दिवस घरी हे राहायचे - पुस्तक परिक्षण

 





 (विडंबन कविता संग्रह - अविनाश चिंचवडकर)

'विडंबन' हा काव्यप्रकार सामजिक आणि राजकीय विषयांवर केलेल्या विनोदी कविता आणि गाण्यांमुळे लोकप्रिय आहे. काव्य, गेयता,आणि विनोदी शैलीतील लिखाणाचे भान असलेले असे विडंबनकार आजकाल कमी दिसतात. मूळ रचनेचा गाभा तसाच ठेऊन कोणतीही टीका टिप्पणी न करता, आपली कल्पना विनोदी पद्धतीने मांडणे हे थोडे अवघड असते. बेंगलोर येथील विनोदी लेखक, विडंबनकार अविनाश चिंचवडकर लिखितदिवस घरी हे राहायचेहा विडंबन काव्यसंग्रह नुकताच ऑनलाईन प्रकाशित झाला. मागील वर्षी लॉकडाऊनच्या काळात त्यांनी 'दिवस घरी हे राहायचेहे विडंबन गीत लिहिले. हेमंत साने यांनी ते गायले. यु-ट्यूबवर त्याला प्रचंड प्रसिद्धी लाभली आणि जगभर तब्बल एक लाख लोकांनी ते पाहिले. तसेच ABP माझा वाहिनी आणि न्यू जर्सी येथीलमराठी वैभवया इंटरनेट रेडिओवर ते प्रसारित झाले.

 श्री. अविनाश चिंचवडकर गेली अनेक वर्षे विविध विषयावरील विनोदी कथा, विडंबन काव्याचे लेखन करीत आहेत. ५७ वेगवेगळी गीते आणि कविता यांच्यावरील विडंबनाने भरलेला हा काव्यसंग्रह म्हणजे निखळ मनोरंजनाचा ठेवा आहे. पुण्यातील संवेदना प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते प्रशांत दामले यांची प्रस्तावना या विडंबन संग्रहाला लाभली आहे. करोनाच्या या काळात सक्तीने सर्वांना घरात राहणे भाग पडले. बाहेर कुठे न पडता घरी अनेक दिवस रोजचे तेच तेच जीवन माणसाला नकोसे वाटत आहे. कारण इतर कोणत्या लोकांशी गाठीभेटी नाहीत, संपर्क नाही. फक्त घरी राहणे आणि मनोरंजनासाठी टीव्ही पाहणे आणि वेळच्यावेळी जेवणे असा ठरलेला दिनक्रम सुरु आहे. ही सर्वांची नको झालेली अवस्थादिवस घरी हे राहायचेया गीतामध्ये मांडली आहे. मंगेश पाडगावकरांचेदिवस तुझे हे फुलांचेया गाण्यावर आधारित हे विडंबन.

 

दिवस घरी हे राहायचे

खिडकीच्या बाहेर पाहायचे…

 

घराच्या बाहेर न जाणे!

कंटाळा आला की खाणे,

टी.व्ही.च्या समोर बसायचे!

 

मोजावी घराची खोली

गिळावी भाजी अन पोळी

बायकोचे टोमणे ऐकायचे!

 

वाहन चालवताना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट घालणे ही महत्वाची गोष्ट आहे.पण हेल्मेट सक्तीबाबतची लोकांची नाराजी कशी असते, तेजिंकू किंवा मरूया गीतामध्ये सांगितले आहे. काहीही झाले तरी हेल्मेट न घालण्याच्या परिणाम शेवटच्या कडव्यात कवींनी सांगितला आहे.

 

हेल्मेटवरच्या सक्तीसंगे

युद्ध आमचे सुरु, जिंकू किंवा मरू!!!

 

पुणे आमचे दुचाकीस्वारांचे

धूड शिरावर नको हेल्मेटचे

शीर तळहाती धरू...

 

हानी होवो कितीही भयंकर

अपघातांचे चालो संगर

भले प्राणार्पण करू…

 

गोविंदाग्रज, केशवसुत यांच्यापासून ते अलीकडच्या काळातील सुरेश भट, शांता शेळके, संदीप खरे या सारख्या कवी, गीतकारांच्या रचनांचा समावेश या पुस्तकामध्ये केला आहे.

'येडू सत्तेवरी’, ’शूर आम्ही सरदार’, ’हुरूप उर्फ पुढारयाचे मनोगतया कविता राजकारणी लोकांच्या बेफाम वागण्याचा छान शाब्दिक समाचार घेतात. विं. दा. करंदीकर यांच्या ‘घेणाऱ्याने घेत जावे’ या कवितेवर केलेले ‘घेता’ हे विडंबनकोणाकडून काय घ्यावे हे सांगते. कोविड काळात परदेशात असणाऱ्या नवऱ्यासाठी व्याकूळ झालेली नववधूची व्यथा ‘का धरिला परदेस’ या गीतात मांडली आहे.

आणखी एक विशेष कविता म्हणजेएक फुल आणि सहा कवी’, फांदीवर असलेल्या एका फुलावर एक पक्षी बसतो.आणि ते फूल खाली पडते. या छोटया प्रसंगावर प्रसिद्ध वेगवेगळ्या सहा कवींनी कशा कविता केल्या असत्या याचा उत्तम कल्पनाविलास या कवितेत केला आहे.

 सध्या कोरोनामुळे सर्वजण तणावाखाली आहेत. सगळे लोक या संकटावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. या ताणतणावातून थोडे बाहेर पडून या विनोदी काव्याच्या वाचनाने मनाला थोडा विरंगुळा नक्कीच मिळेल.दिवस घरी हे राहायचेहे पुस्तक रसिकांच्या चेहऱ्यावर नकीच स्मित हास्य आणेल.

 

पवन जोशी






 

(हे नवीन पुस्तक घरपोच मिळवण्यासाठी ह्या फोन नंबरवर 9986196940 किंवा avinashsc@yahoo.com ह्या मेलवर संपर्क साधावा.)

 

1 comment: