्यामुळे जवळपास कार गॅरेज ही आहे की
नाही ते मॅपवर ही कळेना. सगळं बंद त्यामुळे बाकी कोणी पर्यटकही दिसेनात. शेवटी
देवाचं नाव घेत होता होर्ईल तशी कार ड्राईव्ह करत हळूहळू
घाट उतरायला सुरुवात केली.
"आवडतं ना जंगल आणि प्राणी तुला! सारखी animal planet आणि national geography बघत असतेस. मग कशाला घाबरायचं आणि रामाचा जप करायचा?" इति बाप-लेक.
"मग?? आला होता
ना तो वानर कार वर...हनुमानाच्याच रुपात होता तो ...कार बिघडली आहे येड्यांनो नीट
चालवा आणि धड जावा हेच सांगायला ...कळलं का??" इति मी. शेवटी कसंबसं ड्राईव्ह करत घाट उतरून
आलो. घाट संपताच शृंगेरीला पोहचलो आणि तिथेच लगेच उजवीकडे एक कार गॅरेज दिसले. आणि
आमचा मुठीत धरलेला जीव एकदाचा भांड्यात पडला.
कार खोलून पाहिल्यावर त्यातल्या
एकदोन पार्टस् चे
बरेच तुकडेच झाल्याचं लक्षात आलं. "नशीब तुमचं चांगलं म्हणून इथवर कार
चालवू शकलात,जामच झाली असती." इति कार मेकॅनिक. ते पार्टस् शोध मोहिम चालू झाली.
शृंगेरीसारख्या लहान गावात तर ते पार्टस् मिळतच नव्हते. आणि दुसरीकडून मागवले
तरी मिळायला कमीतकमी दहा दिवस लागणार होते. तरी प्रयत्न करून पाहू म्हणून तो दिवस
गाडी गॅरेज मधेच ठेवावी लागली.
होसामने होम स्टे ला जाऊन सर्वजण रिलॅक्स झालो. सूर्यास्ताच्या वेळेस विद्याशंकर मंदिर, शारदांबेचं दर्शन घेतलं, घाटातून सुखरूप खाली आणलं म्हणून देवाचे मनोमन आभार मानले आणि त्या दिवसाची सांगता झाली.
दुसऱ्या दिवशी पहाटेच उठून शृंगेरी
गावातून फेरफटका मारला. हिरवाईनं नटलेलं छोटंसं टुमदार गाव,...नारळी, पोफळीची झाडं,..कौलारू घरं, कावेच्या
रंगांनी कोबा केलेले व्हरांडे, व्हरांड्यात दोन्ही बाजूने बांधलेले
खांब...प्रत्येकाच्या घरापुढे मारलेले सडे आणि त्यावर रेखलेल्या सुंदर रेखीव
रांगोळ्या...प्रत्येकाच्या दारात असलेली तुळशी वृंदावनं... थोडंस धुकं आणि उगवत्या
सूर्याची अंगणात पडणारी कोवळी किरणं... रस्त्यावर मुक्त फिरणाऱ्या अगदी छोट्या
चणीच्या देशी गाई. आम्हा तिघांनाही गाव फार आवडलं. तिथेच असलेल्या एका छोट्या
टेकडीवरील मंदिरात महादेवाचं दर्शन घेतलं. ओमकारचा जप आणि महादेवाचा अभिषेक चालू
होता. आम्हीही तिथे थोडावेळ ध्यान केले. थोड्या विसाव्यानंतर पुन्हा एकदा जाऊन
विद्याशंकर, शारदाम्बा, तोरणा गणेश यांचं दर्शन घेतलं. शांत चित्त आणि प्रसन्न
मनाने दिवसाची सुरुवात झाली.
आता कार दुरुस्तीचे वेध लागले.
पुढच्या दोन दिवस राहण्याचा प्लॅन कॅन्सल केला. बराच प्रयत्न करून, फोनाफोनी
करूनही ते बिघडलेले पार्टस् काही लगेच मिळणार नाहीत असा अंदाज आल्यावर गाडी दहा पंधरा
दिवस तिथेच ठेवण्यापेक्षा टो करूनच आणण्याचा निर्णय आम्ही घेतला. कोविडची रिस्क
नको म्हणून बसचा प्रवास आम्हाला टाळायचा होता. तसं आम्ही tow सर्विसवाल्याना सांगितले आणि
त्यांच्याच गाडीने आम्हालाही घेऊन जा अशी विनंती केली. पण तशी परवानगी आम्हाला देता येणार नाही असे त्यांनी
सांगितले.
मग राहिला पर्याय... आम्ही ही
आमच्याच बिघडलेल्या कारमध्ये
बसतो आणि आमच्या सकट कार tow करून सोडशील का? असे आम्ही विचारले.
ही आमची विनंती त्याने मान्य केली. अशा तऱ्हेने टुरिस्ट स्पॉट्स बघायला
गेलेलो आम्ही ...लोकांसाठी आम्हीच एक टुरिस्ट स्पॉट बनलो होतो. अशी ही आमची वरात
गावागावातले लोक अगदी थांबून वळून वळून आमच्याकडे आश्चर्याने बघत, पहात मजा घेत होते.
३१ डिसेंबरला रात्रभर प्रवास करून एका
वेगळ्याच अनुभवांची शिदोरी घेऊन नवीन वर्षाची आणि अनीशच्या विसाव्या वाढदिवसाची एक
अविस्मरणीय नवी पहाट उगवली. आम्ही सुखरूप घरी पोहचलो. गाडीलाही
तिच्या डॉक्टरकडे ह्युंदाई सर्विस सेंटरमध्ये tow ऍडमिट केलेय. एकूण पाचसहा अवयवांचं
रिप्लान्ट करायचंय असे त्यांनी सांगितले. सर्व सर्जरीज पार पाडून तीही एकदम ठणठणीत होऊन
पंधरा दिवसात येईलच घरी. पुन्हा नव्याने पुढच्या प्रवासांसाठी सज्ज व्हायला!!!!!!!
सौ.श्वेता अनुप साठये
तेव्हा जरा धडकी भरली असेल पण आता आठवलं की मजा वाटेल! छान अनुभव आणि छान लेख.
ReplyDelete