दिवेकरांची बेकरी

 

ज्या काळात कऱ्हाडच्या सोमवार आणि शुक्रवार पेठेत पाव खाणं शिष्टसंमत नव्हतं, त्यावेळेस कऱ्हाडला दिवेकर बेकरी सुरू झाली. ही बेकरी अगदी आमच्या घराजवळच होती. पावसर गल्लीच्या शेवटास पाठकांच्या वाड्यात मुख्य रस्त्याला तोंड करून उभी असलेली बेकरी मी माझ्या जन्मापासून पाहतोय. हे लिखाण लिहिताना मला आजही त्याकाळात अनुभवलेला पावाचा खमंग वास जाणवतोय. साठच्या दशकात मी कळता झालो. आमच्या घरात पाव वर्ज्य नव्हता, पण फारसा आणला देखील जात नव्हता. एकदा कुठल्यातरी हिंदी चित्रपटात ब्रेकफास्ट टेबलवर नायकाची आई नायकाला ब्रेकफास्ट म्हणून पावाला सुरीने लोणी लावून देताना मी पाहिली आणि तेव्हापासून माझ्या डोक्यात   दिवेकरांचा पाव आणि घरचे लोणी हे समीकरण बसलं. तो ताजा लुसलुशीत पांढरा स्वच्छ पाव आणि लोणी माझं आवडतं खाद्य झालं. थँक्स टु दिवेकर.

त्या काळात मातकट रंगाचा व्हीट ब्रेड आरोग्यास चांगला असतो अशा खुळचट कल्पना नव्हत्या. दिवेकरांच्या बेकरीत कडक बटर पण मिळायची, पण का कोणास ठाऊक बटर हा पदार्थ सोमवार पेठेतील लोकांना फारसा आवडत नसावा. पुढे मसाला बटर देखील मिळायला लागली, एक-दोनदा खाल्ली देखील मी. पण मी या पदार्थांपासून लांबच राहिलो. बेकरीत पिळाची खारी देखील मिळायची. अनेक शहरं फिरलो पण अशी खारी कुठेच मिळाली नाहीत. कॉलेजला असताना पिळाची खारी आणि मोहनराव उडप्यांच्या विशाल हॉटेलमधील चहा ही मोठी चैन होती.

बेकरीत नानकटाई बिस्किटे पण मिळायची. ही नानकटाई आम्ही चेंज म्हणून खायचो,


नेहमीकरता फक्त आणि फक्त खारीच.
कराड आता आधुनिक वसा घेऊ लागले होते. बदल हा स्थायीभाव असतो. उत्तरोत्तर बेकरीचा व्याप वाढू लागला आणि अनेक नवीन नवीन पदार्थ बेकरीमध्ये मिळू लागले. बेकरी अधिकच गजबजून गेली. बेकरीची मॅनेजमेंट बदलली, मूळ मालक आता स्वत:च्या नवीन जागेतील बेकरीत बसू लागले. बेकरी आता साठ-सत्तर वर्षाची झाली. पिढ्या बदलल्या पण बेकरीतील पदार्थांची चव नाही बदलली.

 

आणि म्हणूनच दिवेकर बेकरी आणि कराडकर हे नातं कायमचं  जोडलं गेलं. एका पिढीने व्यवसाय सुरू करणं आणि तो पुढच्या अनेक पिढीपर्यंत चालत राहणं हे दृश्य तसं दुर्मिळच. दिवेकरांना  हे जमलं, कारण सुरुवातीपासूनच त्यांनी आपल्या व्यवसायात काही तत्व जपली, कोणत्याही गोष्टीत तडजोड केली नाही. अडचणी येत राहणं ही व्यवसायातील अटळ गोष्ट. त्यांनाही अडचणी आल्या पण त्यानी व्यवसायात सचोटी जपली. उच्च दर्जा, माफक नफा या गोष्टींबरोबर  त्यांनी समाजाशी आपली नाळ तुटू नाही दिली.

थोडक्यात काय, कराडमध्ये आज पाव खारी विकणारे खूप झाले आहेत पण खऱ्याखुऱ्या कराडकरांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीला मात्र पाव आणि खारी आवडतात ती दिवेकर यांचीच. म्हणूनच कदाचित माझ्यासारखा पुण्यात स्थायिक झालेला कराडकर जेव्हा कराडला येतो तेव्हा दिवेकर बेकरीला भेट देतो म्हणजे देतोच. आताशी मी कराडला फारसा येत नाही, पण जेव्हा केव्हा यावयास निघतो तेव्हा न विसरता माझा मुलगा मला सांगतो, "येताना दिवेकर बेकरी मधील पिळांची खारी आणावयास विसरू नका." दिवेकरांच्या आत्ताच्या पिढीबरोबर सध्याच्या पिढीचीही नाळ जोडली गेली आहे. काय बरोबर आहे ना?

  

श्रीनिवास कुलकर्णी




1 comment:

  1. गावाकडच्या सुंदर आठवणी! आमच्या अमरावतीला पण अशीच पालेकर बेकरी प्रसिद्ध होती.

    ReplyDelete