दिवाळी अंक-२०२१ काय वाचाल?

 

यंदाच्या दिवाळी अंकांमध्ये खूप वाचनीय साहित्य आहे. खाली मी वाचलेल्या काही दिवाळी अंकांची माहिती देत आहे. 

अनुभव दिवाळी अंक:


 

अनुभवचा दिवाळी अंक नेहमीच खूप दर्जेदार आणि वाचनीय असतो. यावर्षीचा दिवाळी अंकही त्याला अपवाद नाही. या दिवाळी अंकातील मला आवडलेला लेख म्हणजे डॉक्टर अनिल अवचट यांचा 'बहिणाई माझी लाडाची, लाडाची' हा होय. खरंतर बहिणाबाईंबद्दल आपण इतके वाचले आहे की त्यांच्याबद्दल अजून नवीन काय लिहिले असेल असे वाटते. पण हा छोटेखानी लेख मनाला भिडून जातो. जिवंत असताना बहिणाबाईंबद्दल कोणाला माहितीही नव्हती. पण तिच्या मृत्यूनंतर तिच्या मुलाने सोपानदेव चौधरी यांनी त्यांच्या कविता आचार्य अत्रे यांना दाखवल्या आणि जगाला बहिणाबाईंच्या कवितांचे अनोखे दालन उपलब्ध झाले. बहिणाबाईंना लिहिता सुद्धा येत नव्हतं, त्यामुळे त्यांच्या कविता कोणीतरी लिहून ठेवल्या आहेत. पण ही निरक्षर बाई जेव्हा -

मन पाखरू पाखरू

त्याची काय सांगू मात?

आता व्हतं भुईवर

गेलं गेलं आभायात

 

असं विलक्षण लिहिते तेव्हा केवळ थक्क होण्यापलीकडे आपल्यासमोर काही पर्यायच राहत नाही. अनिल अवचट यांचा हा लेख बहिणाबाईंच्या आयुष्याची, कवितांची आपल्याला नव्याने सफर घडवतो.

याशिवाय या दिवाळी अंकात करोनाच्या आणि म्युकरच्या तावडीतून सुखरूप परत आलेल्या मुकुंद कुलकर्णी यांचा 'कोरोना कल्लोळाचे १७० दिवस' हा लेखही डोळे उघडणारा आहे. करोनाच्या काळात रुग्णांना कुठल्या दिव्यातून जावे लागले होते याची ही अदभुत कहाणी आहे.

याव्यतिरिक्त राजेश्‍वरी देशपांडे यांचा अगाथा ख्रिस्तीवरील लेख, प्रीती छत्रे यांचा 'आदिमानवाच्या वाटेवरची पायपीट' हा लेख, सुभाष अवचट यांचा सेल्फ पोट्रेट बद्दलचा लेख, निळू दामले यांचा अँगेला मर्केल यांच्याबद्दलचा लेख असा भरगच्च मजकूर आहे. या माहितीपर लेखनाशिवाय प्रवीण चंपानेरकर, मेघश्री दळवी, मुकुंद कुळे यांच्या कथाही दिवाळी अंकात आहेत. शिवाय दोन अनुवादित कथाही आहेत.

 

लोकमत दीपोत्सव: 


लोकमत दिवाळी अंकातील सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा लेख आहे 'से यस टू लाइफ' ! हिटलरच्या छळछावणीतून सहीसलामत परत आलेल्या ऑस्ट्रियातील ख्यातनाम मनोविकार तज्ञ डॉ. व्हिक्तोर फ्रँकल यांची ही रोमहर्षक कहाणी! हिटलरच्या छळछावणीत संपूर्ण कुटुंब गमावूनही आणि अपरंपार यातना सहन करूनही डॉ. फ्रँकल जिवंत राहिले, एवढेच नाही तर त्यांनी सकारात्मक मानवी ऊर्जेचे रहस्य शोधून काढले. त्यांच्या वडिलांनी सांगितलेल्या 'To God's will, I hold still' हा मंत्र त्यांना प्रचंड छळ यातना सहन करण्याची शक्ती देऊन गेला. या कालावधीत कैद्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले आणि आणि त्यांना जगण्याची नवीन उमेद दिली.

१९४५ साली हिटलरचा पराभव झाल्यानंतर डॉ.फ्रँकल यांच्या सापळारुपी देहाची सुटका झाली. पण त्यांनी या भयावह अनुभवावर आधारित मानसोपचाराची एक नवीन पद्धत विशद केली. तिचे नाव लोगो थेरपी! या पद्धतीचे मूळ आहे जीवनाचे प्रयोजन शोधणे! जर माणसाला जगण्याचे प्रयोजन असले तर तो कितीही विपरीत परिस्थितीत तग धरू शकतो, हे त्यांच्या स्वतःच्या अनुभवावरून त्यांनी सिद्ध केले. हा संपूर्ण लेखच अतिशय हृदयस्पर्शी आणि वाचनीय आहे. एका वेगळ्याच विश्वाची सफर घडवल्याबद्दल लेखिका वैशाली करमरकर अभिनंदनास पात्र आहेत!

या लेखासोबतच हार्वर्ड बिझनेस स्कूलचे डीन डॉक्टर श्रीकांत दातार यांची मुलाखत खूप प्रेरणादायी आहे. एक मराठमोळा माणूस एका जगद्विख्यात प्रख्यात संस्थेच्या प्रमुख पदी कसा पोहोचला त्याची कहाणी खूप रोमहर्षक आहे. त्यांनी मांडलेली 'नोईंग, डुईंग आणि बिईंग' ही त्रिसूत्री पण विचार करण्याजोगी आहे.

याशिवाय के-पॉप या कोरियन संगीताबद्दलचा लेख उत्कंठावर्धक आहे. जगातील तरुण पिढीला या पॉपने वेड लावले आहे. याशिवाय कोरियन सिरीयल पण सध्या प्रचंड लोकप्रिय झाल्या आहेत. वंदना अत्रे यांनी लिहिलेला हा लेख मुळातूनच वाचण्यासारखा आहे. याशिवाय या दिवाळी अंकात भरपूर वाचनीय साहित्य आहे. 

अक्षर:


अक्षर दिवाळी अंकाचे हे चाळीसावे वर्ष आहे. निखिल वागळे संपादक असलेल्या हा दिवाळी अंक अर्थातच खूप वाचनीय आहे. या दिवाळी अंकाचे मुखपृष्ठही खूप वेगळे आहे. अंकाच्या मुखपृष्ठावर पृथ्वीला तोलू पाहणाऱ्या हिटलरच्या भूमिकेत चार्ली चॅप्लिन दिसतो. १९४० आलेल्या 'द ग्रेट डिक्टेटर' या चित्रपटातील चार्लीची ही छबी आहे. फॅसिझमला शंभर वर्षे पूर्ण होत असल्यामुळे हे वैशिष्टपूर्ण मुखपृष्ठ ठेवले आहे.

यानिमित्ताने लोकेश शेवडे यांचा 'रोम, बर्लिन आणि हस्तिनापुर' या लेखात जगभरातील फॅसिझमचा आढावा घेतला आहे. फॅसिझममध्ये घडणाऱ्या क्रूर घटनांचे पाप केवळ त्या नेत्यांचे नसून त्याला साथ देणारी जनता ही तेवढीच जबाबदार असते.

मागील वर्षी डॉक्टर शीतल आमटे यांच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्र ढवळून निघाला होता. आमटे कुटुंबाची वारसदार आणि समाजसेवेचा वसा घेतलेल्या प्रतिभावान शीतलने असे टोकाचे पाऊल का उचलले असावे? हा सगळ्यांना पडलेला प्रश्न होता. 'शीतल नावाचे अशांत वादळ' या लेखात शीतलचे पती गौतम करजगी यांनी तिच्या मनाचा मागोवा घेतला आहे. तिने असा आत्मघातकी निर्णय का घेतला असावा याचा त्यांनी मांडलेला लेखाजोखा अस्वस्थ करणारा आहे. हा लेख अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून जातो. याशिवाय अक्षरमध्ये खूपच वाचनीय मजकूर आहे.

'नोमॅडलँड' या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटाची दिग्दर्शिका क्लोए झाओ हीची ओळख करून दिली आहे मीना कर्णिक यांनी! तिच्या चित्रपटांमध्ये एक वेगळीच अमेरिका पडद्यावर दाखवली आहे.

'बदललेली दुबई' या लेखात विवेक चिटणीस यांनी दुबईची प्रगती गेल्या पंचवीस वर्षात कशी झाली याचे चित्तवेधक दर्शन वर्णन आहे. तसेच बदलत्या अरब विश्वाचे सुंदर वर्णन आहे.

याशिवाय 'नेहरूची त्रिमूर्ती' या लेखात हेमंत कर्णिक यांनी राजकपूर, दिलीपकुमार आणि देवानंद या हिंदी चित्रपटसृष्टीवर दीर्घ काळ अधिराज्य गाजवणाऱ्या नायकांच्या कारकिर्दीचा मनोरंजक आढावा घेतला आहे.

'कहानी दोन उद्योजकांची' मध्ये फाळणीनंतर पाकिस्तान मध्ये गेलेल्या गुलाम मोहम्मद आणि भारतातच राहिलेल्या असिम हासिम प्रेमजी (अझिम प्रेमजी यांचे वडील) या दोघांची अनोखी कहाणी जतिन देसाई यांनी सांगितली आहे. पाकिस्तानात जाऊन गुलाम मोहम्मद यशस्वी झाले नाहीत. पण याउलट प्रेमजींच्या कुटुंबाने मात्र एक नवा इतिहास घडवला.

याशिवाय या दिवाळी अंकात 'कोविड नंतरचे जग' ही विशेष लेखमाला पण आहे. 

महाराष्ट्र टाइम्स:


 'महाराष्ट्र टाइम्स' चा छोटेखानी दिवाळी अंक दरवर्षी सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांपैकी एक असतो, यावर्षी पण हा अंक त्याला अपवाद नाही.

'अफगाणिस्तान कालाय तस्मै नमः' या लेखात तालिबानची सत्ता पहिल्यांदा गेली तेव्हा तेथे मुख्य अर्थ प्रशासक म्हणून काम केलेल्या डॉ. नरेंद्र जाधव यांच्या आठवणी आहेत. तेथील सर्वसामान्य जनतेला भारताबद्दल असलेली आपुलकी पाहून आश्चर्य वाटते.

'माध्यमांतून माध्यमांकडे पाहतांना' हा प्रख्यात अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा लेख पण विचारप्रवर्तक आहे. इंटरनेटमुळे माध्यमांच्या क्षेत्रात किती क्रांतिकारक बदल झाला आहे याचे सुरेख वर्णन त्यात आहे.

स्वानंद किरकिरे हे आपल्याला प्रतिभाशाली गीतकार म्हणून माहित आहेत. 'सुवर्णमयी आनंदयात्रा' या लेखात त्यांनी 'आनंद' या चित्रपटाला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आपले विचार मांडले आहेत. 'आनंद' मधील गुलजार यांनी लिहिलेली आणि अमिताभ बच्चन यांनी म्हटलेली 'मौत तू एक कविता है' सारखी भावस्पर्शी कविता स्वानंदसारख्या गीतकाराला अधिकच भावून जाते. हा लेख आपल्या मनाला स्पर्शून जातो.

दीप्ती नवल ही एक संवेदनशील अभिनेत्री आणि कलाकार म्हणून ओळखली जाते. निसर्ग, चित्र, कविता, लेखन या सगळ्यात रमणारी! तिचा व्यक्त होण्याविषयीचा संवाद 'तब कुछ कहने को जी नही चाहता' या लेखात आहे.

अमोल परचुरे यांचा 'दक्षिणेची ओटीटीवर स्वारी' हा लेखही वेगळा आहे. ओटीटी माध्यमावर दाक्षिणात्य चित्रपटांनी कशी बाजी मारली आहे आणि याबाबत मराठी चित्रपट का मागे आहेत याचा शोध या लेखात घेतला आहे.

'यशाचा यु-ट्युब मार्ग' या लेखामध्ये यूट्यूब च्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या मधुराज रेसिपी, भाडिपा, आपली आजी, दादूस या व इतर अनेक प्रसिद्ध मराठी युट्युब चॅनल्सबद्दल मनोरंजक माहिती आहे. याशिवाय रंगनाथ पठारे, शरणकुमार लिंबाळे त्यांच्यासारख्या मान्यवरांशी साधलेला संवाद ही अंतर्मुख करणारा आहे.

'रविकिरण मंडळाची शताब्दी' हा दासू वैद्य यांनी लिहिलेला लेख, श्रीकांत बोजेवार यांचा 'जनांचा प्रवाह चालला' हा अप्रतिम लेख, मनोज देशमुख यांचा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स बद्दलचा लेखही खूपच मनोरंजक आहे. 

दीपावली: 

'दीपावली' च्या दिवाळी अंकाची एक उज्वल परंपरा आहे. उत्कृष्ट साहित्य हे या दिवाळी अंकाचे वैशिष्ट आहे. अंकाचे मुखपृष्ठ खूप वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. कथकली कलाकाराचे हे प्रकाशचित्र शंभर वर्ष जुने आहे. सध्याचे आघाडीचे लेखक हृषीकेश गुप्ते, गणेश मतकरी, विश्वास पाटील, विवेक गोविलकर, शरद वर्दे यांच्या कथा आणि उत्तम कोळगावकर, वसंत आबाजी डहाके, दासू वैद्य, हेमंत जोगळेकर, महेश केळुसकर, इंद्रजीत भालेराव या व इतर प्रख्यात कवींच्या कविता आहेत.

'मला माझं गाणं गायचं आहे' या लेखात विकास खोले यांनी मास्टर दीनानाथ यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. डॉ. बाळ फोंडके यांचा 'ती आणि तो' हा लेख, सुबोध जावडेकर यांचा 'अशी ही बनवा बनवी' लेख पण खूप माहितीपूर्ण आहे. हे दोन्ही लेख विज्ञानाच्या साह्याने मानवी मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात.

अजून एक वैशिष्ट्यपूर्ण लेख म्हणजे 'मै वही हू' हा नंदिनी आत्मसिद्ध यांचा मोमीन या प्रख्यात उर्दू शायरबद्दलचा लेख!

 

हाय कुछ बात मोमीन

जो छा गयी खमोशी 

किस बुत को दे दिया दिल 

क्यू बुत से बन गये हो 

 

अशी जबरदस्त शायरी लिहिणाऱ्या मोमीनच्या शायरी ची नजाकत वेगळीच!

मनोज आचार्य त्यांचा 'विसाव्या शतकातील तानसेन' हा बडे गुलाम अली खाँ यांच्यावरील लेख पण वाचनीय आहे.

प्रशांत कुलकर्णी यांची व्यंगचित्र मालिका 'दुरूनदर्शन मुद्रांचे' पण खूप मजेदार आहे.

 

फराळासोबत उत्तम लेखन असलेल्या दिवाळी अंकांचा आस्वाद ही मराठी परंपरा आहे. या वर्षीचे दिवाळी अंक आपले भरपूर मनोरंजन तर करतातच, पण आपल्याला वैचारिक खाद्यही पुरवतात.

 

अविनाश चिंचवडकर

बंगलोर



1 comment:

  1. इतक्या छान पद्धतीने लेख प्रकाशित केल्याबद्दल संपादक मंडळाचे मनःपुर्वक आभार!

    ReplyDelete